Busan International Film Festival: ऑस्कर्स क्वालिफाइड बुसानचं जोरदार लाईनअप; इराणच्या माजिद माजिदीसहित अख्खं हॉलिवूड पहिल्यांदाच कोरियात

Busan International Film Festival: दक्षिण कोरियातल्या (South Korea) बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या (BIFF) मुख्य स्पर्धेचे लाईनअप जाहीर झालंय. चौदा फिल्म्सच्या यादीत जपानचा (Japan) नानाको हिरोसे (Nanako Hirose), इराणचा (Iran) माजिद माजिदी (Majid Majidi) आणि इंडोनेशियाचा योसेप आंगी नोएन या आशियाई नावाजलेल्या फिल्ममेकर्सच्या फिल्म्स आहेत. हे फिल्म फेस्टिव्हलचे 31वे वर्ष आहे.
इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनने BIFFचा समावेश 'अ दर्जा'च्या फेस्टिव्हलमध्ये केलाय. याचा अर्थ असा की बुसान आता ऑस्कर-क्वालिफाइड फिल्म फेस्टिव्हल झाले आहे. इथे जी बेस्ट फिल्म ठरेल, ती ऑस्कर्स पुरस्कारासाठी थेट क्वालिफाइड होईल. त्यामुळे इथल्या मुख्य स्पर्धेत वर्णी लागणे हे महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. याने कॅन, बर्लिन, व्हेनिस, सनडान्स आणि टोरंटो यासारख्या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्सच्या यादीत बुसान समाविष्ट झालाय. जाहीर झालेल्या लाईनअपवरून अतिशय मजबूत स्पर्धा असणार आहे, हे निश्चित.
बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आशियाई सिनेमांना प्राधान्य देते. मुख्य स्पर्धेतील यादी पाहता 14 आशियाई फिल्म्स आहेत. त्यातील 12 फिल्म्सचा वर्ल्ड प्रिमियर इथे होणारेय. यातील चार दिग्दर्शकांची पहिली फिल्म स्पर्धेत आलीय. तर चार महिला दिग्दर्शक आहेत. असा सर्वसमावेशक कार्यक्रम यंदा आहे. मुख्य स्पर्धेशिवाय व्हिजन एशिया आणि व्हिजन कोरिया या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये कोरिया आणि आशियाई देशांमधील 24 फिल्म्स दाखवण्यात येणारेत. यात भारतातील दोन फिल्म्स आहेत. अंजली पाटील मुख्य भूमिकेत असलेली दिग्दर्शक शैलेश रथनकुमारची सेल्वी (2026) आणि शशांक वालियाची बर्ड्स इन द डार्क (2026). या दोन्ही व्हिजन एशिया स्पर्धेत आहेत.
चिल्ड्रेन ऑफ हेवन (1997) फेम इराणचे दिग्दर्शक माजिद माजिदी पहिल्यांदा बुसानला येणारेय. यापूर्वी बर्लिन, व्हेनिस आणि कॅनसारख्या फेस्टिव्हल्समध्ये माजिदींच्या फिल्म्स गाजल्या आणि जिंकल्यत. ते पहिल्यांदाच इथे आपली फिल्म प्रेझेंट करणारेत. माजिदींच्या सिनेमाचे नाव मिडडे मील (2026) आहे. हा मानवी हक्क आणि इराणमधील रोजच्या जगण्याचा संघर्ष दाखवणारा सिनेमा आहे. शिवाय इंडोनेशियातील नव्या दमाचा दिग्दर्शक योसेप आंगी नोएन यांचा पॉलिटिकल ड्रामा द सी स्पीक्स हिज नेम (2026) हा तिथल्या राजकीय अस्वस्थ कालावधीतला सिनेमा आहे. यात इंडोनेशियातला शाहरुख खान समजला जाणारा रेझा राहादियन मुख्य भूमिकेत आहे. कोरियातील किम जोंग-क्वान यांचा द टेबल: डे अँड नाईट (2026) हा फेस्टिव्हलचा ओपनिंग सिनेमा आहे.
आता ऑस्कर-क्वालिफाइड झाल्याने बुसानमध्ये येणाऱ्या विशेष पाहुण्यांची संख्या वाढणार, हे आपोआपच होणारेय. फ्रान्समधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी कलाकार पियानो टीचर (2001) फेम इसाबेल ह्युपर्ट, गोल्डन ग्लोब अवॉर्ड विजेती आणि ऑस्कर-नॉमिनेटेड मॅगी गिलेनहाल, जपानचे आजच्या घडीचे सर्वात गाजलेले दिग्दर्शक हिरोकाझू कोरीएदा आणि क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन (2000) फेम मिशेल यो असे तगडे स्टार्स बुसानच्या रेड कार्पेटवर अवतरणारेत.
इंडोनेशियातील सर्वात गाजलेल्या अभिनेत्री क्रिस्टीन हाकिम यांच्या तीन फिल्म्स बुसानमध्ये दाखवण्यात येणार आहेत. यापैकी दोन फिल्म्सचा वर्ल्ड प्रिमियर होणार आहे, तर तिसरी स्पर्धेत नसली तरी विशेष स्क्रीनिंग असणारेय. हा योगायोग असला तरी एखाद्या आशियाई कलाकारासाठी हा एक मोठा सन्मान आहे.
ट्रेंडिंग न्यूज






















