IPL 2025 KKR vs SRH: आज झालेल्या कलकत्ता विरुद्ध हैदराबाद सामन्यात एडन गार्डनवर पंडित गुरुजींचे चेले अजिंक्य राहिले. नाणेफेक जिंकून हैदराबाद ने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून कलकत्ता संघाला फलंदाजीस आमंत्रण दिले..कलकत्ता संघाची सुरुवात अडखळत झाली..डिकॉक आणि नारायण स्वस्तात बाद झाले..पण नंतर अजिंक्य आणि रघुवंशी या दोन मुंबईकरांनी शांत डोक्याने फलंदाजी केली आणि पहिल्या ६ षटकात दोन गडी बाद 53 धावा धावफलकावर  लावल्या...अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत एकदा भारत रत्न सचिन तेंडुलकर म्हणाले होते..की तो येतो आवाज न करता गुपचूप धावा करतो की प्रतिस्पर्धी संघाला समजत देखील नाही..आज याच गोष्टीचा प्रत्यय आला..त्याच्या ३८ धावत ४ नयनरम्य षटकार होते...त्याने कमिन्स ला एक फ्रंट फूट पुल चा षटकार खेचला.त्यानंतर  शमी ला एक पिक अप चा षटकार वसूल केलं आणि नंतर  सिमरजीत सिंगला एक बॅकफूट पुलं  षटकार वसूल केला हे तिन्ही षटकार त्याच्या दर्जावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पुरेसे होते..त्याला ज्या दुसऱ्या  मुंबईकराने साथ दिली त्या रघुवंशीला अभिषेक नायर या जवा हिऱ्याने पैलू पाडले आहेत.

अभिषेक नायर याला रोहित शर्मा आणि रघुवंशी मध्ये काही साम्य दिसलं. (सिमरजीत सिंग याच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर लाँग  लेग सीमारेषेबाहेर पाठविल्यावर ती झलक दिसली.).आणि त्याने त्याला रोहित शर्मा च्या शाळेत दाखल केलं....आज सुद्धा त्याने कलकत्ता संघासाठी एक उपयुक्त अर्ध शतक केले आणि आपल्या कर्णधारासोबत ८१ धावांची भागीदारी केली..या दोघांनी रचलेल्या पाया अधिक मजबूत केला तो वेंकटेश अय्यर आणि रिंकू सिंह  यांनी..वेंकटेश अय्यर यांने स्थिराविण्यासाठी थोडा वेळ घेतला पण त्यानंतर त्याने डोळ्याला आनंद देणारे फटके मारले..डावखुऱ्या फलंदाजाला शोभणारी हाय बॅक लिफ्ट आणि बॅट स्विंग या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत...या सोबत चेंडू उशीरा खेळण्याची कला त्याच्याजवळ आहे..त्याने रिंकू सोबत ९१ धावांची भागीदारी केली ती सुद्धा फक्त ४१ चेंडूत...जेव्हा २०० धावा धावफलकावर लागल्या तेव्हाच  हैदराबाद संघ मानसिक दबावाखाली गेला..

२०० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबाद संघाला वैभव अरोरा आणि हर्षित राणा यांनी एका मागून एक धक्के दिले...सुरवातीला  धोकादायक असणाऱ्या हेड ला  लॉफ्टेड  ऑफ ड्राईव्हच्या मोहात पकडले...आणि नंतर ईशान ला कव्हर ड्राईव्ह करताना अजिंक्य कडून बाद केले...अजिंक्य रहाणे ने या आगोदर शॉर्ट कव्हर वर मुबई विरुद्ध विल जॅक्स चां पण अप्रतिम झेल  पकडला होता आणि आज सुद्धा ईशान किशन चा त्याच जागेवर तसाच कॉपी बुक झेल पकडला...या झटापटीत वैभव ने ३ रे षटक निर्धाव टाकून हैदराबाद संघाला आणखीन अडचणीत आणले..हैदराबाद संघ या पडझडीतून शेवटपर्यंत बाहेर आले नाहीत...स्थिर झालेल्या रेड्डी आणि क्लासन ठराविक अंतरात बाद झाले ...आणि हैदराबाद संघाच्या इतर फलंदाजांना वरुण चे गुपित समजलेच नाही..कमिन्स ला एका लेग ब्रेक वर बाद केले आणि समरजीत सिंगला एका अफलातून गुगली वर त्रिफळाचित केले आज वरूण ला तीन बळी मिळालेले आहेत आणि जस जशी ही आय पी एल पुढे जाईल तसतसे वरूण नावाचं गुपित प्रतिस्पर्धी संघाला बूचकाळ्यात टाकेल. भारतीय क्रीडा रसिकांमध्ये विराट बद्दल आकर्षण आहे...रोहित बद्दल प्रेम आहे ...आणि अजिंक्य बद्दल सहानुभूती आहे...आज त्याचा संघाने तळाच्या स्थानावरून   पाचव्या स्थानावर  झेप घेतली. ..चंद्रकांत पंडित आणि अजिंक्य ही जोडी त्यांचे विजेतेपद कायम राखण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील इतके मात्र नक्की...

ही बातमीही वाचा:

IPL 2025 : वैभव अरोरानं धोकादायक ट्रेविस हेडला पुन्हा गिऱ्हाईक बनवलं, 2024 च्या फायनलची पुनरावृत्ती, SRH बॅकफूटवर