Ganesh Chaturthi 2023:  पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कुणी साजरा केला? या प्रश्नाला कुणीही अगदी सहजपणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, असं उत्तर देईल. 1893 मध्ये गिरगावातल्या कांदेवाडीत केशवजी नाईक चाळीत लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून स्वातंत्र्यासाठी लोकचळवळीचा पाया रचला म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. तरीही खऱ्या अर्थानं पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानला जातो तो समर्थ रामदास स्वामींकडे. रायगड जिल्ह्यातील महाडजवळील शिवथरघळीत समर्थांनी हा गणेशोत्सव साजरा केला होता. आणि त्याला इतिहास संशोधक सेतूमाधवराव पगडी यांनीही दुजोरा दिल्याचं रायगड जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नमूद केलंय.


आपण कुठल्याची देवाची आरती करताना सुरुवात ‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची’ या आरतीनं करतो. ही आरती समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली आहे. तसेच समर्थांच्या श्रीमनाच्या श्लोकांची सुरुवातही ‘गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा’ या गणेश नमनानं होते.  एवढंच कशाला दासबोधामधील दशक पहिले स्तवननाम आणि समास दुसरा 'श्रीगणेशस्तवन'ची सुरुवातही ओंम नमोजि गणनायेका, सर्व सिद्धिफळदायेक, अज्ञानभ्रांतीछेदका बोधरुपा, अशीच होते. यावरून समर्थ रामदास स्वामींनी गणपतीला किती महत्त्व दिलंय, हे स्पष्ट होतं.


समर्थ रामदास स्वामींचं वास्तव्य काही काळ महाडजवळील शिवथरघळीत होतं. त्यावेळी म्हणजे 1675 किंवा 1676 साली शिवथरघळीत समर्थांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्याचं रायगड जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नमूद केलंय. आणि हाच पहिला सार्वजनिक गणेशोत्सव असल्याचा दुजोरा इतिहासकार देतात. झालं असं की, रामदास स्वामी 1652 च्या सुमारास शिवथरघळीत आले. तिथं काही काळ राहिल्यानंतर श्रीमत दासबोध ग्रंथ लिहीला. आणि या ग्रंथांची सुरुवात करण्यापूर्वी समर्थांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना शिवथरघळीत केली. या बाबतीत 16 मार्च 1675 आणि 31 मार्च 1676 रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन सनदा आहेत. हाच महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव समजावा लागेल, असं या गॅझेटियरमध्ये नमूद केलंय. आणि याच गणेशोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींची भेट झाली, असा दावा इतिहासकार ग. ह. खरे यांनी केल्याचा संदर्भ रायगड जिल्हा गॅझेटियरमध्ये आहे. 1676 च्या अखेरीस समर्थ शिवथळघळीतून सज्जनगडावर गेले.


महाडपासून 30 किलोमीटरवर त्यावेळी दाट जंगल होतं आणि बाजूला कोसळत असलेला धबधब्यामुळे समर्थ रामदास स्वामींना शिवथरघळ खूप आवडायची. याच घळीतून शिवछत्रपतींना सावध करणारं 'विजापूरचा सरदार निघाला आहे' अशा आशयाचं पत्र समर्थांनी लिहिलं होतं. विशेष म्हणजे या पत्राची सर्वांना माहिती असली तरी याच घळीत समर्थांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला, याची फारशी कुणाला माहिती नाही.