Kasaba By-election : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे विष्णू चितळे 1957 ला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून 1957 ला निवडून आले. त्यावेळी जोमात असलेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीचा त्यांना पाठिंबा होता. संस्कृत पंडित असलेल्या विष्णू उर्फ भाई चितळेंनी उभी हयात स्वातंत्र्य संग्रामात लढण्यात घालवली होती. ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्याचा लढा ते काँग्रेसच्या माध्यमातून जरी लढले असले तरी निवडणुकीच्या रिंगणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांनी 1957 ला काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 2 मार्चचा निकाल लागेपर्यंत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची जी राजकीय ओळख निर्माण झाली होती, त्या तथाकथित राजकीय ओळखीला पूर्णपणे विसंगत असा इतिहास विष्णुदास चितळेंच्या माध्यमातून लिहिला गेलाय.
कसब्याचे पाचवेळा आमदार राहिलेल्या गिरीश बापट यांना कसब्याचा हा इतिहास नेहमीच लक्षात असायचा. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ म्हटलं की सदाशिव, नारायण आणि शनिवार पेठ अशीच अनेकांची मर्यादित समज. गिरीश बापटांना मात्र कसब्याची सर्वसमावेशकता पुरेपूर माहिती होती आणि त्यामुळं त्यांचं राजकारणदेखील सर्वसमावेशक राहिलं. त्या राजकारणात कधी पुण्येश्वर किंवा इतर धार्मिक मुद्दे त्यांनी आणले नाहीत. त्यामुळे राज्यात दीर्घकाळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राजवट असतानाही गिरीश बापट कसब्यातून सातत्याने निवडून येत राहिले.
भाजप कसब्याचा इतिहास विसरला
यावेळची पोटनिवडणूक लढताना भाजपचे नेते कसब्याचा हा जुना इतिहास विसरले आणि अडचणीत आले. गिरीश बापटांना सदाशिव, नारायण, आणि शनिवार पेठेत जशी मते मिळत होती तशी सोमवार पेठ, मंगळवार पेठ, लोहियानगर, गंजपेठ या भागात देखील मिळायची. वैयक्तिक संपर्क आणि इथं नांदणाऱ्या अठरापगड जातींना सोबत घेऊन राजकारण करणं हे त्यांच्या यशाचं सूत्र होतं. विष्णुदास चितळेंच्याही मागे जायचं झालं तर शिवकाळातील कसब्याचा इतिहास आपल्या सगळ्यांनाच अवगत असतो. शहाजी राजेंच्या जहागिरीचा भाग असल्याने त्यावेळी आदिलशहाकडून लढणाऱ्या मुरार जगदेवाने कसबा पुणे पूर्णपणे बेचिराख करून टाकलं. दहशत बसावी म्हणून कसब्यावर मुरार जगदेवाने गाढवाचा नांगर फिरवला.
कसब्याचं हे नशीब पालटलं ते जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी पुण्यात आल्यावर. लाल महालाची उभारणी करून जिजाऊमाँसाहेबांनी कसब्यावर सोन्याचा नांगर फिरवला आणि कसबा पुन्हा वसवलं. त्यावेळच्या गावगाड्याला आवश्यक असलेले बारा बलुतेदार कसब्यात आणले गेले. पुढे मोगलाई, पेशवाई आणि ब्रिटिश सत्ता अशा वेगवगेळ्या राजवटींमध्ये कसब्याची ही ठेवणं कायम राहिली . त्यामुळं अजूनही इथं तांबट आळी , सोनार आळी , लोणार आळी, गंज पेठ असे वेगवगेळ्या लोकवस्तीचे भाग पाहायला मिळतात.
कसब्याची राजकीय विभागणी
सदाशिव , नारायण आणि शनिवार हे भाग शनिवार वाड्याच्या पश्चिमेकडे आणि जुन्या कसब्याच्या भाग असलेल्या सोमवार , मंगळवार , गंज पेठ , घोरपडे पेठ अशा पेठा पूर्वेकडे अशी कसबा मदारसंघाची राजकीय विभागणी होती. पूर्व आणि पश्चिम भागातील मतदारांमध्ये राजकीय मतांचा वैचारिक दुभंग हा नेहमीच राहिला. पण हा वैचारिक दुभंग गिरीश बापटांनी मोठ्या हुशारीने सांधला होता. यावेळी ही किमया रवींद्र धंगेकरांनी केली आणि ते कसब्याचे आमदार झाले. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे मिथक यामुळं गळून पडलं. कसबा ज्या गिरीश बापटांचा बालेकिल्ला होता त्यांच्या राजकारणाकडून शिकत रवींद्र धंगेकरांनी 2017 ला मनसे सोडून काँग्रेसची वाट धरली होती.
