सकाळी ५ वाजताची माऊंट अबूची बस पकडण्यासाठी मी ४.३० वाजताच हॉस्टेल सोडलं. चौकात जगदीश मंदिरासमोर दोन पोलीस कॉन्स्टेबल वगळता एकही रिक्षावाला नव्हता. मुंबईची सवय असल्यानं साडे चार वाजता भरपूर लोक आणि रिक्षावाले असतील असं मला वाटलं होतं. पण इथे तर  सारं उदयपूर शांत झोपलं होतं.  मी वेळ न घालवता गूगल मॅपवर डेस्टिनेशन सेट करून सरळ चालत जाण्याचा निर्णय घेतला. जेमतेम १०० मीटर गेलो असेन, तोच सात आठ कुत्र्यांनी माझ्यावर भुंकायला सुरूवात केली. मला प्रचंड भीती वाटली. पण  मी प्रतिकार केला असता तर कुत्र्यांनी माझे काय हाल केले असतं, याची मनोमन  कल्पना करून त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता मी तसाच चालत राहिलो. चौक पार केल्यावर ती शांत झाली. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो अन् वाटू लागलं की आता पाचची बस पकडणं मुश्किल आहे. तेवढ्यात मागून दोन टू व्हीलर आल्या. मी हात दाखवला तसे  ते दोघेही थांबले. एकाने मला ट्रीपल सीट बसवून पाच मिनटांत बस स्टँडवर सोडलं. माझी बस निघायच्या तयारीतच होती. मी पटकन सीट पकडली आणि सुरू झाला उदयपूर ते माऊंट अबू प्रवास... उदयपूर ते माऊंट अबू हे १६० किमीचं अंतर.. बसने साधारण तीन ते चार तास लागतात. या प्रवासात किमान पाच वेळा टोल द्यावा लागतो. अरवलीच्या पर्वतरांगांमधून बस सुसाट सुटली. भव्य पहाड फोडून बनवलेले ते रस्ते बघून क्षणभर आपल्या खंडाळ्याच्या घाटाचीच आठवण झाली. अबू रोड स्टेशनपासून  पहाडाच्या वर म्हणजे माऊंट अबूला जाण्यासाठी बस वळली. हा पर्वत कसा निर्माण झाला त्याबद्दल पद्म पुराणात कथा आहे..
समुद्र मंथनातून कामधेनू गाय उत्पन्न झाली आणि ती गाय थेट याच दरीमध्ये कोसळली. इथेच वसिष्ठ ऋषींची झोपडी होती.  ही गोष्ट कळल्यावर त्यांनी शंकराची आराधना केली. शंकराने सरस्वती नदीला (जी पाताळात वाहते) भूमीवर बोलावून या दरीचं पात्र भरलं. त्यावर कामधेनू तरंगत वर आली. पण यापुढे या दरीमध्ये कोणीही पडू नये यासाठी वसिष्ठ ऋषींनी हिमालयाची आराधना केली. त्यावेळी हिमालय आणि सर्पदेव अर्बुदा यांच्या मदतीनं एक पर्वत इथे आणण्यात आला. तेव्हापासून या पर्वताला अर्बुदांचल आणि या परिसराला अर्बुदारण्य असं नाव पडलं. तेच आजचं माऊंट अबू!
हिरव्यागार डोंगरामधून वळणावळणाच्या रस्त्याने माऊंट अबूला पोहोचलो. इथे पोहोचताच अनेक लोक तुम्हाला गराडा घालतात.  कोणी हॉटेलसाठी विनवणी करतं, कोणी माऊंट अबू फिरण्यासाठी कार बुक करणार का,  वगैरे विचारत तुमचा पिच्छा पुरवतात. तुम्हाला कारनं फिरायचं असल्यास किमान हजार रुपये हे कारवाले घेतात. आपण अशावेळी सरळ  राजस्थान टुरिझमच्या अबूदर्शनचं तिकिट काढायचं. फक्त १२५ रुपयांत सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ते ६५ किलोमीटर वर पहाडापर्यंतचे ७ पॉइंट्स ही बस  फिरवते.  बसमध्ये त्यांचा गाईडसुद्धा असतो. मी आणि माझ्यासारखे २५ ते ३० जण या बसमध्ये बसलो आणि सुरू झालं - अबू दर्शन! काही वेळातच आमची बस निलगिरी पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचली. या पर्वताच्या टोकावर अर्बुदा देवीचं मंदिर आहे. या देवीच्या नावावरूनच या पर्वताला माऊंट अबू नाव पडलं.. या देवीला अम्बिका देवी आणि अधर देवी या नावानंही ओळखलं जातं.  साडेतीनशे पायऱ्या चढून आपण  मंदिरात येतो. एका गुहेतच हे मंदिर असून याची स्थापना पाच हजार वर्षांआधी झाल्याचं सांगतात. ५१ शक्तीपिठांपैकी हे एक शक्तीपीठ मानलं जातं.
अर्बुदा देवी : (फोटो सौ. फेसबुक) तासाभरात आम्ही पुढे निघालो. आमच्या बसमध्ये अगदी पाच वर्षांच्या मुलापासून ते ७० वर्षांच्या वृद्धापर्यंत पर्यटक होते. त्यामुळे त्यांना नीट खाली उतरवून परत गाडीत बसवण्यात ड्रायव्हर आणि गाईडचा बराच वेळ जायचा.  अशा बसेसचा हा थोडासा तोटा असतो खरा... पण या प्रवासात मी सोलो ट्रॅव्हलर नव्हतो. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागत होतं. आता आम्ही ब्रह्मकुमारी विश्वशांती केंद्राकडे निघालो.  गाईड या केंद्राबद्दल माहिती सांगत होता. आत गेल्यावर तुम्हाला खूप मोठं लेक्चर देतील. इथे किती वेळ थांबायचं, ते  तुम्हीच ठरवा. कारण आपल्याला पुढे अजून बरंच फिरायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी १५ मिनिटांत परत या,  असं गाईडनं स्पष्ट  सांगितलं.बहुधा, हा  त्याचा आधीचा  अनुभव बोलत असावा. आम्ही विश्वशांती केंद्रात गेलो. बाहेर दरवाज्याजवळच एका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या व्यक्तीनं या केंद्राच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. दादा लेखराज कृपलानी यांनी १९३० साली,  आताच्या पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ओम मंडलीची स्थापना केली. फाळणीनंतर १९५० साली ओम मंडलीचं मुख्यालय सिंध प्रांतातून माऊंट अबूमध्ये आलं. १९६९ मध्ये दादा लेखराज कृपलानी यांचं निधन झालं. मात्र त्यानंतरही या संस्थेचा प्रसार देश विदेशात झपाट्यानं होतोय. एकाच वेळी तीन हजार लोक ध्यानधारणेला बसू शकतील, असा एक मोठा हॉल इथे आहे. विशेष म्हणजे या  हॉलला एकही खांब नाही.
येणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारे अनेक अनुयायी याठिकाणी असतात. कलियुगाचा लवकरच अंत होणार असून दुसऱ्या युगाचा लवकरच प्रारंभ होणार आहे,  वगैरे ते सांगत होते. ते मला फारसं काही पटलं नाही. पण इथे सुंदर शांतता होती. त्यामुळे अजून थोडं थांबावंस वाटत होतं.... बराच वेळ झाल्यानं आम्ही तिथून निघालो. बसच्या गाईडने १५ मिनिटांत परत यायला सांंगितलं होतं खरं पण प्रत्यक्षात बाहेर पडायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागला.  गाईडने सगळ्यांना सक्त ताकीदच दिली... वातावरण पावसाळी आहे त्यामुळे लवकर फिरून घ्या.. "मुंबई का फॅशन और माऊंट अबू का मौसम कब बदल जाएं पता नही चलता।" एकाच ठिकाणी अडकून पडू नका - असं त्याला सुचवायचं होतं. दुपारचा दीड वाजत आला. आता आमची बस सुप्रसिद्ध दिलवाडा मंदिराकडे निघाली..
दिलवाडा मंदिर प्राचीन भारताच्या स्थापत्य कलेचं आश्चर्यजनक उदाहरण आहे. मंदिराचं सौंदर्य फक्त नजरेत सामावून घ्यावं, असं. दिलवाडा मंदिराची निर्मिती ११व्या आणि १३व्या शतकात झाली. पूर्णत: संगमरवरी मंदिरातलं कोरीवकाम तर अद्भूत आहे.
इथली पाचही मंदिरं जैन धर्मातील तिर्थंकरांना समर्पित आहेत.. पहिलं जैन तिर्थंकर ऋषभदेव यांचं विमल वसही मंदिर. या मंदिरातल्या मूर्तीचे डोळे हिऱ्यांनी बनलेले आहेत.. दुसरं २२ वे जैन तिर्थंकर नेमीनाथ यांचं लून वसही मंदिर तिसरं पुन्हा पहिले जैन तिर्थंकर ऋषभदेव यांचं पितलहर मंदिर. ऋषभदेवाच्या मूर्तीचं वजन ४ हजार किलोग्रॅम आहे. २३ वे तिर्थंकर पार्श्वनाथ यांचं पार्श्वनाथ मंदिर चौथं मंदिर. आणि पाचवं, अंतीम जैन तिर्थंकर  महावीर यांंचं! हे  सगळ्यात छोटं मंदिर. मात्र याची बांधणी अप्रतिम आहे..
या मंदिर उभारणीत दीड हजार शिल्पकार आणि १२०० कामगारांची मेहनत कामी आली आहे. त्याकाळी यासाठी १८ कोटी रुपयांचा खर्च आला होता. दिलवाडा मंदिरातून बाहेर पडताना ताजमहाल पाहिल्यासारखा अनुभव आला. मंदिराच्या बाहेर आलो. एव्हाना भूक बोलू लागली. आम्ही शेजारच्या भोजनालात जेवायला गेलो . माऊंट अबू आणि एकूणच सिरोही जिल्ह्यात मला एक गोष्ट  प्रकर्षानं जाणवली,  ती म्हणजे इथल्या खाद्यसंस्कृतीवर राजस्थानपेक्षा गुजराती पद्धतीचा जास्त पगडा आहे. इथे राजस्थानी जेवणापेक्षा गुजराती जेवणाचे रेस्टॉरंट्स अधिक आहेत. प्रवासात त्रास नको म्हणून मी गुजराती दाल खिचडी आणि कढी खाणं पसंत केलं.. दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसून अचलगडाकडे प्रस्थान ठेवलं.. दिलवाडा मंदिराकडून परत निघताना उजवीकडे जाणारा रस्ता अचलगडाकडे जातो. इतिहासकारांच्या सांगण्यानुसार १० व्या शतकात अचलगड किल्ला परमार शासकांनी बांधला होता. त्यानंतर या किल्ल्याची दुरवस्था झाली होती. राणा कुंभ यांनी गुजरातच्या मुस्लिम शासकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या किल्ल्याचं पुनर्निर्माण केलं.. आज मात्रा इथे फक्त काही खोल्या आणि भिंती उरल्या आहेत. ज्या पहाडावर हा किल्ला आहे,  त्या पहाडाच्या पायथ्याशी अचलेश्वर मंदिर आहे. १५ व्या शतकात उभारलेल्या या शंकर मंदिरात शिवलिंगाची नव्हे तर अंगठ्याची पूजा होते.  याच अंगठ्यावर शंकरानं आबू पर्वताला स्थिर केलं होतं, अशी कथा सांगतात.  म्हणूनच या स्थानाला अचलगड असं नाव पडलं. मंदिराच्या बाहेर पंचधातूचा भव्य नंदी आहे.
मंदिराच्या शेजारुन  गडावर जायचा छोटा रस्ता होता. पण अचलगडाची एकूण अवस्था पाहून कोणालाही वर जायचा उत्साह नव्हता.. आता आम्ही माऊंट अबूचं सर्वोच्च स्थान गुरूशिखराकडे निघालो.  त्याआधी मध्ये सनसेट पॉईंट लागतो. यालाच हनीमून पॉईंटही म्हटलं जातं. 'कयामत से कयामत तक' सिनेमात आमीर खाननं जुही चावलासाठी इथेच घर बांधलं होतं. हे आमचा गाईड तीन तीन वेळा सांगत होता. कदाचित या ठिकाणाबद्दल त्याच्याकडे याव्यतिरिक्त सांगण्यासारखं काहीच नसावं. बस इथे फोटो काढण्यासाठी दहा मिनिटं थांबली. लग्न झालेली जोडपी  आणि इतर काही याठिकाणी फोटो काढायला उतरले. जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी इथे एक आजोबा पगडी आणि बंदूक घेऊन बसले होते. पगडी घालायची हातात बंदूक घेऊन फोटो काढायचा.. फक्त १० रुपयात.. मी यातलं काहीही केलं नाही.
आता आमचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचला.. समुद्रसपाटीपासून ५५६० फूट (१७२२ मी.) उंचीवर वसलंय गुरूशिखर.. अरवलीच्या पर्वतरांगेतलं हे सर्वोच्च शिखर. मंदिराच्या पायथ्यापर्यंत बस जाते मात्र तिथून मंदिरापर्यंत पायऱ्या चढाव्या लागतात. अत्री ऋषी आणि देवी अनुसया यांच्या पोटी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी जन्म घेतला. या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार म्हणजे दत्त.. प्रभू दत्तात्रेय याच ठिकाणी तपश्चर्येला बसायचे.
