Furious Movie Review: कोलमडलेल्या व्यवस्थेतली 'अँग्री वुमन'; फ्युरीयस वेब सिरीजनं बदलला क्राईम थ्रिलरचा पॅटर्न

Furious Movie Review: बऱ्याचशा क्राईम शोमध्ये (Crime Show) काय असतं? एक चांगला पोलीस अधिकारी असतो जो गुन्हेगाराला पकडतो. पण हुलूची (Hulu) नवीन सिरीज ‘Furious - फ्युरीयस (2026) यापेक्षा पूर्णपणे वेगळीय. हा थ्रिलर शो स्त्रीवादी दृष्टिकोनातून गुन्हेगारीकडे बघतो आणि त्यातील स्त्री पात्रांच्या एकमेकींशी जोडलेल्या वेदनेवर लक्ष केंद्रित करतो. शोमधील महिला सिरियल किलरला एक वेडी किंवा अघोरीन दाखवता, तिच्या या रागामागची खरी कारणं केलीयत. जेव्हा आपली कायदा आणि न्याय व्यवस्था शक्तिशाली शोषकांचे रक्षण करते, कुणालाही राग येणं स्वाभाविकच आहे. फ्युरीयसमध्ये याचा फेमिनिस्ट दृष्टीकोन असल्यानं ते जास्त भावतं. व्यवस्था महिलांच्या बाबतीत कशी अपयशी ठरते आणि जेव्हा महिला याविरोधात उभ्या ठाकतात तेव्हा काय होऊ शकतं हे फ्युरीयस दाखवून देतं.
एलिझाबेथ मेरीवेदर या फ्युरीयस शोच्या क्रिएटर आहेत. या शोमध्ये एकूण आठ एपिसोड. आहेत. जे दोन पुरुष (ब्रायन किर्क, आणि कॉरी फिन्ले) आणि दोन महिला (कॅरिना इवान्स आणि डेस्टिनी इकारघा) दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेत.
तोकड्या कपड्यांपलिकडे जाऊन पुरुषी नजरेला छेद
जुन्या हॉलिवूड सिनेमांमध्ये महिला किलर्सना बऱ्याचदा अवाजवी ग्लॅमरस दाखवलं जातं. घट्ट लेदरचे कपडे किंवा चकचकीत ड्रेसेस दाखवले जातात. ही आत्तापर्यंत पुरुषाच्या नजरेतून तयार झालेली स्त्री क्रिमिनल आहे. 'Furious' मधली सिरियल किलर कॅथरीन अगदी सर्वसामान्य दिसते. सर्वसाधारण कपडे घालते. या पारंपारीक महिला क्रिमिनल्सला पुरुषी कल्पनेतून बाहेर काढत थेट फेमिनिस्ट पर्याय देते.
लहानपणी तिचं लैंगिक शोषण करणाऱ्याला जेव्हा ती संपवते तेव्हा ती थ्रिलर सिनेमातल्या व्हिलनसारखी अजिबात दिसत नाही. त्याऐवजी, ती साधासुधा मांजराचा मास्क आणि सैल किंवा जड असे सोयीस्कर कपडे घालते. तिचे कपडे फॅशनसाठी नसून फक्त तिच्या बदल्यासाठी सोयीचे ठरणारे आहेत. ती वेगावान हालचाल करु शकते, मास्कपलिकडे स्वतःची ओळख लपवते आणि अंधारात सहज मिसळून जाते. कॅथरीनच्या दिसण्यातून ग्लॅमर काढून घेतल्यामुळं, हा शो प्रेक्षकांना तिच्या शरीराऐवजी तिच्या कृत्यांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो. तिचा हा बदला म्हणजे परफॉर्मन्स नसून, एक थंड डोक्याने केलेले काम बनतं. फेमिनिस्ट कथानकासाठी ही कपड्यांची निवड खूप महत्त्वाची आहे, कारण यामुळे या पात्राला ती जगासमोर कशी दिसणार यावर पूर्ण नियंत्रण मिळतं.
