कोरोनाच्या विषाणूनं आज अवघं जग वेठीला धरलंय. पण चीननं साऱ्या जगाला दिलेला हा विषाचा प्याला इटलीसाठी सर्वात संहारक ठरतोय. आणि त्याचं कारण आहे मोस्ट ब्युटिफुल गेम अशी ओळख लाभलेला फुटबॉलचा खेळ. तुम्हाआम्हा भारतीयांसाठी क्रिकेट हा जर जीव की प्राण असेल, तर इटलीसह अवघ्या युरोपीय खंडासाठी फुटबॉल हा सर्वात लाडका खेळ आहे. आणि फुटबॉलच्या त्या प्रेमापायीच इटलीनं कोरोना नावाचा विषाचा प्याला आपल्या ओठांना लावला.
त्याचं झालं असं की, युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या (युईफाच्या) चॅंम्पियन्स लीगमधला अटलांटा आणि लेव्हॅन्सिया क्लब्समधला सामना 19 फेब्रुवारीच्या रात्री मिलानच्या सॅन सिरो स्टेडियमवर खेळवण्यात आला. त्यापैकी अटलांटा हा इटलीतल्या ‘सिरी ए’ लीगमधला नामवंत क्लब, तर व्हॅलेन्सिया हा स्पेनमधल्या ‘ला लीगा’त खेळणारा तगडा क्लब. त्यामुळं या दोन क्लब्समधला फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी मिलानचं सॅन सिरो स्टेडियम हाऊसफुल्ल होणार, यात नवल नव्हतं. आणि घडलंही तसंच.
अटलांटा आणि व्हॅलेन्सिया क्लब्समधला सामना पाहण्यासाठी सॅन सिरो स्टेडियमवर तब्बल 45 हजार 792 फुटबॉल रसिकांची गर्दी उसळली होती. त्यात अटलांटा हा क्लब मिलानपासून केवळ 37 मैलांवर असलेल्या बरगामोचा. त्यामुळं एकट्या बरगामो शहरातून हा सामना पाहण्यासाठी 40 हजार फुटबॉल रसिकांची पावलं सॅन सिरो स्टेडियमच्या दिशेनं वळली होती. खाजगी कार, बस आणि ट्रेन या मिळेल त्या वाहनानं गर्दी करून बरगामोचे नागरिक मिलानमध्ये दाखल झाले. ज्यांच्या हातात सामन्यांची तिकीटं होती, त्यांनी स्टेडियम गाठलं आणि ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत, त्यांनी पब्स, रेस्टॉरंट्स आणि स्टेडियमबाहेर गर्दी करून आपल्या संघाचं मनोबल उंचावलं. त्यामुळं फुटबॉलच्या मैदानातली लढाई अटलांटानं 4-1अशी सहज जिंकली. पण त्याच लढाईनं साऱ्या इटलीसमोर एका महाभयंकर लढाईचं आव्हान उभं केलं. ती लढाई होती कोरोना नावाच्या जीवघेण्या विषाणूशी.
इटलीतल्या एका वैद्यकीय तज्ज्ञाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘गेम झीरो’च्या ‘त्या’ काळरात्री सॅन सिरो स्टेडियमवर उपस्थित राहिलेला प्रत्येक फुटबॉल रसिक इटलीसाठी जणू जैविक बॉम्ब ठरला. आता तुम्ही म्हणाल की, हा ‘गेम झीरो’ काय प्रकार आहे? इटलीत कोरोना विषाणूचा उद्रेक होण्याचं अटलांटा-व्हॅलेन्सिया सामना हे एक सुरुवातीचं केंद्र ठरलं. त्यामुळंच अटलांटा-व्हॅलेन्सिया सामन्याचा उल्लेख आता ‘गेम झीरो’ म्हणूनच होतो.
बरगामोचे महापौर जॉर्जियो गोरी म्हणतात की, आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची फेब्रुवारीच्या मध्यावरही नेमकी कल्पना आली नव्हती. त्यामुळं अटलांटा-व्हॅलेन्सिया संघांमधला सामना रद्द करणं शक्यच नव्हतं. पण कोरोनाच्या विषाणूनं जानेवारी महिन्यातच युरोपात शिरकाव केला होता, तर ‘गेम झीरो’ची ती रात्र इटलीसाठी काळरात्र ठरली असं म्हटलं तर त्यात गैर काहीच नाही.
मंडळी, विचार करा... कोरोनाचा विषाणू आपल्या अंगाखांद्यावर खेळवत असलेल्या काहीशे वाहकांनी (Carriers) विषाचा तो प्याला 40-45 हजारांच्या अंगाखांद्यांवर रिता केला. ही सारी मंडळी सार्वजनिक वाहनांनी आपापल्या घरी परतली. घरी परतताना आणि परतल्यानंतर त्यांच्याकडून आणखी काही हजारांना कोरोनाचा सामूहिक संसर्ग झाला. आणि मग त्यातूनच इटलीत अखेर हाहा:कार उडाला. ‘फिफा’च्या इतिहासात इटलीनं आजवर 1934, 1938, 1982 आणि 2006 असा चारवेळा फुटबॉलचा विश्वचषक जिंकला आहे. साऱ्या इटलीला त्या इतिहासाचा अभिमान आहे. पण दुर्दैव म्हणावं लागेल इटलीचं, की त्यांच्या लाडक्या फुटबॉलचा एक सामना देशातल्या नागरिकांच्या जीवावर बेतलाय.
भारतीयांच्या सुदैवानं आयपीएलचं बिगुल वाजण्याआधी आपण कोरोना विषाणूचा धोका ओळखला. नाही तर काय झालं असतं याची कल्पनाच करवत नाही. आयपीएलमधून उद्भवणारा संभाव्य धोका एव्हाना टळला असला तरी, रोड सेफ्टीच्या नावाखाली खेळवण्यात आलेल्या बुजुर्गांच्या वर्ल्ड सीरीजचं नाटक आपण बराच काळ लांबू दिलं. आता किमान ‘लॉकडाऊन’च्या काळात घालण्यात आलेले शासकीय निर्बंध तरी इमानेइतबारे पाळून आपण स्वत:ला आणि देशालाही सुरक्षित ठेवायला हवं.