चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा?
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2018 07:36 AM (IST)
अनाथ मुलांसाठी, वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था मी पहिल्या आहेत. तिथं जेमतेम अंथरुण - पांघरूण असतं. पलंग तर क्वचित कुठे दिसतात. गाद्या आहेत-नाहीत. मुलं सतरंज्या अंथरून निजतात. ब्लँकेट्स फाटलेली. अनेक जागी नुसत्या सोलापुरी ादरी.
थंडी ओसरू लागण्याची चिन्हं घेऊन संक्रांत येते. एरवी आवडता वाटणारा हा ऋतू स्वत:च्या घराबाहेर डोकावून पाहिलं की निराळा दिसू लागतो. मुळात आपल्या डोक्यावर आपल्या मालकीचं एक छप्पर आहे, हे पुन्हा एकदा अप्रूपाचं वाटू लागतं. काही वर्षं भाड्याच्या घरांसाठी वणवण करून एकदा स्वत:च्या घरात राहायला आल्यावर पहिल्यांदा जितकं हुश्श वाटलं होतं, तितकं आणि तसंच पुन्हा वाटू लागतं. आधीचे हिवाळे-उन्हाळे-पावसाळे आपण सहज विसरून गेलेलो असतो. आमच्या वसाहतीच्या पलीकडे सगळी मिठागरे आहेत. हिवाळ्यात मिठाच्या झाकून ठेवलेल्या लहान-लहान टेकड्या दिसतात आणि बाकी मीठशेतीची जमीन उलगलेली. मिठाचा खारा तीव्र वास सगळीकडे भरलेला. जिभेवर खारट चव. तिथल्या मिठानं पांढुरक्या झालेल्या, वाळून तडकलेल्या जमिनीकडे साधं बघवत देखील नाही; मग तिथं पाय ठेवणं तर अगदीच नकोसं होतं. त्या मोकळ्या जमिनीवर भटके लोक आलेले दिसले मुक्कामाला. पालं देखील नव्हती त्यांच्याकडे. थोडे कपडे आणि भांडी. एरवी मोठे घोळके असतात, तेव्हा काठ्या लावून त्या सांगाड्यावर ऋतूनुसार मेणकापड वा गोधड्या घातल्या जातात. दगड गोळा करून चुली बांधल्या जातात. भांड्यांचं अर्धं पोतं, तांदळाच्या-पिठाच्या पिशव्या, कपडे आणि कपडे टांगायला दोऱ्या... एखाद्या झाडाच्या फांदीला, बुंध्याला या दोऱ्या बांधल्या जातात, दुसरं टोक ‘घरा’च्या काठीला. पण या कुटुंबाकडे तर इतपत सामानदेखील दिसत नव्हतं. अपुऱ्या पांघरुणात हे लोक उघड्यावर झोपणार या थंडीत? लहान मुलेही न हुंदडता गप्प बसून होती. बाईने काट्याकाड्या गोळा करून आणल्या. चूल मांडू लागली. बाप्या एक बादली आणि कळशी घेऊन पाण्याची व्यवस्था मार्गी लावायला निघाला. कुठून आणेल? सोसायटीच्या गेटवर वॉचमन असतात, ते मदत करतील? शक्यता कमीच. काही जुन्या चाळी आहेत, पण तिथंच आठवड्यातून दोनदा पाणी येतं नळाला, बाकी टँकर आले की विकत घेतलं जातं. वापरायच्या पाण्याचा २०० लिटरचा ड्रम ३० रु. दराने भरून घ्यायचा. पिण्याचं पाणी एका दुकानात मिळतं, ते ३० रु.ला २० लिटर; पाण्याचा डबा आपला न्यायचा किंवा त्यांचा हवा असेल तर त्याचे ५० रु. मोजायचे. पाच ते सहा माणसांच्या कुटुंबाला निव्वळ पाण्यासाठी महिन्याला किमान पाच ते सहा हजार खर्च येतो. ते लोक या भटक्या – फाटक्या माणसाला पाणी फुकट देतील? हीही शक्यता नाही. अनेक मंदिरं-चर्च आहेत जवळ; तिथंही पाणी असतं; पण हा माणूस तिथं पाय ठेवू धजणार नाही. तो आता कुठेतरी पाण्याची डबकी – डबरे शोधत फिरेल. चाळीतल्या – झोपडपट्टीतल्या बायका अशा डबर्यांवर कपडे धुवायला जातात. एखाद्या पत्र्याच्या डब्याला दोरी बांधून पोहरा बनवलेलं असतं; त्यानं पाणी शेंदून थोडं दूर जाऊन कपडे धुतात. मग ते जड, ओले पिळे खांद्या-डोक्यावर घेऊन घरी जातात. दर एक-दोन महिन्यांनी या बिनकाठाच्या डबऱ्यात पडून एखादी बाई, एखादं खेळतं मूल जखमी झाल्याची बातमी येते. तिच्याने आजकाल कुणी हळहळत देखील नाही. बाईची चूल मांडून झाली होती. दोन मोठी वांगी घेऊन तिनं कोयत्यानं त्याचे चारसहा तुकडे केले. ते ती भाजेल असं वाटलं होतं, पण पातेल्यात ठेवले. बाप्या पाणी घेऊन येताच पातेल्यात पाणी ओतून ते शिजत ठेवले. हमरस्त्याच्या बाजूचे हे दृश्य. शेकडो वाहने येत जात होती. काळोख पडण्यास सुरुवात झाली. मला बाबुराव बागुलांची 'मैदान' ही 'मरण स्वस्त होत आहे' मधील कथा आठवत राहिली. फार हताश वाटू लागलं. रात्री खूप वेळ झोप लागली नाही. पहाटे एक स्वप्न पडले. त्यात एक लांबलचक कच्चा रस्ता होता. रस्त्यावर शवपेट्या ठेवण्यासाठी खोदतात तसे, पण जरा उथळ, आयताकृती खड्डे खोदलेले होते. मग दिसलं की, त्या प्रत्येक खड्यात एकेक माणूस झोपलेला होता. सकाळी स्वप्नासोबतच एक जुनी आठवण मनाच्या तळातून वर आली. आठवलं, एकदा एका आदिवासी वस्तीत मी मुक्कामाला होते. रात्री निजताना लोक सहसा घर झाडून घेऊन मग अंथरुणे घालतात. तर त्या घरात बाईने चुलीतली राख काढून पसरली. राख गरम होती. राखेवर झोपले कि थंडी कमी वाजते, हा तिचा अनुभव होता. त्या घरात अंथरुणेच नव्हती, असे माझ्या ध्यानात आले. पांघरायला सहा माणसांमध्ये दोन गोधड्या. त्यातही तिने एक गोधडी मला देऊ का म्हणून विचारले. माझ्याजवळ एक चादर होती. तिचा एक लहानगा मग माझ्या कुशीत येऊन झोपला. आजही त्यांच्याही स्थितीत फारसा फरक नाही. माझी स्थिती मात्र तेव्हाच्या तुलनेत बरीच बरी आहे, सध्यातरी. अनाथ मुलांसाठी, वेश्यांच्या मुलांसाठी, एड्स झालेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था मी पहिल्या आहेत. तिथं जेमतेम अंथरुण - पांघरूण असतं. पलंग तर क्वचित कुठे दिसतात. गाद्या आहेत-नाहीत. मुलं सतरंज्या अंथरून निजतात. ब्लँकेट्स फाटलेली. अनेक जागी नुसत्या सोलापुरी चादरी. आणि आपली मध्यमवर्गीय माणसं इतकी दळभद्री आहेत की, फाटक्या-मोडक्या गोष्टी देतात कुणाला काही द्या म्हटले की. धड अवस्थेतील सगळे गुंडाळून माळ्यावर ठेवतील वर्षानुवर्षे अडगळीत कधी तरी लागेल म्हणून. पण कुणाला काही उचलून चांगले द्यायचे म्हटले कि यांना हजार नैतिक प्रश्न सुचतात. मध्यमवर्ग पार बदलून गेला आहे. घरात चार ब्लँकेट्स होती. संध्याकाळी त्यातली दोन उचलून पिशवीत घातली आणि त्या कुटुंबाला देऊन आले. म्हटलं, आपण काही दुनियेला पुरे ठरणार नसतो आणि दुनियाही आपल्याला पुरेशी नसते, तरीही आपल्याला शक्य ते आपण करत राहावं. यंदा तिळगूळ बनवले नाही, विकतही आणले नाही. गोड बोला म्हणण्याची आणि गोड बोलण्याचीही अजिबात इच्छा नाही. कॉलनीतल्या बायका सालाबादप्रमाणे संक्रांतीचं हळदीकुंकू करतील, वाण लुटतील; सालाबादप्रमाणे यंदाही मी त्यांच्यात जाणार नाही. संबंधित बातम्या : चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट