मुंबईत अशी अनेक रेस्टॉरन्टस आहेत ज्यांना लिजेंडरी रेस्टॉरन्ट म्हणता येईल. अगदी कुटुंबातल्या तीन तीन पिढ्या वर्षानुवर्ष  या रेस्टॉरन्टसमध्ये जाऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. अशी अनेक वर्ष जुनी रेस्टॉरन्ट्स प्रामुख्यानं दक्षिण मुंबईत बघायला मिळतात. कितीतरी वेळा एखादा नवा पदार्थ आम्ही पहिल्यांदा याच हॉटेलमध्ये खाल्ले अशाही आठवणी लोक सांगतात. मग उडुप्यांचे दक्षिण भारतीय पदार्थांचे रेस्टॉरन्ट्स, जुन्या परंपरा टिकवून ठेवणारी पारशी रेस्टॉरन्ट्स आणि काही मराठी उपहारगृहांबरोबरच मॉडर्न पदार्थ सर्व्ह करणाऱ्या काही खास रेस्टॉरेन्टसचाही या कडीत समावेश होतो. गिरगाव चौपाटीवरचं लिजेंडरी हॉटेल क्रिम सेंटर हे मॉर्न पदार्थांचं रेस्टॉरन्टही असंच अतिशय जुनं. गिरगावचं चौपाटीसमोरचं क्रिम सेंटर सगळ्यात जुनं असलं तरी आता मुंबईच्या वेगवेगळ्या भागात साधारण दहा ठिकाणी क्रिम सेंटरच्या शाखा गेल्या काही वर्षात उघडल्या आहेत. पण इतक्या वर्षांनंतरही नवनवीन पदार्थांचं सरप्राईज मात्र क्रिम सेंटरच्या शाखांमध्ये गेल्यावर नेहमी मिळतं. तरीही इथे लोक पुन्हापुन्हा जातात ते काही खास ठराविक पदार्थांसाठीच.
इथले छोले भटुरे सगळ्यात प्रसिद्ध आणि इथला भटूरा हा पूर्ण गोल आण मोठा असतो ही त्या भटुऱ्याची खासियत, अनेक भारतीय आणि त्यातही पंजाबी पदार्थ सिझलरवर इथे सर्व्ह केले जातात, असे हे भारतीय सिझलर्सही इथले जबरदस्त गर्दी खेचतात. क्रिस्पी आलु टिक्की सिझलर, पनीर का बाप सिझलर नावाचंही एक सिझलर इथे मिळतं, तंदूरी पनीर शाशलिक सिझलर आणि या सगळ्यावर कडी म्हणजे बम्बय्या पावभाजी सिझलर, मेक्सिकन फजिता सिझलर आणि अनेक प्रकारचे चायनिज सिझलर असा सिझलर्सचा इतका मोठा मेन्यू तर खास सिझलर्सच सर्व्ह करणाऱ्या स्पेशालिटी रेस्टॉरन्टमध्येही नसतो. बरं सिझलरचा आकारही केवढा मोठा आणि त्या सिझलरमधले विविध पदार्थही इतर ठिकाणपेक्षा कितीतरी जास्त.
त्यांच्या ‘पनीर का बाप सिझलर’मध्ये तर इतर कुठल्याहीपेक्षा जास्त पदार्थ आणि आकारानेही मोठे असतात असा रेस्टॉरन्टचा दावा आहे. या सिझलरमध्ये फक्त पनीरचेच कितीतरी प्रकार असतात म्हणजे पनीर टिक्का, हरियाली पनीर टिक्का, अचारी टिक्का, असे पनीरचे कितीतरी प्रकार एकाच सिझलरमध्ये खाता येतात, त्याचबरोबर दोन माणसांना पुरेल इतका बटर राईस दोन प्रकारचे सॉस, काजू आणि लसूण सॉस आणि ब्लॅक पेपर सॉस, रंगीत शिमला मिर्ची, बिन्ससारख्या भाज्या, स्टफ केलेला टोमॅटो, स्टफ केलेली शिमला मिर्च, परतलेला कांदा, तळलेले वाटाणे आणि कचुंबर किंवा कोशिंबिर.
एका सिझलरमधल्या पदार्थांची यादी वाचूनच दमणूक होते, मागवल्यावर तीन ते चार जण पोटभर खातील इतकं ते सिझलर मोठं असतं. क्रिम सेंटरला पदार्थांच्या किमती इतर ठिकाणापेक्षा जरा जास्त आहेत अशी तक्रार कायमच केली जाते पण प्रत्येक प्लेट मागव्यावर येणारी क्वांटिटीपण इतर ठिकाणांपेक्षा नक्कीच दुप्पट असते.
सिझलरसारखेच किंवा सिझलरपेक्षाही फेमस आहे इथले बिग नॅचोज. नॅचोज हा जगभर लोकप्रिय झालेला मेक्सिकन पदार्थ. इतर मेक्सिकन पदार्थांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक लोकप्रिय झालेला पदार्थ नॅचोज आहे. अगदी कुठल्याही डेलिनिड्सच्या दुकानात गेलं तरी कॉर्नच्या पिठापासून केलेले टॉर्टिला चिप्स म्हणजेच नॅचोजची पाकीटं अगदी बटाट्याच्या चिप्सइतकी सर्रास बघायला मिळतात.
हेच कुरकुरीत टॉर्टिला चिप्स टोमॅटोचा तिखट सॉस, भाज्या आणि भरपूर प्रमाणात पातळ केलेल चिज असं रेस्टॉरन्टसमध्ये सर्व्ह केलं जातं. पण हाच चिज नॅचोज नावाचा पदार्थ क्रिम सेंटरमध्ये मात्र वेगळ्यात थाटात सर्व्ह केला जातो. एकतर एरव्ही बटाट्याच्या चिप्सच्या आकाराचे असणारे टॉर्टिला चिप्स क्रिम सेंटरमध्ये मात्र थेट पोळीच्या आकाराइतके मोठे असतात. एका मोठ्या प्लेटमध्ये नॅचोजबरोबर काळे ऑलिव्हज, लेट्युसची पानं आणि इतर भाज्यांबरोबर इडली सांबार मागवल्यावर जितका सांबार येतो तितकं चिज असा हा पदार्थ येतो. मग चिजप्रेमींना अजून काय हवं.
क्रिम सेंटरला गेल्यावर अगदी न चुकता ट्राय केलाच पाहीजे असं ड्रिंक म्हणजे अतिशय आकर्षक अशा पिस्ता, गुलाबी आणि केशरी रंगात मिळणारे आईस्क्रीम सोड्याचे फ्लेवर्स. हिरव्या रंगाचा लिंबाचा आईस्क्रीम सोडा, गुलाबी स्ट्रॉबेरी सोडा आणि केशरी ऑरेंज सोडा यातलं काहीही मागवलं. तो रंगीत आईस्क्रीम सोड्याचा ग्लास आणि त्याबरोबर छोट्याशा बरणीच्या आकाराच्या काचेच्या ग्लासमध्ये भरपूर सोडा असं सगळं एकत्र सर्व्ह केलं जातं. हवा तेवढा सोडा टाकत ते ड्रिंक प्यायचं. आईस्क्रीम, सरबत आणि सोडा असा तिहेरी ब्लास्ट असतो जिभेवर.
क्रिम सेंटरमध्ये चवदार खायला गेल्यावर असे अनेक पदार्थ आहेत जे पिढ्यानपिढ्या लोकप्रिय झालेले आहेत आणि कुटुंबातल्या सर्वांनाच आवडणारे आहेत. त्या लाडक्या पदार्थांना क्रिम सेंटर क्लासिक असं संबोधलं जातं. त्यात त्यांच्या चिली चिज टोस्ट आणि कॉर्न चिज बॉल्सचा नंबर सगळ्यात वरचा लागतो. या दोन स्टार्टर्सपैकी किमान एकतरी पदार्थांची चव खवय्ये घेतातच.
स्टार्टर्सनंतर इथे सिझलर किंवा पनीरच्या विविध डिशेसचा पर्याय असतोच, पण तो नको असल्यास पोटालाही चांगला पारंपरिक भारतीय पण आंतरराष्ट्रीय स्टाईलने सर्व्ह होणारा पर्याय म्हणजे पंजाबी मसाला खिचडी. फॉन्द्यु पॉटसारख्या पॉटमध्ये ही खिचडी आपल्यापुढे आणून ठेवली जाते आणि त्याबरोब फॉन्द्युसोबत जसा ब्रेड किंवा फळं असतात त्याऐवजी दही आणि पापडाचा चुरा अशी ची डिश सर्व्ह होते. क्रिम सेंटरची बिर्याणी आणि इतर भाज्याही चवदार असतात, पण स्टार्टर्स म्हणता येतील असे पदार्थ आणि सिझलर हाच खवय्यांचा प्राधान्यक्रम असतो. स्टार्टर्समध्ये तर इतकं वैविध्य असतं की त्यातच पोट भरु शकतं. काही हटके पदार्थ इथेही मिळतात. त्यातला सगळ्यात वेगळा पदार्थ आहे चिजलिंग भेळ. छोटे-छोटे चौकोनी बिस्कीटं म्हणजे चिजलिंग्स, करमुऱ्यांऐवजी चिजलिंग्सची चाट इथल्या लोकप्रिय पदार्थांपैकी एक. थ्री खारीज नावाचा आणखी एक नेहमीच्या पदार्थाचा नवा आणि हटके अवतार. चहाबरोबर आपण जी खारी खातो. त्या खारीवर ब्रुशेटासारखा टॉमॅटो ऑलिव्हजचा थर असतो. ब्रेडऐवजी खारीचा ब्रुशेटा कुरकुरीत आणि चमचमीत लागतो.  खारी हा मुंबईकरांचा विक पॉईंट असल्याने असे खारीचे बरेच पदार्थ मिळतात क्रिम सेंटरला. पावसुद्धा मुंबईकरांना खूप आवडतो. त्याचाही वापर करुन काही नाविन्यपूर्ण पदार्थ क्रिम सेंटरच्या मेन्यूकार्डात दिसतात. चिली चिज मस्का पाव हा त्या प्रयोगाचाच एक भाग. याशिवाय खवय्यांसाठी पिझ्झाचे अनेक प्रकार, पास्ता, मॅकरोनी, सॅण्डविचेस, पाणीपुरीसारखे चाटचे प्रकारही क्रिम कॉर्नरला जाऊन चाखता येतात. त्यामुळे पारंपरिक भारतीय पदार्थ आणि भारतीय पद्धतीने ट्विस्ट केलेले विदेशी किंवा कॉन्टीनेन्टल पदार्थ कुटुंबासोबत चाखायचे असल्यास वर्षानुवर्ष जुना पण तितकाच फ्रेश असलेला क्रिम सेंटर हा एक उत्तम पर्याय आहे. संबंधित ब्लॉग : 

जिभेचे चोचले : तरुणाईचा ‘चिजी’ अड्डा, प्युअर मिल्क सेंटर

जिभेचे चोचले: उडुपी संस्कृतीचा पारंपारिक थाट

जिभेचे चोचले : आस्वादचा ‘आस्वाद’

जिभेचे चोचले : स्पेशल सिझलरसाठी ‘फुड स्टुडियो’

जिभेचे चोचले : ‘फ’ से फ्यूजन… ‘फ’ से फूड

जिभेचे चोचले : ढाब्याची आठवण – चौबारा 601

जिभेचे चोचले : ग्लोबल एशियन फ्युजन

जिभेचे चोचले : हम काले है मगर… आईस्क्रीमचा भन्नाट फ्लेवर

जिभेचे चोचले : महाराष्ट्राचा काठ आणि घाट

जिभेचे चोचले: केक चॉकलेट पेस्ट्रीचं रोलिंग पिन

जिभेचे चोचले : पाणीपुरी – ‘तोंडभर’ आनंद

जिभेचे चोचले: पावभाजी – विथ लव्ह फ्रॉम मुंबई

 जिभेचे चोचले: इराणी हॉटेलांचा मॉडर्न अवतार

जिभेचे चोचले : मुंबईतलं मिनी दक्षिण भारत : इडली-डोशाचं गाव

जिभेचे चोचले : मुंबईचं मॉडर्न कॅन्टीन

जिभेचे चोचले : कुटुंबसंस्थेचं सेलिब्रेशन

जिभेचे चोचले : सफर विस्मरणातल्या खाद्यसंस्कृतीची

जिभेचे चोचले : हवाहवासा प्रवास

जिभेचे चोचले : गल्लीतला ‘खाऊ’

जिभेचे चोचले : पंचतारांकित रसनातृप्ती

जिभेचे चोचले : चमचमीत ग्रील आणि बार्बेक्यू

जिभेचे चोचले : तरुणाईची हँगआऊट प्लेस

जिभेचे चोचले : टूमदार, चटकदार घराची ‘स्टोरी’

जिभेचे चोचले: विलक्षण पाहुणचार

जिभेचे चोचले – खाद्यपदार्थांची न्यारी दुनिया ! 

जिभेचे चोचले : मुंबईतला नवा ट्रेण्ड- मॉडर्न फुड विथ ट्विस्ट