लागोपाठ काही घटना समजल्या. फेसबुकवर एक ऐंशीच्या घरातले आजोबा मदतनीस बायकांविषयी तक्रार करत होते आणि काही पर्याय आहे का हे विचारत होते. ते आणि त्यांची पत्नी दोघेच घरात आहेत, मुलं परदेशी; दोन शिफ्टमध्ये घरात या मदतनीस स्त्रिया येतात, खेरीज मोलकरीण व स्वयंपाकीण निराळी. एका मैत्रिणीने घरात वृद्ध सासूच्या देखभालीसाठी एक मदतनीस दिवसाच्या बारा तासांच्या शिफ्टमध्ये ठेवली. सासूबाई पडल्या होत्या, हाड मोडलं होतं; काही दिवस दवाखान्यात काढले, काही दिवस केअर सेंटरमध्ये काढले. केअर सेंटरचे दर अधिक काळ परवडणारे नव्हते. खेरीज आपली नोकरी-घरकाम सांभाळून रोज एकतरी फेरी केअर सेंटरमध्ये मारावी लागे. ते बंधनकारक नव्हतं, पण भावनिक मुद्दा होता. वेळेची गणितं आणि आर्थिक ताळा जमवताना तारांबळ होऊ लागली, म्हणून एका एजन्सीतून या मदतनीस बाई मिळवल्या. काही दिवसांत घरात अनेक लहानमोठ्या चोऱ्या झाल्या; व्यापात लगेच ध्यानात आलं नाही, पण समजलं तेव्हा त्यांना कामावरून काढणं आणि एजन्सीत तक्रार नोंदवणं इतकंच केलं; प्रत्यक्ष पुरावे नव्हतेच, त्यामुळे पोलीस तक्रार केली नाही. दुसऱ्या मैत्रिणीकडे घरात दोघेच नवरा-बायको. दोघांचे कामांचे व्याप मोठे. स्वयंपाकासाठी एक बाई ठेवल्या. विश्वासू वाटल्या, त्यामुळे घराची किल्ली त्यांच्याकडे असे. येऊन स्वयंपाक करून जात. स्वयंपाक झाला की, दुपारची जेवणाची वेळ असल्याने तुम्हीही इथं जेवूनच जात जा, हेही तिनं सांगितलेलं. पगार व्यवस्थित. त्या महिन्याच्या सामानाची यादी देत, ही ते सामान एखाद्या विकेंडला आणून टाके. एकदा तिची आई आलेली असताना तिनं वाणसामान आणलं, तेव्हा त्याची क्वांटीटी पाहून आई चकित झाली. केवळ दोन व्यक्तींच्या एकवेळच्या जेवणासाठी महिन्याला इतकं सामान लागणं शक्यच नाही, हे तिनं ठामपणे सांगितलं. पुढच्या आठवड्यात एके दिवशी स्वयंपाकीण बाई येत, त्या वेळेत ती अचानक घरी आली. पाहिलं तर बाईंची तीन मुलं शाळेतून थेट इथं आलेली होती आणि मुलांसह बाई निवांत जेवत होत्या. हे रोज होत असणार हे ध्यानात आलं. खाण्यापिण्यावरून कुणाला बोलू नये, अन्नाला नाही म्हणू नये वगैरे ‘संस्कार’ एकीकडे आठवत होते आणि दुसरीकडे ही चोरीही आहे आणि विश्वासघातही आहे, हेही जाणवत होतं. बाईंना अर्थात कामावरून काढून टाकलं गेलं, पण खेद वाटत राहिलाच. बाई जाताना तिला मुलं नसण्यावर टोमणा मारून गेल्या, ते निराळंच. तिसरी मैत्रीण मोलकरणीच्या टोमण्यांनीच जास्त वैतागली होती. मोलकरीण ज्या बाकीच्या घरी काम करे, तिथली आणि हिच्या घराची सतत तुलना करत ही कशी बाकीच्यांहून गरीब आहे हे ऐकवत असे. तुमच्या घरात अमुक वस्तू कशी नाही किंवा असलेली वस्तू लहान वा कमी किमतीची आहे वगैरे बिनधास्त बोलून दाखवत असे. “तिच्या मुलांची शिकवणी मी मोफत घेते, त्याची कृतज्ञता दूरच; उलट बाकीच्या नोकरदार बायका कशा चांगल्या नोकऱ्या करतात आणि मी घरात शिकवण्या घेऊन तुलनेत कमी पैसे कमावते, यावर ही बाई कॉमेंट्स करते,” अशी तिची तक्रार. चौथीने लहान जुळ्या