• संवाद - 1
• स्थळ - दत्त मंदिर
• व्यक्ती - लता आणि सुमा ( गृहिणी )
लता - अगं सुमा थांब की जरा. का पळायलीस कुत्रं मागं लागल्यासारखी. वटपौर्णिमा झाली की काल. आज कसली घाई.
सुमा - बरं थांबले. बोल बाई. काय म्हणतीस.
लता - काल वड पूजायला ती खालच्या गल्लीची नली लंकेची पार्वतीच हून आल्ती की. लग्नात दागिण्यांच्या वझानं वाकून गेलती. सहा महिन्यातच कुटं गेलं बाई हिजं पाटीबर दागिणं.
सुमा - माहित नाही तुला.? बरं ऐक तुला म्हणून सांगते.
तिला म्हणं सासरच्यानी सगळं नकली दागिनं घातलं होतं. तिला जवा कळलं तवा तिनं फेकलं म्हणं त्यांच्या अंगावर. जावू दे बाई आपल्याला काय करायचय.
लता- आणि काय ती सुधावैनी साडी निसून आलती बाई बाई. भिकारीन बरी एकांदी. यावच कशाला म्हंते मी वड पूजायला नवरा बिनलाजंसारखा दुसऱ्या बाईसोबत ऱ्हात असताना.
सुमा - ती जाव दी तू त्या पाटलाच्या राणीच्या अंगावरची पैठणी बघितली का? तेवढ्या गर्दीत पण मी विचारूनच घेतलं. कितीची अन् कुठनं घेतली ती.
लता - ती मांजरवकल्यावनी रंगाची. काय तुला आवडली बाई. वाटत तर हुती का ती राणी पाटलाच्या घरची.
सुमा- मला आवडली बाई. तसलीच पैठणी पवार साडी सेंटर मधी हाय अजून एक. नवऱ्याचा खिसा कापावा लागतोय रात्च्याला. कालपासून नाचायलाय बहिणीच्या पोराचा दहावीत पहिला नंबर आलाय त्याला भिशीच्या पैशातनं घड्याळ घिवून द्यायचय म्हणून.
लता - आमचा नवरा काल ऐन सणाचं सकाळी सकाळी ढूसून यिवून वटवट करत हुता. आईला दोन लुगडी आणतू म्हणून. मी नुसत्या डोळ्यानं दाबून ठिवलं. आधी बायकोला एकादा दागिणा घ्या म्हणलं सणाला. आमी उपास करायचा ह्यांच्यासाठी सात जन्म हाच नवरा मिळू दी म्हणून आणि ह्यांला धरणीला टेकल्याल्या आईला लुगडी घ्यायची बुद्धी सुचणार . मी बरी चालू दिन त्याजं.
सुमा - बरं बास झालं आता. संध्याकाळी जाणारय मी पैठणी आणायला पवार साडी सेंटरमधी. येती का तू.?
लता - होय येते की. आणि अजून एक तुला ती राण्यांची सून दिसली का वडाला आलेली.?
सुमा - नाही गं दिसली. का काय झालं ?
लता - अगं तिनं म्हणं काल वटसावित्रीचा उपवासच केला नाही. तिची सासू किती वटवट करत हुती. कितीबी शिकल्यालं असलं म्हणून ही आसं रीत सुडून वागायचं असतय व्हयं. काय वळण लावलं बाई आईनं. सासूच्या डोक्यावर चांगली मिऱ्या वाटायला आली की.
सुमा - चल घरी जाऊ दी आता. नाहीतर माझी सासू माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायची. भेटू संध्याकाळी. आज गुरूवार म्हणून म्हणलं सकाळी सकाळी दत्ताचं दर्शन घिवून यावं.
• संवाद - 2
• स्थळ - बस सँड.
• व्यक्ती - पूजा आणि रेश्मा ( नोकरदार स्त्रिया )
पूजा- अगं बाई रेश्मा काय सुंदर मेहेंदी काढलीयस. वटपौर्णिमा जोरात साजरी झालेली दिसतेय काल. आणि काय रंग चढलाय मेहेंदीला. अहोंचं फारच प्रेम उतू चाललय वाटतं. आँ आँ.
रेश्मा - कशाचं काय पूजा. माझी अजिबात इच्छा नव्हती असले पारंपरिक उपवास वगैरे करायची आणि वडाला फेरे मारायची. पण सासूबाईंसाठी करावा लागला.
पूजा - हा काय नवीन प्रकार आता. तू नवऱ्यासाठी उपवास धरलास की सासूसाठी?
रेश्मा - सासूबाईंनी परवा जवळ बोलावून घेतलं. स्वतःची पैठणी माझ्या हातावर ठेवली आणि फार हळव्या होत बोलायला लागल्या. " रेश्मा मला माहीत आहे आजकालच्या शिकलेल्या पोरींचा काय अशा उपवासांवर विश्वास नसणार. पण ही तुझी पहिली वटपौर्णिमा. पुढच्या वर्षी करू नकोस. पण एवढं वर्ष माझ्यासाठी कर. यांनी मला ही वटपौर्णिमेला घेतलेली साडी पण वेळच नाही आली गं ही साडी नेसून वडाला जायची. त्याआधीच हे गेले. तेव्हापासून मी वाट बघत होते. माझ्या सुनेनं तिच्या पहिल्या वटपौर्णिमेला ही साडी नेसून वडाला जावं म्हणून. हे बघ तुझ्यावर लादत नाही मी काहीच. तुला योग्य वाटेल ते कर." असं म्हणून रडायलाच लागल्या अगं. मग मलाही नाही म्हणता आलं नाही. आणि या मेहेंदीचं म्हणशील तर सासूबाईंनीच हौसेने पार्लरवाली बोलावलेली मेहेंदी काढायला परवा.
पूजा - हं असा इमोशनल लोचा झाला तर. मग तुझ्या नवऱ्याला सांगायचं नं उपवास नाही करायचा म्हणून. त्याने काय ते बघून घेतलं असतं नं.
रेश्मा- नवरा आणि मी बोललो या विषयावर. तो म्हणाला तुला हवं ते कर. तुझ्यावर काही जबरदस्ती नाही. मग शेवटी मीच म्हटलं सासूबाईंना या वयात दुखावायला नको. आणि वरून त्यांना बीपीचाही त्रास.
पूजा- हम्म. आधी स्वतः पायावर धोंडा मारुन घेतलास आणि आता का कण्हतेयस मग. सासू खूश. नवऱ्यालाही बरंच वाटलं असणार आईला खूश बघून. मग आता जरा पाॕझिटीव्ह विचार कर. त्या निमित्तानं स्त्रियांना नटायला मुरडायला मिळतं. मस्त साडी नेसून, दागिने घालून मेकअप करून स्वतःला आरशात बघितलं असशील ना काल. काही क्षण का होईना सुखावली असशीलच की बयो. झालं तर मग.
रेश्मा - हम्म. ते आहे गं.
पूजा - मग चिल मार. ती बघ माझी बस आली. आणि हो कालचे तुझे मेकअप-शेकअपवाले फोटो सेंड कर गं वाॕट्सअपला. आणि तुझ्या सासूबाईंना येते भेटायला पुढच्या आठवड्यात. बाय.
• संवाद - 3
• स्थळ - महाविद्यालय लेडीज रूम
• व्यक्ती - मीरा आणि सायली ( विद्यार्थिनी)
मीरा - सायली ती बघ आपल्या महाविद्यालयाच्या आवारातल्या वडाच्या झाडाची काय अवस्था करून ठेवलीय वडाला पूजणाऱ्या स्त्रियांनी. आता कुठे चांगलं फोफावत होतं झाड. लगे तोडून नेल्या सगळ्या कोवळ्या फांद्या.
सायली - आमच्या मदरनेही काल कुठूनतरी वडाची फांदी तोडून आणलेली. वाईट वाटलं यार. या बायांना ना सणांमागचं शास्त्रीय महत्त्वच माहीत नाहीय.
मीरा - ते सत्यवान-सावित्रीच्या दंतकथेवर फुकाच्या गप्पा झोडत बसण्यापेक्षा वडाच्याच झाडाला का फेऱ्या मारतात एवढा साधासा जरी विचार केला ना तर आपली उद्या मोठी होणारी कितीतरी वडाची झाडं वाचतील.
सायली - मी ही आईला काल तेच सांगितलं जे आपल्या बॉटनीच्या सरांनी वडाच्या गुणवैशिष्ट्यांविषयी सांगितलं होतं.
मीरा - हो खरय गं सायली पण वडाच्या झाडाच्या फांद्या निर्दयीपणे तोडून आपली धार्मिक पारंपरिक हौस पूर्ण करणाऱ्या स्त्रियांचे कान कुणी टोचावेत.?
सायली - कुणी टोचो नाहीतर नाही आपण मात्र ही असली पारंपरिक लोढणी गळ्यात बांधून नाहीत घ्यायची. आणि काय म्हणे तर हाच नवरा सात जन्म मिळू दे. इथे पोरींना एकच बाॕयफ्रेड सात महिने काय सात आठवडेही चालत नाही. त्या रीयाच्या बगलेत बघ आज नवाच हिरो दिसतोय.
मीरा - जोक्स अपार्ट. पण बघ उद्या आपण लग्न करू तेव्हा कुणी कितीही इमोशनल ब्लॕकमेल केलं अथवा अजून काही. ज्या धार्मिक गोष्टींनी पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे असल्या गोष्टींची कधीच पाठराखण करायची नाही.
सायली - चल यार. ते ओकंबोकं वडाचं झाड बघून डोकं तापलय माझं. घरी जाताना जिथं कुठं वडाच्या सूत गुंडाळलेल्या फांद्या असतील ना त्या उपसून आणून घराच्या आवारात लावणार बघ.
मीरा - वाहहह..!! आत्ता खरी शोभतेस बघ बाॕटनीची स्टुडंट. चल इस बात पर एक गरमागरम वडापाव हो जाऐ!