भवतालच्या सखोल अभ्यासातून घडणारं कथानक
हॉलीवूड असो की हिंदी सिनेमा व्यवस्थेच्या समस्या मांडण्याठी प्रचंड डायलॉगबाजी केली जाते. फ्युरीयस याला छेद देते. व्यवस्थेनं नाडलेली महिला पात्रं दाखवण्यासाठी संवाद नाही तर भवताल आणि सेट डिझाऊनचा योग्य वापर केलेला आहे. यातून सत्ता कशी काम करते याची अनुभूती मिळते.
पुरुष बॉस सोबतचे बहुतांश सीन्स एफबीआयची (FBI) मोठी ऑफिसेस आणि कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्ये होतात. या खोल्या थंडगार काच, स्टील आणि उंच छतांनी बनलेल्या आहेत. कॅमेरा एँगल मुद्दामहून वाईड ठेवण्यात आलाय. ॲलिस आणि नोरा सारखी पात्रं खूप लहान आणि एकटी वाटतात. ही महाकाय, आरपार दिसणारी काचेची इमारत थंड व्यवस्थेचे प्रतीक आहेत, जी महिलांवर नजर तर ठेवते पण त्यांचं रक्षण करायला नकार देते.
दुसरीकडे, जेव्हा महिला पात्रं एकमेकींशी बोलतात, तेव्हा शोचे वातावरण पूर्णपणे बदलते. जेव्हा ॲलिस पीडित महिलांची चौकशी करते किंवा नोरासोबत केस प्लॅन करते, तेव्हा ती जागा लहान आणि खाजगी खोल्यांमध्ये बदलते. तिथे अगदी क्लोज किंवा मीड क्लोड शॉट आहेत, ज्यामुळं एक सुरक्षित आणि जिव्हाळ्याचे वातावरण तयार होत.
साध्या भाषेत सांगायचं झाल्यास मोठ्या, रिकाम्या काचेच्या खोल्या म्हणजे महिलांच्या वेदनांकडं दुर्लक्ष करणारी पुरुषप्रधान व्यवस्था. याउलट, त्या लहान, गर्दीच्या खोल्या महिलांनी स्वतःसाठी तयार केलेल्या सुरक्षित जागा. 'Furious' प्रेक्षकांना सतत आठवण करून देते की अधिकृत व्यवस्था जरी क्रूर असली, तरी महिलांची एकमेकींना असणारी साथ सुरक्षिततेची भावना निर्माण करते.
तणावाचे आवाज (Sound OF Stress)
प्रेक्षकांना फ्युरीयसमधल्या महिला पात्रांना होणाऱ्या त्रासाची जाणिव करुन देण्यासाठी साऊंड डिझाइनिंगचा अतिशय उत्तम वापर करण्यात आलाय. फक्त नाट्यमय संगातीवर अवलंबून न राहता एलिसच्या मनातलं वादळ दाखवण्यासाठी साऊंड इंजिनियरिंगचा जबरदस्त वापर करण्यात आला आहे. बहुतांश क्राईम शो मध्ये वापरलं जाणारं पार्श्वसंगीत हे अगदी टिपिकल असतं. पण फ्युरीयसमधला बॅकग्राऊंड स्कोअर पात्रांच्या इमोशनल स्थितीनुसार बदलतो. आवाजातला हा बदल चांगल्या स्टोरीटेलिंगचं साधन आहे. हे प्रेक्षकांना घाबरल्यामुळं आणि तणावामुळं होणाऱ्या शारीरिक त्रासाची जाणीव करून देतं. ॲलिसला स्वतःच्याच ऑफिसमध्ये खोटं ठरवलं जात असताना होणारा तिचा कोंडमारा आणि चीड आवाजानं प्रेक्षकाला नेमकी अनुभवायला मिळते.
महिलांच्या तीन 'फ्युरीयस' पिढ्या
'Furious' सिरीजचा मुख्य गाभा आहे महिलांच्या तीन पिढ्यांमधला गंभीर वैचारिक वाद. सिरीजमध्ये प्रत्येक महिला एका कोलमडलेल्या, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या व्यवस्थेचा सामना करण्याचा एक वेगळा मार्ग दाखवतेय.
पहिली आहे नोरा. ती सगळ्यात मोठी आहे आणि भूतकाळाचे प्रतिनिधित्व करते. नोराने एफबीआयमध्ये नियमांचे पालन करून अनेक वर्षे स्वतःला टिकवून ठेवलंय. तिने स्वतःचा राग गिळायला, स्वतःचे काम शांतपणे करायला आणि गुपचूप केसेस उभ्या करायला ती शिकले. सिस्टीममध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी पुरुषांच्या नियमांनुसार चालणे हाच एकमेव मार्ग आहे, असा तिचा विश्वास होता.
त्यानंतर येते ॲलिस. ती आजच्या काळातल्या महिलांचं प्रतिनिधित्व करते. सिस्टीममध्ये चुका आहेत याची कल्पना ॲलिसला माहीत आहे. तिचा विश्वास आहे की ती आत राहून ही व्यवस्था सुधारू शकते. प्रचंड कष्टानं ती नियमात राहून काम करत असते. या तणावामुळे ती आतून तुटत चाललेय. यंत्रणा बदलायला तयार नसल्यामुळे ॲलिस मानसिकदृष्ट्या कशी खचत चालली आहे, हे प्रेक्षक पाहू आणि अनुभवू शकतात.
शेवटी येते कॅथरीन. ती एका टोकाच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करते. कॅथरीनचा व्यवस्थेवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. कायदे फक्त शोषकांचं रक्षण करतात अशी तिची धारणा झालेय. म्हणूनच ती त्यांना पूर्णपणे नाकारते. तिचा एकदम उपाय साधा आहे तो म्हणजे ही संपूर्ण व्यवस्था आणि समाजरचनाच मुळापासून उखडून टाकायला हवीय.
ही तीन पात्रं एकत्र आल्यानं 'Furious' फक्त एक चोर-पोलिसांचा खेळ उरत नाही. हा शो वेगवेगळ्या पिढ्यांमधील महिला या व्यवस्थेच्या अन्यायाचा सामना कसा करतात, हे दाखवतो. तो प्रेक्षकांना एक कठीण प्रश्न विचारतो: जेव्हा व्यवस्थाच बिघडलेली असते, तेव्हा तुम्ही नोरासारखे नियमांचे पालन करणार, ॲलिससारखे ते सुधारण्याचा प्रयत्न करणार, की कॅथरीनसारखे सर्व काही उद्ध्वस्त करणार?
फ्युरीयसमुळं क्राईम शोचे नियम बदलले
थोडक्यात सांगायचे तर, हुलूची 'Furious' सिरीज स्त्रीवादी ओटीटी कंटेंटच्या दिशेने टाकलेले एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. हा शो एका नेहमीच्या थ्रिलरमध्ये फक्त लोणच्या सारखं महिला पात्रांना तोंडी लावण्यासाठी घेण्यापेक्षा खूप सखोल विचार देते. ही सिरीज गुन्हेगारी आणि न्यायाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकते. ती प्रेक्षकांना सिरियल किलरच्या हिंसेपलीकडे जाऊन, त्यामागे कारणीभूत असलेल्या कोलमडलेल्या व्यवस्थेकडे बघायला भाग पाडते. या सिरीजचा शेवट कोणतीही सोपी उत्तरं किंवा हैपी एंडींग देत नाही. त्याऐवजी, ती प्रेक्षकांच्या मनात एक आव्हानात्मक प्रश्न सोडून जाते. जेव्हा व्यवस्था व्यवस्था महिलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरते, तेव्हा त्यांनी खरा न्याय कसा मिळवायचा?
स्त्रीवादी कथाकथन म्हणजे टेलिव्हिजनवर गोष्टी सांगण्याची पद्धत कुठलीही तडजोड न करता पूर्णपणे बदलून टाकणे होय. हेच Furious' सिद्ध करते.
ट्रेंडिंग न्यूज























