एखादं पुस्तक प्रकाशित होणं ही सामाजिक घटना असू शकते का? किंवा एखादं चित्रप्रदर्शन, एखादं काव्यवाचन, एखादं नवं नाटक... किंवा कोणत्याही कलाकृतीचं निर्माण, सादरीकरण ही आपल्याकडे घटना असते का, जिकडे आपली दैनंदिन धाव थांबवून लोकांनी वळून पाहावं? असायला हवी खरंतर. पोटापाण्याच्या रहाटगाडग्यात अडकून पडलेल्या लोकांनी थांबून श्वास घ्यावा आणि सगळे व्याप विसरून एखादं पुस्तक वाचत बसावं तहानभूक हरपून किंवा उथळ बधीर मेंदूच्या लोकांच्या अकलेच्या कांद्याला एखादा कोंब फुटावा अवचित आणि फटाके बाजूला सारून एखादी कादंबरी विकत घेऊन, वाचल्याचं सांगत मिरवावं. पण असं होत नाही. उत्तरादाखल लोक उदास सुरात सांगतात, “खूप काळ असं सणसणीत काही मराठीत प्रकाशितच झालं नाहीये की, चर्चा व्हावी, वाद झडावेत; साहित्यात थोडं उत्साही वातावरण निर्माण व्हावं! सगळं मवाळ, मचूळ, रडकं वातावरण आणि मंदी, नोटाबंदी यांमुळे पुस्तकविक्रीच होत नसल्याच्या चर्चा.”

अशा करड्या वातावरणात विहिरीतल्या काळोखात एक हिरवाजर्द साप लाल दुतोंडी जीभ लवलवत एका कादंबरीच्या मुखपृष्ठावर चंद्रमोहनसारख्या संवेदनशील चित्रकाराच्या हातून अवतरतो; पोहरा उतरतोय गूढ जांभळ्या काळोखात आणि त्याच्या दोरीला धरून सांगाड्याच्या रंगाची किरकोळ माणसं वर चढू पाहताना दिसतात. विहिरीच्या काठावरून वाकून पाहणारा कावळा उजवीकडे आणि डावीकडे शीर्षक – दंशकाल. लेखक हृषीकेश गुप्ते. राजहंस प्रकाशनाची नवीकोरी कादंबरी.



घनदाट काळोख, गडगडाट, कडाडत्या विजांचे मातीला स्पर्शणारे लोळ, मुसळबडवा पाऊस... अनोळखी ऑक्टोबर... ‘दंशकाल’ वाचण्यासाठी हे अत्यंत अनुकूल वातावरण होतं. स्वतःचं लेखन बाजूला ठेवून, सलग दोन दिवस बैठक मारून वाचावं असं पुस्तक खूप काळाने हाती आलेलं. ओघवतं आणि खिळवून ठेवणारं लेखन. त्यामुळे वाचून डोळे थकतात, तेव्हाच थांबलं जातं; मात्र मेंदू शिणत नाही. मेंदू शिणवण्याची खूप मोठी शक्यता कादंबरीतल्या घटना व त्या अनुषंगाने मांडलेल्या विचारांत आहे; पण प्रथमपुरुषी निवेदन घात करतं – असं मत पहिले दोन भाग वाचताना ठाम बनत जातं आणि तिसऱ्या भागात ते चक्क बदलतं; मेंदू शिणायला सुरुवात झालेली असते.

पहिल्या दोन भागांत नायकाच्या मनात काय चाललंय, त्याच्या नजरेने माणसं आणि घटना कशा दिसताहेत याची झापड लागते. परिणामी प्रसंग आत्यंतिक नाट्यमय असूनदेखील त्यांची तीव्रता सतत बोथट होत जाते; काहीवेळा तर टोकंही मोडतात; परिणामी पुन:पुन्हा नव्या घटनांमधून टोकं काढण्याची धडपड लेखक करत राहतो, त्यात विषय आखूड होत जातो की काय असं वाटू लागतं. खासकरून मठातले गैरव्यवहार कळल्यावर लोक घर जाळायला येतात त्या वेळचे सारे प्रसंग तृतीय पुरुषी निवेदनाने अधिक उत्कट झाले असते. तिसऱ्या भागात मात्र घटनांची आणि तत्त्वज्ञानाची वीण इतकी घट्ट होत जाते की आपल्या समांतर आठवणी व विचार थांबतात आणि आपण कादंबरीत घुसतोच पार.

आला आला गाडा / यमाचा वाडा / यमाजीच्या वाड्यातनं / महानंदाला धाडा /
यमाच्या वाड्यात / रगताची च्या / काळजाची भाकर / त्यात बुडवून खा /
मायेला प्रेमाला / हिथं न्हायी थारा / जितंतितं सुटलाय / मरणाचा वारा /

असली ‘कुणाच्या ना कुणाच्या कानातून रक्ताच्या धारा नक्कीच वाहायला’ लावणारी विधिगीतं वाचताना दुसरं काय होणं शक्य आहे? दंतकथा, त्यातली चौकात जाळून मारलेली घराण्यातली मूळ स्त्री भिवली, नवऱ्यावरचं संकट बायकोवर ढकलून त्याला वाचवणारा दादुमिया, ही दोन्ही माणसं अंगात येणारा काका, त्याच्या वेडाचा फायदा घेऊन मठ उभारणारे नातलग व गावकरी, अपत्यप्राप्तीच्या लालसेने मठात येणारी जोडपी, तिथले गैरव्यवहार... हजार कहाण्या. तरी बोलीभाषांचा विशेष वापर यात नाहीये; असता तर भाषिक अंगानेही ही कादंबरी जोरकस ठरली असती.

