Blog : शिंदे-फडणवीस सरकार अ-संविधानिक आहे. ट्रिपल इंजिन सरकार बेकायदेशीर आहे. अशी तोफ डागत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. सत्ताधारी पक्षांकडून खरच संविधानाची आब राखली जात आहे का?, खरोखर संविधान रक्षण केले जात आहे का? हे प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या मनात सध्या खदखदत आहेत. घटनेने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून सत्ता मिळवायची आणि सत्तेचा वापर घटना विरोधी कारस्थाने करण्यासाठी करायचा हे विरोधाभासी वागणं महाराष्ट्रीयन जनता आता चांगलं ओळखून आहे.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चैत्यभूमीवर महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नतमस्तक झाले. पण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना यावेळी काय वाटले असेल ? या तिघांना एकत्र बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दुसरे संविधान लिहायला सुरुवात तर केली नसेल ना?


जे देशवासीय संविधान रक्षण करतात , संविधानाचा आदर करतात ते डॉ. बाबासाहेबांचा पण आदर करतात. पण जे देशवासीय संविधानाला मानत नाहीत, किंबहुना संविधानाच्या मूल्यांची जपणूक न करता त्याची पायमल्ली करतात , त्याचा आदर करत नाहीत अशी मंडळी चैत्यभूमीवर जाऊच शकत नाहीत. काही राजकीय नेत्यांना मतांच्या बेगमीसाठी चैत्यभूमीवर जाऊन फोटो सेशन करावे लागते, अशा संविधान विरोधक मंडळींना पाहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय विचार करत असतील?


"माझ्या समोर खरंच नतमस्तक व्हायला आलात कि फक्त छायाचित्र काढण्यासाठी एकत्र आलात "? असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नक्कीच केला असेल. घटना पायदळी तुडवणारे सत्ताधारी पुढारी चैत्यभूमीवर येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर नतमस्तक होण्याचे ढोंग करतानाचे चित्र लाजिरवाणे आणि चीड आणणारे आहे.
सत्ताधारी नेत्यांनी दिक्षा भूमीवर नतमस्तक होण्याअगोदर भारतीय राज्य घटनेचा अगोदर आदर करायला शिकावं! "ट्रिपल इंजिनला एकत्रित बघून , या तिघांना सु्बुद्धी मिळो " हिच अपेक्षा. 


माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांना चैत्यभूमीवर अभिवादन करायला आलेल्या या ट्रिपल इंजिन सरकारच्या फोटो बाबत मिश्किल असा प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तर शिरूरचे राष्ट्रवादीचे आमदार अॅड. अशोक बापू पवार यांनी या बाबत उत्तर द्यायला नकार दिला. तसेच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ,  शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत , शिवसेना उपनेते आणि माजी  राज्यमंत्री सचिन भाऊ अहिर, माजी खासदार संजय दिना पाटील यांना दूरध्वनी वर संपर्क साधला असता या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


दीक्षाभूमीवर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चैत्यभूमीवर या प्रसंगी देशभरातून  लाखोंच्या संख्येने अनुयायी येऊन नतमस्तक झाले.