"आमच्यात की नाई आम्ही प्रतिदिनी सोवळ्यात स्वयंपाक करूनच देवाला नैवेद्य दाखवतो बरं का? आणि बाई सणावाराला तर सांगूच नका. त्या दिवशी तर आम्ही दुसऱ्या जातीच्या माणसाला उंबऱ्याच्या आतसुद्धा येऊ देत नाही. (शक्य असते तर गेटबाहेरच उभे केले असते, पण काय करावे धुणीभांडी थोडीच गेटबाहेर करता येतात आणि झाडलोटसुद्धा गेटआतलीच करावी लागते की हो.) आणि आम्हाला धुण्याभांड्याठी, फरशी, झाडलोट यासाठी चालतात खालच्या जातीच्या बायका पण स्वयंपाकासाठी नाही हो चालत. किचनमध्ये आम्ही आमच्याच जातीची बाई प्रिफर करतो." मेधा खोले यांचं प्रकरण ऐकल्यापासून मला कधीकधी कानावर पडलेले असे संवाद हटकून आठवायला लागले आहेत. हवामान खात्याच्या विद्यमान (?)  माजी संचालिका मेधा खोले ( सॉरी सॉरी डॉ.मेधा खोले) यांनी त्यांच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या बाईंवर जात लपवून सोवळे मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. "पुणे तेथे काय उणे" म्हणतात तर पुण्यात हेच उणे बघायचे राहिले होते, असो.खोले बाई उच्चशिक्षित आहेत, (?) काही काळ मोठ्या पदावर कार्यरतही होत्या. त्यांचा धर्म बाटला, त्यांचा देव बाटला म्हणून त्यांनी संबंधित बाईंवर गुन्हा दाखल केला. त्यांचा तरी काय दोष म्हणा मागील काही वर्षांमध्ये बहुतांश लोक आणि त्यांच्या जातीय, धार्मिक अस्मिता अधिकाधिक कट्टरतेकडे वाटचाल करत आहेत आणि काही संघटना, राजकीय शक्ती अशा अस्मितांना खतपाणी घालण्यातच आपल्या शक्ती खर्च करत आहेत. या सगळ्यांप्रमाणे खोलेबाईंचा देवही तितकाच कट्टरवादी असावा. तर निर्मला नावाच्या बाई खोलेबाईंकडे सणावाराच्या वेळी स्वयंपाकाला यायच्या. नैवेद्याचा स्वयंपाकही त्याच करायच्या. सहा-सात वेळा त्यांच्या हातचा नैवेद्य खोलेबाईंच्या देवाला दाखवला गेला. "ज्या बुवांनी मला खोलेबाईंशी जोडून दिले त्यांनीच माझे आडनाव कुलकर्णी असल्याचे खोलेबाईंना सांगितले असावे, कारण मी स्वतःहून कधीही माझी जात ब्राह्मण असल्याचे खोलेबाईंना सांगितले नाही," निर्मला बाईंचे हे म्हणणे आहे. तर खोले बाई म्हणतात,  "निर्मला बाईंनी स्वतःची जात लपवली, आमच्याकडे काम मिळवले, आणि आमचा देव बाटवला." एका उच्चशिक्षित ज्येष्ठ महिलेचे असे प्रतिगामी वर्तन पाहून मला तरी तिची कीवच वाटते आहे. आणि विशेष म्हणजे या बाई हवामान खात्याच्या संचालिका राहिलेल्या आहेत. (लोकांचा हवामान खात्यावरचा विश्वास का उडत चाललाय हे आता कळले बरं) त्या बाईंच्या विचारात-वर्तनात आणि शिक्षण नोकरी यात भयानक विरोधाभास पाहायला मिळतोय. या प्रकरणाच्या अनुषंगानं मला परवाचाच एक किस्सा आठवतोय. माझ्या ओळखीत धुणीभांडी करणाऱ्या एक लिंगायत (धर्म म्हणावं की जात हा ही प्रश्नच) बाई आहेत. गौरी-गणपतीच्या दिवसात त्या घरीच निवांत बसलेल्या दिसल्या. मी त्यांना विचारलं, " मावशी गणपतीपासून तुम्ही घरीच दिसताय. काम नाही काय? का सणाला सुट्टी दिली मालकिणीनं?" तसं त्या म्हणाल्या, " कुठली सुट्टी अन् काय मालकिणीनं सांगितलं दहा-बारा दिवस कामावर येऊ नको, आमच्यात गौरी-गणपती आहे.". "मागच्या वर्षी तर तुम्ही या दिवसात गेलतात की कामावर. मग यावर्षीच का त्यांनी येऊ नका म्हणून सांगितलं?" "गेल्या वर्षी आमच्या पोराचं लग्न नव्हतं झालं, यावर्षी झालंय. त्यांना चालत नाही तर आपण काय करणार " "तुमच्या पोराच्या लग्नाचा आणि तुमच्या मालकिणीनं तुम्हाला कामावर नका येऊ म्हणण्याचा नेमका संबंध काय?" "मी हाय ओ लिंगायत पण माझ्या पोरानं महाराच्या पुरीसंगं लग्न केलंय की. शिवताशिवत हुती म्हणं घरात. आम्हाला देवधरम करायचाय तर नका येऊ सांगितलं." मावशींच्या या उत्तराने मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि विशेष म्हणजे धक्का याचा अधिक बसला की मावशीची मालकीण शिक्षिका आहे. हवामान खात्याच्या सेवेत राहिलेल्या खोलेबाई आणि या शिक्षिका यांच्या विचारात मला काडीचाही फरक जाणवत नाही. उलट उच्चशिक्षित असूनही जातीधर्माच्या नावाने माणसा-माणसात भेद करत अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या त्यांच्या विकृत विचारांची कीवच येते. मावशी अल्पशिक्षित असूनही दलित मुलगी सून म्हणून आनंदाने स्वीकारली म्हणून त्यांचे कौतुक वाटते. आमच्या गावाकडे एक वाक्य बऱ्याचदा ऐकायला मिळतं ते म्हणजे, "शिकलेलेच जास्त हुकलेले असतात." असे प्रसंग घडले की हे वाक्य मला तंतोतंत खरं वाटायला लागतं. भांडी घासायला, फरशी पुसायला, साड्या, ड्रेस, पाय-पुसण्यापासून ते चड्ड्या, ब्रा पर्यंतची धुणी धुवायला चालतात यांना दलित, मातंग, मराठा बाया. (त्या बायांच्या कामाचा मोबदला देतात हे खरचंय, पण तो किती असतो हा संशोधनाचा विषय आहे). आम्ही आमच्या कामवाल्यांशी कसे माणुसकीने वागतो (जणू खूप मोठे उपकारच करतो त्यांच्यावर). त्यांच्या मुलामुलींना कशी शिक्षणात मदत करतो. (आहे आहे यासाठी तुमचं कौतुकच आहे.) वगैरे वगैरे वाक्ये सतत कानावर आदळतात. पण मग जेव्हा तुम्ही जातपात बघून भेदभाव करता, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तेव्हा कुठे जाते तुमची माणुसकी. खोलेबाई एक प्रातिनिधिक नमुना आहे. उच्चभ्रू, उच्चशिक्षितांमधल्या अशा शेकडो खोलेबाई प्रत्येक शहरात सापडतील. मग ते पुणं असो नाही तर सोलापूर. अजून एक उपस्थित केला गेलाय तो म्हणजे या प्रकरणात गुन्हा दाखल करणारी ही बाईच आहे आणि जिच्यावर हा सोवळं मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तीही बाईच आहे. "बाईच बाईची कट्टर शत्रू असते," काही लोकांकडून या वाक्याचा उच्चार वारंवार कानांवर पडतो. आणि ही गोष्ट संपूर्णपणे नाकारताही येणार नाही. बाईने बाईचे शोषण केलेय हे जरी खरे असले तरी बाईने बाईचा उद्धारही केलाय, हेही विसरता येणार नाही. निर्मलाबाईंच्या ठिकाणी एखादा पुरुष असता तरी काही खोलेबाईंनी त्यांची जातीयावादी तलवार म्यान नसती केली. सो हा मुद्दा या ठिकाणी गौण ठरतो. पुरुष आहे म्हणून छोड दिया जाय आणि बाई आहे म्हणून मार दिया जाय असं काही जातीयवादी लोकांचं धोरण नसतं. एकीकडे उजव्या विचारसरणीला कडवा विरोध करणाऱ्या पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या होते आणि दुसरीकडे सनातनी विचारांची एक उच्चशिक्षित बाई सोवळंओवळं, देवधर्म अशी तद्दन फाल्तू गोष्टींच्या आहारी जाऊन एका वयस्कर बाईंवर आमचा देव बाटवला म्हणून आरोप करतेय. यार, या देशात चाल्लय काय? आपण सुरक्षित राहावं म्हणून वाहतुकीचे नियम आपल्याला नेहमीच डाव्याबाजूने चालण्यास सांगतात. उजव्याबाजूने चालले तर अपघाताची शक्यता अधिक असते. पण आपल्या देशातलेच नियम असे सांगतात की "तुम्ही डाव्या बाजूनं चाललात तर आम्ही तुमची गोळ्या घालून हत्या करू आणि उजव्याबाजूने चाललात तर तुमचा उदोउदो करू." याच प्रतिगामी लोकांच्या जिवावर मेधा खोले नावाच्या बाई माती खातात. असो, जिकडं वारं तिकडंच फुफाटाही जात असतो असं आमची आज्जी म्हणायची. कविता ननवरे, सोलापूर (लेखिका सोलापूरमधील शिक्षिका आहेत.) kavitananaware3112@gmail.com कविता ननवरे यांचा आधीचा ब्लॉग

BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!