>> शेखर पाटील


महान संगीतकार खय्याम साहेब गेले. बातमी तशी अनपेक्षित नव्हती. मात्र क्षणार्धात हृदयातून कळ उठली. कोणत्याही कलावंताची प्रत्येक कृती वा रचना ही उच्च दर्जाची असेलच असे नव्हे. म्हणजे महानायक अमिताभचे अनेक चित्रपट व त्यातील भूमिका या भिकार आहेत; मास्टर ए.आर. रहेमानची अनेक गाणी कर्णकर्कश्य आहेत. खरं तर, अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिभेला ओहोटी लागल्याची चाहूल अचूकपणे ओळखणे; काळाच्या ओघात बदल स्वीकारणे वा आपली सद्दी संपल्याचे लक्षात घेऊन बाजूला होणे या महत्वाच्या बाबी बरेच प्रतिभावंत विसरून जातात. यातूनच बहुतेकांची शोकांतिका होत असते. मात्र आपल्या करिअरमध्ये सूर, ताल, लय आणि गेयता याबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करणारे संगीतकार म्हणून खय्याम ख्यात आहेत. आपल्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी मोजके चित्रपट केले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते योग्य वेळी थांबले. आता तर त्यांचा जीवनप्रवासही थांबलाय. मात्र त्यांनी रसिकांना जे आनंदाचे क्षण दिलेय ते पाहता खय्याम हे कधीच अजरामर झाले आहेत.


जे आपल्याला नेहमी गुणगुणावेसे वाटते ते गीत सर्वोत्तम अशी माझी सरळसोपी व्याख्या आहे. याचा विचार करता, खय्याम हे माझे सर्वाधिक आवडते संगीतकार आहेत. त्यांची अगदी अनेक डझनवारी गाणी माझ्या हृदयाला स्पर्श करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या सर्व प्ले-लिस्टमध्ये खय्याम यांची बहुतेक गाणी आहेत. वास्तविक पाहता, त्यांचे जवळपास प्रत्येक गीत हे मास्टर पीस आहे. यावर बरेच काही लिहता येण्यासारखे आहे. कभी कभी, नूरी, उमराव जान, बाजार, रझिया सुल्तान आदी चित्रपटांमधील गाणी ऐकतांनाच भावविभोरपणा आपण सर्वांनी नक्कीच अनुभवला असेल. आज खय्याम साब जाण्याची वेदना असली तरी त्यांनी आपल्याला जे काही भरभरून दिले त्याबद्दल कृतज्ञता निश्‍चित व्यक्त करावी लागेल. खय्याम काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर क्षणार्धात अनेक गाणी आणि त्याच्याशी संबंधीत भावना डोळ्यासमोर तरळून गेल्या. यातील एक गीत हे आपोआप ओठांवर आले.


खय्याम साहेबांनी संगीत दिलेल्या 'थोडीसी बेवफाई' या चित्रपटातील 'आंखो मे हमने आपके सपने सजाये है' हे गाणे मला खूप आवडते. प्रणयाची ही उत्कटता आपल्याला स्वत: अनुभवाविशी वाटते. किंबहुना प्रत्येकाच्या आयुष्यात हे क्षण कधी तरी येतातच. या गाण्याशी एक योगायोग जुडलेला आहे. हे गाणे गुलजार यांनी लिहले असून किशोरकुमार व लता मंगेशकर यांनी गायले आहे. तर नेत्रपल्लवीतल्या प्रेम संकेताबाबत गुलजार यांनीच लिहलेले व किशोर-लता यांनी अमर केलेले दुसरे गाणे ''आप की आंखो मे कुछ महके हुवे से राज है...'' हेदेखील तितकेच सरस गाणे असले तरी याला आर.डी. बर्मन या दुसर्‍या महान कलावंताने संगीत दिले आहे. दोन्हीही गाणी तितक्याच तोलामोलाची....तर या गाण्याकडे वळूया.


या गाण्यासाठी निवडण्यात आलेले स्थान हे स्वप्नातील असून ते स्वाभाविक आहे. नेत्रांमधील जादू अनुभवण्यासाठी स्वप्नाळूपणाच हवा. व्यावहारिक पातळीवर कुणाच्या डोळ्यात डोकावून पाहिले असता आपल्याला काहीही मिळणार नाही. मात्र नायक हा नायिकेला अगदी हळूवारपणे 'पलके उठा के आपने जादू जगाये है...' म्हणतो तेव्हा आपण प्रत्यक्ष ही जादू अनुभवतो हीच खय्याम यांची महत्ता. तर पुढे नायिका 'सपना भी आप ही है...हकीकत भी आप है' असे म्हणून याला नव्या पातळीवर नेऊन ठेवतो. हे गाणे प्रेमाचे विलोभनीय रंग अतिशय मनमोहक पद्धतीत ऐकवणारे/दर्शविणारे आहे. कुणालाही क्वचितच जीवनातील निस्सीम प्रेमाचा हा रंग गवसतो. या क्षणांमधील आसुसलेपण ज्यांना उमगले अन् जे जगले ते भाग्यवान! या गाण्यातील ''ठहरे हुवे पलो मे जमाने बिताये है'' हे वाक्य तर प्रतिभेचे शिखर होय. आता एखाद्या क्षणात फार मोठा कालखंड व्यतीत होईल यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. तथापि, आयुष्यातील हा अत्यल्प विराम आणि यातील स्वप्नश्रुंखलांना या गाण्यातून अजरामर करण्यात आले आहे. यामुळे ''सपनो मे भी ना छुटेगा ये साथ अब कभी'' हे वाक्य फक्त नायिका ही नायकाला म्हणत नाही; तर रसिकही खय्याम साहेबांना म्हणणार आहेत. ते आज शरीराने आपल्यातून गेले असले तरी त्यांचे संगीत हे चिरकाल टिकणारे आहे यात शंकाच नाही. थँक्स खय्याम साब...आमच्या आयुष्यात विलोभनीय रंग भरल्याबद्दल!


(http://shekharpatil.com  वेबसाईटवरून)