Continues below advertisement

BLOG : आज जागतिक टपाल दिन. जगभरात आज पोस्टमन, टपाल व्यवस्था, आणि त्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या माणसांच्या कथा साजऱ्या केल्या गेल्या. पण माझ्यासाठी हा दिवस काहीसा वेगळा, काहीसा खास आहे. कारण माझे वडील... पोस्टमन होते.

हो, ते दररोज हातात एक पिशवी, डोक्यावर टोपी आणि खांद्यावर जबाबदारी घेऊन निघत असत, लोकांच्या दारांवर आशा, आनंद, बातम्या आणि कधी दुःखाचीच सावली घेऊन. त्या काळी पोस्ट म्हणजे फक्त पत्र नव्हे, ती एक भावना होती, एक काळ होता... जेव्हा कोणाच्या हातात मोबाईल नव्हता, पण तरीही लोक ‘जवळ’ होते. कारण त्या काळात "पत्रं" लिहिली जायची… प्रेमाने, काळजीनं, अधीरतेनं.

Continues below advertisement

माझं लहानपण वडिलांच्या त्या रोजच्या वाटचालीत सामावलेलं असायचं.. कितीदा मी त्यांच्याबरोबर त्यांच्या सायकलवर बसून पोस्ट टाकायला गेलोय. मला अजून आठवतं, कधी एखादी मनीऑर्डर मिळालं की एखाद्या घरातं आनंदाचं वातावरण व्हायचं. कोणाचं लग्न, कोणाचं परीक्षा निकाल, कोणाचं परदेशातून आलेलं पत्र, प्रत्येक गोष्टीला वडिलांचा सहभाग असायचाच.

पोस्टमन आला की जीवात जीव यायचा. गावातल्या लोकांसाठी पोस्टमन म्हणजे फक्त सरकारी कर्मचारी नव्हता, तो घरचा माणूस होता. लोक त्यांच्या हातूनच बातम्या ऐकायचे, आणि वडीलही प्रत्येकाच्या घरातल्या घडामोडी ओळखून होते. कधी कधी कोणाला वाईट बातमी देताना त्यांच्या डोळ्यातलं दुःख मी पाहिलं आहे. त्यांनी ते दुःख किती संयमानं हाताळलं, हे फक्त अनुभवता येतं, सांगता येत नाही.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात पोस्टाचं महत्त्व फारसं उरलेलं नाही, असं वाटतं. पण तरीही जेव्हा एखादं जुनं पत्र हातात पडतं, किंवा पोस्टाच्या ठशाखालची हस्ताक्षरं दिसतात, तेव्हा काळ थांबतो. माझ्यासाठी तर पोस्ट म्हणजे माझ्या वडिलांची आठवण. त्यांची सायकल, त्यांच्या खांद्यावरची पिशवी, त्यांच्या डोळ्यातली आपुलकी. हे सर्व जागतिक टपाल दिनचं खरं स्वरूप आहे.

आजच्या युगात आपण ‘Seen’ मध्ये अडकलोय, पण एकेकाळी "पोस्टकार्डवर" हृदयं लिहिली जायची. प्रेमपत्रं सुगंधी चिठ्ठ्यांमध्ये लपवली जायची. घरात ती कपाटात ठेवली जायची, पण मनात मात्र ती हृदयाच्या खोल कप्प्यात दडवून ठेवलेली असायची. खरंतर पत्रातला मजकूर जुना होतो पण पत्रं कधीच जुनी होत नाहीत.

आज या दिवशी माझ्या वडिलांना आणि त्यांच्यासारख्या असंख्य पोस्टमनना एक नम्र अभिवादन. ज्यांनी आपल्या पायांनी गावोगाव धावून लोकांना जोडलं… ज्यांच्या आवाजानं दरवाजे उघडले आणि मनंही!