Dashavatar Marathi Movie: स्थळ : लोअर परळच्या फिनिक्स पॅलेडियम मॉलमधलं पीव्हीआर आयकॉन थिएटर. वेळ रविवारी पावणेपाचच्या शोची. शेवटच्या रांगेतल्या ठरलेल्या आसनांची तिकीटं बुक करून मी मित्रांसोबत थोडा लवकरच जाऊन बसलो होतो. सिनेमाला गर्दी होणार याची खात्रीच होती. आणि एक मराठी माणूस, तोही कोकणाशी नातं असणारा म्हणून मला ती गर्दी अनुभवायची होती. देवमाणूस, आता थांबायचं नाय, गुलकंद आणि जारणच्या निमित्तानं रसिकमनांवर झालेलं मराठी सिनेमाचं गारुड मी पाहिलं होतं. अनुभवलं होतं. पण दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'च्या निमित्तानं मराठी सिनेमाची क्रेझ टिपेला पोहोचणार याचा एक अंदाज आला होता आणि तो सोळा आणे खराही ठरला.
पीव्हीआर आयकॉनचं ऑडी थ्री हे साधारण अडीचशे आसनक्षमतेचं थिएटर रविवारी पावणेपाचच्या शोला अगदी गच्च भरलं. महत्त्वाचं म्हणजे या गर्दीत जातपात, धर्म, मातृभाषा… सारे सारे भेद गळून पडले होते. सहकुटुंब किंवा सह मित्रपरिवार असा हा 'क्राऊड' फक्त एक चांगला सिनेमा पाहण्यासाठी 'दशावतार'ला आला होता. तो एक कोकणाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला मराठी-मालवणी बोलीतला सिनेमा आहे ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती. पण थिएटरमधून बाहेर पडताना एक प्रेक्षक म्हणून मी समाधानी होतो का?
दिलीप प्रभावळकर-सिद्धार्थ मेनन या बापलेकाचं दाखवलेलं नातं आणि त्यांचा अभिनय, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदलकर यांचा खट्याळ रोमान्स, कोकण आणि दशावताराची पार्श्वभूमी, नेत्रसुखद फ्रेम्स, सिनेमातली गाणी आणि संगीत… सारं सारं काही मनाला भावणारं होतं. पण तरीही थिएटमधून बाहेर पडताना प्रेक्षक म्हणून मी समाधानी नव्हतो. कारण माझ्यासाठी सिनेमा उत्कर्षबिंदूकडे जाता जाता अचानक ढेपाळतो. इथंच आमचं मराठीपण अजूनही आडवं येतं का? आम्हाला मसाला सिनेमा बनवायचा तर आहे, पण ते स्वीकारायचं नाहीय का?
अहो एकीकडे दिलीप प्रभावळकरांचा बाबुली मेस्त्री एकेक गेम वाजवत आपली उत्कंठा वाढवतो, पण त्याचवेळी सिनेमाची गोष्ट उलगडता उलगडता त्यातली लय हरवून बसते. मुख्य खलनायक सरमळकराचा लेक… मॉन्टी... सहनायिकेवर अचानक लट्टू होऊन पुढं जे काही घडतं, त्यानं सिनेमाचा वेग, त्यातलं नाट्य आणि थ्रिलही निघून जातं. त्या मॉन्टीचं अपहरण आणि महेश मांजरेकरांच्या मायकेल डिकास्टा या व्यक्तिरेखेला एस्टॅब्लिश करण्यासाठी दिलेले प्रसंग यात भरपूर वेळ खर्च होतो. सरतेशेवटी 'आपलो हीरो' बाबुली मेस्त्री सारी सूत्रं सहनायिकेच्या… प्रियदर्शनीच्या हाती देता आणि मगे तिच्या मुखातून निसर्गरक्षणाचा संदेश देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आपल्या 'दशावतारा'क थेट अनुबोधपटाच्या रांगेत आणून बसवता. पण या सगळ्याचो तिकीटबारीयेवर कायोक परिणाम होवचो नाय... 'दशावतारा'क होणारी गर्दी आणि त्या पब्लिकसाठीचे शो वाढतच जातले. जय मराठी!