ट्विटर (Twitter) ही मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेतल्याने एलॉन मस्क (Elon Musk) हे अमेरिकन नागरिक (जे जन्माने अफ्रिकन आहेत) सध्या फार चर्चेत आले आहेत. वाचकांना हा प्रश्न पडला असेल की, एलॉन मस्क यांचा आणि  या लेखाचा काय संबंध? मुळात अमेरिकन नागरिक कशा पद्धतीने विचार करतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून यांच्याकडे पाहता येईल. आणि असा स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य देणारी शिक्षणपद्धती यांनी विकसित केलेली आहे हे आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावे लागेल. प्राथमिक स्तरावर या मुलांना व्यावहारिक जीवनात पाळावयाची शिस्त याचेच जास्त शिक्षण दिले जाते, म्हणजे रांगेत कसे चालावे? शब्दांचे उच्चार कसे करावेत? याचाच सराव शाळेत करुन घेतला जातो. एक स्वतंत्र ओळख असणारा नागरिक ज्याला जबाबदारीचे भान असेल अशा नागरिकांची जडणघडण इथल्या शाळांमधून होत आहे. 


इथल्या शाळांच्या इमारती आणि भौतिक सुविधांबाबत बोलायचे झाले तर सर्वच शाळा या भौतिक सुविधांनी सुसज्ज असतात. जुन्या इमारती, पावसाळ्यात छतावरून टपकणारे पाणी असे काही इथे दिसून येत नाही. शाळांना  भौतिक सुविधा वाढवणे किंवा नवीन फर्निचर घेणे याकरिता दरवर्षी भरघोस निधी मिळतो. प्रत्येक वर्गात AC/हिटर असतो. वर्गखोलीतील वस्तू जाणून घ्यायच्या झाल्या तर वर्गात सोफा, बेड, टेबल,खुर्च्या, TV,प्रत्येक मुलाला लॅपटॉप, मुलांचे लेखन साहित्य, पुस्तके, सर्वांसाठी वह्या, रंगखडू, चित्रकलेचे साहित्य अशी भलीमोठी यादी तयार होईल. एकंदरीत काय तर एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसच्या दर्जाच्या वर्गखोल्या इथे आहेत. आणि सर्वच वर्गखोल्या खूप प्रशस्त असतात. 


साधारणपणे 800-950 चौरस फूट एवढ्या क्षेत्रफळाची एक वर्गखोली असते. म्हणजे विचार करा, इकडे एका गुंठ्यात एक वर्गखोली बांधलेली असते. अर्थात एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाची वर्गखोली असण्यामागे विचार असा आहे, की सर्वच मुलांना सहजरित्या वावरता यावे, सामुहिक कृती करताना अडचण होवू नये आणि आपात्कालिन परिस्थितीत देखील सर्वांना लवकर बाहेर पडता येईल या दृष्टीने यांनी एवढ्या मोठ्या आकाराच्या वर्गखोल्या बनवल्या आहेत. इथल्या शाळांमध्ये वारंवार होणारे हल्ले विचारातं घेवून आता वर्गखोल्यांच्या खिडक्या बुलेटप्रुफ बनवल्या जात आहेत, जेणेकरुन बाहेरुन जरी कोणी हल्ला केला तरी मुले मात्र सुरक्षित असतील. प्रत्येक शाळेचा एक विशिष्ट असा मस्कॉट असतो आणि एक झेंडा देखील. हा मस्कॉट आणि झेंडा ही त्या शाळेची ओळख असते. मी ज्या शाळेत जात होतो, त्या शाळेने जंगली मांजराची (WildCat) मस्कॉट म्हणून निवड केली होती. इथल्या शाळेत मुलांना किंवा शिक्षकांना विशिष्ट असा ड्रेसकोड नसतो. प्रत्येकजण आपल्या आवडीचे कपडे घालू शकतो, त्यावर शाळा बंधन आणत नाही.  इथल्या प्राथमिक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके वापरली जात नाहीत. डिस्ट्रिक्ट सुपरीटेंडेंटच्या ऑफिसकडून शाळांना वेगवेगळे रिसोर्सेस उपलब्ध करुन दिले जातात आणि यामधून आपल्या आवडीचे रिसोर्सेस वापरुन शिक्षक शिकवत असतात. 


मागच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे इकडे सध्या शिक्षकांची खूप कमतरता आहे. सर्टीफाईड शिक्षक मोठ्या प्रमाणात शाळा सोडून जात आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे, कामाचा ताण आणि त्याबदल्यात मिळणारे अल्प वेतन. आपल्याला मिळणारे वेतन अपुरे आहे अशी इथल्या शिक्षकांची भावना आहे. भारतीय चलनात सांगायचे झाले तर नुकत्याच रुजू झालेल्या शिक्षकाला इथे वार्षिक सरासरी 40 लाख इतके वेतन मिळते. मात्र पदवी धारण केलेल्या अमेरिकन नागरिकांना साधारणपणे 70 लाख इतके वेतन मिळते. वेतनातील ही तफावत दूर करण्यासाठी इथले सरकार प्रयत्नशील आहे. पुढील 3 वर्षात 20 टक्के वेतनवाढ दिली जाईल असे सरकारने घोषित केले असले तरीदेखील सध्या 30 टक्के पदे रिक्त आहेत. मास्टर ऑफ एज्युकेशन ही पदवी घेवून शिक्षक पदासाठी पात्र होतो येथे. आणि या पदवीनंतर नॅशनल शिक्षक होण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते आणि मग लायसन्स किंवा सर्टिफिकेट मिळते. असे शिक्षक मुलाखतीनंतर काम करण्यास सुरुवात करतात. निवड झालेले शिक्षक त्यांच्या वेतनासाठी बोलणी करतात आणि अधिकाऱ्यांनी देवू केलेले वेतन आणि भत्ते समाधान कारक असतील तर मग काम सुरु करतात. शिक्षकांनी नोकरी सोडून जावू नये म्हणून अनेक राज्य सरकारे सध्या बोनस देखील देवू करत आहेत. पण हा बॅकलॉग भरुन निघणे अवघड दिसते. शिक्षकांच्या कामाचे दरवर्षी मूल्यमापन केले जाते आणि त्याच्याआधारे त्यांना वेतनवाढ दिली जाते. पण एक मुद्दा इथे लक्षात घ्यायला हवा, तो म्हणजे ज्या शिक्षकांचे काम समाधानकारक नसते त्याना केवल बेसिक वेतन मिळते, त्याला वेतनवाढ दिली जात नाही किंवा नोकरीतून काढून टाकले जात नाही. कोणताही अधिकारी कुठल्याही शाळेत अथवा वर्गात पूर्वसूचना दिल्याशिवाय जात नाही, तसा शिष्टाचार इथे पाळला जातो. शाळेला अचानक भेटी देणे, मुलांची गुणवत्ता तपासणी करणे असे अधिकार ना प्राचार्यांना आहेत ना कोणत्याही अधिकाऱ्याला. 


शाळांच्या कामात मदत व्हावी म्हणून इथे देखील शाळा व्यवस्थापन समिती आहे. मात्र या समितीचा हेतू हा शाळेला आर्थिक मदत करणे, शाळेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम आयोजित करणे हा आहे. या समितीचा किमान एक सदस्य रोज शाळेत हजर असतो. आणि शाळेच्या दैनंदिन कामात सहकार्य करत असतो. या कामासाठी त्याला  कोणतेही वेतन मिळत नाही, मात्र या सामाजिक कामाचा फायदा त्याला  इतर ठिकाणी होतो.  मी ज्या शाळेत होतो त्या शाळेच्या समितीने एका महिन्यात तब्बल 9 लाखांचा निधी जमा केला होता. या निधीचा विनियोग करण्याचे अधिकार मात्र शाळेच्या प्राचार्याना असतात. समितीच्या सदस्यांना याबाबत कोणताही अधिकार नसतो. 


प्रत्येक वर्गात एक वर्गशिक्षक आणि एक सहायक शिक्षक काम करत असतात. यशिवाय प्रत्येक शाळेत किमान दोन समुपदेशकांची नेमणूक केली जाते. वर्गशिक्षक आणि सहायक शिक्षक एकत्र बसून दैनंदिन नियोजन करत असतात. वर्गशिक्षकाचे मुख्य काम शिकवणे तर सहायक शिक्षक वर्गव्यवस्थापनाचे काम पाहतो. रोज शाळा संपल्यावर हे दोघे एकत्र बसून उद्या लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करतात. यांचे नियोजन इतके सुक्ष्म असते की कोणत्या खुर्चीवर कोणत्या मुलाने बसावे , किती वेळ बसावे याचेही नियोजन  हे करतात. विशेष गरजा असणाऱ्या मुलांनी सर्वसाधारण मुलांसोबतच शिकावे यावर इथे भर दिला जातो. या मुलांना शिकवण्यासाठी वेगळे शिक्षक नेमलेले असतात. बहुभाषिक मुलांची वाढती संख्या लक्षात घेवून  सध्या स्पॅनिश, हिंदी भाषा शिकवणारे शिक्षक नेमले जात आहेत. 


तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हे इथल्या शिक्षकांकडून शिकून घेण्यासारखे आहे. याकरिता लागणारी सर्व सॉफ्टवेअर्स डिस्ट्रिक्ट ऑफिसकडून पुरवली जातात. शाळांमधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच चालते. आपण ज्या  एज्युकेशन डिस्ट्रिक्ट ऑफिसच्या कार्यक्षेत्रात रहातो, त्याच कार्यक्षेत्रातील शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. इथे सर्वच शाळांमधून समान दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने विशिष्ट शाळेतच प्रवेशाची गर्दी झाली किंवा प्रवेश मिळाला नाही असे घडत नाही. सर्व शाळा या सकाळच्या सत्रातच भरतात. मुलांची हजेरी देखील एका सॉफ्टवेअरद्वारे नोंदवली जाते.   


(ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे सध्या फुलब्राईट फेलोशिपसाठी अमेरिकेत आहेत.)


रणजितसिंह डिसले यांचे इतर ब्लॉग :


BLOG : अशी आहे अमेरिकेतील प्राथमिक शिक्षण व्यवस्था