नुकतेच महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले. वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवणारे तसेच आपले अवघे आयुष्य खेळाला समर्पित करणाऱ्या अवलीयांना प्रतिवर्षी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सदर पुरस्कार देत असतात. कोणतेही सन्मान अथवा पुरस्कार हे त्या व्यक्तीच्या आजवरच्या कारकिर्दीची जणू पावतीच असते. कुस्ती या क्षेत्रात ज्याला हजारो वर्षांची दैदिप्यमान परंपरा आहे अश्या खेळातही उत्तरोत्तर काळात हे पुरस्कार देण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला आहे ही उत्सुकता माझ्यासह अनेकांना लागून राहिली होती. अखेर यादीत नाव पाहिले आणि मनात आनंदाची लकेर उडाली. पुण्याचे जेष्ठ कुस्ती आश्रयदाते पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा) यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या नजरेसमोर अण्णांचा उण्यापुरऱ्या 50 वर्षांचा दांडगा कालखंड नजरेसमोर झरझर सरू लागला.


पुण्याजवळच्या खराडी या छोट्याश्या गावात पंढरीनाथ पठारे अण्णांचा जन्म. शेतकरी कुटुंब आणि घराण्याला पंढरीच्या वारीची आणि तांबड्या मातीतल्या कुस्तीची मोठी परंपरा. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची. रानात दिवसभर घाम गाळावा तेव्हा कुठे संध्याकाळी चूल पेटणार अशी अवस्था. आषाढी वारीला साऱ्या पठारे घराण्याच्या वाटा पंढरीकडे वळायच्या. अगदी कोवळ्या वयात अण्णांच्या मनावर अध्यात्म आणि बलोपसनेचे संस्कार घडत होते. ऐन उमेदीच्या काळात अण्णांचे आणि लाल मातीचे नाते जडले. दिवभर रानात राबायचे आणि संध्याकाळी गावच्या तालमीत लाल मातीत रमायचे असा त्यांचा दिनक्रम. तो काळ खरतर कुस्तीने मंतरलेला होता. पंथ आणि पठडी मध्ये कुस्ती चालत होती. पुण्यामध्ये कुस्तीक्षेत्रामध्ये शिवरामवाले आणि चंदूभाईवाले वाले असे प्रतिस्पर्धी गट पूर्वापार होते, या दोन बाजूंमध्ये पुण्यातील सर्व तालमी विभागण्यात आल्या होत्या.

शिवरामवाले गटात - 

शिवरामदादा वस्ताद तालीम

१)देवळाची तालीम

२)गोकुळ वस्ताद तालीम

३)चिंचेची तालीम

४)नवीपेठ तालीम

५)सुभेदार तालीम

इ. प्रमुख तालमी.... तर

चंदूभाईवाले गटात -

१)जगोबादादा तालीम

२)आगरवाल तालीम

३) निंबाळकर तालीम

४) खालकर तालीम

५)कडबेआळी तालीम

इ. याच प्रमाणे पुणे जिल्ह्यातील तालुक्यांमधील गावे सुध्दा 3-4 पिढ्यांपासून शिवरामवाले आणि चंदूभाईवाले बाजूंमध्ये विभागली गेली असून दोन्ही बाजूंच्या मल्लांमध्ये कंत्राटी कुस्त्या होत आहेत,एकाच बाजूच्या तालमींमध्ये कंत्राटी मैदाने होत नाही. उलट आपल्या बाजूच्या मल्लाची कुस्ती ठरल्यावर त्याला सराव देण्यासाठी बाजूच्या इतर तालमीतील मल्ल त्या तालमीत जातात किंवा तो मल्ल बाजूच्या इतर तालमींमध्ये जाऊन सराव करीत असतो, या दोन्ही बाजूंचे मल्ल उच्च सरावासाठी कोल्हापूर ला वेगवेगळ्या तालमींमध्ये जात असत. शिवरामवाले प्रामुख्याने मोतीबाग तालीम,गंगावेस तालमीत तर चंदूभाईवाले मठ तालीम,काळा इमाम तालीम पुण्यात दोन्ही बांजूमध्ये 1970 सालापर्यंत डेक्कन जिमखाना तर नंतर शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे कंत्राटी मैदाने होत असत. त्यानंतर ती प्रथा बंद पडली.

