जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला विरोध कुणाचा?
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 05:54 PM (IST)
जिल्हास्तरावर ग्रामीण मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा परिषद आणि तिच्याशी संलग्न १५ तालुका पंचायत समित्यांची निवडणूक दि. १६ फेब्रुवारीस होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आचार संहितेचा अंमल सुरू झाला आहे. याच काळात विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत असल्यामुळे आचार संहितेचाही डबल डोस आहे. मावळत्या जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युतीची नावाला सत्ता होती. युतीच्या एकत्रित संख्या बळावर भाजपने अध्यक्षपद आणि शिवसेनेने उपाध्यक्षपद टीकवून ठेवले. परंतु, पाचही वर्षे सभागृहात भाजप-शिवसेना सदस्यांचा ताळमेळ काही जमला नाही. भाजपनेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमधील टोकाच्या वादाची याला किनार होती. शिवाय, भाजप अंतर्गत खडसे - गिरीश महाजन यांच्यातील दुरावा हेही छुपे कारण होते. या स्थितीचा लाभ घेत महाजन यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी जामनेर तालुक्यातील दिलीप खोडपे यांना जि. प. अध्यक्षपद मिळवून दिले. नंतर राज्याच्या मंत्रिमंडळात महाजन यांची वर्णी लागली. जेव्हा पुन्हा अडीच वर्षांसाठी राखीव गटातील महिलेस अध्यक्षपद देण्याची वेळ आली तेव्हा महाजन यांनी जामनेर तालुक्यातील व मर्जीतील सौ. प्रयाग कोळी यांना संधी मिळवून दिली. शिवसेनेतही उपाध्यक्षपद निवडीवर चिमणराव पाटील यांचे वर्चस्व राहीले. त्यांनी पहिल्या अडीच वर्षांसाठी मच्छींद्र पाटील व नंतरच्या अडीच वर्षांसाठी ज्ञानेश्वर आमले यांना संधी मिळवून दिली. हे दोघेही एरंडोल तालुक्यातील आहेत. जि. प. त सध्या ६८ सदस्य आहेत. त्यात भाजपचे २३, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे २० आणि काँग्रेसचे १० सदस्य आहेत. आता होणारी निवडणूक ६७ गटांसाठी आहे. ६८ पैकी १ गट कमी झाला आहे. या सोबतच १५ तालुका पंचायत समित्यांच्या १३४ गणांसाठी निवडणूक होईल. प्रत्येक महत्त्वाच्या गावातील कोणी तरी, कोणत्या तरी पक्षाचा उमेदवार असेलच. त्यामुळे प्रचाराचा धुराळा लहान-मोठ्या गावात उडेल. जिल्हा परिषदेच्या अगोदर जळगाव जिल्ह्यातील १४ नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यात ७ नगरपालिकांसह १ नगर पंचायतीचे नगराध्यक्षपद जिंकून भाजपने बाजी मारली आहे. शहरी मतदाराने भाजपला कौल दिला. आता ग्रामीण मतदार काय करतो ? ही उत्सुकता आहे. निवडणुकांमध्ये लागोपाठ मिळालेल्या यशामुळे भाजपच्या दारात उमेदवारांची खरोखर भाऊगर्दी आहे. भाऊगर्दी म्हणजे, नाथाभाऊंचे समर्थक आणि गिरीभाऊंचे समर्थक. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीची शक्यता नाही. एकनाथ खडसे यांनी युती करा अशी मागणी करीत गनिमी काव्याचा डाव टाकला आहे. गिरीश महाजन यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेतर्फे राज्यमंत्री गुलाबराव पाटील हेही स्वबळावरच लढू म्हणत आहेत. महाजन-पाटील मंत्री म्हणून प्रशासनाच्या पातळीवर एकत्र असतात. त्यांचा युतीला विरोध आहे. शिवसेनेला नेहमी घालून-पाडून बोलणारे खडसे मात्र युती करा म्हणत आहेत. पारोळा व एरंडोल तालुक्यात युतीचा प्रस्ताव खासदार ए. टी. पाटील यांचा आहे. युतीवर सध्या चर्चा नाही. भाजपतर्फे इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शिवसेनेकडून प्रेमाने युतीचा प्रस्ताव आला तर युती करु असे सुतोवाच भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केले आहे. शिवसेनेने इच्छुकांच्या मुलाखती घेवून निवड यादीही तयार केली आहे. संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर व सहप्रमुख नाईक यांनी यादी जाहीर न करता थांबवून ठेवली आहे. शिवसेनेला काही ठिकाणी बंडखोरीची भीती आहे. शिवसेनेकडेही इच्छुक उमेदवारांनी गर्दी केल्यामुळे भाजपला स्वबळावर आव्हान देता येईल अशी स्थिती नक्कीच आहे. स्वबळाची तयारी करताना तालुकास्तरावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना युतीचे अधिकार दिल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखतींची तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्या टप्प्यात मुलाखती संपवल्या आहेत. याच दरम्यान काँग्रेसचे प्रभारी विनायक देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगावात एकत्रित चर्चा करुन आघाडी करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपला विरोधासाठीची पहिली पायरी दोन्ही काँग्रेस चढताना दिसत आहेत. आघाडीचे घोडे नंतर जागा वाटपावरुन अडायला नको. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची खरी अडचण मतदारांवर प्रभाव नसलेले जिल्हाध्यक्ष आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांचे चोपडा शहर व तालुक्यात राजकीय वजन नाही. शहरात न. पा. निवडणुकीसाठी उमेदवार मिळाले नाहीत. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारांची वानवा आहेच. अशीच अडचण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांची आहे. पारोळा नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व नव्हते. डॉ. पाटील यांना नातेवाईकांसह मित्रही सोडून जात आहेत. तालुक्यातही त्यांचा फारसा राजकिय प्रभाव नाही. त्यामुळे वकील आणि डॉक्टर आपली झाकली मूठ ठेवण्यासाठी आघाडी करण्यासाठी उत्सुक आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची वेगळीच अडचण आहे. त्यांच्या अमळनेर शहरात व तालुक्यात भाजप अंतर्गत जबरदस्त गटबाजी आहे. अमळनेर नगरपालिका निवडणुकीत भाजप भुईसपाट झाली. तालुक्यातही भाजपला फारशी चांगली स्थिती नाही. नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बंडखोर भाजप अशी आघाडी करुन सत्ता मिळविणारे नेते आता पंचायत समितीसाठी तालुका विकास आघाडीचा प्रयोग करीत आहेत. हा प्रयोग विद्यमान आमदार व भाजपला विरोधासाठीच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या निवडणुकीत संधी नाही. त्याविषयीच्या मर्यादा पक्ष जाणून आहे. सध्या पक्षाला जिल्हाध्यक्ष नाही. पक्षाचे प्रभारी किंवा संपर्क प्रमुखही कोणी नाही. जिल्हा सरचिटणीस ऍड. जमिल देशपांडे यांनी म्हटले आहे की, आम्ही काही मोजक्या जागा लढू. येथेच विषयाला पूर्णविराम आहे. वरील प्रमाणे सर्व पक्षाची तयारी पाहता सध्या क्रमांक एकवर भाजप आहे. जेथे भाजपचे आमदार आहेत तेथे पंचायत समिती जिंकण्याचे आव्हान आहे. तयारीच्या बाबतीत शिवसेना आघाडीवर आहे. मात्र, शिवसेना आमदारांनाही तालुक्यात अनंत अडचणी आहेत. भाजप-शिवसेनेला आव्हान देण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडी करण्याचा शहाणपणा केला तर सर्वच ठिकाणी भाजप, शिवसेनेला जेरीस आणता येईल. नवा चेहरा मिळणाऱ्या जिल्हा परिषदेचे नेतृत्व इतर मागास घटकातील महिलेकडे जाणार आहे. याशिवाय एकूण ६७ पैकी ३४ सदस्य या महिलाच असतील. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदांची रस्सीखेच होताना सत्ता वाटपात महिलांचीच सरशी झाली तर जि. प. चा संभाव्य चेहरा महिलाराजचा असेल. जिल्ह्यातील २१ लाख ६१ हजार मतदार दि. १६ फेब्रुवारीस मतदानाचा हक्क बजावतील. निकाल दि. २३ फेब्रुवारीस जाहीर होईल. ‘खान्देश खबरबात’मधील याआधीचे ब्लॉग :