होळी अजून काही दिवस लांब आहे. पण कालच सगळं वाराणसी शहर फुलांची होळी खेळल्यासारखं दिसत होतं. ज्या बनारस हिंदू विद्यापीठापासून पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरु झाला आणि ज्या आंबेडकर पार्क मधून अखिलेश-राहुल चा रोड शो सुरु झाला या दोन्ही ठिकाणी सगळ्या रस्त्यांवर फुलांचा खच पडलेला. रात्री दहा वाजेपर्यंत वाराणसीच्या गल्ली-गल्लीत कार्यकर्त्यांच्या रांगा लागलेल्या. एरव्ही बम बम भोले च्या गजरानं निनादणारी काशी राजकीय घोषणाबाजीनं दुमदुमतेय. कुणाचा रोड शो चांगला झाला, वाराणसीत भाजपला अंतर्गत नाराजीचा फटका बसणार का, मोदींनी वाराणसीला 24 तास वीज मिळत नसल्याचा आरोप केलाय त्याबद्दलची गरगागरम चर्चा नाक्या नाक्यावर सुरु आहे.


देशाचे पंतप्रधान सध्या मुक्काम पोस्ट वाराणसी आहेत. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल तीन दिवस ते वाराणसीत प्रचार करतायत. सलग दोन दिवस रोड शो, प्रचारसभा, शिवाय रात्रीचा मुक्कामही वाराणसीतच. बाहेरच्यांना पटकन लक्षात येणार नाही, पण वाराणसीतल्या नागरिकांना भाजपला हे का करावं लागतंय याची कल्पना आहे. कारण इथे भाजपच्या अंतर्गत नाराजीची, धुसफुशीची चर्चा निवडणुक सुरु झाल्यापासून सुरु आहे. श्यामदेवर राय चौधरी उर्फ दादा यांना तिकीट नाकारणं ही भाजपची मोठी चूक असल्याचं इथले पत्रकार सांगतात. त्यांना मनवण्यासाठी भाजप श्रेष्ठींचे निकराचे प्रयत्न सुरु आहेत. कालचाच प्रसंग...मोदी काशी विश्वनाथाच्या दरबारात दर्शन घेण्यासाठी येणार होते. चहूबाजूंनी एसपीजी सुरक्षेचा वेढा होता. माजी आमदार श्यामदेव राय चौधरी हे मंदिराच्या गर्भगृहात जायचा प्रयत्न करत होते. पण एसपीजी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवलं. व्हीआयपी सिक्युरिटीचं जोखमीचं काम एसपीजीवर असल्यानं ते अशा आमदार-खासदारांनाही कधी जुमानत नसतात. श्यामदेवर राय यांनी आपली ओळख सांगायचा प्रयत्न केला, पण तुमचं नाव विशिष्ठ श्रेणीच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही असं सांगून त्यांना बाजूलाच थांबवलं. थोड्या वेळानं पंतप्रधान या ठिकाणी पोहचले. त्यांनी दादांना बघितल्यावर अगदी प्रेमानं अभिवादन केलं. त्यांचा हात हातात पकडून त्यांना आपल्यासोबत मंदिराच्या दिशेनं नेलं. हे दृश्य पाहिल्यावर समर्थकांनी जोरजोरात हर हर महादेवचा नारा सुरु केला. याआधी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनीही श्यामदेव राय चौधरींची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मोदींची कालची कृती ही त्याचाच भाग असल्याची चर्चा वाराणसीत रंगलीय. या घटनेबद्दल काल भाजपच्या कार्यकर्त्यांशी बोललो, तेव्हा त्यांची भावना होती की गेल्या पंधरा दिवसापासून भाजपचे सगळे पदाधिकारी जे करु शकले नाहीत, ते मोदींच्या एका कृतीनं करुन दाखवल्याचं आम्हाला वाटतंय. वाराणसीत एकूण 8 पैकी पाच विधानसभेच्या जागा या मोदींच्या लोकसभा मतदारसंघात येतात. या पाच जागा एका बाजूला आणि यूपीच्या उरलेल्या 398 जागा दुसऱ्या बाजूला इतकं या जागांचं महत्व भाजपसाठी आहे. कारण प्रश्न पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आहे. तिकीटवाटपात झालेली चूक आता अमित शहांच्याही लक्षात आलीय. त्यामुळेच ती कसर भरुन काढण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सुरु आहेत. कालच्या रोड शोनं किती परिणाम झालाय याचं उत्तर 11 तारखेला कळेलच.



मोदींचा कालचा रोड शो हा तीन वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या करणारा होता. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वाराणसीमध्ये अशाच रोड शोनं मोदी लाटेला शिगेवर पोहचवण्याचं काम केलेलं होतं. कालच्या रोड शो मध्ये विशेष चर्चेत राहिलेली आणखी एक गोष्ट. मदनपुरासारख्या काशीच्या मुस्लिम बहुल भागातही मोदींचं जोरदार स्वागत झालं. या ठिकाणी काही मुस्लिम नागरिकांनी मोदींवर फुलं उधळली. त्यांनी दिलेल्या भेटवस्तू मोदींनी अगदी बोट दाखवून सुरक्षारक्षकांना घ्यायल्या लावल्या. एक चादर तर अगदी भक्तीभावानं डोक्याला लावून जीपमध्ये ठेवून दिली. 2014 च्या आधी मुस्लिम टोपी घालायला नकार देणारे मोदी या पार्श्वभूमीवर आठवणं साहजिक आहे. कदाचित नेता ते पंतप्रधान बनण्याच्या प्रवासात झालेला हा बदल असावा.

मोदींच्या रॅलीपाठोपाठ काल राहुल-अखिलेश-डिंपल यांचीही रॅली वाराणसीत होती. वाराणसीतल्या आंबेडकर पार्कपासून या रॅलीला सुरुवात झाली. एरव्ही अखिलेश यादव इतक्या उघडपणे कुठल्या मंदिरात जाऊन दर्शन करताना दिसत नाहीत. मात्र काल मोदींपाठोपाठ त्यांनीही पत्नी डिंपलसोबत काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा केली. आता भोलेनाथाचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे. भाजपला त्यांचा पराभव दिसू लागल्यामुळेच त्यांनी पंतप्रधानांना तीन दिवस वाराणसीत आणलंय असा आरोप रॅलीत अखिलेशनं केला. शक्तीप्रदर्शनात आपणही कुठे कमी पडू नये याची काळजी सपा-काँग्रेस या दोन्ही पक्षांनी घेतल्याचं दिसत होतं. पण 8 किलोमीटर लांबीचा हा रोड शो पुढे जात असताना मध्येच काही काळासाठी वीज गायब झाली. याच वीजेवरुन सध्या यूपीचं राजकारण तापलंय. वाराणसीत 24 तास वीज मिळत नाही असा सारखा आरोप मोदी करतायत. त्यावर अखिलेशनं त्यांना खाओ गंगा मय्या की कसम असं आवाहन केलेलं होतं. रोड शोमध्येच वीज गायब झाल्याचं कळल्यावर भाजप कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. संध्याकाळीच टाऊन हॉलच्या सभेत मोदींना हिशोब चुकता करायची संधी मिळाली. खोटं बोलणा-यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली असा टोला मोदींनी लगावला.



वाराणसीतला हा राजकीय माहौल पुढचे दोन दिवस अजून तापतच जाणार आहे. आजही परत मोदी रोड शो करणार आहेतच. गंगेचा काठ सध्या कुरुक्षेत्राचं मैदान बनलाय. वाराणसीतल्या या राजकीय लढाईचे रंग लवकरच सविस्तर लिहीनच. पण जाता जाता फक्त रात्री हॉटेलवरचा किस्सा...

कालभैरवाचं दर्शन घेऊन आम्ही हॉटेलच्या दिशेनं परतत होतो. रॅलीची गर्दी अजूनही न ओसरल्यानं कुठे रिक्षा मिळत नव्हती. शेवटी सायकल रिक्षा कशीबशी मिळाली. रिक्षातून उतरल्यावर रिक्षावाल्याला सहज विचारलं...भैय्या अबकी बार किसको व्होट करनेवाले हो...त्यावर तो पहिल्यांदा उत्तर द्यायच्या स्थितीत नव्हता. पुन्हा विचारल्यावर डोक्याला लावलेल्या टॉवेलनं घाम पुसत त्यानं म्हटलं...दे देंगे मोदी जी को ही..क्यूं अखिलेशनं काम अच्छा नहीं किया क्या....असं विचारल्यावर त्यानं नहीं..हमें तो ऐसा नहीं लगता..मोदीजी अच्छा कर रहें हैं...नोटबंदीचा काही तोटा नाही झाला का..यावर हमारे धंदे में तो नहीं हुआ हैं जी..अच्छा असं म्हणून आम्ही निरोप घेणारच होतो, त्यावर त्यानं अचानक सांगितलं...लेकिन एक चीज हम आपको बताते हैं साहबजी, मोदी तो यहां पर हार रहा हैं..वाराणसी में बीजेपी में बहुत अंदरुनी किचड मचा हैं..हम बोल रहे हैं आपको..11 तारीख को याद कर लोगे हमें...



या रिक्षावाल्याची ही एक्सपर्ट कमेंट खरंतर विचार करायला लावणारी आहे. जो भाजपचाच मतदार आहे, मोदींवर प्रेम करतो त्यालाही वाराणसीत भाजप जिंकेल असं वाटत नसेल तर परिस्थिती बिकट आहे. 15 केंद्रीय मंत्र्यांची फौज वाराणसीत का तळ ठोकून असेल याचंही उत्तर यात दडलेलं आहे. भाजपनं पहिल्या पाच टप्प्यांतच बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा नेते करतायत. वाराणसीची लढाई केवळ बोनससाठी आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. पण केवळ यूपी जिंकून चालणार नाही. तर पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघात काय होतं, याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. म्हणूनच हा आटापिटा सुरु आहे. वाराणसी हे भाजपसाठी यूपीच्या लढाईचं नाक बनलंय. ते कुठल्याही परिस्थितीत कापलं जाऊ नये यासाठी सगळे दक्ष आहेत.रिक्षावाल्यानं सांगितलेली परिस्थिती खरीच असेल तर शेवटच्या दोन दिवसांत भाजप किती जोर लावतं यावर सगळं काही अवलंबून असेल. उत्सुकता शिगेला पोहचलीय..