- आकांक्षा जावडेकर
शिमगा... कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण. कोकणात शिमगा म्हटलं की एक वेगळाच उत्साह लहानांनपासून थोरांपर्यंत सर्वांगातून वाहायला लागतो. जसं गावकऱ्यांना ह्या सणाची आतुरता असते तीच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक ओढ ही कोकणातून रोजगारनिमित्त मुंबईत गेलेल्या चाकरमान्यांना असते. खरं तर आपण कितीही दूर गेलो तरी आपल्या गावाशी, तिथल्या मातीशी, तिथल्या निसर्गाशी आणि तिथल्या माणसांशी आपली नाळ जोडलेली असते. याचाच प्रत्यय होळीच्या सणात चाकरमान्यांना बघून येतो. काळाच्या ओघात कोकणातला गावकरी शहरात गेला आणि जाताना गावाचं गावपण ही घेऊन गेला असं म्हणतात . पण असं असलं तरी गेलेले गावपण जपण्याचं काम देखील हाच चाकरमानी कित्येक वर्ष अगदी निष्ठेने करतोय. Time is money असं म्हणत चाकरमानी लाइफ रेस मध्ये धावत असला तरी वर्षातले काही दिवस ह्याच रेस मधून मुद्दाम मागे पडून, मशीन पासून disconnect होऊन हाच चाकरमानी आपल्या निसर्गाशी Reconnect होतो.
कोकणातल्या चाकरमान्यांची पावलं प्रत्येक सणाला गावाकडे वळाल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गौरी गणपती असो दिवाळी असो किंवा दसरा असो. आणि ह्याच सणांच्या रेलचेलीनंतर पुढे येतो तो त्यांच्या जिव्हाळ्याचा शिमगोत्सव.
चाकरमानी आणि त्यांच्या गावाचा शिमगा यांच एक अतूट असं नातं आहे. वर्षभर मन मोडून काम करणारा हा चाकरमानी वाट पाहत असतो तो शिमग्याची, तो वाट पाहत असतो गावातल्या आपल्या आप्तेष्टांच्या गाठीभेटींची, तो वाट पाहत असतो दहा दिवस माळावर होळी लावण्याची, तो वाट पाहत असतो रोज होळीत फाक घालण्याची, तो वाट पाहत असतो आपल्या गावदेवीची पालखी बेधुंदपणे नाचवण्याची आणि तो वाट पाहत असतो त्या सजवलेल्या पालखीतून मढवलेल्या देवाला आपल्या घरात आशीर्वाद द्यायला घेऊन येण्याची. खरंतर शिमगा या चाकरमान्यांसाठी का एवढा जिव्हाळ्याचा याचं कारण एका वाक्यात सांगायचं तर ते हे की वर्षभर आपण देवाच्या दारात जातो...पण शिमगा हा सण असा आहे जेव्हा देव त्यांच्या दारी येऊन या कोकणकरांना आशीर्वाद देतो.
तसं पाहता होळीची परंपरा ही प्रत्येक गावा प्रमाणे थोड्या अधिक प्रमाणात बदलताना पाहायला मिळते. काही ठिकाणी होळीच्या काही दिवस आधीपासून शिमगोत्सव सुरू होतो तर काही ठिकाणी होळी पासून. होळी जवळ आली की गावाला एक प्रकारचा निराळच चैतन्य प्राप्त होतं. होळीच्या तयारीची धामधूम जिकडे तिकडे बघायला मिळते. गावातल्या मानकऱ्यांनी वर्षानुवर्ष जिवापाड जपलेल एखादं झाड त्याची पूजा करून तोडलं जातं. एरवी झाडाच्या एका पानाला सुद्धा हात न लावून देणारा माणूस आनंदाने आणि मोठ्या अभिमानाने हे झाड तोडून घेऊन जातो. यामध्ये विशेषतः सुरमाड, आंबा, पोफळीचं झाड अश्या झाडांचा समावेश असतो. हे झाड मोठ्या जल्लोषात वाजत गाजत खांद्यावरून नाचवत होळीच्या माळावर नेऊन तिथे रोवलं जातं. त्याच्या बाजूने पूर्ण होळी रचली जाते. रात्री त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होलिका दहन केलं जातं. होळी लावल्यावर तिच्या बाजूने रिंगणात फाक देत, पारंपरिक गाणी म्हणत फेऱ्या मारल्या जातात. याच दिवशी संपूर्ण गावातून शंकासुर आणि सोंगं नाचवली जातात. गोमुचा नाच होतो. काटखेळ खेळले जातात.
याच रात्री गावदेवीची पालखी सजवली जाते. दुसऱ्या दिवशी देवीचा कौल घेऊन ही पालखी देवळातून सहाणेवर आणली जाते. मानकरी तिची यथोचित पूजा करतात. सजलेली पालखी आणि मढवलेल्या देवीचं रुप पाहून डोळ्याचं पारणं फीटतं आणि सर्वांगातून आनंद आणि श्रद्धेची लाट उसळून येते. पारंपरिक वाद्यघोषात ही पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. नवस बोलले जातात, नवस फेडले जातात, ओट्या भरल्या जातात, गाऱ्हाणी घातली जातात एवढेच काय तर प्रत्येकजण आपल्या अंगणात पालखी खांद्यावर घेऊन मनसोक्त बेधुंदपणे ती नाचवतात. आणि शेवटी अतिशय आनंदात पण पाणावलेल्या डोळ्यांनी गावकरी पालखी गावाच्या वेशीवर आणतात. पुन्हा पूजा होते. संपूर्ण गावच्या सुख समृद्धीसाठी देवीला गाऱ्हाणं घातलं जातं. मग खऱ्या अर्थाने हा शिमगा संपन्न होतो.
शिमगा संपलेला असतो पण त्यातून मिळालेली अपरिमित ऊर्जा ही त्याला संपूर्ण वर्ष पुरून उरणारी असते. मग चाकरमान्यांची पावलं पुन्हा मुंबईच्या दिशेने वळतात. जड अंतःकरणाने परंतु अतिशय समाधानाने तो गाव सोडतो. पण हो तो या परंपरेची आणि संस्कारांची शिदोरी घेऊन ती तो आपल्याजवळ अगदी जबाबदारीने जपतो, वाढवतो आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करत असतो. थोडक्यात काय, कोकणातला माणूस शहराकडे वळला असला, चाकरमानी झाला असला तरी त्याच्यातलं गावपण आज देखील टिकून आहे. त्याच्या ध्यानीमनी नेहमीच आपलं गाव असतं.. कारण शहरात येताना मुठीत घट्ट पकडलेली ती गावाची माती निसटून जायच्या आतच त्याचं गाव त्याला पुन्हा साद घालतं...येवा कोकण आपलाच असा!!!