मुलांना सांभाळण्यासाठी घरात मदतनीस ठेवलेली, तीही त्या तरुण मुलीच्या सतत मोबाइलवर बोलणं, केव्हाही टीव्ही लावून बसणं, मोठा आहार आणि त्यातही मांसाहाराच्या मागण्या यांमुळे वैतागून गेलेली. पाचवीनं एका गंभीर शस्त्रक्रियेनंतर घरात मदतनीस ठेवलेली. ती विशीतली मुलगी भरपेट जेवून प्रचंड झोपा काढायची आणि अखेर सुनेला मदतीसाठी हाकारावं लागायचं, म्हणून ही वैतागलेली. या आसपासच्या घटना ऐकत असताना पुण्यात ‘चहा मागितला, तो दिला नाही’ म्हणून एका प्रौढ स्त्रीची एकोणीस वर्षांच्या मदतनीस तरुणाने अमानुष हत्या केल्याची बातमी वाचली. घरातल्या नोकरांनी, मोलकरणींनी वगैरे चोरी करून वृद्धांची हत्या केल्याच्या बातम्या तर अधूनमधून येत असतातच. पण या बातमीत तो तरुण बारा तासांची शिफ्ट करत होता आणि सतत खायला मागत असल्याने बाई वैतागलेल्या होत्या, असा उल्लेख वाचून अस्वस्थ वाटलं. अशा घटना घडल्या की, सहानुभूती मध्यम – उच्चमध्यम वर्गातल्या गृहिणींकडे वळते आणि नोकरवर्ग आरोपीच्या पिंजऱ्यात जातो, हे ठरलेलं असतं. कुठल्याही चोऱ्या वा अधिक गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या की, पोलीस आधी नोकरांकडे वळतात. ‘तलवार’ चित्रपटात असा नोकरांकडे डोळा वळतो, तेव्हा दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या तरुणाला कामचुकारपणाबद्दल रागावल्याने आलेल्या संतापातून हत्या झाली का, असाही एक संशय दिसतो. मालकांकडून नोकरांना मिळणारी वागणूक आणि नोकरांकडून मालकवर्गाला मिळणारी वागणूक याची जुनी गणितं आता उलटीपालटी झालेली आहेत. नोकरांना त्यांच्याच पायरीवर ठेवावं, नोकरांनी स्वत:हून आपली पायरी सांभाळून वागावं वगैरे म्हणताना बदलत्या सामाजिक परिस्थितीत, बदलत्या कुटुंबरचनेत नोकर मध्यमवर्गीय घरात ‘घरातली एक व्यक्ती’ बनू लागले आणि त्यातून अनेक नवे प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली. नोकरांनी सगळं काम ‘घरच्या सारखं’ करावं ही अपेक्षा करताना, त्यांना कुटुंबाचा सदस्य असल्यासारखी वागणूक आपण देतो का, याचा विचार बहुतेकांना करता येत नाही. तरुण मुलं-मुली घरात बारा तासांच्या शिफ्टमध्ये कामाला ठेवताना अनेक गोच्या असतात. घरातले प्रौढ वा वृद्ध यांच्या पथ्यपाण्याच्या मोजक्या सौम्य आहाराच्या सवयी आणि तरुण मुलांच्या आहाराच्या सवयी व क्वांटीटी यांत जमीनअस्मानाचा फरक असतो. आपण आपल्या सोयीसाठी, सेवेसाठी माणसं ठेवायची, तर त्यांची कामं ( म्हणजे त्यांच्या आहार, स्वच्छता, विश्रांती अशा प्राथमिक गरजा भागवणे ) आपणच करायचं तर काय फायदा; असाही प्रश्न काहींना पडतो. काही मोलकरणी सांगतात की, “आम्हीच घराची स्वच्छता राखतो, पण कधी गरजेनुसार लघवी – संडाससाठी या घरांमधील ‘आधुनिक टॉयलेट्स’ वापरण्याची परवानगी आम्हांला नसते.” चोऱ्या, छळ, हत्या हे गुन्हे आहेतच आणि गुन्हेगारांना शिक्षाही व्हायला हवी, यात दुमत नाहीच; पण दुसरीकडे आपलं काही कुठे चुकतंय का, हेही मालकवर्गाने पाहिलं पाहिजेच. किमान माणुसकीने नोकरांना वागवता येत नसेल आणि बारा तासांसाठी आपण घरात एखादं यंत्र आणलं आहे असं वाटत असेल, तर ते चुकीचंच आहे. अधिक शिक्षण, अधिक समज आपल्याकडे आहे, असा दावा असेल तर ते आपल्या वर्तनातूनही दिसायला पाहिजे. वृद्धाश्रम, केअर सेंटर्स, वृद्धांसाठी वेगळ्या खास वसाहती, दवाखाने, पाळणाघरे, खेळघरे या व्यवस्था आता संख्येनेही वाढताहेत आणि त्यांचा दर्जाही सुधारतोय; मात्र तिथंही ‘मदतनीस’ असतातच. तिथल्या चांगल्यावाईट हकीकती घरकामगारांहून निराळ्या नाहीत. या मदतनिसांची आर्थिक स्थिती, त्यांची कुटुंबं, अडचणी, प्राथमिक सुविधांच्या अभावातलं त्यांचं जगणं, परिस्थितीमुळे करावी लागलेली स्थलांतरं, जाहिरातींच्या माऱ्याने निर्माण होणारे मोह, वयाचे तकाजे व तगादे... एक ना दोन, अनेक मुद्दे आहेत. गरजा सगळ्यांच्याच आहेत; त्यामुळे आपण पैसे मोजून मनुष्यबळ विकत घेतो, सेवा विकत घेतो, म्हणजे आपण वरच्या स्तरातले असं समजणं अयोग्य ठरत चाललेलं आहे. घरात सीसी टीव्ही बसवणं वगैरे काळजी लोक घेऊ लागले आहेतच, पण मुळात माणसांना माणसासारखी वागणूक देणं ही काळजी त्याआधी घेतलेली बरी. कुठल्याही घटनेला अनेक बाजू असतात, त्यातली आपली आपल्याला – आपल्याच डोळ्यातल्या मुसळासारखी – न दिसणारी बाजू आता सर्वप्रथम पाहण्याची गरज आहे; हे या निमित्ताने ध्यानात घ्यायला हवं. संबंधित ब्लॉग चालू वर्तमानकाळ (26) : द आदिवासी विल नॉट डान्स चालू वर्तमानकाळ : 25 : कौमार्य चाचणीचा खेळ व पुरुषार्थ चाचणीचं दिव्य चालू वर्तमानकाळ (24) : पॅनिक बटण आणि इ–संवाद वगैरे चालू वर्तमानकाळ (23) : पितात सारे गोड हिवाळा? चालू वर्तमानकाळ २२. लहानग्या सेक्स डॉल हव्यात की नकोत? चालू वर्तमानकाळ (21) : आनंदाची गोष्ट चालू वर्तमानकाळ (20) : एका वर्षात अनेक वर्षं चालू वर्तमानकाळ (19) : रोशनी रोशनाई में डूबी न हो...  चालू वर्तमानकाळ (18) : मुखवटे घातलेल्या बातम्या चालू वर्तमानकाळ (17) : पशुपक्ष्यांत ऐसे नाही... चालू वर्तमानकाळ (16) : असं क्रौर्य कुणाच्याही वाट्याला येऊ नये! चालू वर्तमानकाळ (15) : दीपिकाचं नाक, रणवीरचे पाय आणि भन्साळीचं डोकं चालू वर्तमानकाळ (१४) : दुटप्पीपणाचं ‘न्यूड’ दर्शन चालू वर्तमानकाळ (13) : ‘रामायण’ आणि ‘सुहागरात’ व ‘रमणी रहस्य’   चालू वर्तमानकाळ (१२). लोभस : एक गाव – काही माणसं चालू वर्तमानकाळ (11) : सूट घातलेली बाई आणि वस्तुरुप नग्न नर चालू वर्तमानकाळ (10) दंशकाल : गूढ, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सांगड चालू वर्तमानकाळ (९) : बाईच्या थंडगार मांसाचे अजून काही तुकडे चालू वर्तमानकाळ (8) : बिनमहत्त्वाचे (?) प्रश्न आणि त्यांची हिंस्र उत्तरं चालू वर्तमानकाळ (7) : अरुण साधू : आपुलकीच्या उबदार अस्तराचं नातं चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात… चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील… चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची! चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब