जोधपूरहून निघालेली ट्रेन वाळवंटी प्रदेश मागे सोडून आता हिरव्यागार अरवली पर्वतरांगेत प्रवेश करत होती. कुठे मैलो न् मैल पसरलेलं रखरखीत वाळवंट तर कुठे भव्य पहाड,  कुठे पाण्याचे भव्य तलाव.... किती वैविध्य आहे राजस्थानच्या भूमीत. आज पुष्करला आपण जातोय. राजस्थानला येणारा पर्यटक हा राजवाडे, महाल, किल्ले बघण्यासाठी येत असतो. पण यापैकी काहीही नसलेलं हे  छोटसं  पुष्कर आपलं अस्तित्व टिकवून आहे ते इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेमुळे. पुष्करला जाण्यासाठी ट्रेन्स फार कमी आहेत. त्यामुळे मला अजमेरहून पुष्करला वेगळ्या  वाहनानं जावं लागणार होतं. दुपारी साडे बारा वाजता अजमेर स्टेशनला पोहोचलो. तिथून रिक्षाने बस स्टॉप गाठला. इथून पुष्करसाठी खूप गाड्या असतात. एक गाडी लागलेलीच होती.  पण गर्दी प्रचंड होती. काय करावं,  हा विचार करत मी तसाच आत घुसलो. पाठीवर मोठी बॅग,  हातात कॅमेऱ्याची बॅग आणि आणखी एक छोटी बॅग घेऊन मी कसातरी घुसलो होतो खरा;  पण बसमध्ये  पाय ठेवायलाही जागा नव्हती. अजमेरहून पुष्करपर्यंत फक्त 13 किमीचा प्रवास होता. पुढच्या पाच मिनटांत मी बॅग वर टाकून कोपऱ्यात उभं राहण्यासाठी कशीबशी  जागा मिळवली. आता इतक्या वर्षांच्या मुंबई लोकलचा अनुभव इथे कामी आला. एव्हढ्यात  बोलता बोलता कळलं, की आज गुरूपौर्णिमा आहे. म्हणूनच बसमध्ये एवढी गर्दी होती. मलाही बरं वाटलं.  चांगल्या मुहूर्तावर आपण अशा तीर्थक्षेत्राला जातोय. काही मिनिटांत बस शहराच्या बाहेर पडली आणि डोंगरातून नागमोडी वळणांवरून धावू लागली. डोंगरावरून पुष्करचा तलाव आणि त्याबाजूचं छोटसं शहर स्पष्ट दिसतं. खिडकीतून वाकून वाकून मी बघत होतो. तेवढ्यात कंडक्टर तिकिट तिकिट करत आला. आपल्याकडे कंडक्टर आणि ड्रायव्हर खाकी गणवेषात असतात.  राजस्थानमध्ये मात्र त्यांना कुठलाही गणवेश नसतो. अजमेर ते पुष्कर बसचं तिकिट फक्त 20 रुपये आहेे. अजमेर आणि पुष्कर या दोन शहरांच्या मध्ये हा अरवलीचा नाग पर्वत आहे.  याचं वैशिष्ट्य बघा, याच्या एका बाजूला अजमेर शरीफ दर्गा आहे.  जगभरातल्या मुस्लिम बांधवांचं हे श्रद्धास्थान! तर दुसऱ्या बाजूला आहे, हिंदूंचं पवित्र तीर्थक्षेत्र बह्मराज पुष्कर.  अरवलीचा हा नाग पर्वत या दोन संस्कृती आणि दोन धर्मांना असा  घट्ट धरुन उभा आहे.
बस स्टॉपवर उतरल्यावर तर  सण असल्याचा फील येतो ना अगदी तसंच माझं  झालं. गुरुपौर्णिमा असल्याने गर्दीच गर्दी होती. या गर्दीत राजस्थानच्या ग्रामीण भागातून आलेले भाविक जास्त होते. पुष्करमध्ये राहण्यासाठी मोठमोठी हॉटेल्स, हॉस्टेल्स,  डॉर्मिटरीज् उपलब्ध आहेत. मी ज्या हॉस्टेलमध्ये थांबणार होतो ते अगदी पुष्कर तलावाच्या समोरच होतं. मी नेहमी प्रमाणे मस्त चालत निघालो. मोठ्ठाले किल्ले, राजेशाही महाल बघून आल्यावर या शहराचं वेगळेपण पावलोपावली जाणवत होतं. खरंच सुंदर शहर आहे पुष्कर. तीन बाजूंना  पर्वतरांगा,  एका बाजूला थरचं वाळवंट! इथे दरवर्षी कार्तिक महिन्यात पुष्कर उंट मेला (पुष्करची उंट यात्रा) भरतो. गारेगार हवा, छोट्या छोट्या गल्ल्या, निवांत किंबहुना जरा आळसावलेलेच वाटतील असे इथले सर्वसामान्य लोक, कपाळावर मोठं भस्म लावलेले अनेक संप्रदायांचे साधू आपल्याला पुष्करच्या गल्ल्यांमध्ये दिसतात.
या सगळ्या साधूंची नजर असते परदेशी पर्यटकांवर. परदेशी पर्यटकही या साधूंसोबत राहतात.  हे साधू यांना किती ज्ञान देत असतील, कुणाला माहित! पण घाटावर बसून एकत्र सुट्टा मारण्याची मजा ते एकत्र बसून घेतात. पण तरीही एक नक्की... "कुछ तो खास है यहां की हवामें..!"  युरोप अमेरिकेतले लोक उगीच इथे महिनोन्महिने इथे राहत नाहीत. हॉस्टेलवर पोहोचल्यावर मी ज्या रूममध्ये राहणार होतो,  तिथे आधीच एक परदेशी मुलगा आला होता. त्याला हाय..हॅलो म्हटलं आणिक  आवरुन बाहेर पडलो. समोरच पुष्करचा तलाव आणि त्याच्या 52 घाटांवर जिकडे पाहावं तिकडे गर्दीच गर्दी. इथलं पाणी गंगेसमान पवित्र मानलं जातं. तलावात डुबकी मारली, की पापं नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मी कधी पापं केलीच नाहीत त्यामुळे डुबकी मारण्याचा प्रश्नच नव्हता. असो.
हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांमध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर असणारं पुष्कर हे एकमात्र ठिकाण आहे. पद्मपुराणातल्या वर्णनानुसार ब्रह्मदेवानं इथे येऊन यज्ञ केला. एका आख्यायिकेनुसार ब्रह्मदेवाच्या कमलपुष्पातून एक पाकळी खाली पडली,  तिथे हा तलाव निर्माण झाला. एकूणच इथला माहौल कुंभमेळ्यासारखा असतो. प्रयागला जसं 'तीर्थराज' म्हटलं जातं,  तसंच पुष्करला 'पुष्करराज' नावानंही ओळखलं जातं. रामायणातही पुष्करचा उल्लेख आहे. विश्वामित्र इथेच तपश्चर्येला बसलेले असताना मेनकेनं त्यांची तपस्या भंग केली होती. अशा अनेक कथा या तलावाबाबत ऐकायला मिळतात. बुद्ध स्तुप आणि चंद्रगुप्ताच्या मुद्रांवरही पुष्करचा उल्लेख आढळतो. आता जाऊयात  ब्रह्मदेवाच्या एकमेव मंदिरात. तसं ब्रह्माचं एक मंदिर इंडोनेशियात असल्याचं वाचलं होतं. पण भारतीयांसाठी हेच एकमेव ब्रह्माचं मंदिर आहे. पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे  जगतकल्याणासाठी ब्रह्मानं यज्ञ करायचं ठरवलं. त्यासाठी ते पुष्करला आले; पण काही कारणांमुळे त्यांची पत्नी सावित्री वेळेवर पोहोचू शकली नाही. यज्ञ पूर्ण करण्यासाठी तर पत्नी उपस्थित असणं,  आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी गुर्जर समाजातील गायत्री देवी यांच्याशी विवाह केला. पण थोड्याच वेळात तिथे सावित्री देवी पोहोचल्या. झालेला प्रकार कळल्यानंतर त्या प्रचंड संतापल्या आणि त्या रागातच त्यांनी ब्रह्मदेवाला शाप दिला,  की "देवता असूनही तुमची पुष्कर वगळता कुठेही पूजा होणार नाही. जो कोणी तुमचं मंदिर बांधण्याचा प्रयत्न करेल त्याचा सर्वनाश होईल." ब्रह्माचं पुष्करमध्ये एकमेव मंदिर  असण्यामागे ही एक आख्यायिका!  बायकोच्या रागापासून देवही सुटले नाही हेच खरं..
ब्रह्माच्या मंदिरामागेच उंच पहाडावर त्यांच्या पत्नी सावित्री यांचंही मंदिर आहे. पण त्यासाठी अनेक पायऱ्या चढण्याची तयारी असेल तरच जावं. काशी मथुरेच्या घाटांप्रमाणे पुष्कर फिरण्याची एक वेगळीच मजा आहे. भारताच्या विविधतेचे सगळे रंग जणू या पहाडांच्यामध्ये येऊन स्थिरावलेत. कुठे  टोपलीतला साप बाहेर काढून खेळ दाखवणारे गारुडी.
तर कुठे दीन चेहरा करून बसलेले भिकारी दिसतात. घाटावरच्या श्राद्धाच्या पिंडाला शिवण्यासाठी कावळ्यांचे जत्थे तर तयारच असतात. आपल्या लौकिक परलौकिक इच्छांची पूर्ती करणाऱ्या गायी पुष्करच्या रस्त्यावर शांत बसून असतात. इतक्या सगळ्या धार्मिक विधींचा प्रसाद या गायींच्याच पोटात जाणार असतो.
पुष्करमध्ये फिरण्यासाठी काही प्लॅन करण्याची गरज नाही. सगळं एकमेकांना जोडलेलं आहे. पुष्कर सरोवराच्या बाजूलाच शहरात किमान 500 मंदिरं आहेत. औरंगजेबानं या शहरातली अनेक मंदिरं उध्वस्त केली. तरीही आजही पुष्करच्या कुठल्याही गल्लीबोळात गेलात तरी तुम्हाला मंदिर दिसणारंच. त्या सगळ्यांचा इथे उल्लेख करणं आणि त्यांच्याबद्दल लिहिणं अशक्य आहे. पण राम लक्ष्मण मंदिर हे त्यातल्या त्यात खास आहे. कारण राम मंदिर आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळतं. पण राम लक्ष्मणाचं मंदिर क्वचितच आढळतं. लग्न झालेल्या जोडप्याचं देवदर्शन असो, की एखाद्याचं श्राद्ध. सगळे विधी पुष्करमध्ये नेमानं होतात. ब्रह्म मंदिर आणि सरोवराच्या घाटांवरून आता मार्केटमध्ये जाऊया. पुष्करचं मार्केटही इथल्या संस्कृतीसारखं रंगीत आहे. राजस्थानी कलाकुसरीच्या सगळ्या वस्तू... विशेष म्हणजे उंटाच्या चामड्याच्या बॅग्ज, शूज्, पर्स इथे मिळतात. फक्त खिसा थोडा गरम ठेवावा लागतो.
मार्केट फिरल्यावर पुन्हा संध्याकाळी घाटावर आलो.  एका झाडाखाली देवीची मूर्ती होती. तिथे काही परदेशी लोकांसह एक आजोबा नगारा वादन करत होते.  त्यांचा हा नित्यक्रम असल्याचं कळलं. थोड्यावेळाने अंधार पडला, त्यावेळी घाटावर आरती सुरू झाली. मोठाल्या निरंजनांनी ब्रह्म घाट उजळून निघाला.
