हरियाणात कुरुक्षेत्र जिल्ह्यात पहोवा इथं सरस्वतीच्या किनाऱ्यावर एक कार्तिकेयाचं मंदिर आहे. पृथुदक तीर्थ असं पहोवाचं पुराणकालीन नाव. कार्तिकेय ब्रह्मचारी, त्यामुळे मंदिरात बायकांना प्रवेश नाही, हे माहीत होतंच. तरीही मी त्या मंदिरापर्यंत जाऊन तिथलं बाह्य वातावरण पाहून आले. चैत्रात इथं मोठी जत्रा भरते. कार्तिकेयाबद्दल महाराष्ट्रात विशेष प्रेम नाही, गणपतीसारखं त्याला घरोघरी आणि सार्वजनिकरीत्याही स्थान नाही. ते त्याला तमिळनाडूमध्ये मुरुगनच्या रुपात मिळालेलं आहे. तिथं तो ब्रह्मचारीही नाही. तिथं त्याचं महात्म्य फार मोठं आहे. हा शिवपुत्र स्त्रीचा अंश नसलेला निखळ पुरुष, केवळ पुरुषाचा पुत्र आहे असं म्हणतात; जसा गणपती पुरुषाचा अंश नसलेला केवळ स्त्रीचा, पार्वतीचा पुत्र आहे म्हणतात तसंच. मोर हे त्याचं वाहन. अमरकोशात त्याची भूतेश, भगवत, महासेन, शरजन्मा, षडानन, पार्वतीनन्दन, स्कन्द, सेनानी, अग्निभू, गुह, बाहुलेय, तारकजित्, विशाख, शिखिवाहन, शक्तिश्वर, कुमार, क्रौञ्चदारण ही नावं दिलेली आहेत. स्कंदपुराणात त्याची कथा विस्ताराने येते. तारकासुराचा वध करण्यासाठी देवांना शिवपुत्र हवा होता; म्हणून त्यांनी अग्निदेवाला शिवाकडे पाठवलं. शिवपार्वती कामक्रीडेत मग्न असताना तो पक्ष्याचं रूप घेऊन खिडकीत आला. त्याला पाहून शिव पार्वतीपासून दूर होऊन त्याच्याशी बोलायला निघाला. मात्र तेवढ्यावेळात त्याचा नकळत वीर्यपात झाला. ते वीर्य एका पानात घेऊन अग्नी निघाला, मात्र त्याचे तेज त्याला सहन होईना. त्यामुळे त्याने ते गंगेकडे सोपवलं. त्यामुळे गंगेचं पाणी उकळू लागलं. गंगेने सहन न होऊन ते किनाऱ्यावरील सहा कृत्तिकांना दिलं. ही सहा बालकं त्यांनी पार्वतीच्या हाती दिली, तेव्हा त्यांची मस्तकं कायम राहिली, पण सहा देह एकवटून एकच देह बनला. कृत्तिकांचा पुत्र म्हणून तो कार्तिकेय! ज्या कामासाठी त्याचा जन्म झाला होता, ते म्हणजे तारकासुराचा वध, ते त्याने पूर्णत्वास नेले. क्रौंच पर्वताला बाणाने आरपार छेदून त्यानं तारकासुराला मारलं. पृथ्वीप्रदक्षिणा करायची म्हटल्यावर गणपतीने आईभोवती फेरी मारून शर्यत जिंकली आणि असं बुद्धिचातुर्य नसल्याने कार्तिकेय मात्र निरागस गांभीर्याने अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून खूप उशिराने परतला. परतल्यावर आपण हारलो आहोत आणि तेही शारीरिक कृतीमुळे नव्हे, तर बुद्धिचातुर्याने आपल्याला हरवलं गेलं आहे, हे त्याला समजलं. ही गोष्ट लहानपणी ऐकताना गणपतीबाप्पा कित्ती हुशार आणि कार्तिकेय कसला बुद्दू असंही वाटायचं. ब्रह्मचारी तर मारुतीही आहे, पण त्याच्या मंदिरात जातात की बायका, मग कार्तिकेयाला काय एवढा प्रॉब्लेम आहे... असा प्रश्न कुमारवयात डोकावू लागला. स्त्रियांना पाहून ऋषिमुनीच काय, पण देवही चळतात; चळत नाही तो केवळ परमेश्वर... हे समजल्यावर देवांचं लहानपणापासून मेंदूत अपलोड केलेल्या साफ्टवेअरला व्हायरसने उडवून टाकलं. स्त्रीला मार्गातली धोंड समजणं, तिला चित्रातही पाहू नये असं म्हणणं असे विचार त्यामागील इतिहासाचा विचार न करताच खटकू लागले. सगळा दोष चाळवणाऱ्या स्त्रियांचा, चळणाऱ्या पुरुषांची चूक काहीच नसते का? हा प्रश्न त्या वयात रास्तच होता. पुढे मात्र वाचन, अभ्यास वाढत गेला तसा मिथकं, पुराकथांमधली प्रतीकं, धार्मिक इतिहास समजून घेताना मतं बदलली. परमेश्वर, देव, राक्षस, असुर, गंधर्व, अप्सरा हे सारे किती विविध स्वरूपाचे काल्पनिक लोक आहेत आणि या कल्पना कोणत्या काळात, का व कशा विकसित झाल्या असाव्यात हे समजू लागलं. विद्रोह वयानुसार ओसरून शांतपणा आलाच होता, त्याला अभ्यासाची जोड मिळाली. लोककथा, पुराणकथा, विश्वउत्पत्तीच्या कथा यांचं वाचन वेगळ्या दृष्टीने होऊ लागलं. गोष्टीपलीकडे जाऊन त्यामागील विचार, उपदेश, सार आणि मुख्य म्हणजे तत्त्वज्ञान पाहता येऊ लागलं. त्यात मजा होती. गोष्ट फुलासारखी आकर्षक असते आणि तत्त्वज्ञान मुळासारखं अनाकर्षक, बहुतेकवेळा दडून बसलेलं. कार्तिकेयाची गोष्ट पहोवामध्ये ऐकली, तेव्हा अशीच दृष्टी बदलली. पहोवामधली कार्तिकेयाची मूर्ती त्वचाहीन आहे. कोणतीही स्त्री आपलं रूपसौंदर्य पाहून आपल्याकडे आकर्षित होऊ नये, म्हणून कार्तिकेयाने आपली त्वचा फेडून आईच्या हाती दिली, अशी त्यामागची कथा आहे. कथेच्या एका आवृत्तीत असं म्हटलं आहे की, कोणत्याही स्त्रीकडे पाहिलं की त्याला आईची आठवण होई. तिची आपल्या आईशी तुलना केल्यावर ती अगदीच क्षुद्र वाटू लागे. त्यामुळे कार्तिकेय ब्रह्मचारी राहिला. कथेची दुसरी आवृत्ती मला अधिक रोचक आणि थरारक वाटली. कार्तिकेय हा युद्धखोर देव. देवांचा सेनापती. शक्तीचा अधिदेव. त्याच्या पूजेने विजय तर मिळतोच, खेरीज प्रतिष्ठाही मिळते. समाजात सुव्यवस्था व शिस्त राखली जाते. युद्धं करून करून कार्तिकेय शरीराने अधिक मजबूत बनला, पण मनाने मात्र थकला. एका युद्धानंतर रात्री तो युद्धमैदानावर गेला, तेव्हा मृत सैनिकांच्या विधवाविलापाचं एक विदारक दृश्य त्याच्या नजरेस पडलं. ते पाहून त्याची युद्धविषयक मतं बदलली. आता कोणतीही स्त्री पाहिली की ती त्याला विधवा, कुंकू पुसलेली, श्वेत वस्त्रं परिधान केलेली, आक्रोश करत शिव्याशाप देणारी, असुरक्षित, भयग्रस्त आणि कमालीची दु:खी दिसू लागे. युद्ध टाळणं का गरजेचं आहे, हे त्याला या भ्रमभासांमधून जाणवलं. त्याची युद्धपिपासा शमली, तरीही त्याच्या तनामनाचा दाह मात्र अजूनही शमलेला नाही. त्यात आपली त्वचाही उतरवून त्यानं आईकडे दिली. हा दाह शमावा म्हणून त्याच्या त्वचाहीन देहावर तेलाचा अभिषेक केला जातो आणि जगभरात युद्धात मरण पावलेल्या लोकांच्या आत्म्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. कुरुक्षेत्रात महाभारतातल्या शेकडो कथांच्या अनेक आवृत्त्या ऐकायला मिळतात. या कथेच्याही अनेक आवृत्त्या आहेतच. कार्तिकेयाचं दर्शन घेतलं, तर सधवा स्त्रिया विधवा होतील, अशी भीती घालणारी एक कथा आहे. गणपतीला अधिक महत्त्व दिल्याने आईचा राग आल्यामुळे त्याने तिला त्वचा व मांसही उतरवून दिलं अशी अजून एक कथा आहे. स्त्रीबीज लाल आणि पुरुषबीज पांढरं म्हणून हाडं ही वडलांची देण आणि रक्त, मांस, त्वचा ही आईची... अशी एक प्राचीन समजूत आपल्याकडे होती. या मंदिराशी निगडित एक कथा आहे. महाभारत युद्ध संपलं तेव्हा अठरा अक्षौहिणीहून अधिक सैनिक धारातीर्थी पडले. युधिष्ठीर हे पाहून खचून गेला. तेव्हा त्याला कृष्णानं कार्तिकेयाच्या मंदिरात जाण्यास सांगितलं. युधिष्ठीर तिथं जाऊन कार्तिकेयाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक आणि मृताच्या आत्म्यांना शांती मिळावी अशी प्रार्थना करून आला, तेव्हा कुठे स्वत:ला क्षमा करू शकला. इथली अखंड ज्योत युधिष्ठिरानेच चेतवलेली आहे, असं सांगितलं जातं. युद्धखोर लोकांनी, ते अस्तिक असोत वा नास्तिक, एकदा हे मंदिर जरूर पाहावं आणि कथा ऐकून किमान विचार करावा... इतकीच आता प्रार्थना.