वेळ - रात्रीचे अकरा ------------------------------
ती : कधीपासून फोन करतेय मी. उचलत का नव्हतास. किती काळजी वाटली माहितय. कुठे ठेवला होतास फोन?
तो : जवळच होता. सायलेंट मोडवर ठेवलेला. दिसलेत मला तीस मिनिटांत पस्तीस मिसकॉल पडलेले. काही महत्वाचं बोलायंय का बोल पटकन.
ती : एकतर दिवसभरात एकही कॉल केलेला नाहीयेस. किंवा साधा एक मेसेजही केलेला नाहीयेस. आणि आता म्हणतोयस पटकन बोल म्हणून.
तो : तुला काल रात्रीच सांगितलेलं आज माझी महत्वाची मिटींग होती बॉस बरोबर. तुझ्या लक्षात कसं राहत नाही. आणि एखादा दिवस नाही केला मेसेज फोन तर काय बिघडलं.
ती : तुझ्याशी बोलण्यात न् काही अर्थच नाहीय.
तो : नको बोलूस न मग ठेव फोन.
ती : तुला तेवढंच पाहिजे ना. कळलंय आता मला. तुला ना आधीसारखा इंट्रेसच नाही वाटत माझ्याशी बोलण्यात.
तो : दुसरी ही महत्वाची कामं असतात. आणि हो सारखं सारखं काय अस्तं बोलायचं.
ती : माझ्यापेक्षा तुला काम महत्वाचं वाटतं. कामच करत बस.
तो : आता तू मला अधिकचं इरिटेट करू नको. झोपतो मी माझं डोकं दुखतंय.
ती : काय झालं? वेळेवर जेवला नाहीस का? का पावसात भिजलास? तुला हजारदा सांगितलंय छत्री घेऊनच बाहेर पडत जा. गोळी घे असेल तर किंवा बाम लाव.
तो : फक्त डोकं दुखतय गं. किती सूचना देतेयस. झोपतोय मी आता. तू ही झोप. बोलू सकाळी. बाय.
ती : बाय. टेक केअर. मिस यू. लव यू.
तो : हं. गुड नाईट. ------------------------------
वेळ - पहाटेचे तीन
ती : तू अॉनलाईन काय करतोयस. डोकं दुखतंय नं तुझं.
तो : हं. मित्राशी बोलतोय गं मिटिंगबद्दल. झोप तू.
ती : मित्राशीच नं नक्की.
तो : नाही मैत्रीणीशी बोलतोय. झालं समाधान?
ती : तरीच
तो : तरीच काय तरीच. गैरअर्थ काढायची सवयच लागलीय तुला.
ती : आणि तुला खोटं बोलायची.
तो : काय खोटं बोललोय मी.
ती : हेच ना. झोपतो म्हणालास आणि जागा आहेस. ते ही अॉनलाईन.
तो : झोप नाही लागली त्याला मी काय करू?
ती : मला काळजी वाटते रे. तिथं नाहीये नं तुझी काळजी घ्यायला कुणी.
तो : मी लहान बाळ नाहीय. आपण आपली काळजी घ्यायला सक्षम असावं.
ती : हम्म. झालं का डोकं दुखायचं कमी. आणि प्लिज जागरण नको करूस ना.
तो : होईल कमी. तू झोप. बाय.
ती : टेक केअर.बाय. आणि जागू नकोस जास्त.
------------------------------
वेळ - दुसरा दिवस सकाळचे नऊ
ती : गुड मॉर्निंग. राहिलं का डोकं दुखायचं?
तो : गुड मॉर्निंग. नाही अजून कमी झालं.
ती : केलस नं जागरण. आता आल्याचा चहा घे. बरं वाटेल आणि आंबट किंवा अॉयली वगैरे काही खाऊ नकोस निदान आज तरी का मी घेऊन येऊ डबा अॉफिसवर.
तो : नको नको. मी खाईन लाईट काहीतरी. बरं. मला अॉफिसला उशीर होतोय निघतो मी. बाय.
ती : बाय. सी. यू.
------------------------------
वेळ - दुपारचा एक
ती : वाटतंय का काही कमी?
तो : काय?
ती : डोकं?
तो : हो आहे जरा कमी.
ती : खाल्लयंस का काही?
तो : हो समोसा खाल्लाय.
ती : काय हे? तुला सकाळीच सांगितलं ना. अॉयली काही खाऊ नको म्हणून.
तो : माझं डोकं दुखतय. मला खोकला नाही लागलेला. प्लिज तू माझी डॉक्टर बनू नकोस.
ती : तरी काळजी घ्यावी आपण.
तो : हं.
ती : हं काय हं. मी मूर्ख म्हणून तुझी काळजी करतेय. घे तब्येत बिघडवून अजून.
तो : बाई माझं फक्त डोकं दुखतय मला ब्रेन ट्युमर नाही झालेला.
ती : अरे असलं काय अभद्र बोलतोयस. तुला काहीच कसं वाटत नाही असं बोलताना.
तो : आता रडून माझा मूड खराब करू नकोस. मला खूप काम आहे अॉफिसमध्ये.
ती : जा तुला नाही कळणार.
तो : बरं. ठेवतोय फोन मी. लंचटाईम संपला माझा. बाय.
------------------------------
वेळ - सायंकाळचे पाच
ती : निघालास का अॉफिसमधून? झालं न पूर्ण कमी डोकं दुखायचं?
तो : हो बरचसं कमीय आता.
ती : अॉफिसवरुन जाताना मी येऊ का घरी?
तो : कशाला.
ती : कशाला म्हणजे काय? भेटायला.
तो : आज नको. मित्रांचं ठरलंय भेटायचं.
ती : हम्म. तुला मित्रांना भेटायला वेळ आहे आणि मला नाही.
तो : तुला आठवत नसेल तर सांगतो. आपण भेटून दोन दिवसच झालेत. महिना दोन महिने झालेत असं का वागतीयस.
ती : हम्म. बरं.
तो : चल करतो कॉल रात्री. बाय.
ती. : बाय. सी. यू. ------------------------------
वेळ - रात्रीचे दहा
ती : तू रात्री कॉल करतो म्हणालेलास ना. शेवटी मीच केला.
तो : हो म्हणालेलो पण कामात विसरलो. आणि तू केलास तर बिघडलं कुठे?
ती : जावू दे काय करतोयस.?
तो : काम करतोय.
ती : कामात तुला माझी आठवणही येत नाही नं?
तो : कॉन्सनट्रेशनने केलं तरच काम चांगलं होतं.
ती : माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर चालतय नं?
तो : हे बघ माझा भांडणाचा मूड नाहीय. मला उद्या प्रोजेक्ट सबमीट करायचाय.
ती : ओके ओके. नाही भांडतेय. झालं का डोकं दुखायचं कमी.
तो : होय. बऱ्यापैकी.
ती : गुड. पण एखादी गोळी घे आजही. आणि होता होईल तेवढं लवकर झोप. उगाच जागत बसू नको. आणि थंडीत बाहेर नको जाऊस. थंड पाणी सुद्धा पिऊ नकोस.
तो : हे बघ. स्वतः इतकं पझेसिव व्हायची आणि मलाही इरिटेट करायची अजिबात गरज नाहीय. मी ओके आहे. मी उशीरपर्यंत काम करत बसेन. डिस्टर्ब करू नकोस बाय.
ती : हम्म. बाय.टेक केअर.
------------------------------
वेळ - पुढचा दिवस सकाळचे आठ
ती : गुड मॉर्निंग. कसा आहेस?
तो : एकदम फ्रेश.
ती : आज जरा कणकणी वाटतेय अंगात.
तो : कालचं जरासं काम पेंडींग आहे. लवकर उठून करत बसलोय.
ती : हम्म. ओके.
तो : बाय. बोलू दुपारी. ------------------------------
वेळ - दुपारचे दोन
ती : जेवलास का? काय करतोयस?
तो : हो जेवलो. तू?
ती : खाल्लं थोडं. काही खावंसं वाटेना. अंग दुखतंय सकाळपासून आणि आता डोकंही दुखायलंय.
तो : वेट मला मित्राचा फोन येतोय. बोलतो पुन्हा. ------------------------------
वेळ - रात्रीचे नऊ
ती : कुठेयस ? काय करतोयस ? जेवलास का ?
तो : हो जेवलो.. तू काय करतीयस ? जेवलीस का ?
ती : भूक नाहीय आज. खाईन काहीतरी थोडंफार. डोकं भणभण करतंय.
तो : माझं डोकं एकदम व्यवस्थित आहे आता. एखादी फिल्म बघत बसेन.
ती : माझं डोकं दुखतंय म्हणतेय मी. तुझं नाही विचारलं.
ती : दुसऱ्याचं डोकं कमी खावं नं मग.
ती: तू नं खडूस आहेस. प्रचंड.
तो : शांत झोप आता. उद्या संध्याकाळी सहा. नेहमीचं कॉफी शॉप. बाय.
- कविता ननवरे.