सासुरवासाच्या अनेक कथा, खासकरून व्रतकथांमध्ये आणि लोककथांमध्ये ऐकायला मिळतात. त्या सुखान्त असतात. बिचारी सून शेवटी सासरी घरात व सासरच्यांच्या मनात स्थान मिळवते. यात एक बिचारी नसलेली आणि शेवटी अढळपद मिळवणारी एक सून उत्तर कर्नाटकातल्या कन्नड लोककथेत सापडली. ही लोककथा पावसाचीच आहे.
उत्तरा नावाची एक खमकी सून होती. कुणीही काहीही बोललं, विचारलं, सुनावलं तरी ते निमूट ऐकून न घेता सडेतोड उत्तर देणारी. म्हणून तर तिचं नाव उत्तरा होतं. हे नक्षत्र ऊर्ध्वमुख आहे. विश्वेदेव / सूर्य हा उत्तरा नक्षत्राचा स्वामी मानला जातो; ही सूर्यासारखीच तेजस्वी आणि काहीशी तापटदेखील होती. या नक्षत्राचा प्रतीकवृक्ष फणस; ही तशीच... बाहेरून काटेरी, आतून गोड. तर एकेदिवशी सासूसुनेचं भांडण झाला. सासूनं ठरवलं, आता हिला घरात राहू द्यायचं नाही. हाकलायचं. तिनं मुलाचे कान भरायला सुरुवात केली. म्हणाली, “मला अशी बोलभांड सून नको. हिला माहेरी धाड.” मुलगा म्हणाला, “ती काही एखादी वस्तू नाही की जनावर नाही. एवढा खर्च केलाय तिच्यावर. लग्न केलंय तिच्याशी. असं कसं हाकलू?” आई म्हणाली, “माझे दागिने विकून तुला कठपुतळीसारखी देखणी बायको आणून देईन.पण हिला घरातून बाहेर काढ.” तो एकेक मुद्दा मांडतो, त्याची आई एकेका दागिन्याचं नाव घेत त्याला फितवू पाहते. इतकं ऐकल्यावर त्याला हळूहळू आईचं म्हणणं खरं वाटायला लागतं. किचन पॉलिटिक्स मधला प्रोपगंडाच तो. आपल्या इतक्या सगळ्या दागिन्यांची किंमत मोजायला कुणी बाई अशी कशी उगाच तयार होईल? बायकोतच काहीतरी खोट असली पाहिजे. तो बायकोला माहेरी सोडायला निघाला. निघताना उसना आव आणून सासू उत्तराला म्हणाली, “सूनबाई, शिंक्यात भाकरी आहे, पातेल्यात भात आहे. जेवून तरी जा. तुपाळ्यात साजूक तूप भरून ठेवलंय, तेही घे. गायीचं दूध काढून तापवत ठेवलंय चुलीवर, निदान ते तरी पिऊन जा.” उत्तरा ठसक्यात म्हणाली, “तुमच्या लेकाला खाऊपिऊ घाला, तुम्हीही खा; त्यातून उरलं तर जी नव्यानवतीची येणार आहे तिच्यासाठी ठेवा.” सासूने तिला तिचे कपडेलत्ते घेऊन जायला सांगितलं, तेही तिनं घेतले नाहीत. अंगावरच्या साडीनिशी निघाली. एक मूल कडेवर, दुसरं मूल हाती धरून चालवत ती बाहेर पडली. अंगणातल्या केळी म्हणाल्या, “आम्हांला आता पाणी कोण देईल? तुझ्याशिवाय तर आम्ही सुकून जाऊ.” असंच बाकीही झाडांनी, संत्र्याच्या बागेनं, शेतानं विचारलं; त्यांना ती म्हणाली, “माझ्याहून हुशार, माझ्याहून कामसू येईल कुणी. तीच देईल पाणी आणि तीच चाखेल फळं.”
उत्तरा माहेरी आली आणि वडिलांचं दार खटखटावलं. ते म्हणाले, “माझ्या मांडीवर माझ्या दुसऱ्या बायकोचं मूल आहे. जवळ तेलानं काठोकाठ भरलेला दिवा आहे. मी उठून दार कसं उघडू?” मग ती भावाकडे गेली, मोठ्या बहिणीकडे गेली, धाकट्या बहिणीकडे गेली. एकीच्या कुशीत बबी निजली होती, दुसरीच्या कुशीत छबी निजली होती. मुलांना सोडून हिच्यासाठी उठणार कोण? अखेर ती आईच्या घरी गेली. म्हाताऱ्या आईनं धावत येऊन दार उघडलं. तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला घरात घेतलं. उत्तरानं पाहिलं तर आई नखशिखान्त भाजलेली. ती म्हणाली, “तुझ्या बापानं मला छळलं, माझ्यासारखंच नशीब तुझ्याही वाट्याला आलं. या झोपडीत राहून दयनीय जगू नकोस. या विश्वात आपलं अढळ स्थान निर्माण कर. इतकी मोठी हो की, सगळ्यांनी तुझी वाट पाहिली पाहिजे; सगळ्यांनी तुला स्वत:हून बोलावलं पाहिजे; सगळ्यांना तुझी किंमत कळायलाच हवी, इतकी महत्तम हो.” उत्तरानं आभाळात पाहिलं. काळोख अजून दाट होता. आईला नमस्कार करून ती त्या काळोखात नाहीशी झाली आणि आकाशस्थ होऊन नक्षत्र बनली. मुलांच्या पायांतल्या वाळ्यांचे घुंगरू रुणझुणत होते. मुलांसह ती अढळस्थानी पोहोचली. तो आषाढ महिना होता.
सासरी हाहा:कार माजला. गावातले सगळे मळे, सगळी शेतं नष्ट होतील; असं भय सगळ्यांच्या मनात दाटून आलं. गावकर्यांना उत्तरेची कथा समजली. सगळे तिच्या सासूला आणि नवऱ्याला दोष देऊ लागले. पण आता वेळ निघून गेली होती. सगळ्यांनी आभाळाकडे बघत तिची विनवणी केली, आपल्या मुलाबाळांचे दाखले दिले; तिच्यावर झालेल्या अन्यायाची माफी मागितली. अखेर उत्तरा द्रवली. लोकांचे हाल तिला बघवेनात. तिच्या डोळ्यांमधून वेगानं अश्रूधारा वाहू लागल्या. आकाशातून सरी बनून त्या धरतीवर उतरल्या. त्या सरींमधून उत्तरेच्या मुलांच्या पायांमधल्या वाळ्यांच्या घुंगराची रुणझुण ऐकू येत होती. महाराष्ट्रात उत्तरा नक्षत्राच्या पावसाला रब्बीचा पाऊस म्हणतात, पण त्याआधीच्या पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या पावसाला ‘सुनांचा पाऊस’ म्हणतात. त्यामागची कथाही अशीच काही असणार. पुनर्वसू नक्षत्राचा पाऊस ‘तरणा’, पुष्य नक्षत्रातला ‘म्हातारा’, आश्लेषा नक्षत्राचा ‘आसलका’, मघा नक्षत्राचा पाऊस ‘सासू’चा, त्या पाठोपाठ येणारा पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा ‘सुनां’चा, हस्त नक्षत्रातला हत्तीचा. त्या त्या वर्षी पाऊस ‘कुणाच्या घरी’ राहतो, यावरूनही अंदाज बांधले जातात. उदा. गेल्या साली तो कुंभाराच्या घरी राहणार होता, तर अन्नधान्याची नासाडी होणार असं भाकीत होतं. वाहन कोणतं यावर देखील भाकितं केली जातात. वाहन बेडूक असेल तर पाऊस चांगला पडणार, उंदीर असेल तर मध्यम, मोर असेल तर थुईथुई पाऊस खरिपाला चांगला, गाढव-घोडादेखील समाधानकारक, कोल्हा असेल तर ढग हुलकावणी देऊन लबाड वागतील, हत्ती असेल तर मुसळधार सरी कोसळणार... अशा कैक गमती ऐकायला मिळतात. उत्तरेच्या पावसाच्या कैक म्हणी आहेत. उदा. पडतील उत्तरा तर भात खाईना कुत्रा. म्हणजे भाताचं पिक इतकं अति येईल की, कुत्र्यालाही भात खाण्याचा कंटाळा येईल! पाठोपाठ येणारा हस्ताचा पाऊस ‘हस्त गडगडी किडा मुंगी रगडी’ असा असला की पिकांवरचे रोग धुवून निघतात. हे दोन्ही ‘परतीचे पाऊस.’ शेतकऱ्यांच्या फायद्याचे, गावांमधली तळी-विहिरी भरून काढणारे, चिंतामुक्त करणारे! उत्तरेला आज प्रत्येकजन मानाने बोलावतो, तिची वाट पाहतो, तिचं मन:पूर्वक स्वागत करतो.

