‘लखनौ सेंट्रल’ आणि ‘कैदी बँड’ चित्रपटांच्या ट्रेलर्समध्ये तुरुंग, कैदी, बँण्ड आणि त्यांचं नाव कमावण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा संघर्ष दिसतो. मात्र लखनौ सेंट्रलची कथा कणखर आणि मनोरंजक असण्याची शक्यता आहे. लखनौ सेंट्रल चित्रपटात मोठ्या स्टारकास्टपेक्षा कथेवर जास्त भर दिल्याचं दिसतं.
‘लखनौ सेंट्रल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पहिल्या फ्रेमपासून फरहान आणि त्याचं स्वप्न दाखवलं आहे. मनोज तिवारी सारखा गायक बनण्याची इच्छा असणारा किशन, एक आयएएस अधिकारी हत्येच्या आरोपावरुन जेलमध्ये जातो. केस बंद करण्यासाठी वकील त्याच्या मृत्युदंडाची मागणी करतात. हा झाला ट्रेलरचा पहिला भाग.
खरी कहाणी सुरु होते ती फरहान म्हणजेच किशन तुरुंगात गेल्यावर... तुरुंगातील परिस्थिती अधिकच वास्तववादी दाखवली आहे. तिथले राजकारण आणि मारामारी, यादरम्यान फरहान तुरुंगातून पळण्याचा प्लॅन आखताना दिसतो आहे.
तुरुंगात त्याच्यासमोर एक प्रस्ताव येतो. एका राष्ट्रीय सणाच्या दिवशी तुरुंगात एका कार्यक्रमात त्याला गाण्याची संधी मिळते. पण त्याच्यासमोर पेच उभा राहतो की जेलमध्ये गायक व्हायचं की त्या दिवशी पळून जायचं. आपल्याला जरी तो नक्कीच पळून जाईल असं वाटत असलं तरी, तो यशस्वी होईल का? हा प्रश्नच आहे.
ट्रेलर अतिशय उत्तम प्रकारे बनवलेला आहे. अभिनेता रोनित रॉय भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्याच्या, तर दीपक डोब्रियाल कैदी म्हणून चित्रपटात पाहायला मिळणार आहे. डायना पेंटी आपल्याला तुरुंगातील कैद्याच्या हक्कांसाठी लढा देणारी कार्यकर्ता दिसेल. चित्रपट येत्या 15 सप्टेंबरला आपल्या भेटीला येणार आहे.
पाहा व्हिडिओ :