मुख्य कथा अर्थातच विष्णूच्या दशावतारांमधल्या कूर्मावताराची गोष्ट. समुद्रमंथन करण्यासाठी मंदार पर्वत कुठंतरी स्थिर ठेवणं गरजेचं होतं आणि त्यासाठी कासवाचं रूप धारण करून विष्णूने तो आपल्या पाठीवर पेलला; अशी ती गोष्ट आहे. या कासवाच्या पाठीच्या आकाराचं मोजमाप ‘एक लाख योजने’ इतकं होतं म्हणे.
कूर्मावतारावेळी विष्णूने इंद्रद्युम्न राजाला ज्ञान, भक्ती आणि मोक्ष याविषयी उपदेश केला. तो लोमहर्षण नावाच्या सूताने शौनक ऋषींसह अजून काही ऋषींना नैमिषारण्यात ऐकवला. त्याचं लेखी स्वरूप म्हणजेच कूर्मपुराण!
कूर्मपुराणात देखील एक सृष्टीउत्पत्तीची कथा आहे. मेरू पर्वताला दोन मुली होत्या, एकीचं नाव आयति आणि दुसरीचं नाव नियति. त्यांचा विवाह विधात्याशी झाला आणि त्यांची मुलं मानववंशाचा विस्तार करू लागली. लिंगपुराणात समुद्रमंथनाच्या वेळी पृथ्वी रसातळाला जात असताना विष्णूने कासवाचं रूप धारण करून तिला वाचवलं आणि पाठीवर तोलून धरलं अशी कथा आहे. एकादशी व्रत या कूर्मावतारानंतर सुरू झालं, अशीही एक मान्यता आहे.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विष्णूने कूर्मावतार धारण केला, म्हणून हा दिवस भारतातल्या काही मंदिरांमध्ये कूर्मजयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वास्तूपूजन, भूमिपूजन केलं जातं. योगमाया बगलामुखी देवीच्या मंदिरात ही कथा अजून थोडी वेगळी छटा धारण करून येते. विष्णूने मंदारपर्वत धारण करण्यासाठीची शक्ती स्तम्भनकारिणी बगलामुखी देवीकडून घेतली, असं सांगून देवीचा महिमा गायला जातो.
दुसरं मंदिर कर्नाटकात चित्रदुर्गमधील होसदुर्ग तालुक्यात गवी रंगापुरा या लहानशा गावात आहे. गवी रंगनाथस्वामी या नावाने ते ओळखलं जातं. मूळ गुहेत असलेलं हे मंदिर आता व्यवस्थित विकसित केलेलं आधुनिक धाटणीचं दिसतं. इथंदेखील मूर्तीऐवजी कासवाच्या अवशेषांची पूजा केली जाते. तिसरं मंदिर चित्तूरला कूर्माई गावात आहे. ते ‘कूर्म वधीराजा स्वामी मंदिर’ म्हणून ओळखलं जातं. दक्षिण भारतातलं सर्वांत मोठं शिवलिंग असलेलं मंदिरही याच गावात असल्याने हे विष्णूमंदिर काहीसं दुर्लक्षित राहिलेलं आहे.
पाणी, चंद्र, पृथ्वी, काळ, अमरत्व आणि उत्पत्ती या सहाही गोष्टींशी कासवाचा काही ना काही संबंध जोडला जातो. स्थैर्य, कणखरपणा हे गुण त्याच्याकडून मिळतात असं लोकांना वाटतं. मंदिरांमध्ये कासव असतं ते त्यानं विष्णूची प्रार्थना केल्याने, अशी एक गोष्ट आहे. मुळात हा जीव सत्त्वगुणी मानला जातो. मंदिरात प्रवेश करण्याआधी कासवाचं दर्शन घेणं म्हणजे, कासव जसं स्वसंरक्षणार्थ आपले अवयव पाठीच्या ढालीखाली आत खेचून घेतं तसं माणसानं काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या सहा रिपुंना दडपून ठेवून मोकळ्या मनाने देवदर्शनाला जाणं; त्यातूनच माणूस आध्यात्मिक उन्नती साधू शकतो, असा विचार यामागे आहे. आत्मज्ञानाचं ते प्रतीकच आहे.
कासवाच्या पाठीवर हत्ती वा लोखंडी खांब यांच्याद्वारे पृथ्वी तोलून धरली गेल्याच्या कथा आहेत. इथं कासव हे स्त्रीरुपाचं आणि हत्ती वा खांब हे पुरुषरूपाचं प्रतीक आहेत, असाही अर्थ काही अभ्यासक काढतात. चीनी देवता नुवाने एओ या विराट कासवाचे पाय तोडले आणि स्वर्ग खाली कोसळू नये म्हणून या पायांचा टेकू दिला, अशीही एक कथा आहे. पृथ्वी सपाट होती, अशी कल्पना जिथं जिथं होती, तिथं कासवाच्या पाठीवरील नक्षीमुळे ते पृथ्वीचं प्रतीक मानलं जाणं स्वाभाविक होतं, असंही अभ्यासक म्हणतात.
कासवाबाबत जितक्या उत्पत्तीकथा, पुराकथा, लोककथा जगभर आढळतात; त्याहून कैक पटींनी जास्त अंधश्रद्धा या दुनियेत आहे. अगदी कासवांचा जीव जाण्याची वेळही कधी त्यामुळे उद्भवते. उदा. २१ नखं असलेल्या कासवाचा बळी दिल्याने पाऊस पडतो अशी एक अंधश्रद्धा आहे. माती, दगड इथपासून ते सोनंचांदीसारख्या धातूंपर्यंतची कासवं अनेक देशांमध्ये पूजनीय वा शुभ वस्तू म्हणून अनेक देशांमधल्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतात. पण कासवांचे खरे सोहळे पाहायचे असतील, तर फेब्रुवारी व मार्च महिन्यात रत्नागिरीमध्ये ‘समुद्री कासव महोत्सव’ साजरा केला जातो; तेव्हा अगदी पोराबाळांसह तिथं अवश्य जावं. ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांची पिल्लं अंड्यांमधून कशी बाहेर येतात आणि अशी शेकडो कासवं हळूहळू चालत समुद्रात कशी शिरतात, हे पाहणं हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असतो. अधिक वेळ असेल, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वायंगणी गावात ऑलिव्ह रिडले याच सागरी कासवांचं प्रजनन व संवर्धन केंद्र आहे; तिथं जाऊनही अधिक माहिती मिळवता येऊ शकते.
आपल्याकडे एक कूर्मपुराण आहे; मात्र जगभरच्या कासवकथा अगणित आहेत. त्यामागच्या माणसांच्या कल्पनांचा विचार करू गेलं, तर थक्क व्हायला होतं. रात्री संपतील, पण गोष्टी संपणार नाहीत... असं वाटावं इतक्या अमाप कहाण्या आहेत या सगळ्या.
(सर्व फोटो आणि चित्र: कविता महाजन)