हृषीकेशची आधीची पुस्तकंही जुन्या लेखकांचा प्रभाव दिसत असूनही भावली होती, विशेषत: त्याच्या कथा व गूढकथा. त्यातही ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ तर एका कथेचं एक पुस्तक प्रकाशित करावं इतकी अफलातून. असे प्रयोग आपल्याकडे होत नाहीत ते सोडा. ‘दंशकाल’ मात्र प्रभावातून बाहेर पडून पेंडसे, दळवी, जीए, मतकरी या पूर्वसुरींच्या मळवाटेवरून चालत येत स्वत:च्या आठ पदरी हायवेवर, वाचकाचा श्वास रोखत तुफ्फान वेगाने धावू लागते.

भूगाव नावाचं कादंबरीतलं पात्रच बनलेलं एक गाव, त्यातलं देशमुखांचं घर, घरातली आणि गावातली असंख्य माणसं. लागोपाठ येऊन आदळणाऱ्या अनेक नाट्यमय घटना. निसर्ग, वास्तू, वस्तू, जनावरं, माणसं सगळं एका गडदगूढ गुंतवळीत अडकलेले. नायकाच्या कुमारवयापासून ते प्रौढ वयापर्यंतचा मोठा कालखंड. चालू वर्तमानात घडणाऱ्या घटना, भूतकाळातील स्वत:च्या आठवणी आणि इतरांनी सांगितलेल्या आठवणी हे सारं आलटून पालटून येत राहतं आणि तरीही कुठे तपशील हुकत नाहीत. कथनात उत्सुकता फार सुंदर टिकवलेली आहे; ‘आता काय राहिलंय’ असं वाटत असतानाच पुढची अनपेक्षित वळणं येतात. त्यांची बिजं आधीच इतक्या बेमालूमपणे पेरलेली होती की, आपल्याला पत्ताच लागला नाही, हे जाणवून हसू येतं आणि अंदाज चुकल्याचा निर्भेळ आनंद वाटतो – ही लेखकाच्या कौशल्याविषयीचं कौतुक भरपूर वाढवणारी गोष्ट.

कौटुंबिक आहे असं वाटतावाटता ही कादंबरी सामाजिक वळणं घेते, गूढ आहे वाटतावाटता विज्ञानवादी होते. “तगून राहणं ही विश्वातली सर्वात क्लिष्ट कृती आहे,” या वाक्यावर थबकून आपण काहीवेळ पुस्तक बाजूला ठेवतो. हे या कादंबरीचं सार, हा गोल्डन पॉइंट.

स्त्री पात्रं अत्यंत सक्षम रंगवली आहेत. बायका मुळात अशाच घट्टमुट्ट असतात वृत्तीनं. परिस्थितीने त्या कधी ढासळतात, कधी किचन पॉलीटिक्स खेळतात. एकमेकींवर कुरघोड्या करत घर, कुटुंब, मालमत्ता आपल्या ताब्यात राखण्यासाठी तमाम नैतिकता बाजूला सारणाऱ्या निखळ माणूस असलेल्या स्त्रियाही यात आहेत. आपापल्या पद्धतींनी त्या तग धरतात... आजी मठ सुरू करते, वेडी आई अण्णांच्या मृत्यूनंतर शहाणपणाच्या वळणावर येते, काकू शरीराची भूक आणि अपत्यप्राप्तीची ओढ म्हणून थोरल्या दिराला लागू होते, आत्या लालसा ओळखून सोन्याचं आमिष दाखवून हवं ते पदरात पाडून घेते. सगळ्या आपल्याला हवं ते करतात, करवून घेतात. सवतीवत काकूला शाप देणारी आई, तिचं बाळंतपण मात्र व्यवस्थित करते; आपली सुईणीची भूमिका वैयक्तित राग, द्वेष, अपमानांपोटी टाळत नाही. घरातल्या स्त्रियांची पाळी बंद होणं, याविषयी आणि ‘काकूसारखी अस्सल स्त्री या घरात वाया गेली’ म्हणणं हे नायकाची पत्नी अनूचे संवाद मुळातूनच वाचावेत असे आहेत. खणखणीत, खंबीर स्त्रियांच्या अत्यंत आतल्या विश्वात लेखक ज्या सहजपणाने प्रवेश करतो, ते पाहून चकित व्हायला होतं... हे आधी केवळ मेघना पेठेला पुरुष पात्रांच्या बाबतीत साधलेलं होतं.

पुरुष पात्रांच्या विविध लैंगिकता यात येतात. त्यात त्यांची अगतिकता, लैंगिक मर्यादांची जाणीवही ठळक होते. जबाबदाऱ्या टाळणारे, विकल वा अतिआदर्श अशा दोन्ही टोकांनी पुरुषांचं टिपिकल चित्रण होत असतं, तसं इथं नाही. ‘दंशकाल’चा नायक लोभी, वासनेला बळी पडणारा आहेच, पण तो दुबळा आहे आणि आपलं दुबळेपण मान्य करण्याचं अफाट धाडस तो दाखवतो – हे शौर्यच त्याला नायकत्व बहाल करतं. त्याचं दुबळं असणं त्याच्याकडे माणूस म्हणून बघायला भाग पडतं.

कादंबरी संपल्यावरही एक प्रश्न मनात उरतो की, आईचं मरण हे हत्या होती की आत्महत्या? शेवटी कुठंतरी याचा उलगडाही व्हायला हवा होता. अर्थात तो न झाल्यानंही काही फार फरक पडत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका आयुष्यात मिळत नसतात हे पुन्हा एकदा कळतं, इतकंच.

चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं


चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब