“तुमचं एक प्रेमप्रकरण होतं ना...?” कुणीतरी चाचरत विचारतं.

“एक... प्रेमप्रकरण...? छे छे... मी इतकी सुमार नाहीये की, माझं एकच प्रेमप्रकरण असावं!” कृष्णाजी खळखळून हसत म्हणतात.



कृष्णा सोबती!

सृजनशीलतेची तब्बल नऊ खणखणीत दशकं सार्थकतेने पार करुन आता त्या फक्त 92 वर्षांच्या आहेत आणि नुकतीच बातमी हाती आलीये की, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्यांचं फोनवरुन अभिनंदन करता येणार नाही. कारण त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि तसंही पुरस्कारांचं अप्रूप उरलेलं नसतंच एका टप्प्यावर! त्यांनी तर विचारपूर्वक भूमिका घेऊन, असहिष्णुतेबाबत सरकारचा निषेध करत साहित्य अकादमी वगैरे पुरस्कार परतही करुन टाकले होते. आणि ज्ञानपीठ पुरस्काराची आता जी 11 लाखांची रक्कम आहे, त्याहून मोठ्या रकमांच्या देणग्याही विविध उपक्रमांना दिल्या आहेत. आपल्या लेखी अप्रूपाचं आहे ते त्यांनी अजून लिहितं असणं. वयाच्या 92 व्या वर्षी ही कविता त्यांनी लिहिलीये...

हरवलेल्या घोड्यावर स्वार
आमचं सरकार
नागरिकांना हुकुमशाहीने
दूर का सारतं
आणि मग श्रीमंतांना
वाकवाकून नमस्कार का करतं

सरकार
कसं विसरतं
की आपल्या देशात लोकशाही आहे
आणि इथले नागरीक
गुलाम, दास नाहीत
ते लोकतांत्रिक देशातले
स्वाभिमानी नागरीक आहेत
राज्याची ही रचना
आता बदला!

18 फेब्रुवारी 1925 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या या लेखिकेने 18 नोव्हेंबर 2016 साली लिहिलेली ही कविता आज वानगीदाखल इथं अनुवादित करुन देते. त्या जन्मल्या तो गुजरात प्रांत आता पाकिस्तानात आहे आणि ‘पाकिस्तानातलं गुजरात ते हिंदुस्थानातलं गुजरात’ अशा शीर्षकाचं एक पुस्तकही कृष्णाजींनी लिहिलेलं आहे. 'डार से बिछुड़ी', 'यारों के यार', 'तीन पहाड़', 'मित्रो मरजानी', 'सूरजमुखी अंधेरे के', 'ज़िन्दगीनामा', 'दिलो-दानिश', 'समय सरगम' या त्यांच्या कादंबऱ्या आणि 'बादलों के घेरे', 'सिक़्क़ा बदल गया', 'मेरी माँ कहाँ', 'दादी अम्मा' या त्यांच्या गाजलेल्या कथा आहेत. ‘कमी’ लिहिणं म्हणजेच ‘विशिष्ट’ लिहिणं, असं त्यांचं मत होतं. प्रत्येक लेखनाचे त्या तीन खर्डे करत. शेवटचा खर्डा मोठ्या आवाजात वाचून आवश्यक त्या दुरुस्त्या करत. त्यांच्या लिहिण्याच्या मोठ्या सागवानी टेबलावरुन अंतिम खर्डा पूर्ण होऊन प्रकाशकांकडे गेला की, मग मात्र त्याकडे ढुंकून पाहत नसत.



18व्या, 19व्या शतकातील वृत्ती-प्रवृत्ती, दंतकथा, लोककथा, म्हणी, लैंगिकता हे सारं समजून घ्यायचं तर त्यांचं ‘जिंदगीनामा’सारखं एखादं पुस्तकदेखील पुरतं. ‘यारों के यार’ वाचल्यावर ध्यानात येतं की, त्यांच्याआधी कुणा भारतीय लेखिकेनं स्त्रीच्या लैंगिकतेचं असं थेट दर्शन घडवलं नव्हतं, त्यामुळे या पुस्तकावर  वादही खूप झाले. स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द भारतात निर्माणही झाले नव्हते, त्या काळात त्यांनी स्त्रियांचं लैंगिक जीवन, त्यातले अभाव आणि अत्याचार, सुखदु:खं यांविषयी तीव्रतेने आणि मोकळेपणाने लिहिलं. या लेखनासाठी ‘मांसल’ असं विशेषण वापरलं गेलं. प्रत्यक्षातही त्या शिव्या देत बोलणाऱ्या असतील, असं वाचकांना वाटायचं आणि प्रत्यक्षात ‘सभ्य’ संवाद ऐकून काहींचा अपेक्षाभंगही व्हायचा.

व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर त्यांनी खूप पाहिलं, अनुभवलं; ते स्त्रीपुरुष भेद मनात न बाळगता बिनधास्त लिहिलं. अर्धनारीश्वराची कल्पना त्यांना फार आवडायची. त्यातूनच एकदा त्यांनी ‘हशमत’ हे टोपणनाव घेऊन पुरुष म्हणून लिहिण्याचा अनुभव कसा वाटतो हे अनुभवून पाहिलं. त्यावेळी आपण एक पूर्णत: निराळी व्यक्ती बनतो, असं त्यांना जाणवलं. अगदी आपलं अक्षरसुद्धा बदलून जातं, असा चकित करणारा अनुभव त्या मांडतात. ही कलेतील जटीलता असते.

वृद्धावस्थेपर्यंत स्वतंत्र, एकटीने जगल्यानंतर वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी डोगरी लेखक शिवनाथ यांच्याशी लग्न केलं; त्याही वेळी ‘वय’, ‘लोक काय म्हणतील’ असे मुद्दे त्यांच्या मनात आडवे आलेच नाहीत. त्यांची आई दुर्गा त्यांच्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्व असावी. त्या काळात ती खूंखार जंगली घोडे माणसाळवून घोडेस्वारी करत असे. लग्नानंतर ही दुर्गा हुंड्यासह काही पुस्तकंही सासरी घेऊन गेली होती. त्यात सत्यार्थप्रकाश, रामायण, महाभारत वगैरे तर होतंच; खेरीज खास स्त्रियांसाठी लैंगिक जीवनाबद्दल माहिती देणारं ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’ अशी पुस्तकंही होती. असं कृष्णाजींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तत्त्वज्ञान, पुराकथा, लोककथा यांच्यापासून ते थेट वास्तवाची दालनं खुली करणाऱ्या माहिती, मतं, विचारांपर्यंत कृष्णाजींना कशाचंही वावडं म्हणूनच राहिलं नसावं. घरादारातलं रामायण आणि बिछान्यातली रमणी रहस्यं त्यांनी सारख्याच सहजतेने लिहिली. शिव्या आणि ओव्या त्यांच्यासाठी समसमान होत्या. पुरुषपात्रं जिवंत उभी करायची, तर पुरुषांची भाषा जशीच्या तशी नि:संकोचपणे वापरणं आवश्यक असतं हे त्यांना जाणवलं होतं आणि तसंच त्यांनी लिहिलंही.



गरिमा श्रीवास्तवला दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, “दिल्लीच्या लोकांमध्ये आपसात भेटीगाठी घेण्याची पद्धत फारशी उरली नाही. दिल्लीच काय, कोणत्याही शहरात आता अपरिचय आणि कृत्रिमताच रुढ झालेले दिसतात. खेड्यांमध्येही हळूहळू हा आजार पसरू लागला. कानाच्या गुहेत मोबाईलचं प्लग खुपसून दुसऱ्या जगाचं नागरीक बनून जाणं सगळ्यांना सोयीचं  वाटतं. या जगात दुसऱ्यांची सुख दु:खं, हसण्या-कण्हण्याचे आवाज वर्ज्य आहेत. अनोळख हे आत्मरक्षणाचं एक हत्यार बनलं. मग आम्हांला वारसा मिळणार तरी कुणाकडून? जीवनाचं आकलन होण्यासाठी अनुभवसंपन्न दृष्टी देणारे लोक अंतिम प्रवासासाठी निघून जातील आणि आम्ही शोकसभा आयोजित करुन त्यांच्या आठवणी काढण्याचं कर्तव्य आटोपत राहू.”

इतकं दीर्घ, संघर्षाचं तरीही समाधानाचं आयुष्य जगून झाल्यावर त्यांच्या सूर कुठेही निराशेचा, तक्रारीचा कुरकुरीचा नाही. त्या शांतपणे वस्तुस्थिती मांडतात आणि आवश्यक तिथं विद्रोहाचा चढा सूर लावून जाबही विचारतात. ज्ञानपीठ पुरस्काराची बातमी समजल्यावर मी,1950 साली प्रकाशित झालेली त्यांची पहिली कथा ‘लामा,’ आणि जनसत्ताने गेल्यावर्षी पहिल्या पानावर छापलेली त्यांची मुलाखत वाचली; काही कविता वाचल्या; ‘दिलो दानिश’ या माझ्या आवडत्या कादंबरीतली काही पानं चाळली. आनंदही वाटत होता आणि उदासीही. इतकं वृद्ध झाल्यावर, आजारानं अंथरुणाला खिळल्यावर, विस्मरणाच्या वाटेवर असताना लेखकांना पुरस्कार देण्यात काय अर्थ आहे? – असंही पुन्हा एकदा वाटलं.

त्यांच्या कादंबरीतलं एक वाक्य आहे – बुटांवरुन हात फिरवून, त्यांना आलटून-पालटून पाहिलं आणि स्वत:ला विचारलं, आता कोणत्या दिशेने पुढे जायचंय आपण? तुम्हाला तरी प्रवासाची एखादा मार्ग दिसतो आहे का?

कृष्णाजी, ते ‘मांसल’ बूट आता आम्हां अनेकींच्या पायांत आले आहेत. अगदी मापात! तुमच्या पावलावर पाउल टाकून चार पिढ्या चालत आल्या. चौकात उभ्या आहोत आम्ही आणि काही आखीव वाटा दिसताहेत, काही कच्च्या आणि काही अगदी नव्या वाटा आता आमच्या पायांमधून जन्म घेणार आहेत, त्यावर नवी, तरुण पावलं आत्मविश्वासानं चालायला सुरुवात करतील आणि त्यांना ‘मार्ग कोणता?’ हे स्वत:ला विचारावं लागणार नाही.

संबंधित ब्लॉग

चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव - काही माणसं

चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर

चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड

चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे

चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं

चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं

चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या

चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात…

चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…

चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत

चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!

चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब