पणजी : गोवा! पर्यटनासाठी प्रसिद्ध. केवळ देशच नाही तर परदेशातून देखील इथं पर्यटक येतात. गोव्यात फिरण्यासाठी एक ना अनेक पर्याय. येणारा प्रत्येक जण त्याच्या नजरेनं गोवा पाहत असतो, दाखवत असतो आणि सांगत असतो. तुम्ही पाहाल, सांगाल, दाखवाल तसा गोवा आहे. आता प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन कसा यावर साऱ्या गोष्टी अवलंबून.
गोव्याचं खरं वर्णन मी वाचलं ते बोरकरांच्या कवितेत. लहानपणी हा गोवा कवितेतून, पाठ्य पुस्तकांमधील धड्यांमधून वाचला आणि पाहिला. तसं गोव्यात फिरायला येऊन गोवा किती कळेल याबाबत मात्र मला शंका आहे. पण, गोव्याला, गोयंकरांना ससजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यातील एक व्हावं लागणार. अर्थात मी देखील त्यांच्यातील एक झालोय असं आता वाटू लागलंय. निमित्त आहे गोवा विधानसभेची निवडणूक कव्हर करण्याचं. पंधरा दिवसांपेक्षा देखील अधिक कालावधी घालावल्यानंतर गोवा दुसरं घर वाटू लागल्यास त्यात काही विशेष नाही.
सध्या गोव्यात निवडणुकीचा माहोल आहे का? काय वाटतं तुला? गोयंकर कुणाला निवडून देतील? भाजपची कामगिरी कशी असेल? काँग्रेस, तृणमूल, आप, शिवसेना यांची कामगिरी कशी असेल? गोव्याचा अंडरकरंट काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न सहकारी, ओळखीचे, नातेवाईक यांच्याशी बोलताना विचारले जातात. पण, खरं सांगायचं झाल्यास इतक्या लवकर याबाबतचा आखाडा बांधणं तसं घाईचं होईल असं मला वाटतं. त्याचं कारण म्हणजे इथल्या लोकांशी, जाणकारांशी, राजकीय नेत्यांशी बोलल्यानंतर कळतं. कारण, अद्याप उमेदवारी अर्ज देखील सर्वांनी दाखल केलेले नाहीत. ती प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी उमेवार देखील घोषित झालेले नाहीत. त्यामुळे गोवा आणि गोयंकर शांत आहेत की काय? असा प्रश्न पडतो. सारं कसं 'सुशेगात' आहे. आता 'सुशेगात' म्हटल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी गोव्यात आलंच पाहिजे. इथं राहिलं पाहिजे. गोयंकरांना समजून घेतलं पाहिजे त्यानंतर त्याचा अर्थ कळतो. असो!
आता निवडणुका म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, रॅली, मेळावे आणि एकंदरीत होत असलेली धावपळ असं चित्र आपण महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये पाहतो. पण, गोव्यात तसं काहीही होत नाही आहे. कदाचित कोरोनाचं एक कारण देखील त्याला असेल. त्यामुळे उमेदवार घरोघरी जात प्रचारावर भर देत आहेत. गाठीभेटींवर जोर दिला जात आहे. पण, गोव्यात वावरताना इतकी शांतात कशी काय? असा प्रश्न पडतो. कारण निवडणुका म्हटल्यानंतर कसा मोहोल असणं गैर काही नाही. पण, गोयंकर मात्र शांत आहे. तो आपल्या कामात व्यस्त आहे. तो व्यक्त होत नाही. बोलत नाही. काहीही करत नाही असं किमान आताचं तरी चित्र आहे. हे असं पाहिल्यानंतर अरेच्चा! हे कसं शक्य आहे? असा प्रश्न मनात येतो. तर, त्याचं उत्तर देखील सहज तयार.
काही जणांशी पुस्तकाच्या दुकानात, टपरीवर सहज विषय काढला. निवडणुका आहेत, तुम्ही इतके शांत कसे? असा सवाल केला. त्यावर आलेलं उत्तर अगदी सहज होतं. निवडणुका आहेत मग आम्ही काय करायचं? आमचा धंदा, आमचं काम पहिलं. त्यावर देखील मी त्यांना विचारलं मग निवडणुकांबद्दल तुम्हाला काहीही वाटत नाही. तर त्यावर वयस्कर असलेली एक व्यक्ती सहज उत्तरली. असं कसं वाटतं ना? मग त्यासाठी बोललं पाहिजे असं थोडंच आहे. अहो साहेब आम्ही गोयंकर शांत आहोत. काहीही बोलत नाही याचा अर्थ आम्हाला काहीही पडली नाही असं अजिबात नाही. सध्या काय सुरू आहे ते चालू दे. आम्ही सारं काही बघणार आणि मग मतदान करणार. त्यासाठी उघडपणे बोललं पाहिजे असं थोडंच आहे? आम्ही मतपेटीतून व्यक्त होऊ की!. तुम्ही फक्त पाहा निकालाच्या दिवशी गोयंकर काय करतो ते. तुम्हाला वाटतं तसं काही नाही. आता हे सारं झाल्यानंतर मी त्यांच्याशी राजकारणाच्या इतर गोष्टींकडे वळलो. त्यांनी अनेक गोष्टी नाव घेऊन सांगितल्या. गोव्याचं राजकारण कसं रंगीन आहे. त्याचे काही किस्से देखील सांगितले. पैशांच्या वापरापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत कशी रितीनं काम चालतं, याचे किस्से अरेच्या, हे असं पण होतं होय. असं बोलायला लावणारे होते. अर्थात काही सेकंत असतात म्हणून अशा गोष्टी सांगणं आणि लिहिणं योग्य नाही. पण, एक मात्र कळलं, की गोव्याचे लोक अजब आहेत. तसंही गोव्यात 'गोवा के लोक अजब है' असं म्हणतात की. त्याच्या प्रत्येयाची सुरूवात इथून होते.
वरिष्ठ पत्रकारांशी बोलताना एक गोष्ट मात्र कळली की, निवडणुकीत उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार आपल्या मतदाराच्या घरी एकदी तरी भेट देतो. त्याला त्या व्यक्तीचं, त्याच्या घरातील मतं मिळणार की नाही याची कल्पना आहे. पण, त्यानंतर देखील ही भेट होते. कारण गोव्यातील मतदारसंघात असलेली मतदारांची संख्या, तिथली लोकसंख्या पाहता, या भेटीला पर्याय नाही. सध्या गोव्यात गटागटानं प्रचार सुरू आहे. घरोघरी गाठीभेटी घेतल्या जात आहेत. पण, गोयंकरांच्या मनात काय चाललं आहे याचा अंदाज बांधणं अद्याप तरी कठीण आहे. इथं लोकप्रतिनिधींशी अगदी सहज भेच होते. मुख्यमंत्री देखील ज्या पद्धतीने येतात, जातात त्या गोष्टी पाहिल्यानंतर एका राज्याचा मुख्यमंत्री असा वावरतो याचं अप्रुप आहे. पण, त्याला कारणं देखील तशीच आहेत. इथल्या कोकणी भाषेत एक वेगळा गोडवा आहे. साधारणपणे प्रत्येकाचा एकेरीमध्ये होत असलेला उल्लेख तुम्हाला सुरूवातीला बुचकाळ्यात पाडतो. पण, भाषेचा लहेजा पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर त्याचं उत्तर देखील सापडतं. अर्थात गोव्यात सध्या राजकीय उलथापालथी सुरू आहेत. रोज नवीन कुणी तरी कुठल्या तरी पक्षात जातोय, येतोय असं सुरू आहे. त्याकडे गोयंकरांचं देखील लक्ष आहे. पण, तो बोलत नाही. पण, असं असलं तरी मतपेटीतून गोयंकर व्यक्त झाल्यानंतर त्याची पसंती कुणाला असणार? याची मात्र उत्सुकता आहे.