घाटाच्या पलीकडच्या बाजूला पंजाबी बांधवांचा गुरुद्वारा आहे. गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या पुष्कर भेटीचं प्रतिक म्हणजे हा गुरुद्वारा. गोड पंजाबी भजनं ऐकून मन शांत झालं. तिथेच लंगरमध्ये प्रसादरुपी जेवणाचा आस्वाद घेतला. गुरुद्वारातून बाहेर पडल्यावर मी हॉस्टेलकडे निघालो. आता दुकानांची आवराआवर चालू होती. पुष्करमध्ये मिठाईची दुकानंही खूप आहेत आणि त्यात मोठ्या आवडीनं खाल्ला जातो, तो इथला मालपुआ.. भल्या मोठ्या कढईतल्या पाकात मालपुआ ठेवलेला असतो. मुंबईतला मालपुआ तुटता तुटत नाही. इथला मात्र तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतोच.
रात्री 9 च्या सुमारास मी हॉस्टेलवर आलो. माझा परदेशी रुममेटही होताच.  तो नेमक्या कोणत्या देशातला होता ते मला आठवत नाही. युरोपातला होता एवढं नक्की. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर मी त्याला आपला पर्मनंट प्रश्न विचारला. कसा आहे इंडिया? वगैरे. त्यावर त्यानं फारच प्रामाणिक उत्तर दिलं. "इंडियात लोकांना गोऱ्या लोकांचं इतकं का आकर्षण आहे कळत नाही. आम्ही खूप सारे पैसे खर्च करून इथे येतो. पण लोक धड रस्त्यावरुन चालूही देत नाही. मध्येच आमच्यासोबत सेल्फी घेतात.  आम्हाला एखाद्या ठिकाणी  शांत बसायचं असेल, तर तिथेही एकांत मिळत नाही. बाकी लोकांचा तसा फार वाईट अनुभव नाही; पण काही वेळा लूटमार करण्याचाही प्रयत्न होतो." तो हे जे सांगत होता,  त्याच्याशी मी सहमत होतो. इथल्या ट्रॅफिकविषयीही तो मस्त बोलला.  "सिग्नल आहे.  पोलीस उभा आहे. तरीसुद्धा लोक हॉर्न का वाजवतात?" असा प्रश्न त्याचा प्रश्न होता. त्याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. युरोपात असं  काही केलं,  तर थेट लायसन्स काढून घेतात म्हणे.इथलं तिखट जेवण आणि जेवणाचे प्रकार मात्र त्याला खूप आवडले. आमचं बोलणं सुरू असतानाच त्याला भिंतीवर पाल दिसली. मिनी क्रोकडाईल..असं  म्हणत त्याने ती हातात पकडली. ते बघून एखादी भारतीय मुलगी किती जोरात किंचाळली असती विचार करा. मी मात्र त्याचा फोटो काढला. त्याने नंतर ती पाल खिडकीतून बाहेर सोडली.
आता मी माझ्या या विदेशी मित्राला गुड नाईट म्हटलं आणि  झोपायची तयारी केली. कारण उद्या निघायचंय, राजधानी जयपूरला.. शुभ रात्री. आजचा खर्च जोधपूर ते अजमेर ट्रेन तिकिट - 105 रु. अजमेर ते पुष्कर रिक्षा आणि बस तिकिट - 50 रु. दुपारचं जेवण 120 रु. हॉस्टेल खर्च - 210 रु. स्नॅक्स आणि इतर खर्च 100 रु. हॉस्टेल खर्च - 210 रु. -------------- एकूण खर्च -790 रु. तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच.. हे ही वाचा

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जोधपूर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर भाग दोन

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक 

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : माऊंट अबू

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर

राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : चित्तोडगड