43, मीनाबाग… हा राजीव सातव यांचा दिल्लीत गेल्या दहा वर्षांपासूनचा पत्ता होता..अकबर रोडला ज्या ठिकाणी काँग्रेस मुख्यालय आहे, त्याच रस्त्यावर अगदी कोपऱ्यावरचं हे घरं… समोर उपराष्ट्रपती निवास, विज्ञान भवन. आम्हा मराठी पत्रकारासांठी 43 मीनाबाग हे अगदी हक्काचं ठिकाण होतं. हे घर अगदी साधं, दिल्लीतल्या बंगल्याचा प्रशस्त टुमदारपणा याला नव्हता. पण तरी सातवांचं या घराशी एक भावनिक नातं होतं. नेहमी बोलताना म्हणायचे की, हे घर मला सोडायचं नाहीये, माझ्यासाठी हे खूप लकी ठरलं आहे. युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदापासून ते  लोकसभा, राज्यसभा, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, गुजरातचे प्रभारी असा सगळा प्रवास अवघ्या दहा वर्षांत त्यांनी याच घरातून पाहिला होता. शिवाय काँग्रेस मुख्यालयापासून शेजारीच हे घर असल्यानं पक्षाच्या सच्च्या सेवकाला शोभेल अशीच ही व्यवस्था होती. पक्षाच्या कुठल्याही मोठ्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते हक्काचं घर म्हणून राजीवभाऊंच्या घराकडे एखादी चक्कर मारायचेच. घर डुप्लेक्स पद्धतीचं होतं. खालचा मजला राजीव भाऊंसाठी होता. खोल्याही दिल्लीच्या इतर बंगल्याप्रमाणे फार प्रशस्त नव्हत्या, पण तरी या बंगल्यात आलं की प्रसन्नता जाणवायची. कार्यमग्न, पक्षासाठी झपाटलेल्या कार्यकर्त्याच्या कामाचा पसारा तिथल्या चर्चेला उत्तम पार्श्वभूमी ठरायचा.


अशोक गहलोत राजस्थानचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याआधीच्या काळात गुजरातचे प्रभारी होते, संघटन महासचिव म्हणूनही काम पाहत होते. कुठल्याही गुप्त बैठकांसाठी त्यांचा सर्वात आवडीचं ठिकाण होतं, राजीव सातव यांचं दिल्लीतलं हे घर. अगदी हक्कानं ते इथं असायचे. राजीव सातव यांच्या गांधी घराण्याशी असलेल्या जवळकीची चर्चा होते, पण तितक्याच कुशलतेने त्यांनी मल्लिकार्जुन खरगे, अशोक गहलोत या ज्येष्ठ नेत्यांशीही संबंध प्रस्थापित केले होते ही बाब फार कमी लोकांना माहिती असेल.


राजीव सातव यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. खरंतर यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचं स्वप्न विद्यार्थी दशेत पाहत होते. तयारीही केली, पण ते पूर्ण न झाल्यानं आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची वाट धरली. पण त्यातही त्यांची वाटचाल अशी की, घराणेशाहीचा ठपका लावण्याची हिंमत कुणाला होऊ नये. कारण पंचायत समिती सदस्य म्हणून सुरुवात, मग जिल्हा परिषद, मग आमदार, राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष, नंतर राष्ट्रीय युवक काँग्रेस अध्यक्ष, लोकसभा, राज्यसभा अशा पायऱ्या चढत ते दिल्लीपर्यंत आले होते. राजकीय व्यवस्थेच्या सर्वच सभागृहांमध्ये आपण काम केलं आहे याचा अभिमान आहे असं त्यांच्या बोलण्यात नेहमी यायचं. सातव यांच्या दिल्लीतल्या कारकीर्दीची सुरुवात झाली 2010 मध्ये, जेव्हा ते राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनले. अवघ्या आठ-दहा वर्षांच्या काळात त्यांनी दिल्लीत असं काही स्थान निर्माण केलं होतं की, अत्यंत कमी वयातही हाय कमांडनं त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. अवघ्या 47 व्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या सर्वात महत्वाच्या वर्किंग कमिटीचे सदस्य होते. गुजरातसारख्या महत्वाच्या राज्याचे प्रभारी होते.


2014 मध्ये लोकसभेत खासदार म्हणून ते निवडून आले. 2019 ची लोकसभा निवडणूक स्थानिक समीकरणामुळे न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र मार्च 2020 मध्ये इतक्या कमी वयात हाय कमांडनं त्यांना राज्यसभेची संधी दिली. मागच्या वर्षी 12 मार्चला त्यांचं नाव जाहीर झालं होतं. त्यावेळी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी भेटलो, त्यावेळी आमच्या गप्पा सुरु असताना सोनिया गांधींचा आलेला मेसेज दाखवला होता. you should always trust Rahul, he suggested your name.


