मुंबई-महाराष्ट्रातला रखरखीत उन्हाळा सोसल्यावर कुणालाही जून-जुलैमध्ये  एखाद्या थंडगार प्रदेशात चारेक दिवस घालवायला आवडतील. पण मी मात्र राजस्थान निवडलं. राजस्थान म्हटल्यावर आपल्यासमोर मरुभूमीचा तप्त वाळवंट येतो. पाण्यासाठी भटकणारे लोक येतात. बसच्या टपावर बसलेले लोक आणि हेलकावे खात धावणाऱ्या जर्जर बसेस येतात.

'आपल्याकडे उन्हाचे चटके कमी की काय म्हणून तिकडे तुलनेने थंड हवेच्या प्रदेशात जावं' असा विचार जून जुलैमध्ये येणं स्वाभाविक आहे. मी सुद्धा अनेक ठिकाणी वाचलं होतं, सल्ले ऐकले होते की राजस्थानला जायचं तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी याच महिन्यांमध्ये.. पण तरीही छातीचा कोट करून मी जुलैमध्ये राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला. कारण मला राजस्थानच्या दुष्काळी चित्रापेक्षा तिथला वैभवशाली इतिहास खुणावत होता. राजस्थातले गडकोट, डोळे दीपवणारे महाल, एकीकडे तप्त वाळवंट तर दुसरीकडे अरवलीच्या हिरव्यागार पर्वतरांगा साद घालत होत्या.

मी जुलै महिन्यात ही सोलो ट्रिप केली. कुठलाही प्लॅन न करता केलेला प्रवास आणि त्यातून मिळत जाणारा आनंद मी 10 दिवस अनुभवला. विशेष म्हणजे ही ट्रिप एकट्या भटक्यासाठी खिशाला परवडणारी ठरली.

तर अवघ्या 12 हजार रुपयांमध्ये राजस्थानमधली 7 शहरं आणि पंजाबचं अमृतसर असं सगळं बारा दिवसात मी उरकलं. तुम्हीही सोलो ट्रॅव्हलर असाल किंवा ग्रुपने फिरत असाल तर एवढ्या कमी पैशात तुम्ही उत्तम फिरू शकाल..

मी काय केलं? तर गूगल मॅप घेऊन राजस्थान फिरण्यासाठी माझा एक रोडमॅप तयार केला. चित्तोडगडपासून प्रवासाला सुरुवात करून पुढे उदयपूर, माऊंट अबू आणि थेट मारवाडमध्ये जायचं ठरलं. माऊंट अबूवरून पुढे जैसलमेर, जोधपूर, पुष्कर, जयपूर आणि शेवटच्या टप्प्यात पंजाबमध्ये अमृतसर असा मार्ग निश्चित केला आणि त्यानुसार ट्रेनची तिकिटे बुक केली. महिनाभरआधी कराल तर कन्फर्म तिकिटे मिळतात.

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसहून 9 जुलैला रात्री 11.30 वाजता उदयपूर ट्रेन निघाली. ट्रेनने 10 जुलैला दुपारी 1 च्या सुमार चित्तोडगडला पोहोचवलं. ट्रेनमधून शहरात जात असतानाच चित्तोडगडचा भव्य किल्ला आपल्या नजरेतही मावत नाही. आज चित्तोडगड बघून लगेच संध्याकाळी उदयपूरला रवाना व्हायचं प्लॅनिंग होतं. दुपारी ट्रेनमधून उतरल्यावर सपाटून भूक लागली होती. स्टेशनच्या बाहेरच राजस्थानी जेवणाचे रेस्टॉरंट्स आणि भोजनालयं आहेत. मी लगेच दाल-बाटीवर ताव मारला. कारण किल्ला बघूनच खाली उतरायचं असल्यानं किती वेळ लागेल सांगता येत नव्हतं.

साधारण दुपारी 2 पर्यंत मी जेवण उरकून रिक्षास्टँड गाठलं. कचेरी चौकातून शेअर रिक्षा मिळतात. काही रिक्षा फक्त 20 रुपयात गेटपर्यंत नेऊन सोडतात तर काही 200 ते 300 रुपयात अख्खा किल्ला फिरवून आणतात. इथे तिघे जण असतील तर अगदी प्रत्येकी 100 रुपयांत किल्ला बघून होईल. पण मी एकटा असल्यानं मी घासाघीस करून 200 रुपयांत रिक्षावाल्याला पटवलं आणि सुरू झाला चित्तोडगड किल्ल्याचा प्रवास..

महाराष्ट्रामध्ये जसं घाटावरचे घाटाखालचे असं ढोबळमानानं बोललं जातं अगदी तसेच राज्यस्थानमध्ये मेवाड आणि मारवाड असे दोन प्रांत आहेत. गुजरातच्या सीमेजवळचा चित्तोडगड आणि उदयपूरचा भाग हा मेवाड म्हणून ओळखला जातो. या भागात राजपूतांचं वर्चस्व होतं. दुसरीकडे वायव्येकडील राजस्थानचा भाग म्हणजे जैसलमेर आणि जोधपूर जिल्हा हा मारवाड म्हणून ओळखला जातो. या भागातून येणाऱ्यांना आपल्याकडे मारवाडी म्हणतात. बहुतांश मारवाड वाळवंटी आहे.

चित्तोडगचा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातला सर्वात मोठा किल्ला मानला जातो. इसवी सन 700 मध्ये चित्रांगद मोरी या राजाने या किल्ल्याची निर्मिती केली. त्यावरूनच या किल्ल्याचं नाव चित्तोडगड पडलं. मेवाडच्या इतिहासात 834 वर्ष चित्तोडगड ही राजपुतांची राजधानी होती. तब्बल 600 एकरात हा किल्ला पसरला आहे. तर गेटपासून किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी साडे चार किलोमीटर लांबीची विशालकाय तटबंदी भिंत सात दरवाज्यांमधून आपल्याला चित्तोडगडावर पोहोचवते. खाली गेटपासून भैरव पोल, हनुमान पोल, गणेश पोल, जोरला पोल, लक्ष्मण पोल आणि शेवटी राम पोल हेच ते सात दरवाजे आपल्याला पहाडावरच्या महालापर्यंत पोचवतात. शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचू न देण्यासाठी या सातही दरवाजांजवळ सैनिक तैनात असत. राणा कुंभ यांनी किल्ल्याला ही विशालकाय तटबंदी घातली होती. तर आपण आता रिक्षातून वर पोहोचताच आपल्या उजव्या बाजूला राजांचा महाल नजरेस पडतो. आता जर्जर झालेला हा महाल आजही मोठ्या खंबीरपणे आपला संघर्षाचा इतिहास आपल्याला सांगतो.

(महालाचा फोटो)

थोडसं पुढे जाताच कालिका मंदिर लागतं. नवस पूर्ण झाल्यास लोक इथे नारळ फोडतात..

(कालिका माता मंदीर फोटो)

चित्तोडगडानं तीन मोठी आक्रमणं झेलली. चितोडगडाने फक्त सत्ता आणि लुटीसाठी आक्रमणे सोसली नाहीत तर हजारो सैनिकांचं वीरमरण आणि वीरपत्नींचा जौहर अनुभवला आहे.

पहिलं आक्रमण 1303 मध्ये अल्लाउद्दीन खिल्जीनं केलं. त्या युद्धात राणा रतन सिंह यांचा पराभव झाला. राणासह हजारो सैनिक शहीद झाले. राणी पद्मिनीला मिळवण्यासाठी अल्लाउद्दीननं चित्तोडगड काबिज केला पण राणी पद्मिनीनं शहीद पत्नींच्या सोबत जौहर करत खिल्जीचे मनसुबे धुळीस मिळवले. अग्नीच्या त्या ज्वाळा क्षणभर जौहर कुंडावर आपल्या समोर येतात. मेवाडच्या इतिहासातला हा पहिला जौहर होता.

जौहर स्थळ फोटो

त्यानंतर जवळपास सव्वा दोनशे  वर्षांनी म्हणजे 1535 साली गुजरातचा शासक बहाद्दूर शाहनं चित्तोडगडावर आक्रमण केलं. यावेळी राणी कर्णावतीने जौहर केला. हा मेवाडच्या इतिहासातला शेवटचा जौहर मानला जातो. पण चित्तोडगडानं तोपर्यंत 13 हजार महिला आणि लहान मुलांचा आक्रोश आपल्या पोटात सामावून घेतला होता.

त्यानंतर 1567 मध्ये मुघल बादशाह अकबराने चित्तोडवर आक्रमण केलं होतं, चित्तोडगडावर झालेलं हे तिसरं मोठं आक्रमण. त्यानंतर तब्बल 48 वर्षांनी मबल बादशाह जहाँगीरने चित्तोडगड राणा अमर सिंह यांना सोपवला.

जौहर स्थळाच्या शेजारीच विजय स्तंभ आहे. राणा कुंभ यांनी सुल्तान महमूद शाह खिल्जी याला पराभूत केल्यावर 1440 मध्ये हा विजयस्तंभ उभारला होता. हा स्तंभ वास्तूकलेचं अद्भूत उदाहरण आहे.

विजयस्तंभ फोटो

याच परिसरात शंकराचं प्राचिन मंदिर आहे.  मंदिराच्या शेजाचीच गोमुख कुंड आहे. याठिकाणावरून किल्ल्यापर्यंत जाणारी भिंत दिसते. सोबतच गडाखालचं पूर्ण शहर दिसतं. अथांग पसरलेलं..

गोमुख कुंड

हे सगळं बघितल्यावर थोडसं पुढे गेलं की आपल्याला कुंभश्यामचं सुंदर मंदिर नजरेला पडतं. राणा कुंभ यांनी 1449 साली विष्णुच्या एका अवताराचं हे मंदिर बनवलंय.

कुंभश्याम मंदिर

कुंभश्याम मंदिराच्या शेजारीच संत मीराबाईचं मंदिर आहे. याच मंदिरात मीरा श्रीकृष्ण आराधना करायची.







मीराबाई मंदिर

आता आपण जाऊया राणी पद्मिनीच्या महालाकडे. राणा रतन सिंग यांनी तलावामध्ये राणी पद्मिनीसाठी महाल बनवला.



पद्मिनी महाल फोटोतलावाकाठच्या मर्दाना महालाच्या खिडकीतून पद्मिनी महालाच्या पायऱ्यांवरची व्यक्ती समोरच्या खोलीत लावलेल्या आरशात दिसायची.



मरदाना महल फोटोराणा रतन सिंग यांनी अल्लाउद्दीन खिलजीला याच खोलीत लावलेल्या आरशावर पद्मिनीला दाखवलं होतं. पण हा आरसा करणी सेनेच्या आंदोलनानंतर हटवण्यात आलाय. आरशाचे खिळे मात्र अजूनही तसेच आहेत.

या ठिकाणी आरसा होता फोटो

याशिवाय अनेक खोल्या या महालामध्ये आहेत. आता या परिसरात सुंदर बाग फुलवण्यात आली आहे.

याशिवाय किल्ल्यावर अनेक मंदिरं आहेत. शिवाय त्याकाळी किल्ल्यावर भरणारा मोती बाजार हा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. आता मात्र त्याचे अवशेष उरलेले आहेत. याशिवाय जैन मंदिर आणि प्राचिन शस्रास्रांचं मोठं संग्रहालय उभारण्यात आलंय. शिवाय चित्तोडगडाचा प्राचीन इतिहास प्रतिमारुपातही या संग्रहालयात बघायला मिळतो. याचं तिकिट फक्त 20 रुपये आहे.

हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला रिक्षाचालक साधारण तीन तासात व्यवस्थित फिरवतो आणि खाली रिक्षातळापर्यंत आणून सोडतो. चित्तोडगड किल्ल्याच्या व्यतिरिक्त या शहरात बघण्यासारखं फार काही नाही. त्यामुळे वेळ न घालवता मी सायंकाळी 6वाजताची उदयपूर बस पकडली. 120 रुपयात राजस्थान परिवहनची बस आपल्याला ३ तासात उदयपूरमध्ये सोडते.

दुसरा पूर्ण दिवस उदयपूरसाठी द्यायचा तर सकाळपासून सुरुवात करायला हवी, म्हणून रात्रीच मुक्कामाला पोहोचणं जास्त योग्य आणि सोईस्करही.. मी रात्री साधारण 9 वाजेपर्यंत उदयपूरला पोहोचलो. त्यामुळे पुढच्या भागात उदयपूरची सफर..

चित्तोडगडचा एका दिवसाचा खर्च

  • मुंबई ते चित्तोडगड ट्रेनचा प्रवास (SL) 560 रुपये.

  • गडाची सफर घडवणारी रिक्षा भाडे 200 रुपये

  • जेवण 150 रुपये

  • चित्तोडगड ते उदयपूर बस प्रवास 120 रुपये


तळटीप-  भटकंतीचा अर्थ कुठलाही विचार न करता बॅग उचलून बाहेर पडणं. जग बघण्याची भूक असलेल्यांना पोटाच्या भुकेची चिंता नसते, त्यामुळे कधी राहण्याचे तर कधी खाण्याचे हाल होऊ शकतात. जाडजूड गादीवर झोपणाऱ्यांनी भटकंती करणं टाळावं. तुम्ही टूरिस्ट होऊ शकता ट्रॅव्हलर नाही. तुम्ही पक्के ट्रॅव्हलर असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे.