Election 2022 Result : 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षा थोडी चांगली झाली होती. 2014 मध्ये काँग्रेसला 44 जागांवर विजय मिळाला होता तर 2019 मध्ये काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळवता आला होता. 2017 मध्ये राहुल गांधी कांग्रेसच्या अध्यक्षपदी बसले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेसने लढवल्या होत्या. मात्र पराभव झाल्याने नाराज राहुल गांधी यांनी चार पानी पत्र लिहून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांना पुन्हा अध्यक्षपदी बसवण्याचे प्रयत्न सुरु झाले पण त्यांनी ठाम नकार दिला आणि अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा सोनिया गांधी यांच्याकडेच हंगामी स्वरूपात सोपवण्यात आली. संपूर्ण गांधी कुटुंबात सगळ्यात जास्त काळ म्हणजेच जवळ जवळ 21 वर्षे काँग्रेस अध्यक्षपद भूषवण्याचा मान सोनिया गांधींकडेच जातोय. राजीव गांधी यांच्या निधनानंतर म्हणजे 1998 नंतर त्या 2017 पर्यंत काँग्रेस अध्यक्षा होत्या. त्यानंतर राहुल गांधी दोन वर्षांसाठी आणि आता पुन्हा सोनिया गांधी हंगामी अध्यक्षपदावर आहेत.
2019 मध्ये लोकसभा निव़डणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदी गांधी कुटुंबीयांव्यतिरिक्त कोणाची तरी नेमणूक करावी. त्यासाठी निवडणुक घ्यावी असा सूर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काढला होता. गेल्या वर्षी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतही काही नेत्यांनी अध्यक्षपदी नवीन चेहरा आणावा असे सोनिया गांधींना म्हटल्याचे सांगितले जाते. मात्र काँग्रेस नेतृत्वाने हा सल्ला धुडकावला होता. काँग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नवीन अध्यक्ष आणि संघटनात्मक निवडणुका घ्या असे सांगितले. सीडब्ल्यूसीने ते मान्य केले पण लगेचच तो निर्णय फिरवण्यात आला. गेल्या वर्षी पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमधील निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. राहुल गांधी किंवा सोनिया गांधी पक्षाला विजय मिळवून देऊ शकत नाही, अशी भावना ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही झाली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांची जबाबदारी प्रियांका गांधींवर सोपवण्यात आली होती.
काँग्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी यावेळी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला. काँग्रेसने सर्व जागांवर उमेदवार दिल्याने प्रियांका गांधी यांनी व्हर्च्युअल रॅलीसह 42 रोड शो, 167 रॅली, सभा आणि नाका सभा घेतल्या. एवढेच नव्हे तर घरोघरी जाऊनही प्रचार केला. राहुल गांधी यांनी विशेष सभा घेतल्या नाहीत.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले असून उद्या म्हणजे 10 मार्च रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. सात मार्चला झालेल्या सातव्या टप्प्याच्या मतदानानंतर नेहमीप्रमाणेच विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर करण्यात आले. या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस गोव्यात बऱ्यापैकी कामगिरी करणार असून उत्तराखंडमध्ये भाजपला टक्कर देणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट दिसत असून पंजाबही हातातून जाणार असल्याचे एक्झिट पोलमधून समोर आले आहे. एक्झिट पोलवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न काही राजकीय नेते उपस्थित करीत आहेत. पण ते केवळ मानसिक समाधानासाठी असावे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
या एक्झिट पोलनंतर काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्व बदलाचे वारे वाहू शकते असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात याबाबत काही बैठकाही झाल्याचे सांगण्यात येते. सोनिया गांधी आता अध्यक्षपद सांभाळण्यास तयार नसल्याने ते पुन्हा राहुल गांधींकडेच सोपवण्याचा विचार काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांचे म्हणणे असल्याचेही सांगितले जात आहे.
मात्र दुसरीकडे काँग्रेसचे नाराज नेते मात्र निवडणुका घ्याव्याच असा दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. ती आणखी किती गाळात जाणार याची कल्पनाच दुःखद आहे. आम्ही कोणीही थेट वरून आलो नाही वा दारे खिडक्यातून आलो नाही. आम्ही विद्यार्थी आंदोलनामधून पुढे आलो आहोत असे या जी- 23 नेत्यांपैकी एका नेत्याने जम्मू येथे जाहीर भाषणात म्हटले होते. आता हेच नेते पुन्हा एकदा आक्रमक होणार असून सगळ्यांचे लक्ष 10 मार्चकडे लागलेले आहे. त्यामुळेच दहा मार्चनंतर काँग्रेसमध्ये बदल होणार हे निश्चित मानले जात आहे. फक्त अध्यक्षपद राहुल गांधींकडे जाते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.