महाराष्ट्रातून येऊन दिल्लीत जम बनवणं फार कमी नेत्यांना शक्य होतं. त्यासाठी एकतर मराठीच्या कोषातून बाहेर पडण्याची तयारी, अमराठी वर्तुळात प्रचंड जनसंपर्काची मेहनत, इगो बाजूला ठेवून काम करण्याची तयारी हे गुण असावे लागतात. सातव या सगळ्या गोष्टींवर भर देत मेहनत करायचे.


युवक काँग्रेसच्या काळात अगदी आसामपासून ते दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटकपर्यंत त्यांनी युवा कार्यकर्ते हेरले होते. त्यांच्याशी सातत्यानं संपर्क ठेवून राष्ट्रीय राजकारणात आवश्यक असलेली जमीन ते तयार करत होते. सातवांच्या एकूणच राजकारणात एका प्रयत्नपूर्वक सगळं शिकणाऱ्या विद्यार्थ्याची मानसिकता होती. यूपीएससीचं स्वप्न पूर्ण झालं नसलं तरी त्याच शिस्तीनं, त्याच अभ्यासू वृत्तीनं ते राजकारणातली आपली वाटचाल करत होते. राजकीय विचारसरणीवर पूर्ण विश्वास, पक्षाशी एकनिष्ठता आणि पडेल ते काम करण्याची तयारी या जोरावरच त्यांनी हाय कमांडचा विश्वास प्रस्थापित केला होता. बरं त्यातही विशेष म्हणजे सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी.. तिघांच्याही गुड बुक्समध्ये असणारे लोक काँग्रेसमध्ये खूप कमी आहेत. राजीव सातव हे या दुर्मिळ कौशल्यगटातले एक होते.  एकाचवेळी जुन्या पिढीशी संपर्क, त्यांना मान देण्याचा मोठेपणा आणि दुसरीकडे युवा विचारसरणीची कार्यशैली असं संतुलन त्यांच्या स्वभावात होतं.


दिल्लीशी चांगले संबंध असले पाहिजेत हे आईच्या अनुभवावरुनच ठरवलं होतं असं एकदा गप्पांमध्ये ते म्हणाले होते. त्यांच्या आईला विधानपरिषदेवर संधी मिळाली. तेव्हा राज्यातल्या एका बड्या नेत्यानेच नाव सुचवल्याचं ते समजत होते. पण प्रत्यक्षात नरसिंहरावांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्या भेटायला आल्या नाहीत, नाहीतर त्यांना मंत्रीपदही मिळालं असतं, असं दिल्लीतल्या एका नेत्यानं  सांगितल्यावर सगळ्या परिस्थितीची उलगडा झाला असं ते म्हणाले होते.  


2014 ची लोकसभा निवडणूक लढताना त्यांना शरद पवारांची मदत झाली होती. त्यांच्या आई रजनी सातव काही काळ राष्ट्रवादीत होत्या. आवडता नेता कोण म्हटल्यावर शरद पवारांचं नाव घ्यायला ते कधी कचरले नाहीत, पण दुसरीकडे राहुल गांधींसोबत त्यांचं नातंही इतकं पक्कं की, त्यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घ्यायची कुणाची हिंमत नाही.


त्यांच्या निधनानंतर संजय राऊतही भावनिक होऊन प्रतिक्रिया देतात, सुप्रिया सुळे व्यथित होऊ आपला लहान भाऊ गमावल्याचं म्हणतात. यातच सातव यांनी पक्षाबाहेरचे संबंध कसे जोपासले होते याची कल्पना येते. लोकसभेत असतानाही सभागृहात त्यांची कामगिरी चोख होती. त्याचमुळे चारवेळा संसदररत्न पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये त्यांचं नाव असायचं. डिबेटमध्ये ते हिरीरीनं भाग घ्यायचे. कृषी कायदे मंजूर होत असताना राज्यसभेत जो अभूतपूर्व गोंधळ झाला, त्यात सरकारला धारेवर धरणाऱ्या खासदारांमध्ये राजीव सातव आघाडीवर होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ज्या 7 खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली होती, त्यात सातवही होते.


 हाय कमांडशी इतके घनिष्ठ संबंध असूनही त्याचा गर्व त्यांच्या बोलण्यात कधी दिसायचा नाही, या जवळकीचा त्यांनी कधीही गैरफायदा घेतला नाही.  हाय कमांडची मर्जी आहे म्हणून कधी उन्मत्तपणा नाही, उलट असं असतानाही त्यांच्या वागण्याबोलण्यातला सुसंस्कृतपणा ठळकपणे जाणवायचा.  कमी वयाच्या लोकांनाही आदरानं ‘जी’ संबोधन वापरायचे, घरी निरोप घेताना प्रत्येकवेळी अगदी गेटपर्यंत चालत यायचे, कुठलाही विषय समजून घेताना आपलं नेतेपण दूर ठेवून अभ्यासकाच्या भूमिकेत असायचे. काम पक्षाचं असो, खासदार म्हणून सभागृहातलं असो की संसदीय समितीचं...ते अत्यंत रस घेऊन प्रामाणिकपणे करण्यात समाधान मानायचे. राजकीय कारकीर्दही त्याचमुळे विद्यार्थ्याच्या शिस्तीप्रमाणे काटेकोर आखत आले होते. राष्ट्रीय राजकारणातला एक उभरता तारा म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. गेल्या आठ-दहा वर्षांच्या कष्टावर त्यांनी आवश्यक ती पार्श्वभूमी तयार केली होती. भविष्यात ते राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावतील असं अगदी स्पष्ट दिसत होतं. तो रोल काय असेल याबाबत अनेक चर्चा आता ऐकायला मिळतात. पण सातव यांनी एकदा माझ्यासोबत गप्पा मारताना राष्ट्रीय राजकारणातली आपली महत्त्वाकांक्षा काय आहे हे गुपित सांगितलं होतं. ‘केंद्रात संधी मिळाल्यानंतर संरक्षणमत्री व्हायला आवडेल. त्याचमुळे संसदेच्या डिफेन्स कमिटीच्या कामकाजात मी मनापासून भाग घेतो. आपला म्हणून एक अभ्यासाचा विषय तयार असला पाहिजे असं मी मानतो. शिवाय महाराष्ट्रातल्या यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी हे पद सांभाळलं आहे. त्याचा आदर्शही आहेच समोर,’ असं ते एकदा म्हणाले होते. इतकी त्यांची स्वत:च्या ध्येयांबाबत स्पष्टता होती. त्यासाठी मेहनतीची तयारी होती.  


राजीव सातव यांची माझी पहिली भेट 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारातली. महाराष्ट्रातल्या काही मोजक्या मतदारसंघात, तरुण चेहऱ्यांच्या लढती कव्हर करत होतो. राजीव सातव पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात होते, तेहा त्यांचं वय 40 होतं. ‘प्रचारातला एक दिवस’ अशी थीम असल्यानं दिवसभर त्यांच्यासोबत फिरत होतो. कळमनुरीतल्या त्यांच्या घरातून सकाळी बाहेर पडण्यापासून ते अगदी दिवसभरातल्या छोटयामोठ्या बैठका, कोपरा सभा, नरसी नामदेवाच्या मंदिरातलं दर्शन अशी सगळी लगबग होती. या निवडणुकीत अवघ्या 1500 मतांनी ते निवडून आले. आयुष्यात सगळीच खडतर आव्हानं ते पार पाडत आले होते. लोकसभेची निवडणूक अटीतटीनं जिंकले, गुजरातसारख्या सर्वात अवघड राज्याचं प्रभारीपद त्यांच्यावर सोपवण्यात आलं होतं. तिथंही ते निकरानं लढत होते. त्यामुळे कोरोनाविरोधातली ही लढाईही ते अटीतटीनं का होईल जिंकतील असं वाटत होतं. पण कोरोनापाठोपाठ इतर आजार बळावल्यानं त्यांची ही झुंज अपयशी ठरली.


राजीव सातव यांच्या जाण्यानं महाराष्ट्रानं राष्ट्रीय स्तरावरचं एक आशादायी स्वप्न हरवलं आहे. मोठ्या कष्टानं उभं राहिलेलं हे नेतृत्व आता भरारी मारण्याच्या तयारीत असतानाच  आपल्यातून निघून गेलंय. ही बाब स्वीकारणंही कठीण आहे. 43 मीनाबाग वरुन त्यांचा दिल्लीतला मुक्काम अवघ्या चार पाच महिन्यापूर्वीच महादेव रोडला हलवला होता. मंत्री झालो तरी हे घर बदलणार नाही इतक्या आपुलकीनं घरात गुंतलेले सातव घरच्यांनी, स्टाफनी आग्रह केल्यानंतर घर सोडायला तयार झाले होते. दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात जाता-येता सहज दिसणारं हे घर राजीवभाऊंच्या आठवणींमुळे कायम स्मरणात राहील, हृदयात कालवाकालव करत राहील.


कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचं कळल्यानंतर त्यांच्याशी झालेला फोनवरचा संवाद शेवटचा ठरला. लोधी गार्डनमध्ये संध्याकाळी वॉक करत राजकारणाच्या पलीकडच्या अनेक विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या. ‘लवकर बरे व्हा, आपल्याला पुन्हा लोधी गार्डनमध्ये वॉक करत खूप गप्पा करायच्या आहेत,’ असं म्हटल्यावर त्यांनी ‘नक्की, नक्की’ असं हसत म्हटलं होतं. पण नियतीच्या क्रूर खेळामुळे त्यांचा हा शब्द अधुराच राहिला. याच लोधी गार्डनमध्ये फिरताना ते एकदा म्हणाले होते, “प्रशांतजी या लोधी गार्डनमधली अनेक सम्राटांची इतकी जुनी थडगी आणि त्यांची अवस्था पाहिल्यानंतर मला सतत प्रश्न पडतो की आयुष्याचं सार नेमकं कशात आहे? माणूस गेल्यानंतर नेमकं काय उरतं?  कशाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणं हेच खरं.” आज सातव यांचे हे शब्द सतत कानावर आकाशवाणीसारखे घुमतायत.