शिवसेनेतून मनसेत आलेल्या रवींद्र धंगेकरांनी 2009 आणि 2014 अशा विधानसभेच्या दोन निवडणुका गिरीश बापटांच्या विरोधात लढवल्या. त्यातून त्यांच्या एक लक्षात आलं ते म्हणजे जर आमदार व्हायचं असेल तर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याशिवाय पर्याय नाही. स्वतःच्या काम आणि जनसंपर्कावर 2009 आणि 2014 ला धंगेकरांनी चांगली मतं घेतली होती. मात्र विजय हवा असेल तर स्वतःच्या वैयक्तिक मतांना काँग्रेसच्या परंपरागत मतांची जोड द्यावीच लागेल हे ओळखून धंगेकर 2017 ला राष्ट्रवादी किंवा शिवसेनाचा पर्याय नाकारून काँग्रेसमध्ये आले होते. कसबा मतदारसंघात 31 टक्के ओबीसी, 23 टक्के मराठा कुणबी, 13 टक्के ब्राह्मण, 10 टक्के मुस्लिम, 9 टक्के एससी, 4 टक्के एसटी आणि 7 टक्के जैन, ख्रिश्चन असे इतर धार्मिक अल्पसंख्यांक आहेत. कसब्याची ही सर्वसमावेशकता अनेकदा अनेकांच्या लक्षात येत नाही. दोन निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेल्या धंगेकरांनी ती ओळखली होती आणि काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबतची आघाडी त्यांच्या पथ्थ्यावर पडली. आमदार व्हायचं असेल तर काँग्रेसमध्ये जायला हवं हा पाच वर्षांपूर्वी रवींद्र धंगेकरांनी बांधलेला अंदाज या पोटनिवडणुकीत बरोबर ठरला.
भाजपच्या पराभवाची कारणं
धंगेकरांच्या विजयाची ही अशी अनेक कारणं आहेत तशी भाजपच्या पराभवाची देखील वेगवगेळी करणं आहेत. यातील पहिलं कारण म्हणजे उमेदवाराची निवड. उमेदवारी कोणाला द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी हेमंत रासनेंची उमेदवारी पक्षाने आपल्यावर लादलीय ही भावना पहिल्या दिवसापासून भाजपच्या कार्यकर्त्यांची होती आणि पदाधिकाऱ्यांचीदेखील. रासनेंच्या उमेदवारीमुळे फक्त टिळक कुटूंबच नाराज झालं असं नाही तर भाजपचे इतर पदाधिकारीही नाराज झाले. फक्त नेतृत्वाच्या धाकाने हे कोणी बोलून दाखवत नव्हतं. मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्यात येईल हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. पण भाजपच्या नेतृत्वाने वेगळं गणित मांडलं. सलग चार वर्षे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या रासनेंच्या हाती होत्या. या चाव्यांनी ते भाजपची उमेदवारी मिळवू शकले, पण याच चावीने निवडणुकीतील विजयाचं कुलूप उघडताना चावी कुलुपात अडकून पडली.