घुमक्कडीमधील याआधीचे ब्लॉग :

घुमक्कडी (48) : मस्तवाल मेघ आणि सावुरीचा देहगंध

घुमक्कडी (47) : पाऊस आणि अश्रू

घुमक्कडी : (46) चिमूटभर मिठाच्या समुद्राएवढ्या गोष्टी!

घुमक्कडी (45) : समुद्राचं पाणी खारं का झालं?

घुमक्कडी (44) : कोळ्याच्या जाळ्यात पृथ्वी!

घुमक्कडी (43) : बिघडलेलं दुरुस्त करणारे जादूगार बैगा

घुमक्कडी (42) : कासवकथांचे अनेक अवतार

घुमक्कडी (41) : समुद्राची निर्मिती आणि सूर्यचंद्राची वाटचाल

घुमक्कडी (40) : न्युवाची भलीबुरी लेकरं

घुमक्कडी (39) : दाट काळं धुकं आणि फान्गु

घुमक्कडी (38) : धरतरी माझी मायु रं, तिच्यावं पाय कसा मी ठेवू रं

घुमक्कडी (37) : कार्तिकेयाचं मंदिर आणि चैत्रातली जत्रा

घुमक्कडी (36) : इसामई काला लगी सोना

घुमक्कडी (35) : सुपारी माझी आईबाई !

घुमक्कडी (34) : लोकल दारवा आणि चखणे!

घुमक्कडी (33) : रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सून…

घुमक्कडी (32) : सर्वांत स्वच्छ गावं…

घुमक्कडी (31) : जीवट डोकऱ्या माशाची गोष्ट!

घुमक्कडी (30) : पलाश… धगधगती अग्निफुले…

घुमक्कडी (29) : एको आणि नार्सिसस

घुमक्कडी (28) : तू-ती आणि रेशमी प्रेमाचा लोचा

घुमक्कडी (27)  भई जब लाखो उदला वायरो

घुमक्कडी (26): महुआ बीने दोहर होये जाय

घुमक्कडी (25): साकाचं बेट

घुमक्कडी (24) : कार निकोबार आणि नारळ

घुमक्कडी (23) लावण्याची देवता आणि प्रलय

घुमक्कडी (22) : त्यांना दुसरे हृदय दे, वा मला वेगळी भाषा!

घुमक्कडी (21) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो

घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू

घुमक्कडी : (19) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!

घुमक्कडी : (18) : जिवंत होणारी चित्रं

घुमक्कडी : (17) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ

घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे

घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे

घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!

घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे

घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!

घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!

घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर… 

घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी

घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये

घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण

घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना

घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!

घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी

घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना

घुमक्कडी : (2) सीतेची तहान

घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई