Fjord Movie Review: कायदा महत्त्वाचा की माणूस? क्रिस्टियन मुंजियूच्या फ्योर्डमधली नैतिक कोंडी

Fjord Movie Review: कायद्याच्या चौकटीत माणूसपण कसं हरवून जातं, हे आपण चैतन्य ताम्हणेच्या 'कोर्ट' (2014) या सिनेमात पाहिलंय. नॉर्वेतला फ्योर्ड -Fjord (2026) हा दिग्दर्शक क्रिस्टियन मुंजियूचा सिनेमा ही अशीच गोष्टी दाखवतो. कोर्ट भारतातल्या क्लिष्ट न्यायिक प्रक्रियेची बाजू दाखवतो. फ्योर्ड न्यायिक प्रक्रियेच्या पलिकेडे जातो. दोन देशांतल्या योग्य-अयोग्य गोष्टींचा पाठपुरावा करतो. रोमानिया आणि नॉर्वे या देशामधल्या सामाजिक चौकटीवर भाष्य करतो. नॉर्वेत पालकांनी मुलांना मारणं हा अपराध आहे. रोमानियातून आलेलं एक कुटुंब हे या किचकट सामाजिक नियमांचा बळी ठरतं. अगदी पाच महिन्याच्या बाळापासून ते 14-15 वर्षांची जाणती मुलं आई-वडिलांपासून वेगळी केली जातात.
आई-वडिलांविरोधात खटला चालला जातो. कॅथलिक रोमानियन कुटुंबाच्या दृष्टीनं मुलांना शिस्त लावण्याचा प्रकार असतो. पण नॉर्वेच्या कायद्याच्या कचाट्यात हे ज्या पद्धतीनं अडकतं. याची मांडणी दिग्दर्शक क्रिस्टियन मुंजियूनं भारी केलीय. दोन्ही बाजूंनी दोन टोकांचे विचार आहेत. एकिकडे पालकांचा धार्मिक, पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरीकडे आधुनिक सरकारची अत्यंत कडक, नियम पाळणारी सिस्टीम अश्या कोंडीत सापडलेला हा सिनेमा प्रेक्षकांना या कुटुंबाच्या गोष्टीत अडकवून ठेवतो.
नॉर्वेत फ्योर्ड या शब्दाचा अर्थ होतो, दोन्ही बाजूनं उंच डोंगरांच्यामधून वाहणारा समुद्राचा लांब, अरुंद आणि खोल भाग. हिमनद्या वितळल्यावर होणारी ही नैसर्गिक रचना आहे. सिनेमातली ही पात्रं ही अश्या नैतिक-अनैंतिकतेच्या दोन उंच टोकाच्या पर्वतरांगामध्ये अडकलेली आहेत. यात पाच लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब एखाद्या अरुंद पाण्याच्या प्रवाहासारखे गुदमरुन जातायत. दोन्ही बाजू स्वतःला योग्य वाटतात, पण या चक्रव्यूहात त्या माणसांची कशी फरफड होते, हे सिनेमा अचूक दाखवतो.
फ्योर्ड सिनेमा एका सत्य घटनेवर आधारीत आहे. नॉर्वेतली 2015 ची 'बोडनारियू केस' (Bodnariu Case) अशीच आहे. मुलांना शिस्त लावण्यासाठी हे पालक मुलांना किरकोळ मारहाण करायचे. ते नॉर्वेच्या कायद्यात गुन्हा आहे.
त्या रोमानियन-नॉर्वेजियन जोडप्याकडून नॉर्वेतल्या बालकल्याण विभागाने (Barnevernet) त्यांची पाचही मुलं फक्त या कारणावरून हिरावून घेतली होती. यावरून जागतिक पातळीवर मोठं आंदोलन उभं राहिलं होतं. दिग्दर्शक क्रिस्टियन मुंजियूनं संवेदनशील विषयाला पडद्यावर वाट मोकळी करुन दिलीय.
हा सिनेमा आजच्या काळात का महत्त्वाचा आहे? तो आपल्याला कोणतीही एक बाजू घेऊन सोपं उत्तर देत नाही. तो प्रेक्षकाला विचार करायला लावतो. दोन्ही बाजूचे विचार ऐकताना प्रेक्षकही गोंधळून जातो. म्हणूनच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला 'पाम डी'ओर' सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. या सिनेमाकडे फक्त एक गोष्ट म्हणून पाहता येणं शक्य नाही. तो आधुनिक समाजाचा आरसा आहे.
खऱ्या खऱ्या आयुष्यात 'बोडनारियू’ कुटूंबानं नॉर्वे सरकारविरोधात European Court of Human Rights (ECHR) मध्ये धाव घेतली होती. जवळपास 2016 ते 2020 अशी ही केस चालली. पण बोडनारियू कुटुबाच्या हाती काहीच लागलं नाही. शेवटी त्यांनी नाद सोडला. आहे हे कुटुंब रोमानियात आपलं आयुष्य चांगलं जगतंय. ते पन्हा कधीच नॉर्वेला गेलं नाही. मुलं आता मोठी झालीयत. सर्व गोष्ट विसरली आहेत. पण त्यांच्या पालकांसाठी नॉर्वेतल्या खटल्याचं ते दिवस अजूनही एका भयंकर स्वप्नासारखे आहेत.
क्रिस्टियन मुंजियूचा 4 Months, 3 Weeks, 2 Days (2007) हा सिनेमा रोमानियातल्या अबॉर्शन या विषयावर होता. त्याला ही कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'पाम डी'ओर' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला.
ट्रेंडिंग न्यूज