भाजपच्या नेतृत्वाने मांडलेलं गणित त्यामुळं फिस्कटलं. गणित फिस्कटतंय हे लक्षात आल्यावर भाजपच्या नेतृत्वाने आणखी जोर लावायचं ठरवलं. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण या दोन मंत्र्यांनी पुण्यातील मॅरिएट हॉटेलमध्ये डेरा टाकला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले आणि कसब्याची गल्ली-बोळ त्यांनी पालथी घालायला सुरुवात केली. पुण्यातील सर्व मानाचे गणपती आणि बहुतेक प्रमुख गणपती मंडळं कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात येतात. त्याचबरोबर लक्ष्मी रस्त्यासह सर्व व्यापारी पेठा इथेच वसल्यात. त्यामुळं गणेश मंडळे आणि या गणेश मंडळांना आर्थिक मदत पुरवणाऱ्यांना आपलंस करण्याचा प्रयत्न झाला. तीच गोष्ट व्यापाऱ्यांचा नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बाबतीतही करण्यात आली. याही पलीकडे जाऊन आपल्या आपल्या भागात दादा-भाई अशी ओळख असलेले अनेकजण दावणीला बांधण्यात आले. पण पुढारी सोबत आले तरी त्यांना मानणारे लोक मतदार म्हणून आपल्या सोबत येतील का ही शंका भाजपच्या नेतृत्वाला सतावत होती. सोबत आलेल्या सगळ्यांचा राबता मॅरिएट हॉटेलला सुरु झाला. पण कसब्याच्या मैदानावर लढणारा खरा-खुरा सैनिक असलेला भाजपचा कार्यकर्ता यामुळे अधिकच सैरभैर झाला.
जो कसबा गिरीश बापट एकहाती जिंकायचे तो कसबा जिंकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भाजपला का मैदानात उतरावं लागतंय असा प्रश्न त्याला पडला. मॅरिएट हॉटेलमधून सुटणाऱ्या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेले भाजपचे पदाधिकारी आणि भाजपचा कार्यकर्ते त्यामुळे अधिकच दबावाखाली यायला लागले. पुढे हा दबाव असह्य होत गेला आणि सोपी वाटणारी निवडणूक अवघड होत गेली.
बापट आणि काकडे सुरुवातीपासून सक्रिय नव्हते
उमेदवाराच्या चुकीच्या निवडीनंतर दुसरी महत्वाची चूक होती ती गिरीश बापट आणि संजय काकडे यांना सुरुवातीला या निवडणुकीत सक्रिय न करणं. या आजी-माजी खासदारांशिवाय आपण निवडणूक जिंकू हा भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास पुढे अतिआत्मविश्वास ठरतोय हे लक्षात आल्यावर पळापळ सुरु झाली. कसबा पाचवेळा एकहाती जिंकणारे गिरीश बापट जरी अंथरुणाला खिळले असले तरी त्यांच्यातील राजकारणी जागा होता. आपल्याला बाजूला ठेऊन ही निवडणूक होतेय हे लक्षात आल्यावर गिरीश बापटांनी आपण प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक प्रचारात सहभागी होत नसल्याचं पत्रक काढलं.
कसब्याचा सोपा पेपर अवघड जाऊ लागल्याने आधीच धास्तावलेले भाजपचे नेते मग आणखी गिरीश बापटांना भेटायला धावले. उपचार सुरु असलेल्या बापटांना भेटायला मग एकामागोमाग एक भाजप नेत्यांची रांग लागली. तेवढ्यानेही भागात नाही असं लक्षात आल्यावर गिरीश बापटांना प्रचारात उतरवण्याचा आणि त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची एक बैठक केसरी वाड्यात घेण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला. आयुष्यभर भाजपचा झेंडा पुण्यात फडकवत राहिलेले गिरीश बापट याही परिस्थितीत पक्षाची गरज ओळखून केसरी वाड्यात यायला तयार झाले. व्हील चेअरवर बसलेले आणि पाठीमागे ऑक्सिजन सिलेंडर जोडलेला अशा अवस्थेत असलेले गिरीश बापट केसरी वाड्यात आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत विजयासाठी काम करण्याचं आवाहन केलं.
... पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती
जी बाब गिरीश बापटांबाबत घडली तीच संजय काकडेंसोबत झाली. कसबा पेठ मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रभाव असलेल्या काकडेंना या निवडणुकीत पूर्ण क्षमतेने सक्रिय करायला हवं याची गरज सुरुवातीला न उमेदवाराला वाटली न भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला. संजय काकडे यांना मानणारे भाजपचे अनेक नगरसेवक या भागात असतांना निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांचा उपयोग भाजपने करून घेतला नाही. बापट आणि काकडेंशिवाय कसब्याचा गढ आपण जिंकू शकतो हा आपला अंदाज चुकतोय हे भाजप नेतृत्वाला हळूहळू लक्षात यायला लागलं आणि गिरीश बापटांबरोबरच संजय काकडेंनाही प्रचारात सक्रिय करण्यात आलं. दोघांनीही त्यांच्या सर्व क्षमता पणाला लावून पक्षासाठी शर्थ केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या दोघांना जरी प्रचारात सक्रिय केलं गेलं तरी सर्व सूत्रं मॅरिएट हॉटेलमधून हलत होती. याउलट काँग्रेस आणि महाविकास आघाडी चौका-चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या लहान-लहान मांडवांमधून निवडणुकीची सूत्र हलवत होती. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली कार्यालयं हीच धंगेकर यांच्या विजयासाठी आखण्यात आलेली रणनीती अंमलात आणत होती.
धंगेकरांचं मताधिक्य रासने कमी करु शकले नाही
या सगळ्यामुळं धंगेकर या नावाभोवती एक पर्सेप्शन तयार झालं, एक वलय तयार झालं. शेवटच्या टप्प्यात भाजपने ही निवडणूक पुण्येश्वर मंदिराचा विषय उभा करून हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र कसब्यातील मतदार शेवटच्या टप्प्यातील या प्रचारामुळे कन्व्हिन्स होऊ शकला नाही. यामुळं कधी नाही ते निवडणूक भाजपच्या नाही तर काँग्रेसच्या अजेंड्यावर लढली जाऊ लागली. एरवी निवडणुकीचा गोल पोस्ट ठरवण्यात माहीर असलेल्या भाजपला धंगेकरांनी ठरवलेल्या पिचवर खेळण्याची वेळ आली. धंगेकर या नावाभोवती निवडणूक फिरू लागल्याने एरवी ज्या सदाशिव, नारायण आणि शनिवारातून भाजपला जे मोठं मताधिक्य मिळतं ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालं नाही. रवींद्र धंगेकरांनीं पूर्व भागातून घेतलेली आघाडी पश्चिम भागाची मतमोजणी सुरु झाली तेव्हा कमी झाली पण ती आघाडी हेमंत रासने कुठल्याच टप्प्यावर भरून काढून शकले नाहीत.
कसब्याने भाजपला आणि काँग्रेसलाही धडा दिला
या निकालावरून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनेक धडे मिळालेत. पण एक धडा दोघांनाही समान मिळालाय. भाजपसाठी तो धडा म्हणजे प्रत्येकवेळी मोदींच्या जीवावर आणि हिंदुत्वाच्या मुद्दयांवर विजय मिळेलच असं नाही. मोदी या चलनी नाण्याला आपल्या कष्टाची, लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या जिद्दीची जोड देणं आवश्यक आहे हे यातून भाजपच्या नेत्यांनी शिकायचंय. तर काँग्रेससाठी धडा हा आहे की नुसतं मोदी आणि आरएसएसला नावं ठेऊन काहीही होणार नाही तर लोकांमध्ये मिसळून जर त्यांचे प्रश्न सोडवले तरच आपल्याला भविष्य आहे. महागाई, केंद्र सरकारचा कारभार याबद्दल दररोज टीव्हीवर झळकण्याची आंदोलन करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी यातून हाच बोध घ्यायचाय की राष्ट्रीय मुद्द्यांवर आपल्या तोंडाची वाफ दवडून काही होणार नाही तर लोकांना नळ कनेक्शन मिळत नसेल तर ते मिळवून देणं, विजेची वाढीव बिलं कमी करून देणं, हव्या असलेल्या शाळेत अॅडमिशन मिळवून देणं, अगदी एखाद्याच्या घराच्या वरच्या मजल्यावरील कपाट उचलून खाली आणण्यास घरात कोणी तरुण नसेल तर ते कपाट उचलून खाली आणून देणं अशी कामी करावी लागतील. रवींद्र धंगेकरांनी ही कामं केली आणि म्हणूनच ते कसब्याचा नवा इतिहास लिहू शकलेत. डाव्या कम्युनिस्ट पक्षापासून सुरु झालेला कसब्याच्या आमदारकीचा प्रवास उजव्या भाजपच्या वाटेने चार दशकं मार्गाक्रमन करत मध्यममार्गी काँग्रेसपर्यंत येऊन पोहचलाय.