माझ्या डोळ्यादेखत माझ्या शेळ्या वाहून गेल्या हो, जनावरं पण वाहिली होsss, दाटलेला कंठ, डोळ्यात साचलेलं पाणी, आणि गहिवरुन आणणारे ओठांवरील हे शब्द होते पुराने सगळं गमावलेल्या बेलगावच्या विश्वनाथ दातखिळे यांचे.
भूम तालुक्यातल्या (Dharashiv) दातखिळेनी गेल्या 25 वर्षात जे उभारलं, जे कमावलं ते अख्ख अवघ्या काही क्षणात पुराच्या पाण्यानं गिळून टाकलं. 47 जनावरं, शेकडो कोंबड्या, शेळ्या, बोकडं, 5-6 एकरावरील पिकं एवढं सगळं वाहून गेलं, त्यासोबतच वाहून (Flood) गेली अनेक स्वप्न, लेकराबाळंचं भविष्य आणि आयुष्यभराची कमाई. ही व्यथा एकट्या दातखिळे यांचीच नाही तर, ही व्यथा मराठवाड्यातील कित्येक शेतकऱ्यांची (Farmers) आहे, कित्येक तरुण युवकांची आहे, गावखेड्यातील अनेक माय-बापांची आहे, तरीही पुन्हा नव्याने उभं राहू हा विश्वास ह्या सगळ्यांमध्ये दिसतोय. म्हणूनच दातखिळे म्हणतात मी पुन्हा हे उभं करतो, पण आत्महत्या करणार नाही. इडा गावचा युवक सूरज यादव, गेल्या 8 वर्षांपासून नर्सरीचा व्यवसाय करतोय, आता कुठं स्थिरावत होता, पण पुराच्या पाण्यात उद्योजक बनायची त्याची स्वप्न वाहून गेली, रोपं मातीमोल झाली, तर नर्सरीतील 6 लाखाच्या मशिनीत गाळ साचलाय. तरीही उठून उभं राहण्याची त्याची जिद्द कायमय.
कवी कुसुमाग्रजानी म्हटलंय, मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा.
पण, पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणण्याएवढं सोप्प हे दुःख नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांनी बांधावर जाऊन तेच केलंय, पाठीवर हात ठेऊन 'फक्त लढ' म्हणून ते परतले. कारीतला एक तरणा बांड शेतकरी मंत्र्याचा ताफा अडवून म्हणतो, गोगावले शेठ तुमची एकरी 3400 रुपयांची मदत आमच्या तळवटालाही पुरणार नाही. हेच वास्तव आहे. पण, इथंही काही मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या भाषेवर आक्षेप वाटतोय, इथं त्यांच्यातल्या मंत्रिपदाचा इगो जागा होतोय. कुणाला राजकारण करु नको असं बोललं जातंय, तर कुणाला आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का, अशी दादागिरी केली जातीय. पण, स्वत:ला त्यांच्या जागी ठेऊन बघा, ज्याचं सगळं गेलंय त्यांच्याकडून तुम्ही भाषेच्या सोज्वळपणाची, मर्यादेची अपेक्षा तरी कशी करताय. त्यामुळे या संकटातून बाहेर कसं पडायचा हा यक्षप्रश्न आहे.
केंद्र सरकारने मदतीच पॅकेज जाहीर करावं, त्याने अन्नात कालवलेली ही माती वेगळी करता येणार नाही, पण बुडत्याला काडीचा आधार होईल. शेवटी शेतकरी ही जातच रानावनातून जन्म घेती, दिवसागणिक काट्याकुट्याना तुडवीत आमची लेकरं मोठी होतात, त्यामुळे उद्याही ते मोठी होतील ह्या संकटाच्या छतडावर पाय रोवून नव्या दमानं शेती करून जगाचा पोशिंदा म्हणून मिरवतील. पण, आता फक्त पाठीवरती हात ठेऊन लढ म्हणू नका. मायबाप सरकार म्हणून बळीराजाचे अश्रू तुम्ही पुसा, गलबलून गेलेल्या त्यांच्या लेकरांना कुशीत घ्या, काळ्या आईचं वस्त्रहरण झालंय, पण श्रीकृष्णच्या भूमिकेतून पदर सांभाळायची जबाबदारी आता तुमचीच आहे, मायेला मायेचा आधार द्या, उध्वस्त झालेल्या तिच्या लेकरांना आपलंस करा.
कारी गावातली शेतकऱ्याची लेक बापाच्या आत्महत्येचा प्रसंग सांगते तेव्हा डोळ्यातल्या पापण्याला पाणी स्पर्श करतं, धाराशिवमधली चिमुकली जेव्हा, मला फक्त जीव पाहिजे, पाण्याची भीती वाटते असं म्हणते तेव्हा काळजात चर्र होतं. आपलं 4 वर्षाचं लेकरू डोळ्यादेखत वाहून जाणाऱ्या बीड जिल्ह्यातील माऊलीचा आक्रोश पाहून गलबलून येतं. तर, जळगावमध्य लेकीचं पुसलेलं कुंकू, बापाविना आलेला पोरकेपणा आणि हरवलेलं मातृत्व मी शब्दात मांडू तरी कसं"? मुख्यमंत्रीसाहेब, इथं मोडून पडलाय संसार आणि मोडलाय कणा सुद्धा... आता या 'रयतेचा राजा' म्हणून तुम्हीच काहीतरी करा.