ऑन युअर मार्क... सेट... गो...
या तीन शब्दानंतर होणाऱ्या बंदुकीच्या गोळीच्या आवाजानं तिच्या पायात जणू वीज संचारते. त्यांनतर तिला दिसते ती फक्त फिनिश लाईन. डोक्यात असतं ते फक्त कमीत कमी वेळेत ती अंतिम रेषा पार करण्याचं ध्येय. ते ध्येय ती लिलया साध्य करते आणि त्यानंतर लिहिला जातो तो नवा इतिहास.


2 जुलै ते 21 जुलै या अवघ्या 19 दिवसांच्या कालावधीत एका 19 वर्षांच्या मुलीनं हा इतिहास एकदा दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळा रचला.

धावपटू हिमा दास... भारतीय क्रीडा विश्वात आजच्या घडीला तेजाने झळाळणार हे नाव. भारताच्या पूर्वेकडच्या आसाम राज्यातल्या या लेकीनं पोलंड आणि झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धांमध्ये सलग पाच सुवर्णपदकांची कमाई करुन विक्रमी कामगिरीची नोंद केली.

दोन जुलैला पोलंडच्या पोजनान अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये हिमाने 200 मिटर शर्यतीचं सुवर्ण जिंकलं. त्यानंतर सात जुलैला पोलंडमध्येच कुटनो अॅथलेटिक्स मीटमध्येही हिमानं विजयी दौड घेत दुसरं सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. १३ जुलैला झेक रिपब्लिकमधल्या क्लाडनो इथं झालेल्या स्पर्धेत हिमानं २०० मीटर शर्यतीत सलग तिसरं सुवर्णपदक जिंकलं. यशाचा हा कित्ता हिमानं पुढच्या सात दिवसांत आणखी दोन वेळा गिरवला. झेकमधल्या टॅबोरमध्ये १७ जुलैला हिमानं २०० मीटर्स शर्यतीचं आणि २० जुलैला नोव्ह मेस्टोमध्ये ४०० मीटर्स शर्यतीचं सुवर्णपदक पटकावलं.

हिमानं गेल्या वर्षी फिनलॅन्डमध्ये मध्ये झालेल्या IAAF जागतिक अंडर ट्वेन्टी अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 400 मीटर शर्यतीचं सोनं जिंकलं आणि अॅथलेटिक्सच्या जागतिक नकाशावर भारताला मानाचं स्थान मिळवून दिलं. अॅथलेटिक्सच्या जागतिक व्यासपीठावर भारताच्या झोळीत पडलेलं ते पहिलंवहिलं सुवर्णपदक होतं. त्या पदकानं भारतीय क्रीडा विश्वला एक नवी उमेद दिली. फिनलँडमध्ये हिमानं मिळवलेलं ते यश एक नांदी होती. ट्रॅक अँड फिल्डमधल्या नव्या युगाची.

पुढे जकार्ता एशियाडमध्येही हिमाची यशस्वी घोडदौड सुरूच राहिली. या स्पर्धेत तिनं दोन सुवर्णांसह तीन पदकांवर आपली मोहोर उमटवली. या कामगिरीनंतर हिमाला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

हिमा दास मूळची आसामच्या नगांव जिल्ह्यातल्या धींगची. या गावाच्या नावावरूनच हिमाला आता 'धींग एक्सप्रेस' हे टोपणनाव मिळालंय. अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातील हिमाचं स्वप्न होतं फुटबॉलर बनण्याचं. ती मुलांसोबत तासन् तास फुटबॉल खेळायची. पण नवोदय विद्यालयात शिकत असताना तिथले शिक्षक शमशुल हक यांच्या सांगण्यावरुन हिमा अॅथलेटिक्सकडे वळली. शमशुल हक यांनीच हिमाची नगांव स्पोर्टस असोसिएशनच्या गौरी शंकर रॉय यांच्याशी गाठ घालून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावरच्या पहिल्याच स्पर्धेत हिमानं दोन सुवर्णपदकं पटकावली. याचदरम्यान हिमामधलं अॅथलेटिक्सचं अफाट कौशल्य एकेदिवशी निपॉन दास यांच्या नजरेस पडलं आणि हिमाच्या आय़ुष्यानं यू टर्न घेतला.

निपॉन दास यांनी हिमामधली गुणवत्ता ओळखून तिला धींगपासून 140 किमीवर असलेल्या गुवाहाटीमध्ये आणलं. आणि तिथल्या क्रीडा अकादमीत सुरु झाला अॅथलेटिक्समधल्या भारताच्या नव्या नायिकेचा प्रवास. विशेष म्हणजे हिमाचा हा प्रवास सुरु झाला जानेवारी २०१८ मध्ये. म्हणजेच केवळ दीड वर्षांत तिनं स्वत:चं एक वेगळं विश्व निर्माण केलं आहे. निपॉन दास यांच्या मार्गदर्शनाखाली धींगमधून निघालेली ही एक्सप्रेस आज जगातल्या कोणत्याही ट्रॅकवर सुसाट धावत आहे.

हिमा दासचा हाच वेग भविष्यात ऑलिम्पिकच्या ट्रॅकवरही कायम राहावा अशी भारतीय क्रीडाचाहत्यांची अपेक्षा आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताच्या खात्यात अॅथलेटिक्समध्ये केवळ दोनच पदकं जमा आहेत. तिही 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटीश वंशाचा भारतीय असलेल्या नॉर्मन प्रिचार्डनं मिळवलेली दोन रौप्यपदकं. त्यानंतर गेल्या 119 वर्षांत भारताची ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्सच्या ट्रॅकवरची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे हिमाच्या आतापर्यंतच्या कामगिरीनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदकाची आशा जागवली आहे. हिमासमोरची यापुढची आव्हानं नक्कीच कठीण आहेत. तिची आतापर्यंतची कामगिरी ऑलिम्पिक दर्जाची नक्कीच म्हणता येणार नाही. पण त्या कामगिरीत एक विश्वास नक्कीच आहे.

खरंतर पूर्वेक़डच्या राज्यांमध्ये खेळांसाठी मुंबई, दिल्ली, बंगलोर शहरांसारख्या अत्याधुनिक सोईसुविधांचा अभाव आहे. पण तिथलं कौशल्य हे मेट्रोसिटीतल्या अॅथलीट्सपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. सुदैवानं सध्याचे क्रीडामंत्री किरेन रिजीजू हेही त्याच पूर्वेकडच्या राज्यांतून आलेले आहेत. स्वत: खेळाडू असल्यानं खेळ आणि खेळाडूंविषयीची तळमळ लक्षात घेऊन या राज्यांमधून हिमा दास, मेरी कोमसारखे आणखी खेळाडू घडावेत यासाठी ते योग्य ती दखल घेतील अशी आशा आहे.

भारतीय अॅथलेटिक्समध्ये आजवर फ्लाईंग सिख मिल्खा सिंग आणि पायोली एक्सप्रेस पीटी उषा ही दोन नावं सर्वश्रुत आहेत. या पंक्तीत भविष्यात हिमा दास हे नावं आलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्याचबरोबर तिचं कर्तृत्व, तिची गगनभरारी, प्रतिकूल परिस्थितीशी झगडून परिस्थितीशी दोन हात करण्याची तिची जिद्द आजच्या युवा वर्गाला नवी प्रेरणा देणारी आहे.

प्राऊड ऑफ यू.. हिमा दास....!!