"भारत हा बलात्काऱ्यांचा देश आहे." होय हे धाडसी विधान मी अत्यंत विचारपूर्वक आणि जबाबदारीने करत आहे. कान आणि डोळे उघडे ठेवून बघणाऱ्या, ऐकणाऱ्या कुठल्याही संवेदनशील 'माणसाचा' या विधानावर आक्षेप असणार नाही. या देशातील रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात बलात्कारी लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्त्रिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी दबा धरून बसलेल्या आहेत.


एक स्त्री म्हणून जगताना या बलात्काऱ्यांच्या देशात मला प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी असुरक्षित वाटतंय. भीती वाटतेय उद्याच्या दिवशी कठुआ बलात्कार पीडितेसारखी, निर्भयासारखी सामूहिक बलात्काराची शिकार मी तर ठरणार नाही ना? कारण आता हा देश संतांचा राहिला नाही, महंतांचा राहिला नाही, जवानांचा राहिला नाही आणि किसानांचा तर नाहीच राहिला, तर हा देश उरलाय केवळ बलात्काऱ्यांचा, नुसत्या बलात्काऱ्यांचा नाही तर निर्भीड बलात्काऱ्यांचा. या देशातली प्रत्येक बाई आजघडीला गर्भापासून सरणापर्यंत, घरापासून मंदिरापर्यंत कुठेच एका सेकंदासाठीही सुरक्षितता अनुभवू शकत नाही. या देशातील प्रत्येक स्त्रीला आता हे भीतीदायक सत्य स्वीकारण्याशिवाय तरणोपाय नाही.

या देशात धर्माधर्मांतील वादात एका निष्पाप चिमुरड्या मुलीला निशाणा बनवून तिच्यावर देवाची पूजा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याकडून, त्याच्या साथिदारांकडून मंदिरातच सामूहिक बलात्कार होतो. ( भारतातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्त्रीला मासिक पाळीच्या काळात प्रवेश निषिद्ध आहे.) आठ वर्षाच्या कोवळ्या मुलीवर मंदिरात अनन्वित शारीरिक अत्याचार करणाऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ लोकांचे जत्थेच्या जत्थे हातात तिरंगे घेऊन रस्त्यावर उतरतात. बलात्कार पीडितेला वकील मिळू नये म्हणून प्रयत्न केले जातात. केस लढू इच्छिणाऱ्या वकील महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली जाते. या देशात बलात्कार पीडितेचा जात-धर्म बघून गुन्हा नोंदवून घ्यायचा की नाही ते ठरवलं जातं. या देशात समाजाच्या कल्याणाची ग्वाही देणारे लोकप्रतिनिधीच बलात्कार करतात. जनतेच्या रक्षणाची धुरा खांद्यावर असलेले पोलिस अधिकारी बलात्कार करतात. या देशातील सरकार अशा गुन्ह्यात दोषी असलेल्यांना पाठीशी घालतं. या देशात पोलिस स्टेशनमध्ये केस दाखल करण्यासाठी गेलेल्या बलात्कार पीडितेच्या वडलांना मरेपर्यंत बेदम मारहाण केली जाते. अश्लील प्रश्न विचारून बलात्कार पीडितेचा अवमान केला जातो. तिच्या शरीराची विटंबना केली जाते. या देशात बलात्कारी बाबाबुवांच्या निर्दोष मुक्ततेसाठी त्यांचे अनुयायी रस्त्यावर नंगानाच करतात आणि अशा अमानुष घटनांवेळी देशाच्या महिला लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसतात. पंतप्रधान पदावर असलेली व्यक्ती सायलंट मोडमध्ये गेलेली असते. एक योनी आणि दोन स्तन असलेल्या बलात्काराच्या बळी ठरलेल्या तमाम बायांसारखी मी ही एक बाईच आहे म्हणून मला भीती वाटतेय माझ्या बाई असण्याचीच.

आजही इथल्या हिंदूत्ववाद्यांकडून गाईची यथासांग पूजा केली जाते आणि बाई मात्र सरेआम नागवली जाते. या देशात 'बेटी बचाव'चे नारे देत मुलींचं महत्त्व अधोरेखित करण्याचं निव्वळ ढोंग केलं जातं. या देशात तेरा दिवसाच्या अर्भक असणाऱ्या बाळापासून ते सत्तर ऐंशी वर्षाच्या वृद्धेपर्यंत वासनांध नराधमांच्या तावडीतून कुणाचीही सुटका नाही, हे वासनांध लोक त्यांच्या हत्या करून रक्ताचे टिळे कपाळी लावून विजयोन्मादात राजरोसपणे फिरतात. या देशात बलात्कार करणाऱ्यांच्या, बलात्काराला प्रवृत्त करणाऱ्यांच्या ( तो कितीही मोठ्या पदावर असला तरी) पदाला कुणीही धक्का लावू शकत नाही. या देशात सरकारविरोधात ब्र काढणाऱ्या बाईला योनीत गरम सळया खूपसून जिवे मारण्याची धमकी दिली जाते. बाईला देवी, माता समजून तिचा आदर करण्याचा इतिहास असणाऱ्या या देशात आजघडीला मात्र बाईच्या अब्रूचे मात्र धिंडवडे काढले जातात. म्हणून या देशात बाई म्हणून जगताना मला माझ्या बाई असण्याचीच भीती वाटते. प्रचंड भीती वाटतेय.

खरं तर या देशाला योनीपूजेची मोठी परंपरा आहे.पण नैतिकतेच्या नावाने अंघोळ केलेल्या इथल्या लोकांनी योनीची विटंबना करण्याची प्रथा सुरू केलीय.

या देशात बाप मुलीवर बलात्कार करतो, मुलगा आईवर बलात्कार करतो, भाऊ बहिणीवर बलात्कार करतो, आजोबा नातीवर बलात्कार करतो, मामा भाचीवर बलात्कार करतो, काका पुतनीवर बलात्कार करतो, शिक्षक विद्यार्थीनीवर बलात्कार करतो. डॉक्टर पेशंटवर बलात्कार करतो. शाळेत, दवाखान्यात, कार्यालयात, मंदिरात आणि खुद्द स्वतःच्या घरातही मुली सुरक्षित असल्याची ग्वाही देता येत नाही. "मुली अंगभर कपडे घालत नाहीत ( छोटी कपडे घालतात ) म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात. मुली रात्री उशीरा घरी परततात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात." या देशातले छोटी सोच असलेले लोक एखाद्या मुलीवर बलात्कार झाला रे झाला की असे सनातन विचारांचे पारंपरिक दिवे पाजळत असतात. हेच जर खरं असतं तर बुरख्यातल्या मुलींवर, स्वतःच्या घरात पाळण्यात निर्धास्त झोपलेल्या चिरमुरड्यांवर बलात्कार झाले असते काय? देशातली माणसं ही 'माणसं ' असतील आणि देशातले कायदे कडक असतील तर रस्त्याने विवस्त्र फिरणाऱ्या बाईवरही बलात्कार होणार नाही.

या देशातील मुलींना स्वप्नं पडतात कुणीतरी सतत आपला पाठलाग करत असल्याचे, गर्दीतील प्रत्येक पुरुष वखवखलेल्या नजरेने बघतोय, आठ-दहा पुरुषांचा समूह अंगावर चालून आलाय, एकाने हात पकडलेत, एकाने पाय पकडलेत, एकाने तोंड दाबून धरलय, एकजण आपली कपडे फाडतंय, एकजण जबरदस्ती करतोय.. होय हल्ली अशीच स्वप्नं पडतात. या देशात माझ्यासहीत हरेक मुलगी बलात्काराचं भय उराशी घेऊन आयुष्य जगतेय. भीतीच्या काळ्याकुट्ट सावटाखाली मुलींचा जीव गुदमरून दडपून जातोय. कुठल्याच अनोळखी ( ओळखीच्याही) पुरुषावर त्यांचा भरवसा राहिला नाही.

या देशात 2016 या वर्षात तब्बल 34 हजार 600 रेप केसेस नोंदविल्या गेल्या आहेत. 1990 पासून आजच्या दिवसापर्यंत बलात्काराच्या संख्येत जवळजवळ तिप्पट ( 277%)  वाढ झाली आहे ( National Crime Record Bureau ), या देशात दर वीस मिनीटाला एक बलात्कार होतो, या देशाची राजधानी Rape capital of world ( एका दिवसाला 6 रेप) म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. तरीही बलात्काऱ्याला शिक्षा मिळत नाही. अफूची गोळी घेतल्यासारखी सिस्टीम शांत असते. इथलं सरकार अशा अमानुष घटनांना केंद्रस्थानी ठेवून भविष्यकालीन सत्तेच्या पोळ्या भाजतं. अशा देशात शाळेतच नाही तर आम्हांला मंदिरातही पाय ठेवण्याची भीती वाटतेय.

या बलात्काऱ्यांच्या देशात आम्हा तमाम बायांना भीती वाटते पुरुषाच्या जवळपास असण्याची, भीती वाटते घराबाहेर गेलेली आई, बहिण, पुतनी,भाची घरी परतून न येण्याची, भीती वाटते मुलगी जन्माला घालण्याची, वाढवण्याची, सांभाळण्याची.

हा देश, या देशाचं पुरुषवर्चस्ववादी धर्मांध सरकार, या देशातले सत्तापिपासू विरोधी पक्ष एका निष्पाप चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचं राजकारण करतात. बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी तिरंगे झेंडे हातात घेऊन रॅली काढतात. या देशातील पोलिस खातं, या देशातील न्यायव्यवस्थाही मूळापासून सडलेली आहे. म्हणून मग आम्हाला भीती वाटतेय त्या दिवसाची ज्या दिवशी " बलात्कार कधी, कुठे, कसा आणि कुणावर करावा याचा पाठ शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जाईल, सोबत प्रात्यक्षिकेही दाखवली जातील, अव्वल येणाऱ्यांचे सत्कार समारंभ आयोजित करून त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल, बलात्कारी लोक इथल्या भावी पिढ्यांचे आयकॉन बनतील, बलात्काऱ्यांचे पुतळे उभे केले जातील, बलात्काऱ्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातील, त्यांच्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले जातील, बलात्काऱ्यांवर नायकप्रधान चित्रपट काढले जातील, बलात्काऱ्यांना पद्म पुरस्कार दिले जातील, बलात्काऱ्यांच्या हस्ते ध्वज फडकवले जातील. एवढेच नाही तर बलात्काऱ्यांच्या नावानेसुद्धा पुरस्कार दिले जातील." होय ही अतिशयोक्ती नाही तर हे नजिकच्या भारतवर्षाचं थरकाप उडवणारं चित्र आहे.

"दोन स्तन आणि एक योनी असणाऱ्या कोणत्याही वयाच्या स्त्रीच्या शरीराचा उपभोग घेऊन तिची हत्या करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच." अशा विकृत पुरुषी विचारांचे दृश्य-अदृश्य बॅनरवर लावलेल्या देशात आम्ही स्त्री म्हणून जन्म घेतलाय.

मग आम्ही स्त्रियांनी सुरक्षित राहायचं असेल तर नेमकं काय करावं..?? लिंगबदल करावा की देश सोडून जावं..??