इथून आणखी काही पायऱ्या चढून वर गेलं, की दत्तात्रेयांच्या पादुका आहेत..
याशेजारीच पितळेची एक विशाल घंटा आहे. मनापासून काही इच्छा व्यक्त करून ही घंटा तीन वेळा वाजवल्यास मनोकामना पूर्ण होते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.
गुरुशिखरावरचा एक तास मात्र खरंच  अविस्मरणीय होता. गुरूशिखरावर उभं राहून खाली बघितलं,  की वाटतं .....आपण जग जिंकलंय... गुरु शिखरावरून आता परतीचा प्रवास सुरू झाला. इथून जवळंच एअर फोर्स स्टेशन आहे. त्या परिसरात जायची परवानगी नाही.
आता बस कुठलाही थांबा न घेता वेगानं.  बस स्टॉपकडे निघाली.  संध्याकाळचे ५ वाजत आले होते. साडे पाच पर्यंत आम्ही बस स्टॉपच्या जवळ पोहोचलो. इथे  पाच मिनिटावर नक्की लेक (तलाव) आहे..
नक्की तलावाच्या आजूबाजूला अनेक छोटी मोठी दुकानं आहे. ज्यांना माऊंट अबूमध्ये खरेदी करायची आहे. त्यांच्यासाठी इथलं मार्केट परफेक्ट आहे..
मावळता सूर्य आणि गार वारा. तलावाच्या तटावर बसून शांतपणे ते सौंदर्य मी टिपत बसलो. हा तलाव देवांनी नखानं खोदून तयार केला, म्हणून  याचं नाव 'नक्की तलाव' पडलं, अशी दंतकथा आहे. हिमालयातल्या तलावांचा अपवाद वगळता समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर असलेला हा भारतातला एकमेव नैसर्गिक तलाव आहे.
तासभर हा ऑक्सिजन सामावून घेत मी परतीच्या प्रवासाला लागलो. इथून अबू रोड स्टेशनसाठी अर्ध्या तासाने बसेस आहेत. मी रात्री ८ वाजेपर्यंत अबू रोडला पोहोचलो. दिवसभराचा प्रवास हा समृद्ध करणारा होता. अबू रोड रेल्वे स्टेशनवरून मला जैसलमेरला जायचं होतं. त्यासाठी २.३० वाजताची गाडी होती. त्यामुळे बराच वेळ घालवायचा होता. अबू रोड हे गुजरातच्या जवळचं गाव असल्यानं इथे तुम्ही राजस्थानमध्ये आहात असं फारसं जाणवत नाही. गुजराती फाफडा, जिलेबी, ढोकळा याचे स्टॉल्स जागोजागी पाहायला मिळतात. दुपारी हलकं खाल्लं होतं,  त्यामुळे आता पोटात कावळे ओरडत होते. एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन मी दाल तडका आणि फुलक्याची ऑर्डर दिली. राजस्थानी थाळी हा फार जड प्रकार आहे. त्यात रात्रीसुध्दा  प्रवास असल्याने साधं जेवण आणि त्यातही दोन घास कमीच.... या बेतानं मी जेवलो. रात्री साडेदहा वाजेपर्यंत मी अबू रोड स्टेशन गाठलं. गाडीला अजून ४ तास होते. त्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर जाऊन  मोबाईलवर सिनेमा बघत गाडीची वाट बघत बसलो. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रात्री पावणे तीन वाजता बांद्रा ट. - जैसलमेर ट्रेन आली. माझी सीट पकडून मनातल्या मनात माऊंट अबूला बाय बाय म्हंटलं. हिरव्यागार निसर्गरम्य अबू पर्वतामधून माझा प्रवास आता थारच्या वाळवंटाकडे सुरू झाला.. पुढच्या भागात मारवाड पार करून जाऊयात थेट जैसलमेरला.. तोपर्यंत शुभरात्री! -------------- आजचा खर्च उदयपूर ते अबू रोड बस प्रवास- २०० रु. अबू रोड ते माऊंट अबू प्रवास- ४० रु. माऊंट अबू दर्शन बस भाडे- १२५ रु. दुपारचं जेवण १५० रु. माऊंट अबू ते अबू रोड प्रवास भाडे ४०रु. रात्रीचं जेवण १०० रु. इतर खर्च २०० रु. जैसलमेर ट्रेन तिकिट ३५० रु. -------------- आजचा एकूण खर्च १२०५ रुपये. -------------- तळटीप- भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच.. आधीचे ब्लॉग राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : उदयपूर राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : चित्तोडगड