सुपला शॉट, SKY टोपणनाव, टी20 रँकिंगमधील नंबर वन फलंदाज... म्हणून ख्याती असली तरीही वनडेच्या मैदानात सूर्यकुमार यादव याला म्हणावा तितका प्रभाव पाडता आलेला नाही, हे तितकेच खरे आहे. वनडेतील सूर्यकुमार यादव याचे आकडे पाहिल्यास तुम्हालाही यात तथ्य असल्याचे दिसतेय. टी20 मध्ये वेगाने धावा काढण्यात पटाईत असणारा सूर्या वनडेत मात्र धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. वनडेमध्ये सूर्यकुमार यादव याच्या फलंदाजीत सातत्य दिसत नाही. तरिही वनडे सूर्यकुमार यादव याला रोहित आणि राहुल जोडीकडून सातत्याने संधी मिळते. इतक्या संधी मिळाल्यानंतरही सूर्याला त्याचे सोनं करता आले नाही. मग तरिही सूर्याला विश्वचषकासाठी 15 जणांमध्ये घेण्याचा अट्टहास का?
आज भारतीय संघाची विश्वचषकासाठी निवड झाली. त्यामध्ये सूर्यकुमार यादव याला संधी दिली. पण सूर्यकुमार याला संधी दिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. सूर्यकुमार यादव याची निवड का केली ? सूर्यकुमार यादवला खेळवण्याच्या नादात रोहित आणि राहुल जोडीने गोलंदाजी पर्याय कमी केले का? कारण, सूर्यकुमार यादव याच्याकडे टीम इंडिया फिनिशर म्हणून पाहतेय.. पण प्लेईंग 11 मध्ये त्याची जागाच होत नाही.. सूर्यकुमार यादव याची वनडेतील खराब कामगिरी आहे..तरिही त्याला स्थान दिले गेले. सूर्यकुमार यादवला संधी देण्याऐवजी स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाला स्थान मिळाले असते. कुलदीप यादव हा एकमेव स्पेशालिस्ट फरिकी गोलंदाज आहे... त्यामुळे कुलदीपच्या जोडीला चहल अथवा अश्विन हे पर्याय चांगले होते. पण रोहित आणि राहुल या जोडीने सूर्याला घेण्याचा अट्टहास केला. सूर्याची वनडेतील कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली आहे.
मागील सहा वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव याला आपल्या फलंदाजीला न्याय देता आला नाही. वेस्ट इंडिजविरोधात झालेल्या तीन वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव धावा काढता संघर्ष करत असल्याचे दिसले. त्याला साधे अर्धशतकही ठोकता आले नाही. 19, 24 आणि 35 धावाच करता आल्या होत्या. तर त्याआधी मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वनडे मालिकेतही सूर्या फ्लॉप गेला होता. सूर्याला तीन सामन्यात खातेही उघडता आले नव्हते. तो लागोपाठ तीन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मागील दीड वर्षांपासून सूर्या वनडेमध्ये धावा काढताना झगडतोय, तरिही टीम इंडियात त्याला वारंवार संधी का दिली जातेय ? असा सवाल उपस्थित होतोय. संजू सॅमसनसारखा तगडा खेळाडू असतानाही वारंवार सूर्याला संधी दिली जातेय. बरे.. असे नाही की सूर्याची वनडेतील कामगिरी एक नंबर आहे. आतापर्यंत सूर्याला वनडेत दमदार कामगिरी करताच आली नाही. सूर्यकुमार याने वनडेतील अखेरचं अर्धशतक 2022 फ्रेबुवारीमध्ये झळकावले होते. त्यानंतर तो सातत्याने फ्लॉप जातोय.
सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत 26 वनडेमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेय. यामधील 24 डावात त्याने 24 च्या सरासरीने 504 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 101 इतका आहे. यादरम्यान त्याने दोन अर्धशतके ठोकली आहेत.53 चौकार आणि 11 षटकार मारले आहेत. सूर्यकुमार याला घेण्याबाबत रोहित शर्मा आणि राहुल द्रविड आग्रही का आहेत ? टी 20 मध्ये सूर्या क्लास फलंदाज आहे. त्याच्या तोडीला कुणीही नाही.. पण वनडे त्याला घेण्याचं गणित समजत नाही. सूर्यकुमार यादव याला तुम्ही फिनिशर म्हणून खेळवण्याचा विचार करत आहात... तरी त्याच्या नावावर वनडेत किती षटकार आहेत.. मुळात त्याचे संघात स्थान पक्के आहे का? केएल राहुल आणि श्रेअय अय्यर संघात परतल्यानंतर सूर्यकुमार यादव याला स्थान देण्यात कोणताही अर्थ दिसत नाही. कारण, चौथ्या क्रमांकावर अय्यर आणि पाचव्या क्रमांकावर राहुल फलंदाजीला उतरेल.. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा असा क्रम असेल.. त्यानंतर गोलंदाज सुरु होतील.. मग सूर्यकुमार यादव याला 15 जणांच्या संघात सामील करण्यात अर्थ आहे का ? सूर्यकुमार यादव याच्या प्रतिभेबद्दल कुणालाही शंका नाही....पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला आपल्या प्रतिभेला न्याय देता आला नाही. तरिही त्याला संधी दिली जातेय. सूर्यकुमार यादव याच्याऐवजी एखादा फिरकी स्पेशालिस्ट संघात ठेवल्यास फायदा होऊ शकतो. भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजी प्रभावी ठरते. आशावेळी तुम्ही आर. अश्विन अथवा युजवेंद्र चहल यांना संधी द्यायला हवी... भारतीय संघात एकही ऑफ स्पिनर फिरकी गोलंदाज नाही.. प्रतिस्पर्धी संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या जास्त असेल तर भारतीय संघ कशी रननिती करणार? फलंदाजी मजबूत करण्याच्या प्रयत्नात भारताची फिरकी गोलंदाजी कमकुवत झाल्याचे दिसतेय. हे विश्वचषकासाठी भारतासाठी धोकादायकच आहे.