BLOG : मागच्या आठवड्यात अजित पवारांचा बारामतीत दौरा झाला.. या दौऱ्यावर असताना अजित पवारांना एक तरुण निवेदन द्यायला गेला, त्यावेळी अजित पवारांनी तुम्ही मला मते दिली म्हणून तुम्ही माझे मालक झालात का? मला काय सालगडी समजता काय? असा सवाल विचारला. खरंतर हेच अजित पवार फार लांब नाही, अवघे दीड महिने आधी मतदारांना लोटांगण घालणेच बाकी राहिले होते. मला निवडून द्या, लोकसभेला साहेबांना साथ दिली, आता मला द्या.. अगदी एका सभेत तर अजित पवारांच्या डोळ्यातून देखील पाणीही आले.. मतदार राजा असतो अशा आशयाची विधाने देखील अजित पवारांनी केली.. अगदी मतदानाच्या दिवशी देखील अजित पवारांनी बारामती तालुक्यातील अनेक गावांचा दौरा केला..यावेळी अजित पवार भावनिक साद घालताना दिसत होते..

 

अर्थात अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत.. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेची पहिलीच निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत होता. अजित पवारांना निवडून येणे महत्त्वाचे वाटत होते.. अजित पवारांची ही अस्तित्वाची लढाई होती..  लोकसभेला झालेला पराभव अजित पवारांच्या समोर होता. अजित पवार त्यांचे उमेदवारांना निवडून द्या असं सांगत असतानाच अजित पवार निवडून येतील का नाही? हा प्रश्न होता. अनेक निवडणूक सर्वेक्षणात तसे दिसतही होते.  

 

त्यामुळेच अजित पवार राज्याच्या दौऱ्यावरती जात असताना सकाळच्या वेळी मात्र ते बारामती तालुक्याचा दौरा करत होते. बारामती तालुक्यातील तीन ते चार गावांना भेटी द्यायचे आणि मग अजित पवार राज्याच्या दौऱ्यावरती निघायचे. निवडणुकीचा प्रचार संपला. अजित पवार दुसऱ्या दिवशी बारामतीतील जिरायती भागामध्ये फिरत होते आणि मतदारांनी कौल द्यावा अशी आर्त साद अजित पवार मतदारांना घालत होते. 

 

अजित पवारांना मतदान झालं, तरी देखील शंका होती की, अजित पवार निवडून येतील की नाही. यंत्रणांचे रिपोर्ट अजित पवारांच्या विरोधात होते. बारामतीत अजित पवारांना भरघोस असे मतदान झाले. अजित पवार लाखाने निवडून आले.. निकाल लागला, त्यानंतर निवडणुकीआधी मृदू, संवेदनशील, संयमी झालेले हेच अजित पवार आता मतदारांना विचारतायेत की, तुम्ही आमचे मालक झालात का? 

 

अजित पवारच काय, राज्यातील अनेक नेते याच पद्धतीने वागत आहेत, कारण मतदान होण्याआधी मतदार राजा असतो. पण मतदार राजा हा निवडणुकीआधीच असतो. एकदा का निवडणूक झाली की, नेत्यांच्या लेखी त्याचा गुलाम कधी होतो हेच कळत नाही. पण अजित पवार हेच विसरत आहेत की, ज्या मतदारांच्या जीवावरती अजित पवार निवडून आले, त्याच मतदारांना अजित पवार मालक झाला का? म्हणतायत. तुम्ही काय मला सालगडी समजता का? असा देखील सवाल विचारतायत. 

 

परंतु अजित पवार विसरत आहेत की, मतदार हेच तुमचे मालक आहेत. त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून तुमची निवड केली.. म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री झालात.. म्हणजे मतदार हेच तुमचे मालक आहेत. आणि तुम्ही जनतेचे प्रतिनिधित्व करत आहात. जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी बसण्याची संधी दिली आहे. त्यामुळे तुम्ही जनतेला उत्तरदायी आहात. दादा आजपर्यंत तुम्ही अनेकदा भाषणात मतदारांना बोलत आलेला आहात. पण तुम्ही हे बोलताना कामे देखील मतदारांची केली आहेत यात शंका नाही. 

 

दादा, आता असं बोलणं तुम्हाला परवडणारे नाही, कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला मतदारांना पुन्हा राजाच म्हणावं लागेल. आणि त्यावेळी राजा हाच मालक असणारंय हे मात्र विसरून चालणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही हे विसराल, त्या दिवशी मात्र काय होईल ते माहीतच आहे..