कोरोनाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना त्यावरील जालीम उपाय असलेल्या 'लसीकरण' मोहिमेला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला असून हळूहळू लसीकरण करून घेणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. खरंतर हे चांगले चित्र आहे, सर्व सामन्यांना या आजरापासून वाचवणारे बहुतांश आरोग्य कर्मचारी लसीकरणसाठी बाहेर पडत आहेत. लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात विविध कारणामुळे लसीकरण धीम्या गतीने सुरू होते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली होती, ते लसीकरण मोहिमेला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित करत होते.


अशा पद्धतीचं वातावरण किंवा लसीकरण मोहिमेवर प्रश्न उपस्थित राहणं हे संपूर्ण व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. मात्र लसीकरणाच्या मोहिमेतील काही अटी-शर्ती शिथील केल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी उपस्थित राहून लस घेत आहेत. त्यामुळे लसीकरण मोहिमेला घेऊन सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. आरोग्य क्षेत्रातील लोकांच्या या सहभागामुळे सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा लसीकरण करून घेण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लसीकरण सुरू झाले असले तरी राज्यात दैनंदिन दोन-तीन हजाराने नवीन रुग्णांचे निदान होत आहे. तर काही प्रमाणात या आजाराने मृत्यू होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित वावर ठेवला पाहिजे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जे नियम आखून दिले आहेत त्याचे काटेकोर पालन केले पाहिजे.


राज्यात शुक्रवारी राज्यात आज 282 केंद्रांवर 21,610 (76%) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात सर्वात जास्त बीड जिल्ह्यात 151% लसीकरण झाले आहे, त्या पाठोपाठ हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले. आज सायंकाळी सात वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार, बुधवारी आणि आज झालेल्या सत्रांमध्ये आतापर्यंत एकूण 74 हजार जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात आज 318 जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे.


शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी : अकोला (205, 68%), अमरावती (557, 111%), बुलढाणा (256, 43%), वाशीम (298, 99%), यवतमाळ (500, 83%), औरंगाबाद (772, 77%), हिंगोली (234, 117%), जालना (436, 109%), परभणी (242, 61%), कोल्हापूर (763, 69%), रत्नागिरी (309, 62%), सांगली (545, 61%), सिंधुदूर्ग (115, 65%), बीड (757, 151%), लातूर (439, 73%), नांदेड (296, 59%), उस्मानाबाद (309, 103%), मुंबई (1361, 91%), मुंबई उपनगर (2030, 85%), भंडारा (263, 88%), चंद्रपूर ( 539, 90%), गडचिरोली (439, 98%), गोंदिया (259, 86%), नागपूर (1020, 85%), वर्धा (657, 110%), अहमदनगर (810, 68%), धुळे (370, 93%), जळगाव (543, 78%), नंदुरबार (304, 76%), नाशिक (916, 70%), पुणे (1275, 44%), सातारा (735, 82%), सोलापूर (584, 53%), पालघर (342, 86%), ठाणे (1805, 78%), रायगड (245, 61%)


लसीकरणाचा आकडा सुधारण्याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे लस घेण्यासाठी कोवीन या अँप वरून संदेश येण्याची वाट न पाहता आधी नाव नोंदणी करून ठेवली असेल आणि लस घेण्याची इच्छा असेल तर ते थेट लसीकरणाची सुविधा उपलब्ध असलेल्या केंद्रावर जाऊन लसीकरण करू घेऊ शकतात हा बदल केल्यामुळे लसीकरण वाढले आहे. अजूनही आरोग्य विभागला मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या मोहिमेला घेऊन जनजागृतीची गरज आहे. कारण सध्या तर पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना या लसीकरणाबाबत बऱ्यापैकी माहिती आहे. ज्यावेळी सर्व सामान्य लोकांचा लसीकरणासाठी क्रमांक येईल त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा निश्चितच फायदा होणार आहे.


अनेकांना लस आली म्हणजे कोरोनाचा कहर आता संपलं आहे असे वाटतं असेल तर हा त्यांचा शुद्ध गैरसमज आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने गुरुवारी २१ जानेवारी रोजी कोरोना बाधितांची जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यानुसार राज्यात एका दिवसात नवीन २,८८६ रुग्णांचे निदान झाले आहे, तर ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना काळातील राज्यातील आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखाच्या वर गेला असून २० लाख ८७८ इतका झाला असून, मृत्यूचा आकडा ५० हजार ६३४ इतका झाला असून, देशात महाराष्ट्राचा आकडा हा सर्वाधिक आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आजपर्यंत १९ लाख ०३ हजार ४०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सगळ्यात जास्त दैनंदिन आकडेवारी मध्ये मुंबई शहरातून सर्वात जास्त रुग्ण मिळत असून एकाच दिवशी ५२७ रुग्ण मिळाले असून १० व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ञांनी आणखी काही काळ मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन तसेच हात स्वच्छ धुणे हे करतच राहिले पाहिजे असे सांगितले आहे.


जानेवारी २१ ला, 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोना काळात ज्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक बाधित होत होते, अनेक जणांचे या आजरामुळे मृत्यू झाले होते. त्यावेळ नागरिकांमध्ये या आजराने जबरदस्त दहशत पसरवली होती. त्यावेळी प्रत्येक जण या आजरावरील लस कधी येणार असे प्रश्न विचारत होते. अनेक लस निर्मित करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ या कामी दिवस रात्र काम करत होते. देशातील डॉक्टरच नव्हे तर सर्वसाधारण व्यक्ती लसीची वाट बघत होते. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लस आली, आपातकालीन वापरासाठी परवानगीही मिळाली. लसीकरणाची मोहिमेचा मोठ्या थाटात शुभारंभ संपूर्ण देशात पार पडला. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने ठरले होते त्याप्रमाणे सुरूही झाले मात्र या लसीकरण मोहिमेला अपेक्षित हवा तसा प्रतिसाद पहिल्या टप्प्यात मिळत नसल्याचे दिसत आहे. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे महत्तव सामान्य लोकांना पटवून ती लोकांनी घ्यावी म्हणून प्रचार करणारी मंडळी या लसीकरणाबाबत एवढी उदासीनता का दाखवत आहे हा प्रश्न या ठिकणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. गेल्या पाच दिवसात देशात आणि राज्यात तीन दिवसात ५०-६८ टक्क्याच्या दरम्यान लसीकरण झाले आहे. आरोग्याची आणीबाणी असताना आणि कोरोनासारख्या भयंकर आजारा विरोधात ' लसीकरण ' मोहिमेला हवे तेवढं यश प्राप्त होताना दिसत नाही. आरोग्य कर्मचारी सुरक्षित असतील तर ते सामान्य जनतेला व्यवस्थित उपचार देऊ शकतील, कोरोनाच्या विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात असताना लसीकरण मोहिमेला यश मिळणे काळाची गरज असून येत्या काळात लसीकरण करून घेणाऱ्याच्या आकडयात चांगलीच भर पडेल आणि या मोहिमेला बळ मिळेल अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.


येत्या काळात लसीकरणाचा हा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवरील लोकांचा विश्वास वाढणार आहे. सगळ्यांनीच कोरोनाच्या विरोधातील ही लस घेतली पाहिजे असे वैद्यकीय क्षेत्रातील जानकरांनी आपले मत व्यक्त केले आहे. लसीकरण मोहिमेच्या व्यस्थापनात लसीकरणाची प्रक्रिया ही सोपी आणि सुलभ असावी तरच नागरिक त्याला प्रतिसाद देतील. जर लस घेण्यासाठी काही जटील आणि वेळखाऊपणाची प्रक्रिया असेल तर साहजिकच लोक लसीकरणापासून दूर राहणे पसंत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लसीकरणाच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद घडणे ही काळाची गरज आहे. तसेच लसीकरणाला घेऊन ज्या काही अफवा पसरवल्या जात आहे ते वेळीच थांबविण्याच्या कामात प्रशासनासोबत नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे.