आजकाल मुंबईत एक बरं असतं की एखादा रेस्टॉरन्टचा ब्रॅण्ड सुरु झाला की संचालकांचा प्रयत्न असतो तो एकत्रच मुंबईच्या सगळ्या भागात न्यायचा किंवा पहिलं आऊटलेट सुरु झाल्यानंतर लगेचच मुंबईच्या उपनगरांमध्येही ब्रांच सुरु करायची जेणेकरुन त्या ब्रॅण्डचा आनंद मुंबईच्या सगळ्या भागातले लोक घेऊ शकतील.. असाच एक लोकांना आवडू लागलेला ब्रॅण्ड आहे.. त्या ब्रॅण्डचं नाव आहे ‘द अमेरिकन जॉईंट’.. गंमत म्हणजे नावात अमेरिकन असा शब्द आहे.. मेन्यूकार्डातही सगळ्या परदेशी पदार्थांचाच भरणा दिसतो, पण असं असतानाही ही रेस्टॉरन्ट चेन मात्र पूर्णपणे व्हेजिटेरियन लोकांसाठीच आहे.. प्युअर व्हेज अमेरिकन जॉईंट असं याचं स्वरुप आहे.. गेल्या काही दिवसात हे अमेरिकन जॉईंटस त्यांच्या ओपनिंग ऑफर्ससाठी चांगलेच प्रसिद्ध झालेत.. ठाण्याला पाचपाखाडीत त्यांचं या वर्षाच्या सुरुवातीला नवंकोरं रेस्टॉरन्ट सुरु झालं.. तेव्हा त्यांच्या अनोख्या ऑफरमुळे लोकांनी अक्षरश: लोकांनी द अमेरिकन जॉईंटच्या बाहेर रांगा लावल्या. ८ ते १२ या तारखेपासून त्या तारखेइतकेच पैसे त्यांच्या मेन्यूतील पदार्थासाठी द्यायचे अशी ती ऑफर होती.. म्हणजे ८ तारखेला त्यांच्या ठराविक मेन्यूपैकी कोणताही पदार्थ घ्या, तो ८ रुपयांनाच मिळणार, ९ तारखेला तोच पदार्थ ९ रुपयांना मिळणार अशी ती जबरदस्त ऑफर होती. एरव्ही २००-२५० रुपयांनी मिळणारी एक डिश ८, ९ किंवा १० रुपयांना मिळत असेल तर अशी संधी ठराविक पॉकेटमनी असणारे विद्यार्थी तर नक्कीच सोडणार नाहीत..बरं पदार्थसुद्धा सगळे या युवापिढीला जबरदस्त आवडतील असेच. त्यामुळे ही ऑफर होती त्या काळात तर रेस्टॉरन्ट संध्याकाळी साडेपाच वाजता उघडत असूनही चार वाजतापासून रांगा लागायच्या.
अशी सगळी लॉन्चिंगची ऑफर संपल्यानंतरही द अमेरिकन जॉईंट चांगलीच गर्दी खेचतं, त्याला कारण बाहेर खाण्याची आवड असणाऱ्यांना मॉडर्न स्नॅक म्हणून खूप आवडणारे आणि खरं सांगायचं तर जंक फुड या संकल्पनेतला प्रत्येक पदार्थ या जॉईंटमध्ये मिळतो.. अर्थात कॅलरी कॉन्शस आणि जंक फुड टाळणारे खवय्ये आपल्यापासून दुरावू नये म्हणून हे मॉडर्न रेस्टॉरन्टस वेगळी काळजी घेतात ती खास सॅलडसचा सेक्शन ठेऊन.. ही सॅलडस इतकी आकर्षक असतात की एरवी कच्च्या भाज्या किंवा फारसं चटकदार नसलेल्या पदार्थांचे फारसे चाहते नसलेले लोकही या सॅलड्सचं प्रेझेंटेशन आणि एकूणच बाह्यरुप पाहून त्याचा मोह टाळू शकत नाहीत.. फिटा विथ वॉटरमेलन नावाचं एक सॅलड तर फारच आकर्षक दिसतं..  गारेगार कलिंगडाच्या चौकोनी फोडींमध्ये खास ग्रिक पद्धतीचं फिटा चिज तशाच चौकोनी तुकड्यांमध्ये टाकलेलं असतं... त्यावर थोडसं गार्निशिंग अशी ही गारेगार डिश इतर स्टार्टर्सपेक्षा नक्कीच हेल्दी आणि टेस्टी ठरते..
तसाच एक चांगला चॉईस असतो वेगवेगळ्या प्रकारच्या सुपांचा. नेहमीच्या टोमॅटो किंवा चायनिज पद्धतीच्या सुप्सची जागा आता मॉडर्न पद्धतीच्या सुपांनी घेतलीय.. क्रिमी पोटॅटो सुप हा त्यातलाच एक वेगळा प्रकार.. बेक केलेले बटाटे, चेडार चिज, क्रिम यांच्यापासून तयार केलेलं थोडं घट्टसर सुप प्यायला अशा मॉडर्न जाईंटलाच जायला हवं.. इतर ठिकाणी फारसं न दिसणारं बिन्सचं सूपही इथे चाखायला मिळतं... किंवा अगदी बर्गर खायची इच्छा आहे पण कॅलरीच्या विचारांनी काय करावं सुटत नसेल तर त्यावरही ऑर्गॅनिक बर्गर असा पर्याय आहे.. अर्थात हे झाले त्यातल्यात्यात हेल्दी पर्याय, पण त्याशिवाय युवा खवय्यांना अशा जॉईंटसकडे खेचणारे खरे पर्याय म्हणजे फ्रेंच फ्राईजचे भन्नाट प्रकार आणि बर्गर, पिझ्झा, नॅचोजसारखे पदार्थ. टिक्का फ्लेवरचे फ्राईज, पावभाजीच्या फ्लेवरचे फ्राईज, गार्लिक म्हणजेच लसणाच्या चवीचे फ्राईज, तसंच खास मुंबय्या स्टाईलचे कांदे परतून त्याबरोबर येणारे फ्रेंच फ्राईज, असे या एकाच पदार्थाचे खरतर स्टार्टरचे कितीतरी पर्याय इथे मिळतात..बरं इथे सर्व्हिंग प्लेट वगैरे हा पण प्रकार नाही..
थेट बेकिंग ट्रेसारख्या ट्रेमध्येच कुठलाही पदार्थ आणला जातो..पिझ्झा आणि बर्गर्सच्या विविध प्रकारांबरोबर सध्या द अमेरिकन जॉईंट चर्चेत आहे ते इथल्या शेफ स्पेशल मेक्सिकन डिशेससाठी.. एन्चिलॅडाज हा एक गेल्या काही वर्षातला लोकप्रिय पदार्थ इथे शेफच्या कल्पनेतून खास भाज्या भरून प्रेझेंट केला जातो..तोच प्रकार मॅकरोनी नावाच्या पदार्थाचा.. चिज मॅकरोनी हा अमेरिकन लोकांचा अतिशय आवडता पदार्थ, त्याला राष्ट्रीय पदार्थ म्हणावं इतका अमेरिकेत चिज मॅकरोनी फेमस आहे, त्याचाच खास बम्बया किंवा भारतीय ट्विस्ट इथे खायला मिळतो..
टिक्का मसाल्याच्या ग्रेवीच्या जोडीने इथे आपल्याला चिज मॅकरोनी सर्व्ह केलं जातं.. इतर डेझर्ट आणि मॉकटेल्स किंवा मिल्कशेकच्या जोडीला खरा ‘द अमेरिकन जॉईंट’चा आविष्कार म्हणावा असे इथले डेझर्ट म्हणजे दोन किंवा तीन मजली वॅफल सॅण्डविचेस विथ आईस्क्रीम.. दोन वॅफल्सच्यामध्ये आईस्क्रीमचा गोळा भरुन अक्षरश: ते न पडू देण्याची कसरत करत आपल्या टेबलवर ही भली मोठी डेझर्टस येतात, ती खायला तर भन्नाट आणि मोठ्ठी असतातच पण बघायला त्याहून जबरदस्त असतात..त्यामुळे जंक फुडबद्दल मनात कितीही किंतु परंतु असले तरी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे वॅफल्स आणि त्यामध्ये आईस्क्रीम असे टॉवर्स चुकवायलाच नको..
अशा जंक फुड जॉईंटसना जायचं तर मित्रमैत्रिणींच्या गप्पाटप्पांचा माहौल असेल तर हा मेन्यू अगदीच योग्य वाटतो, पण कुटुंबासोबत विकेण्डला सकाळी लंचच्या वेळी किंवा डिनरच्या वेळी आपण गेलो तर जेवणाला इथे पर्याय मिळू शकतो का हा प्रश्न सहाजिकच पडतो..अर्थात पिझ्झा, पास्ता किंवा भलामोठा बर्गर याने आपलं पोट भरणार यात काही वाद नाही पण त्याशिवाय छोले राईस हा एकमेव पर्याय द अमेरिकन जॉईंटच्या मेन्यूकार्डात दिसतो..त्यामुळे जेवणासाठी विचार करत असाल तर यापेक्षा जास्त व्हेरायटी असलेल्य़ा रेस्टॉरन्टचा पर्याय स्वीकारलेलाच बरा पण मित्रमैत्रिणींबरोबर हॅंगआऊट करत असताना चविष्ट फिंगर फुडचा पर्याय हवा असल्यास द अमेरिकन जॉईंट अतिशय उत्तम जागा ठरते..