BLOG : मागच्या ब्लॉगमध्ये म्हटल्याप्रमाणे आम्ही परभणीहून नांदेडला रवाना झालो. फार असा इंट्रेस्ट नव्हता पण प्रतापराव चिखलीकर वेळ देत होते म्हणून म्हटलं जाऊ. आम्ही येत असल्याची सुचना आम्ही आधीच आमच्या स्थानिक प्रतिनिधींना म्हणजे अभिषेक एकबोटेंना देऊन ठेवली होती. अभिषेकसुद्धा सतत आमच्या संपर्कात होता. या संपूर्ण दौऱ्यात आम्ही दिवसाला किमान 100 ते 150 किमीचा प्रवास करायचो त्यामुळे मुलाखत आम्ही राहत असलेल्या हॉटेलपासून 30 किमी रेंजच्या आतच ठेवायचो. आम्ही एकवेळेस थकलो तर चालायचं पण ड्रायव्हरदादांना थकून चालणार नव्हतं. मी अभिषेकला सुद्धा असंच ब्रिफ केलं होतं की प्रतापराव चिखलीकरांची मुलाखत हॉटेलपासून फार लांब न ठेवता 20 ते 25 किमीच्या रेंजमध्ये ठेव. अभिषेक म्हणाला "ओके". 


आम्ही परभणीहून सुमारे अकरा वाजता नांदेडच्या दिशेनं निघालो. जवळपास 75 किमीचं अंतर होतं पण शेवटचा 20 किमीचा टप्पा फार खतरनाक होता. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. बरं त्यात ऊन इतकं वाढलं होतं की काय सांगू? माझी झोप झाली नसल्याने मी बाईकवर न जाता कारमध्ये होतो. बाईक रियाजचाचांकडे होती.  नांदेडपासून 15 किमी दूर आम्ही गाडी थांबवली. सगळेच तहानलेले होते त्यामुळे मस्त उसाचा रस घ्यायचं ठरलं. एक छोटं दुकान होतं आणि तीन पिढ्या काम करत होत्या. 78 वर्षांचे आजोबा, त्यांचा लेक आणि त्यांचा नातू. त्यांनी गप्पा मारताना सांगितलं की ते 18 एकरवर ऊस लावतात आणि त्यातला 90% ऊस हा कारखान्याला जातो. आता उरेल्या 10% ऊसाचं करायचं काय तर काहीच दिवसांपूर्वी त्यांनी हे रसवंती गृह सुरु केलं.बरं, सुरुवातीला फक्त रस विकायचे पण आता चिप्स, पाणी, कोल्ड ड्रिंक्स पण ठेवू लागलेत. 


उसाचा रस घेतल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो. बाईक चालवून रियाजचाचा घामाघूम झाले होते. आम्ही कुठेही थांबलो तर आधी त्यांना कारमध्ये बसवायचो...AC मध्ये त्यांनाही जरा बरं वाटायचं..इथेही तसंच केलं. निघताना मात्र विनोद सरांनी पुन्हा बाईक घेतली आणि त्यांच्यासह सिद्धेश साईडकारमध्ये बसला. बूक केलेलं हॉटेल 15 किमीवर होतं त्यामुळे पुढच्या अर्ध्यातासात आम्ही हॉटेलवर पोहोचलो. बरोबर दीड वाजले होते.


हॉटेलच्या रिसेप्शनला आम्हाला अभिषेक भेटला. खुप धमाल, उत्साही आणि मदतीसाठी कधीच नाही न बोलणारा माणूस. त्याला घेऊनच वर रुममध्ये गेलो. ऊन खुप असल्यानं थकवा आला होता त्यामुळे सर्वांनी अंघोळ केली आणि जेवण ऑर्डर केलं. बरं, हे सगळं होईपर्यंत आम्ही सतत अभिषेकला विचारत होतो की बाबा मुलाखतीचं काय? वेळ काय आहे..? किती लांब आहे वगैरे वगैरे. या सगळ्यावर त्यांचं एकच उत्तर होतं की 25 ते 30 किमी जायचंय. चिखलीकर बीझी आहेत त्यांचा फोन आला की निघू. म्हटलं चालेल.


बरोबर तीनच्या ठोक्याला अभिषेकला चिखलीकरांचा फोन आला. फोनवर काही सेकंद बोलणं झालं आणि अभिषक ताडकन उभा राहिला आणि अचानक म्हणाला. "चला चला निघायचंय. लवकर चला उशीर होतोय.." म्हटलं दोन मिनिटांपूर्वी उशीर होत नव्हता. आता लगेच कसा काय होतोय. विनोद सर उठले आणि कपडे चेंज करायला लागले त्यांच्यापाठोपाठ मी सुद्धा उठलो. सिद्धेश आत अंघोळ करत होता. अभिषेक पुन्हा म्हणाला..."चला लवकर करा. लगेच निघायचंय. हे येतील. तू चल संकेत खाली. मी म्हटलं " आपल्या कॅमेरामॅन दादांनाही कळवा म्हटलं जाऊन पटकन."  अभिषेक धावतपळत गेला आणि तसाच माघारी आला. 


हा सगळा गोंधळ होतोय तो वर सिद्धेश बाहेर आला. त्याला गोंधळ का सुरु आहे हे समजल्यावर म्हणाला की आपण जेवण ऑर्डर केलंय...पैसे फुटक जातील 2 - 3 हजार रुपये...हे ऐकताच अभिषेक म्हणाला, "जेवण कॅन्सल करा. आपण बाहेर जेवण करु. तुम्ही व्हा तयार मी कॅनस्ल करायला सांगतो जेवण. " हे बोलणं सुरु असतानाच दारावर वेटर जेवण घेऊन आला...मी म्हटलं, "आलंच जेवण.." अभिषेक त्या वेटरकडे गेला आणि म्हणाला..."अभी कुछ नहीं खाना...वापस ले जा खाना..." तेवढ्यात विनोद सर म्हणाले की ,आलंय जेवण तर खाऊन घेऊ 5 मिनिटांत सभागृह असतं तर आम्ही साऱ्यांनी बाक वाजवून सरांना पाठिंबा दिला असता. सरांचं ते वाक्य म्हणजे. 'झिंदगी धूप तूम घना छाया'सारखं होतं.


आम्ही उभे राहून जेवलो आणि खाली गेलो..विनोद सर आणि अभिषेक बाईकवरुन पुढे गेले आणि आम्ही सगळे मागे कारमध्ये होतो. खरी धमाल आमच्यासोबत इथून सुरु झाली. आम्हा सांगितलं होतं की फक्त 25 किमी जायचंय त्यामुळे आम्ही रियाजचाचांना हॉटेलवर आराम करायला सांगितला. आम्हीच बाईक घेऊन बाहेर पडलो. नांदेड मार्केटच्या त्या गल्ल्यागल्ल्यांमधून वाट काढत अखेर आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. आम्ही निवांत होतो..कारण 30 किमी जायचं होतं पण काही वेळ गेला आणि जाणवलं की फक्त पुढे पुढे चाललोय...मॅपवर चेक केलं तर हॉटेलपासून आम्ही 39 किमी दूर आलो होतो. 25 च्या पुढे आणखी 14 किमी. सिद्धेशने पटकन अभिषेकला फोन लावला आणि विचारलं अजून किती लांब जायचंय..त्यांचं उत्तर फिक्स होतं...बस 10 मिनिटं...आम्ही नुसतं वाऱ्याच्या वेगाने पुढे जात होतो...शहर सोडून गावच्या रस्त्याला लागलो तरी थांबायची सोय नाही. हे कमीच होतं की काय आम्हालामध्ये एक टोल सुद्धा लागला. टोल लागताच आम्ही साऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं..सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता..."नेमकं चाललोय कुठे?"


खिडकीच्या बाहेर पाहिल तर सुर्यास्त जवळ आला होता. इतक्या लांब येऊन मुलाखत नाही घेता आली तर राडा. जसा जसा सुर्य खाली येत होता माझा BPवर जात होता. अखेर 2 तासांनी...ठीक साडेपाच वाजता आम्ही एका गावात थांबलो. वर बोर्ड पाहिला तर गावचं नाव होतं मुखेड...किती लांब आलोय हे पाहण्यासाठी तेच नाव मॅपवर टाकलं आणि अंतर पाहिलं. 71 किलोमीटर...कुठे 25 किमी आणि कुठे 71 किमी? दहा-दहा मिनिटं करत गडी आम्हाला 70 किमी दूर घेऊन आला. बाईक चालवून विनोद सर कंटाळले होते. त्यांचा इकता मूडऑफ झालेला मी पहिल्यांदा पाहिला. बाईक चालवण्यासाठी नेहमीच उत्सुक असायचे ते पण यावेळी मानसिक तयारी फक्त 25ची होती. त्यामुळे सगळेच इरिटेट झाले होते. पण त्यांनी आणि आम्ही या प्रवासाची मजा घेतली. नांदेड इकतं सुंदर असेल असं अजिबात वाटलं नव्हतं. नागमोडी वळणं, सपाट रस्ते आणि दोन्ही बाजूने नटलेला निसर्ग...निसर्ग नव्हे तर स्वर्गच!


असो, आम्ही पोहोचताच चिखलीकरांची भेट घेतली...ते मस्त नाश्ता करत बसले होते. त्यांच्यासोबत 3 - 4 आमदार सुद्धा होते आणि त्यातीलच एकाने मला चिखलीकरांच्या शेजारी बसवलं आणि सिद्धेशलाही म्हणाले बसा..पण खुर्चीच दिली नाही बसायला. यांचा भोंगळ कारभार पाहून मी आणि सिद्धेश एकमेकांकडे पाहतच बसलो. बाहेर लाईट जात होती..मी चिखलीकरांना सांगितलं की, "सर लवकर करा उशीर होतोय". तरी सुद्धा त्यांनी अणखी 15 मिनिटं घेतलीच. संध्याकाळी 6च्या दरम्यान मुलाखत सुरु झाली. मुखेडच्या गल्लीगल्लीत आम्ही त्यांना घेऊन फिरलो आणि 20 मिनिटांत अटोपतं घेतलं. मुलाखत तशी चांगली झाली पण निराश झालो होतो. चिखलीकरांना शुभेच्छा दिल्या आणि जरा 10 मिनिटं थांबलो. इतक्यात अभिषेक येऊन म्हणाला, "आपण आता वसंतराव चव्हाणांकडे जाऊ आणि कॉफी घेऊ". विनोद सर म्हणाले,"नको...70 किमी मागे जाऊन कॉफी नको...आपण इथून बाहेर पडू आणि चहा घेऊ". 


आम्ही मुखेडहून पुन्हा माघारी निघालो. विनोद सर म्हणाले, तुम्ही चालवा बाईक मी जाम थकलोय..सिद्धेशने माझ्याकडे पाहिलं...मी म्हटलं 50-50 करु. सिद्धेश ओके म्हणाला आणि पहिलं 35 किमीचं अंतर तो चालेवेल असं फिक्स झालं. मी मागे आणि विनोद सर साईडकारमध्ये बसले. गावच्या वेशीवर पेट्रोल भरलं आणि चहाची टपरी शोधत पुढे निघालो. दोन टपऱ्यांवर थांबलो पण चहाच नव्हता. 


अंधार पडलो होता. दोन्ही बाजूला जंगल आणि स्मशान शांतता. पुढे आमची कार आणि मागे आम्ही. रस्त्यावर अर्थात लाईट नव्हत त्यामुळे आम्ही कारच्या टेललाईवट अंदाज घ्यायचो. हाच अंदाज तुडवताना एक अविस्मर्णीय क्षण आम्ही अनुभवला. कार आणि आमच्यातलं अंतर 10 फुटांचं असेल त्यामुळे कारच्या विंडशील्डमधून आम्हा पुढचा रस्ता सूहज दिसत होता. अशात एक दृश्य आम्ही पाहिलं...कारच्या समोरून दोन हरणांनी रस्त्याच्या आरपार अशी उडी मारली. लहान असताना National Goegraphy वर पाहिलं होतं हे...नांदेडमध्ये पहिल्यांदा अनुभवलं. 


आता जंगल लागलं होतं त्यामुळे चहाची अपेक्षा आम्ही सोडलो होती पण विधात्याने नशिबात चहा लिहिला होता. 30 किलोमीटरनंतर का होईना आमची चहाची तहान भागली. दिवस खरचं डेंजर होता. चहाच्या ब्रेकनंतर मी बाईक चालवायला घेतली आणी सिद्धेश मागे बसला. विनोद सर कारमध्ये गेले आणि अभिषेक साईडकारमध्ये आला. अंधार तुडवत..शहर लागल्यावर ट्रॅफिक तुडवत आम्ही रात्री 8.30  वाजता हॉटेलवर पोहोचलो. येतायेता दिवसभर आमची शाळा करणाऱ्या अभिषेकची मी पण शाळा केली. तो साईडकारमध्ये बसला होता. मी बाईक थांबवली आणि सिद्धेशला म्हटलं साईडकारचा नट ढिला झालाय. सकाळी पहायला हवं. हे ऐकताच अभिषक माझ्याकडे बघतच बसला. मी म्हटलं..घाबरू नका! अभिषकचं व्यक्तीमत्व दिलखुलास...उत्साही...आणि त्याच उत्साहात त्याने आमची मदत केली. थोडा थकवा जाणवला पण त्याने केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही. 


आता हॉटेलवर येताच अभिषेकचा निरोप घेतला आणि रुममध्ये गेलो. जेवायला पुन्हा बाहेर जाण्याची इच्छा नव्हती त्यामुळे सगळ्यांसाठी व्हेज फ्राईड राईस सांगतला. जेवणही आलं..इतक्यात मला रियाजचाचांचा फोन आला...म्हणाले, "मेरे लिये ये राईस क्यु मंगाया?" "मी म्हटलं सबके लिये वहीं मंगयाला.." त्यावर ते म्हणाले की "मुझें पुछा नहीं.." आणि फोन ठेवला. दुसऱ्याक्षणी चाचा आमच्या रुमबाहेर आले आणि बाईकची चावी घेऊन गेले. त्यांना नॉनव्हेज खायचं होतं. आम्ही दिलं ही असतं...याधी देतही होतो रोज..स्वतःच्या बापासारखीच काळजी घेतली होती आम्ही पण हे हॉटेल व्हेज होतं त्यामुळे पर्याय नव्हता. 


आम्ही आमचं जेवण केलं आणि खाली फेरफटका मारायला गेलो. आम्हाला नांदेडच्या गुरुद्वाऱ्यात जायचं होतं पण हे आता जमणार नव्हतं त्यावरच आमची चर्चा सुरु होती. आम्ही 12 वाजता पुन्हा हॉटेलवर गेलो आणि झोपलो. सकाळी लोकांचे बाईट्स करुन बीडला निघायचं होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लवकर उठलो आणि लोकांचे बाईट्स घ्यायला बाहेर पडलो. तासभर फिरलो, लोकांसह गप्पा मारल्या आणि माघारी आलो. नांदेडचा दौऱ्या वाईंडअप केला आणि बीडला निघण्यासाठी तयार झालो...बाहेर पडताच रियाजचाचांनी मात्र आमच्यावर डाव टाकला. ते म्हणाले, "मी बीडला येणार नाही...मी मुंबईला जाणार.." आणि पुन्हा सुरु झाली आमची धावपळ...


पुढची कहाणी... भाग 10 मध्ये


याच लेखकाचा संबंधित ब्लॉग वाचा: