Ikkis Movie Review: एरिक मरिया रीमार्क नावाचा जर्मन लेखक आहे. तो जर्मन सैन्यात होता. पहिल्या युद्धातून परत आल्यावर त्यानं आपल्या अनुभवांवर अनेक पुस्तकं लिहिली. 'ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट' हे त्यापैकीच एक. अगदी महत्त्वाचं. शिक्षकांनी स्फुरण भरल्यावर 19 वर्षांचा कादंबरीचा नॅरेटर पॉल बॉमर सैनिक बनतो. युद्धात सामील होतो. पुस्तकं आणि सिनेमात युध्द जेव्हढं सेन्सेशनल आणि एक्साइटींग दाखवलेलं किंवा लिहिलेलं असतं, तसा अनुभव त्याला प्रत्यक्षात येत नाही. पॉलचा एक एक मित्र युध्दात मरतो. 19 वर्षांचा हा मुलगा रोज आसपास आपली आणि समोरची माणसं मरताना पाहतो. दुश्मन देशाचा एक सैनिक डुआल त्याच्या समोर मरत असतो. पॉलने झाडलेल्या गोळीनेच तो जखमी झालाय. आता मरण्यापुर्वी तो पाकिट बाहेर काढतो आणि त्यातला बायको-मुलांचा फोटो पाहायला लागतो. पाकिटात त्यांची पत्रं ही असतात. पॉलला हे सर्व असह्य होतं. तो त्याला जवळ घेतो आणि तो कसा चांगला सैनिक होता हे तुझ्या कुटुंबियांना सांगेल असं तो त्या मरणाऱ्या फ्रेंच सैनिकाच्या कानात कुजबुजतो. इथं पॉलच्या तोंडी पुस्तकातली काही सुंदर वाक्य आहेत. पॉल म्हणतो, “ ते आम्हाला हे का नाही सांगत की दुश्मन राष्ट्रातही आमच्या सारखे गरीब सैनिक राहतात. त्यांच्या आया ही आमच्या आयांसारख्या काळजी करत असतात, त्यांना ही आमच्या सारखीच मरणाची सतत भिती वाटत असते. ” ही वाक्य या कादंबरीतली महत्त्वाची वाक्य आहेत. दुश्मन देशातला माणूस सैतान नसतो, तो आपल्या सारखाच माणूस असतो. प्रोपंगंडा आणि सीमारेषेमुळं तो आपल्याविरोधात उभा राहिलेला असतो. नाही तर तो ही आपल्या सारखाच माणूस.
श्रीराम राघवनच्या इक्कीस (2026) सिनेमातही असंच एक वाक्य धर्मेंद्र यांच्या तोंडी आहे. धर्मेंद्र यांचा हा शेवटचा सिनेमा आहे. त्यात त्यांनी वीरगती मिळालेल्या सेना अधिकारी अरुण खेत्रपालच्या वडिलांची भूमिका केलीय. सध्याच्या पाकिस्तानात त्याचं गाव आहे, फाळणीनंतर ते भारतात आले. ते स्वताही सैनिक होते. ऐन कारगिल युध्दानंतर 2002 मध्ये गेट टुगेदरच्या नावाखाली ते पाकिस्तानात आलेत. त्यांना आपल्या पिंडमध्ये म्हणजे मुळ गावी जायचंच आहे. पण अवघ्या 21 व्या वर्षी 1971 च्या पाकिस्तान सोबतच्या युध्दात अरुण नक्की कुठे गेला हे त्यांना पाहायचंय. पाकिस्तानात त्यांची सर्व सोय करणारा मेजर नासीरनंच अरुणचा टँक उडवून दिलाय. नासीरला त्याचं गिल्ट आहे. पण मीच तुमच्या मुलाचा मारेकरी आहे हे तो सांगणार कसं या सर्व प्रक्रियेवर हा सिनेमा आहे. सिनेमाच्या शेवटी जेव्हा नासीर त्यांना हे सांगतो तेव्हा धर्मेंद्र यांच्या तोडी सिनेमातली सर्वात महत्त्वाचं वाक्य येतं, “दोनो देश के बीच का यह मसला कब खत्म होगा पता नही. लेकीन इसमें नस्ल और फसल का बडा नुकसान हो रहा है"
इक्कीस (2026) हा सिनेमा खऱ्या अर्थानं आन्टी-वॉर फिल्म आहे. नफ़रत की राजनिती पसरवणाऱ्यांना आरसा दाखवणारी. युध्दखोरीची भाषा बोलणाऱ्यांना सनसनीत कानाखाली लगावणारी. संपुर्ण फिल्ममध्ये युध्द दाखवलंय, नाही म्हणायला त्यात अरुण खेत्रपाल यांची अधुरी प्रेमकहानी आहे. एक मेलोड्रामॅटिक फॅमिली कथानक आहे. पण हा संपूर्ण सिनेमा भारत-पाकिस्तानमधल्या सौहार्दतेची गोष्ट सांगतो. तो पाकिस्तानला दुश्मन देश असं संबोधत नाही. काळं-पाढरं असं दाखवत नाही. तर युध्दाची ग्रे शेड जी दोन्ही बाजूला आहे. सर्वसामान्य लोक कसे राजकारण आणि राजकारण्यांच्या मनसुब्यांचे बळी ठरतात याची गोष्ट सांगतं. इथं कुणी चुक किंवा बरोबर नाही. जो तो आपआपल्या जागी योग्य आहे. चुक जर काही असेल तर ती युध्दाची हाक देणारे राजकारणी आहेत. ते खरे व्हिलन आहेत.
अरुणचं रणगाडा पहिल्यांदा जेव्हा पाकिस्तानात शिरतो तेव्हा त्याचा ड्रायव्हर म्हणतो अरे यहाँ तो सबकुछ अपने जैसे ही है. तिथली माणसं, तिथली जमीन, तिथली हवा सर्व काही एकसारखंच. फक्त सीमारेषेमुळं दोन वेगवेगळे देश बनले. ते एकमेकांविरोधात उभे राहिले आणि त्यांनी मग युध्द केली.
श्रीराम राघवन हा चांगला स्टोरीटेलर आहे. सिनेमाच्या गोष्टीवर त्याची चांगली पकड असते. इक्कीसची गोष्ट फुकाचा राष्ट्रवाद सांगणारी नाही. तर पाकिस्तान आणि भारतातल्या युध्दात दोन्हीकडून माणसंच मारली जातात. याची जाणिव करुन देणारा हा सिनेमा आहे.
‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’ या जर्मन कादंबरीवर आजपर्यंत खुप सिनेमे बनलेत. स्टॅनली कुब्रिकचा फुल मेटल जॅकेट (1987) हा सिनेमा ही असार युध्दाचा मानवी चेहरा दाखवणारा आहे. एव्हढंच नव्हे तर कुब्रिकचा पाथ ऑफ ग्लोरी (1957) हा देखील युध्दाची गोष्ट सांगणारा एन्टी वॉर मुव्ही आहे. तर दिग्दर्शिका कॅथरीन बिगेलोचा द हर्ट लॉकर (2008) असो किंवा झिरो डार्क थर्टी (2012) किंवा गेल्यावर्षी आलेला ए हाऊस ऑफ डायनामाईट (2025) हे सर्व सिनेमे प्रत्यक्ष युध्दभूमीतल्या माणसांची गोष्ट सांगतात. शिवाय सध्या सुरु असलेल्या इस्राइल-पॅलेस्टाईन युध्दावर बेतलेला द व्हॉईस ऑफ हिंद रिजाब (2025) ही महत्त्वाचा एन्टी वॉर सिनेमा आहे.
मेरे दुश्मन मेरे भाई मेरे, मेरे हम साये असं गाणं असणारा बॉर्डर सिनेमा खुप डायलॉगबाजीचा असला तरी तो युध्दात मारल्या जाणाऱ्या सैनिकांची गोष्ट सांगतो. राष्ट्रभक्तीच्या स्फुरणाचं चूण देणारे राजकारणी लोकांची माथी भडकवतात, माध्यमाचा वापर करत मतप्रवाह बनवतात, त्यातून आपली राजकिय पोळी भाजून घेतात. सत्तेवर येतात आणि लोकांचं रक्त प्यायला तयार होतात. हे दोन्ही कडून होत असतं. आदीपासून आत्तापर्यंत असंच होत आलंय. असंच होत राहणार म्हणूनच धर्मेंद्र यांच्या तोंडी असलेलं इक्कीस सिनेमातलं वाक्य फार महत्त्वाचं आहे.
"दोनो देश के बीच का यह मसला कब खत्म होगा पता नही. लेकीन इसमें नस्ल और फसल का बडा नुकसान हो रहा है"