अण्णा शिवरामवाले गटात मोडत असायचे. अण्णा स्वतः मोठे पैलवान होण्याचे स्वप्न पहायचे मात्र कुस्तीसाठी आवश्यक असणारा खुराक आणि पुरेशी झोप हे मिळणे दुरापास्त. खिशातला एक रुपया बैलगाडीच्या चाकाएवढा वाटायचा. अखेर अण्णानी कुस्ती मनात नसताना सोडली. मात्र, आपल्या घरात तांबड्या मातीची सेवा करणारे कोणीतरी असावे म्हणून त्यांनी धाकटे बंधू बापूसाहेब पठारे यांना पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत घातले.बापूसाहेबांची जोडसुद्धा चांगली होत होती.



दरम्यान पुण्यात झपाट्याने वाढत असणारे उद्योगधंदे, व्यापार आणि एकंदरीत सुधारत निघालेला शहरीकरणाचा दर्जा यात अनेक शेतकरी व्यवसाय उद्योगाकडे वळाले. अण्णांनी शेतीला पूरक अनेक व्यवसाय जसे दूध डेअरी आदी उद्योगास प्रारंभ केला. दिसामासाने आर्थिक स्थिती सुधारत गेली आणि कधीकाळी अतिशय बिकट असणारी परिस्थिती बदलून हातात चांगले पैसे येऊ लागले. काही काळापूर्वी तालमीत लाल मातीत अंग घुसळून थंडाईचा तांब्या तोंडाला लावून तोऱ्यात घरी येणारे अण्णा आता व्यापार उद्योगात व्यस्त झाले मात्र त्यांचे मन रमायचे ते कुस्तीमध्ये. वेळ मिळेल तसे ते गावोगावच्या आखाड्यात उपस्थित रहायचे. गरीब मात्र प्रतिभावंत मल्लाला दूध तुपासाठी पैसा द्यायचे.

कुस्तीसाठी काहीतरी करायला पाहिजे असे त्यांच्या मनात सतत यायचे. त्याचवेळी पुण्यातील गोकुळ वस्ताद तालीम मोडकळीस आली होती. मल्लांचा घामेजता घुमारा संपून किड्या मुंग्यांची वारुळे वाढायला लागली होती. कधीकाळी या तालमीत आपला घाम पडला आहे याची जाणीव त्यांना होती.मन तीळतीळ तुटायचे. त्याच दरम्यान भारताचे सुप्रसिद्ध पैलवान ज्यांनी नुकतेच उत्तरेचा बलाढ्य मल्ल महाबली सतपाल वर विजय मिळवून करवीरनगरी वर पराभवाचा आलेला कलंक पुसला असे रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार हे गोकुळ वस्ताद तालमीत येऊ इच्छित आहे अशी बातमी समजली. एवढा मोठा पैलवान आपल्याकडे येतोय हे समजताच अण्णांनी त्यांचे मोठ्या मायेने स्वागत गेले.त्याकाळी बिराजदारांना किडनी स्टोनचा प्रचंड त्रास सुरू होता. पुण्यात ऑपरेशन करून ते खडे काढले आणि मामांनी पुण्यातच राहायचा विचार केला. बिराजदार मामांच्या अगदी लहान सहान समस्यां सुद्धा पठारे अण्णा सोडवत होते. गोकुळ वस्ताद तालीम तुम्ही चालवा असे म्हणत अण्णांनी बिराजदाराना तालमीच्या चाव्या दिल्या. मोडकळीस आलेली तालीम अण्णांच्या सहकार्याने पुन्हा उभी राहिली. भिंती रंगल्या,हौदा सजला आणि हळूहळू महाराष्ट्रभरातील मल्लांचे पाय या तालमीकडे वळू लागले. मामांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नाला प्रारंभ केला.शिस्त,समर्पण,सत्य आणि सातत्य याचा वापर करत उमद्या मल्लांच्यात जग जिंकायचे धाडस ते निर्माण करू लागले. 1987 साली तानाजी बनकर यांनी गोकुळ वस्ताद तालमीला पहिली महाराष्ट्र केसरी ची गदा मिळवुन दिली. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी 1988 रावसाहेब मगर यांनी दुसरी गदा दिली ही प्रथा अगदी राहुल काळभोर,दत्ता गायकवाड ते विकी बनकरपर्यंत सुरूच राहिली. आपला शिष्य केवळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेपुरता मर्यादित राहू नये यासाठी मामांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळली जाणारी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य देत त्यावर प्रशिक्षण सुरू केले. जसे मातीत मुरब्बी मल्ल घडले तसे मॅटवर एक पैलवान हाताला लागला.काकासाहेब पवार. लातूर जिल्ह्यातील साई गावाचा हा छोटा मल्ल कुस्तीत जणू काही बिजली होता. मामांनी त्यांच्यातील गुण हेरले आणि ग्रीकोरोमन कुस्तीप्रकारात प्रशिक्षण सुरू केले.काकासाहेबांनी तब्बल 32 आंतरराष्ट्रीय पदके देशासाठी मिळवली. काकासाहेब पवार ज्यावेळी वरिष्ठ सरावासाठी जायला निघाले त्यावेळी आर्थिक अडचण आली. गोकुक वस्ताद मध्ये कोणत्याही पैलवाणास अडचण आली की पंढरीनाथ पठारे अण्णा धावत यायचे. काकासाहेब पवार याना अक्षरशः कुस्ती सुटेपर्यंत दररोज 4 लिटर दूध अण्णा घरातून पोहोच करायचे. केवळ काकाच नव्हे तर 100 च्या वर गरीब मल्लांचा खर्च मग तो दूध,तूप याच्या स्वरूपात असो किंवा रोख आर्थिक मदतीच्या स्वरूपात असो अण्णा करत रहायचे.

कुस्ती हा खर्चिक खेळ आहे. नवल हे आहे की कुस्ती खेळणारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितून आलेले असतात. कुस्ती हा असा खेळ आहे की ज्याच्या बक्षिसाची मिळणारी रक्कम केवळ खुरकासाठी आणि हॉस्पिटल मध्ये दुखापत बरी करण्यासाठी जाते. अण्णांना याची जाण होती.कधी काळी आपल्याला याच गोष्टींमुळे कुस्ती सोडावी लागली होती. देवाने आज पैसा दिलाय मात्र कुस्ती खेळायची ती वेळ निघून गेली होती.या पोरांच्या रुपात अण्णा स्वतःला पैलवान झालेलं पाहत होते. गोकुळ वस्ताद चा कोणताही पैलवान शालेय कुस्ती किंवा राज्य,राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला की पुण्यात आल्यावर देवाच्या दर्शनाअगोदर अण्णांचे दर्शन घेत असे. आपण एवढे यशस्वी झालो त्यामागे अण्णांचे योगदान मोठे आहे याची जाणीव प्रत्येकाला होती.



तकाही काळाने काका पवार हा अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला. तर त्याचाच छोटा भाऊ गोविंद पवार याने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळून रौप्यपदक प्राप्त केले. रवींद्र पाटील याने आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक तर राहुल आवारे याने ब्रांझपदक मिळविले आहे. राहुल ने त्यानंतर राष्ट्रकुल मध्ये सुवर्ण तर जागतिक स्पर्धेत कांस्य मिळवले. या चार खेळाडूंशिवाय राजेश बारगुजे, राहुल काळभोर, हुसेन वाघमोडे, युवराज वाघ, संजय मगर, अमोल काशीद, रणजित नलावडे हे त्यांचे शिष्य असलेले कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. आतापर्यंत त्यांचे पाच शिष्य महाराष्ट्र केसरी विजेते ठरले असून, सात जणांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किमान 25 खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवरील विविध पदक विजेते आहेत. 1971 ला बिराजदारांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाल्यानंतर 1998 ला एक नामवंत गुरू म्हणून त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्काराने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले. आयुष्यभर कुस्तीला वाहून घेतल्याबद्दल 2006 साली केंद्र सरकारने बिराजदारांना ध्यानचंद्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या सर्व मंडळींना खऱ्या अर्थाने उभे करणारे पंढरीनाथ पठारे मात्र आयुष्यभर शासकीय पुरस्कारापासून वंचित राहिले, किंबहुना त्यांचे कार्य पुरस्कार,सन्मान यासाठी कधीच नव्हते.गोकुळ वस्ताद तालमीत सराव करून शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे पै.हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार, गोविंद पवार, रवींद्र पाटील, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, रमेश माने, उमेश सुळ, अतुल पाटील, ज्ञानेश्वर गोचडे, राहुल आवारे, रणजीत नलवडे, संजय मगर, हे पैलवान होय.

काकांनी कुस्ती निवृत्तीनंतर स्वतःची तालीम स्थापन केली.आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे अध्यक्ष सुद्धा पै.पंढरीनाथ पठारे अण्णांना केले.काकांना तालमीच्या स्थापनेला पहिला हात दिला तो पठारे अण्णांनी. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे शरद पवार, विशाल माने,कौतुक डाफळे, उत्कर्ष काळे, विक्रम कुराडे,वसंत सरोदे इत्यादी मल्ल घडले.

एकूण 20 शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्ल घडवण्यात जेवढा त्यांच्या वस्तादांचा वाटा होता तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त पंढरीनाथ पठारे अण्णा यांचा होता.

केवळ गोकुळ वस्ताद, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल एवढ्यावर अण्णांचे कार्य सीमित होत नाही.महाराष्ट्रभरात स्थापन झालेल्या शेकडो तालमीना पहिली आर्थिक मदत अण्णा करतात. अनेक मल्लाना अडचणींच्या वेळी पहिली आठवण येते ती अण्णांची. नुकताच सांगली कोल्हापूर महापूर आला तिथे अनेक पैलवान मुलांची पडलेली घरे दुरुस्त केली ती अण्णांनी. बाणगे गावात 100 पोटी सिमेंट दिले. त्याचवेळी ते आजारी सुद्धा पडले.

पै.पंढरीनाथ पठारे आणि बिराजदार यांचा घरोबा जुना होता. मामांच्या निधनानंतर मामांचे कुटुंबीय यांना सर्वात मोठा आधार दिला तो पठारे अण्णांनी. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यांच्याविषयी सांगता येईल. अण्णांच्या उंबऱ्यावर एखादा गेला आहे आणि रिकाम्या हाताने परत आला आहे असे कधीच घडत नाही. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा वापर ते सतत पुण्यकर्म आणि त्यातल्या त्यात कुस्तीसारख्या रांगड्या खेळाच्या उत्थानासाठी करत असतात.

पै.पंढरीनाथ पठारे अण्णा यांच्या कुटुंबात अनेक नेते घडत गेले.त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब पठारे आमदार होते.त्यांच्या मुलींची मुले देखील शासकीय निमशासकीय स्तरावर अधिकारी आहेत.खराडी गावचे नंदनवन केले ते याच पठारे घराण्याने. आज IT पार्क,अत्याधुनिक सुविधा,पंचतारांकित MIDC सारख्या अनेक सुविधा अण्णांच्या निस्वार्थ कार्यामुळे खराडी येथे सुरू आहेत.

मात्र आजही त्यांचा जीव कुस्तीसाठी तळमळत असतो. महाराष्ट्र शासनाने यावर्षी जाहीर केलेले जीवन गौरव पुरस्कार हा अण्णांना देण्यात येईल. खरतर अण्णांना मिळणाऱ्या या पुरस्काराने त्या पुरस्काराची उंची वाढली असे मला वाटते. अण्णांचे कार्य कोणत्याही पुरस्कारात बसत नाही,किंवा पुरस्कारासाठी नाही. मात्र,असे पुरस्कार त्या व्यक्तीच्या कार्याची पावती असतात.अण्णांना पुरस्कार मिळण्यासाठी तब्बल 4 अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी शिफारस केली होती,ज्यांना सुद्धा अण्णांच्या कार्याची माहिती अगदी जवळून होती.

पुण्यात आज कुस्तीला जो ग्लॅमर प्राप्त झाला आहे त्यात अनेकांचा वाटा असेल,मात्र यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो केवळ पै.पंढरीनाथ पठारे यांचा.