BLOG : पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी रविवारी प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील रेशीमबाग मुख्यालयात येत आहेत. खरे तर यापूर्वी पंतप्रधान मोदी अनेकदा नागपुरात आले होते, पण संघाच्या मुख्यालयात गेले नव्हते. मात्र आता खास संघाच्या मुख्यालयाला भेट देण्यासाठीच येत आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याचे खरे कारण भाजप अध्यक्षपदाची निवड आणि भाजप संघातील कटुता कमी व्हावी असे म्हटले जात आहे आणि ते खरेही असावे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना म्हणावे तसे यश मिळाले नाही. याचे महत्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला निवडणुकीत संपूर्णपणे मदत केली नाही. अर्थात याला कारण होते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेले एक वक्तव्य. लोकसभा निवडणुकीपूर्वी एका मुलाखतीत जे. पी. नड्डा म्हणाले होते, अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपला चालवण्यासाठी संघाची गरज होती, कारण तेव्हा भाजप लहान पक्ष होता आणि सक्षमही नव्हता. मात्र आता पक्षाची ताकद वाढली आहे. पूर्वीपेक्षा आम्ही आता अधिक सक्षम झालो आहोत. भाजप आता संपूर्ण पक्ष स्वतः चालवतो. पक्षाचे नेते त्यांची कर्तव्ये आणि भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. भाजपला निवडणुकीत आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही.'
जे. पी. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे केवळ संघ स्वयंसेवकच नव्हे तर संघाचे नेतृत्वही नाराज झाले होते. संघाच्या नाराजीबाबत बोलताना सुनील आंबेकर म्हणाले होते, हा घरातला वाद आहे आणि आम्ही तो घरातच सोडवू. याचा अर्थ होता संघ नड्डा आणि पंतप्रधान मोदींवर नाराज होता.
सरसंघचालक मोहन भागवत यांनीही वेळोवेळी भाजप आणि नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले होते. नागपूर येथे झालेल्या कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालकांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना कानपिचक्या दिल्या होत्या. यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी कबीराच्या दोह्याचा आधार घेतला होता. सरसंघचालक म्हणाले होते, सेवक कसा असावा? सेवा करणाऱ्यांमध्ये अहंकार नको, मी पणा नको. एक प्रकारे पंतप्रधान मोदींचे नाव न घेता सरसंघचालकांनी मोदींची कानउघाडणी केली होती.
एवढेच नव्हे तर मणिपूर प्रकरणावरूनही सरसंघचालक मोहन भागवतांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. दहा वर्षांपूर्वी शांत असलेले मणिपूर मागील एक वर्षापासून शांततेची वाट पाहात आहे, आता अचानक तेथे अशांतता निर्माण झाली की निर्माण करण्यात आली ठाऊक नाही. त्या आगीत मणिपूर जळत असून लोकं त्राही त्राही करीत आहे, त्याकडे लक्ष कोण घालणार? असा सवाल करीत केंद्र सरकारने मणिपूरकडे प्राधान्याने लक्ष घालणे आवश्यक असल्याचेही सरसंघचालकांनी म्हटले होते.
तसे पाहिले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजप वाढला, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदापर्यंत पोहचले, पण सत्तेवर येताच अटलबिहारी वाजपेयी आणि अडवानींनी संघाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. खरे तर प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक अत्यंत शिस्तबद्ध रितीने प्रचार करून भाजपला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी भाजपच्या नेत्यांनी संघ स्वयंसेवकांचे कौतुक करावे असेही कोणाला वाटत नसते. कारण स्वयंसेवक नेमून दिलेले काम करतात आणि पुन्हा दुसऱ्या कामाला लागतात. मात्र असे असतानाही जे. पी. नड्डांच्या वक्तव्याने संघ नेतृत्व नाराज झाले होते.
खरे तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी संघाची मदत मोठ्या प्रमाणावर घेतली होती, लोकसभेला झाले तसे महाराष्ट्रात होऊ नये, भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता यावी यासाठी फडणवीसांनी संघाची मदत घेतली आणि संघानेही पूर्णपणए ताकद झोकून भाजपचा प्रचार केला. त्यामुळेच भाजपची महायुती मोठ्य़ा संख्येने विजयी झाली आणि सत्तेवर आली. महाराष्ट्रात फडणवीसांनी जसे जुळवून घेतले तसे जुळवून घ्यायला पंतप्रधान मोदी अजूनही तयार नव्हते.
त्यामुळेच जे. पी. नड्डांचा अध्यक्षपदाचा काळ संपल्यानंतरही नवा अध्यक्ष भाजप निवडू शकली नाही, कारण भाजपने जी नावे पाठवली होती ती संघ नेतृत्वाला मंजूर नव्हती. संघाच्या मदतीने सत्ता स्थापन केल्यानंतरही जर संघाला नावे ठेवली जात असतील तर आम्हाला का विचारता असा विचार संघ करीत होता. मात्र संघाच्या संमतीविना अध्यक्ष निवडणे भाजपला भविष्यात कठीण गेले असते याचे भान भाजप नेतृत्वाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संघाशी जुळवून घेऊन, नाराजी दूर करण्याचे मोठे काम पंतप्रधान मोदींनी हाती घेतले आहे, आणि त्यामुळेच ते रविवारी नागपुरात रेशीमबागेत येऊन सरसंघचालक मोहन भागवतांशी चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधीही नागपूर येथील संघाच्या मुख्यालयात गेले नव्हते. मात्र आता त्यांना संघाच्या मुख्यालयात जाणे भाग पडले आहे. संघ मुख्यालयात जाऊन पंतप्रधान मोदी भाजप आणि संघातील कटुता कमी करण्याचा किंवा नाहीशी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत.