खऱ्या अर्थाने खाद्यभ्रमंती सुरुवात होण्याचे दिवस होते. साधारण ९५ च्या सुमारासची गोष्ट आहे. कंपनीमधली मशिनिंग ड्युटी संपवून जेमतेम काहीच महिने लोटले होते. कंपनीकरता बाहेर फिरुन असतील ती कामं करायचं काम मिळालं होतं.


डेक्कन, मार्केट यार्डातल्या बँकेत जाऊन चेक भरणे, कंपनीमधल्या पगाराचे पैसे काढणे; रविवार पेठ, बोहरी आळी ते निगडी तळवडे अगदी फुरसुंगीपर्यंत जाऊनही मटेरियल्स आणण्याची कामं रोज येतील त्या सिक्वेन्सनी करायला लागायची. शाळा-कॉलेजमध्ये असेपर्यंत फक्त गावभागातले रस्ते माहिती. त्यातून आधी फक्त मशीन चालवायचे काम केलं असल्याने हे काम माझ्यासाठी नवीनच होतं. त्यामुळे एकापाठोपाठ एक दोन टोकाची कामं करताना सुरुवातीला डोकं चक्रावून जायचं. सकाळी नाश्ता करुन निघाल्यावर नंतर पोटात चार घास कधी पडतील ह्याचा नेम नसायचा.

अशाच मे महिन्याच्या एका दुपारी भोसरीत मिळालेल्या एका ‘लाईटनिंग कॉलवर’मिळालेल्या आदेशावर, मंगळवार पेठेतल्या आमच्या बाबाजान चाचांच्या ‘स्नॅको ट्रेडर्स’मध्ये एक अर्जंट मटेरियल घ्यायला पोचलो, शुक्रवार होता. वार ही लक्षात असायचं कारण म्हणजे ते दुकान दर शुक्रवारी दुपारी नमाजाकरता बंद असतं, हे त्यावेळी मात्र माहिती नव्हतं आणि मटेरियल ऑर्डर करणाऱ्यालाही हे माहिती नसल्याने मी चुकीच्या वेळी तिथे पोचलो होतो. दुपारचे दोन वाजले होते, समोर दुकान चार वाजेपर्यंत बंद असल्याची पाटी दिसत होती.

सकाळी लवकर केलेल्या नाश्त्यानंतर पोटात काहीच नसल्याने कावळे तुफान ओरडत होते आणि कानात तिथून मटेरियल घेतल्याशिवाय कंपनीत परत न येण्याची तंबी आठवत होती. गाडीत पेट्रोल फुल पण खिशात मात्र चिल्लरसकट जेमतेम पाच रुपये. अशावेळी काय खायचं हेही सूचत नव्हतं.

मग स्कूटर दुकानासमोरच लावून तोपर्यंत कधीही न गेलेल्या विरुद्ध दिशेला चालत निघालो. कडबाकुट्टी ओलांडून एका बोळात शिरतोय तोवर नाकात तडक्याचा अफाट वास घुसला. समोर चक्क एक बैठा पंजाबी धाबा दिसत होता. पुण्यातल्या मंगळवार पेठेचा पत्ता सोडला तर नजारा एखाद्या स्टेट हायवेला शोभेल असा. बाहेर डांबरी रस्त्यावर रांगेत कडबाकुट्टीवर आलेले ट्रक लागलेले, तिथेच ट्रकची टायर बदलणे वगेरे ‘मरंम्मत’ची कामं सुरु, पलीकडे क्लीनर लोक त्यांच्या उस्तादांशी बोलण्यात मग्न. धाब्याच्या बाहेरच काळ्या फळ्यावर खडूने मेन्यूकार्ड खरडलं होतं.

नुकताच औरंगाबादवरुन काम करुन परत आल्याने उर्दू पद्धतीने वाचायची सवय होतीच, त्यामुळे १ रोटी=१.५ रुपये ह्या ओळीनी लक्ष चटकन वेधून घेतलं. मेन्यूच्या खाली त्या अवस्थेत वाळवंटात हरवलेल्याला ‘ओअॅसिस’ दिसावं, तशी अक्षरे दिसत होती, “दो रोटी पे एक दाल फ्री”. ते वाचल्यावर काहीही विचार न करता पुढच्या सेकंदाला धाब्यात प्रवेश केला.

अंगात पूर्ण बाह्यांचा शर्ट आणि फॉर्मल पँट, पायात लेदर शूज असलेल्या पोरसवदा मुलाचे पाय त्या धाब्याला कधीच लागलेले नसावेत. कारण मी आत शिरल्यावर वेटर ते कोपऱ्यातल्या खाटांवर पहुडलेले ट्रकवाले ग्राहक आदी यच्चयावत मंडळी, आपापली कामं सोडून फक्त माझ्याकडे बघायला लागली. दारात शिरल्यावर उजवीकडे असलेला तंदूर आणि त्यात स्वाहा होत असलेल्या मुर्ग्यांकडे साफ दुर्लक्ष करत मी सरळ समोरच्याच एका टेबलावर बसलो.

एक वेटर घाईने हातात पाण्याचा जग आणि स्टीलचा ग्लास घेऊन समोर आला. आता मी खायला काय काय आहे विचारणार, ह्या अपेक्षेनी माझ्याकडे बघत असतानाच, ‘दो रोटी और उसके साथ फ्री दाल’ अशी ऑर्डर देऊन मी मोकळा झालो. तो आश्चर्याने माझ्याकडे बघत तंदूरकडे जाऊन मालकाशी बोलला, परत आला. म्हणला,“वो दाल एकदम फिकी और सादी होती है सहाब”. त्यावर जैसी भी है लाओ और दो”, त्या अवस्थेत ह्यापलिकडे काहीच बोलता येत नव्हतं. मी अगदी निर्धारानेच असं बोलल्यावर तो निराशेनेच परत गेला. पगडीवाल्या सरदारने तंदुरवर स्वतः रोटी भाजताना माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. त्याच्या अनुभवी नजरेनी माझ्या पोटातली भूक बहुतेक ओळखली असावी.

पाचच मिनिटात माझ्यासमोर एक रोटी आणि एका मोठ्या कटोरीमधे वरुन तडका न दिलेली खरोखरच्या फिकट रंगाची डाळ आली. अशी फिकट दाल त्याआधी मी खरंच कधी पाहिली नव्हती. वेटर बरोबर बोलला होता, ती दाल माझ्यासाठी नव्हतीच. त्यासोबत एका मळखाऊ रंगाच्या बशीमधून ३-४ हिरव्या मिरच्या, कांदा, लिंबू आणि कोथिंबीर आले. हॉटेलचा फारसा सराव नसल्याने म्हणा किंवा खिशात जेमतेमच पैसे असल्याने म्हणा,” मुझे कांदा-लिंबू एक्स्ट्रा नही चाहिये” म्हणालो. त्यावर “ये भी फ्री दिया है साहब” म्हणाला. त्याला साधं ‘थँक्यू’ म्हणण्याचंही सौजन्य न दाखवता, लिंबू दालमध्ये पिळून त्यावर कोथिंबीर ‘गार्निश’ करत रोटीचा एकेक सणसणीत घास घेत, हिरव्यागार मिरच्या दालरोटीच्या घासागणिक तोडत जेवणावर तुटून पडलो. दाल फिकट असली तरी तिची चव मात्र सॉलिड होती. त्यावेळी काही समजत नव्हतं पण चणा, उडीद डाळीचं मिश्रण असावं बहुदा. पण त्यातल्या तुपावर परतलेल्या कांदा, लसणीचा स्वाद ह्याक्षणीही आठवतोय.

दोन रोटी संपत आल्या तरी दाल जेमतेम अर्धीच शिल्लक हे बघून एका हाताने खिशातली चिल्लर चाचपत, अजून एका रोटीची ऑर्डर दिली. तीन रोट्यांना पुरुन उरलेल्या त्या डाळीचा शेवटचा घास चमच्याने खाताना पोटातली भूक शमल्याचं समाधान होतं. त्याचवेळी शेजारच्या टेबलावर नंतर येऊन बसलेल्या ड्रायव्हर, क्लीनरला मिळालेली छोट्या वाटीतली फिकी दाल दिसली. मी चमकून तंदूरमधून मसालेदार मुर्ग काढण्यात व्यग्र असलेल्या सरदारकडे पाहिलं. ह्यावेळी त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. पण त्यांनी भूक ओळखून मला नक्कीच नेहमीपेक्षा दुप्पट, तिप्पट दाल द्यायला लावली होती.

हात धुवून मालकाकडे पैसे द्यायला गेल्यावर खिशातली चिल्लर गोळा करत साडेचार रुपये जमा केले. ह्यावेळी ‘थँक्यू’ म्हणायला विसरलो नाही. पोट भरलं होतं पण ते म्हणताना घशात आवंढा आला होता.

सरदार मालकानीही समजून घेतल्यासारखं पैसे गल्ल्यात टाकत हसून म्हणाले, “बेटा,अगली बार दोस्तो को लेकर तंदूरी मुर्ग खाने आ जाना!

काही न बोलता पुन्हा कामाला बाहेर पडलो.प रत येताना खिशात शिल्लक असलेल्या चार आण्याची दोन नाणी वाजत होती आणि गाडी चालवत असताना डोळ्यात मधूनच पाणी येत होतं. कदाचित तिखट मिरच्या खाल्याचा परिणाम असावा.

एक-दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. एक दिवस मित्रांना घेऊन ठरवून तंदूर मुर्ग खायला त्याच धाब्यावर गेलो. सरदार तिथेच होते, त्यांनी मला अर्थातच ओळखलं नाही. यथेच्छ खाणं झाल्यावर वेटरला जागेवरच टीप देऊन बिल द्यायला काऊंटरवर गेलो. त्यांना माझ्याकडे फारसे पैसे नसताना खालेल्या दालरोटीची आठवण करुन दिली. ओळखल्यासारखं दाखवून नानकसाहेबांच्या तसबिरीकडे बघत म्हणाले, “कोई बात नही बेटा! याद रखनेवाले कम होते है, तुम्हे याद है, यही बहोत है!” आणि हसून पुन्हा आपल्या कामाला लागले.

मध्ये काही वर्ष त्याबाजूला माझं जाणं झालं नाही. तो नाव नसलेला ढाबा आता तिथे दिसत नाही, सरदारजींचं नावही माहिती नव्हतं. पण उमेदवारीमधल्या त्या दिवसाची आठवण आल्यावर आजही खिशात चार आण्याची दोन नाणी वाजल्याचा भास होतो, डोळे उगाचच पाणावतात. तसाही ताज्या हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा, जिभेवर किती दिवस टिकावा ह्याचा काही ठराविक नियम नाही.

अंबर कर्वे

(ढाबा आता बंद झाला असला तरी ठिकाण आणि घटना सत्य आहे. नरपतागिरी चौकाजवळ असलेल्या लडकत पेट्रोल पंपाच्या शेजारुन आत जाणाऱ्या गल्लीत, आताच्या कॉर्पोरेशनच्या दवाखान्यासमोर हा ढाबा होता.)

आधीचे ब्लॉग

फूडफिरस्ता : पुण्यातील अमृततुल्य चहा

फूडफिरस्ता : राजा आईसेस

फूडफिरस्ता - नेवरेकर हेल्थ होम

खादाडखाऊ : पुणे ते पुणे व्हाया पाबे घाट

खादाडखाऊ : पुण्यातील सर्वात बेस्ट 'ठक्कर' दाबेली