समृद्ध देशांमध्ये उत्पन्नाची असमानता फारशी नसली, तरी शारीरिक व मानसिक आरोग्य आणि व्यक्तिगत
नातेसंबंधांमधील ताणतणाव ही आनंदी नसण्याची मुख्य कारणं आहेत. गरीब माणसं तर या अनारोग्यासह आर्थिक ताणातून जात असतात आणि त्यामुळे अधिक दु:खी असतात.
आयुष्यात अनेकानेक टोकाचे आनंदाचे आणि टोकाचे दु:खाचे प्रसंग अनुभवले की माणूस हळूहळू नकळत फिलॉसॉफिकल होत जातो. रुटीन कामकाज सुरू असतं, आसपासचं वास्तव दिसत असतं, विचारांना टोक काढलं जात असतं, कल्पना केल्या जात असतात, फॅंटसी भुरळ घालत असतात, कधी आपल्याहून मोठी माणसं भेटली किंवा अगदीच छोटी मुलं भेटली की बालिशपणेही केले जातात... या सगळ्यामागे एक अदृश्य सावली हाताची घडी घालून शांतपणे उभी राहून सगळं नीट निरखून बघत असते, ती आपल्या आतल्या फिलॉसॉफरची असते. तो एकेक प्रश्न निवांतपणे समोर मांडून ठेवतो... आनंद म्हणजे काय? त्याची व्याख्या कोण ठरवतं? की प्रत्येकाची आपली व्याख्या असते अनुभवातून आलेली अथवा दुसऱ्या कुणाकडून उसनी घेतलेली? तो कशाने – कशातून मिळतो? कुठून येतो आणि कुठे जातो? कसा नष्ट होतो? एक ना दोन अनेक. आत हे प्रश्न मांडलेले असताना बाहेर जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा जल्लोष सुरू असतो. लोक खरोखर आनंद साजरा करताहेत की आनंद साजरा करीत असल्याचं दाखवताहेत, हेही त्या गलक्यात कळेनासं होतं. संयुक्त राष्ट्र संघाकडून २०१२ पासून ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’ संशोधनाअंती सादर केला जातो. १५५ देशांच्या या पाहणीत २०१२ साली भारत १११ व्या क्रमांकावर होता आणि आता २०१७ च्या रिपोर्टनुसार भारताचा क्रमांक १२२ वा आहे. म्हणजे पाच वर्षांत दहा पायऱ्या खाली उतरल्या. त्यातही गेल्यावर्षी पेक्षा आपण यावर्षी चार पायऱ्या खाली उतरलो आहोत. पहिल्या तीन क्रमांकांवर असलेले देश आहेत – डेन्मार्क, नॉर्वे आणि आईसलँड. सगळ्यात खालचे आहेत, सेन्ट्रल आफ्रिकन रिपब्लिक, त्यावर बुरुंडी आणि त्यावर टांझानिया, त्यावर सिरीया. इथं गेल्या काही वर्षांत विपरीत घडामोडी घडताहेत हे आपल्याला माहीत आहेच. त्यांच्या आनंदाच्या अभावाला कारणीभूत आहे ते दुर्दशा, हालअपेष्टा, विपत्ती, संकटं आणि दु:खं यांचं वाढतं प्रमाण. अमेरिकाही गेल्या वर्षीपेक्षा एका क्रमांकाने घसरली असून आता १४ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा यावर्षीचा क्रमांक ८० असून ते मागील वर्षाहून तब्बल १२ पायऱ्या वर चढले आहेत. चीनचा यावर्षीचा क्रमांक ७९ आहे. चीनमधील लोक गेली २५ वर्षं मुळीच आनंदी नाहीत, अआनंदी आहेत, असा निष्कर्ष आहे. त्यांचे पगार वाढलेत, पण आनंद कमी झालाय. गेल्या पंधरा वर्षांत त्यांची घसरण भयाण वेगाने झालेली आहे. भूतान ९७, नेपाळ ९९, बांगलादेश ११० आणि श्रीलंका १२० ही शेजाऱ्यांची अवस्था आहे. आपल्या या सगळ्या शेजाऱ्यांहून आपण कमी आनंदी आहोत. यात एक गमतीची गोष्ट अशी आहे की, या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत प्रत्येक देशाची तुलना ‘डायस्टोपिया’ नावाच्या काल्पनिक राष्ट्राशी केली जाते. हे राष्ट्र सर्वांत दुबळं मानलं जातं; म्हणजे व्यक्तींनीही आपली तुलना आपल्याहून मोठ्याशी नव्हे, तर सर्वात खालच्या व्यक्तीशी करावी – असाच विचार यामागे आहे. आता या आनंदाचे निकष कोणते? १. जीडीपी म्हणजे एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत नागरिकांचं दरडोई घरगुती उत्पन्न. खेरीज यात तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करता याचाही विचार झाला, २. सामाजिक स्थिती व पाठबळ, ३. आरोग्यदायी जीवनशैली आणि अपेक्षित आयुर्मर्यादा, ४. औदार्य, जीवनातील निर्णय घेण्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा, ५. विश्वास, भ्रष्टाचार, असमतोल आणि इतर काही मुद्दे. आपला जीडीपी आहे ०.७९२, सामाजिक पाठबळ ०.७५४, निरोगी आयुष्य ०.४५५, निर्णय स्वातंत्र्य ०.४७०, औदार्य ०.२३२ विश्वास ०.०९२ आणि इतर १.५१९. आनंदनिर्मितीसाठी अधिक उत्पन्नापेक्षा बाकीचे घटक १६ पट कारणीभूत ठरतात, असाही यंदाचा एक निष्कर्ष आहे. ( आनंदाचा जागतिक नकाशा ) पाश्चात्य देशांत उत्पन्न, नोकरी आणि शारीरिक अस्वास्थ्य यापेक्षाही मानसिक विकार हे आनंदी नसण्याचं जास्त मोठं कारण मानलं जातं. पण जगातल्या सगळ्याच देशांमध्ये शारीरिक आरोग्याला मानसिक आरोग्यापेक्षा जास्त दिलं गेलं आहे. नैराश्य आणि चिंता यांचं प्रमाण कमी केलं तर सर्वच देशांचा आनंदाचा कोशंट वरती जाऊ शकतो, असाही त्यांचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ सांगतात की, त्यासाठी लहान मुलांचं मानसिक आरोग्य व वर्तन यांवर त्यासाठी आता लक्ष केंद्रित करायला हवं आहे आणि यासाठी सर्वात जास्त मदत आईची होऊ शकते आणि पाठोपाठ शिक्षकांची. समृद्ध देशांमध्ये उत्पन्नाची असमानता फारशी नसली, तरी शारीरिक व मानसिक आरोग्य आणि व्यक्तिगत नातेसंबंधांमधील ताणतणाव ही आनंदी नसण्याची मुख्य कारणं आहेत. गरीब माणसं तर या अनारोग्यासह आर्थिक ताणातून जात असतात आणि त्यामुळे अधिक दु:खी असतात. अहवालात राष्ट्रांच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी कल्याणाचे मोजमाप प्रभावीपणे कसे वापरले जाऊ शकते याची अर्थशास्त्रीय, मानसशास्त्र, सर्वेक्षण विश्लेषण आणि राष्ट्रीय आकडेवारीसह तज्ज्ञांनी मांडणी केली आहे. आनंदाशी संबंधित मुद्दे, आनंदाची उद्दिष्टे, मानसिकता, नैतिकतेचे महत्त्व, धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक सहकार व विकास यांच्या विचारातून व्यक्तीचं कल्याण साधलं जाऊ शकतं; असा विचार त्यामागे आहे. गलूप वर्ल्ड पोल प्रश्नावलीत प्रश्नांसाठी पुढील विभाग केले होते : १. व्यवसाय आणि आर्थिक, २. नागरिक प्रतिबद्धता, ३. संप्रेषण आणि तंत्रज्ञान, ४. विविधता (सामाजिक समस्या), ५. शिक्षण आणि कुटुंब, ६. भावना, ७. पर्यावरण आणि ऊर्जा, ८. अन्न व निवारा, ९. सरकार आणि राजकारण, १०. कायदा व सुव्यवस्था (सुरक्षितता), ११. आरोग्य, १२. धर्म आणि नैतिकता,१३. वाहतूक, आणि १४. कार्य. बेरोजगारी, सामाजिक सुरक्षेच्या उपक्रमांमध्ये घट (बेरोजगारी लाभ, आरोग्य सेवा, निवृत्तीवेतन, अडचणीच्या वेळी मदत इत्यादी) मध्ये घट आणि भौतिक आकांक्षांची पूर्तता यांमुळे आनंदाच्या प्रमाणात घट होते. उत्पन्न सुरक्षा, कौटुंबिक जीवन, स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य या गोष्टी जिथं नियंत्रणात ठेवता आल्या आहेत, तिथं आनंद टिकतो. आफ्रिकन देशांमध्ये बदलत्या अपेक्षांची पूर्तता, नागरिक स्वातंत्र्य, विशेषतः भाषण स्वातंत्र्य हे मुद्दे आनंदासाठी महत्त्वाचे मानले गेले आहेत. यांच्या अभावी जगात सर्वाधिक दु:ख तिथं आहे. लोकशाही नसलेल्या देशांमध्ये आनंदाची पातळी घसरलेली असते. प्रभाव ( आपल्या जीवनात सध्या काय घडतंय ) आणि दूरचे प्रभाव (एखाद्याच्या बालपणाच्या आठवणी, शाळा व मूळचे कुटुंब याबाबतच्या घटना ), नैराश्य आणि चिंता हे मानसिक विकार, शारीरिक आजार, गरीबी, कमी शिक्षण, बेरोजगारी आणि मनातून एकाकी वाटणे, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना दिली जाणारी वागणूक हे मुद्दे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि इंडोनेशियात महत्त्वाचे ठरतात. त्यातही नियोजन करणारे लोक आनंदी बनू शकतात, हा एक चांगला मुद्दा आहे. आता या अशा अहवालांचा नेमका काय उपयोग होतो, असा प्रश्न कुणाला पडू शकेल. पण आपल्या पातळीवर आपण चिंता व नैराश्य कमी करणे, नियोजन करणे असे साधे मुद्दे त्यातून शोधून आपल्या वाटा आनंदाच्या दिशेने नक्कीच वळवू शकतो.