BLOG : अजित पवारांच्या विमानाला बारामती विमानतळावर लॅण्डिंग करताना अपघात... परिस्थिती गंभीर... एबीपी माझाच्या कार्यालयीन व्हॉटसअप ग्रुपवर आमच्या रिपोर्टरचा मेसेज झळकला. ऑफिस असेल किंवा घर असेल... आमच्यापैकी जिथं कुणी जो होता तो वेगानं कामाला लागला. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाला अपघात ही बातमीच इतकी मोठी होती, की, एक मीडिया हाऊस म्हणून आमची सारी यंत्रणा वेगानं कामाला लागणं स्वाभाविक होतं. 

थोड्याच वेळात डीजीसीएनं ती बातमी दिली आणि साऱ्या महाराष्ट्राला आणखी मोठा धक्का बसला... बारामतीतल्या विमान अपघातात अजित पवारांसह सहाही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी ही डीजीसीएनं कन्फर्म केली होती. पुढच्याच क्षणी एबीपी माझाच्या स्क्रीनवर अक्षरं उमटली... उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन

अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते... महाराष्ट्राच्या राजकारणात नवी वाट निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. एका मोठ्या परिघासाठी अजित पवारांची तीच खरी ओळख होती. पण महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्रासाठी खेळांचा, खेळाडूंचा आणि संघटकांचा भक्कम आधारवड हरपला होता. राज्यानं आपले क्रीडामंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशननं आपले अध्यक्ष गमावले. 

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यानंतर अजित पवार यांच्या रुपानं महाराष्ट्राच्या क्रीडाखात्याला कदाचित पहिल्यांदाच खेळांचा आणि खेळाडूंचा विचार करणारं नेतृत्त्व लाभलं होतं. योगायोगानं महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रंही अजितदादांच्या हाती होती. त्यामुळं महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राचा, विविध खेळांचा आणि त्यातल्या खेळाडूंचा साकल्यानं विचार होईल, असं राज्यातल्या क्रीडारसिकांना वाटत होतं. पण अजित पवारांच्या अपघाती निधनानं त्या भावनांना तडा गेला आहे.

राज्याचं राजकारण असो किंवा महाराष्ट्राचं क्रीडाक्षेत्र, वर्कोहोलिक किंवा घाण्याला जुंपल्यासारखं काम करणारं नेतृत्त्व ही अजितदादांची ओळख सारखीच होती. भेटीसाठी दिलेली वेळ कटाक्षानं पाळणारा नेता हा अनुभव महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि कबड्डी-खो खो खेळातल्या कार्यकर्त्यांना कायम यायचा. खेळाच्या मैदानातील कार्यकर्ता किंवा संघटक हा वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीशी नातं सांगणारा किंवा वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी बांधिलकी सांगणारा असतो. त्या साऱ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं असतं. एक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना आपल्याकडे कामासाठी आलेला माणूस हा कोणत्या पक्षाचा आहे हे अजितदादांनी कधीच पाहिलं नाही. पण खेळांच्या मैदानात तर त्यांनी ती बंधनं आणखी शिथील केली होती.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष जय कवळी सांगत होते की, अजित पवार हे स्पष्टवक्तेपणाचं मूर्तिमंत उदाहरण होते. समोरचा माणूस नाही तर हातातला कागद पाहून ते बोलायचे. तुमचं काम होणार की नाही हे ते समोरासमोर सांगायचे. आणि काम होणार नसेल तर ते का होणार नाही, हेही स्पष्टपणे सांगायचे. एखाद्यानं आपलं काम जरा जास्तच लावून धरण्याचा प्रयत्न केला, तर अजितदादांच्या आवाजाची पट्टी चढायची. पण म्हणून कुणी ऐकलं नाही तर ते चिडायचे किंवा संतापायचे असं म्हणता येणार नाही. त्यांच्या कामाची ती पद्धत होती. त्यालाच सडेतोडपणा असं म्हणतात आणि अजित पवारांचा तो गुण होता.

महाराष्ट्र ऑलिम्पिक किंवा कबड्डी-खो खोतल्या कार्यकर्त्यांना किंवा संघटकांना अजितदादा पाठिंबाही भरभरून द्यायचे अशी आठवण जय कवळी यांनी सांगितली. भुसावळमधली राज्य बॉक्सिंग तोंडावर आली तरी त्यासाठीची रिंग लागली नव्हती. कवळींनी आपली अडचण अजितदादांच्या कानावर घातली. त्यांनी तातडीनं स्थानिक आमदार संजय सावकारेंना संपर्क साधून काम झालं की, कवळींना फोन करायचा असा निरोप दिला. त्यानंतर काम इतक्या वेगानं झालं की, राज्य बॉक्सिंगच्या आयोजनात कोणतीही अडचण आली नाही.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रसिद्धी समिती प्रमुख शशिकांत राऊत म्हणाले की, शरद पवारांनी बीसीसीआयची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र कबड्डीतील चैतन्य हरवलं होतं. कबड्डीमहर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी वयोमानानुसार थकले होते. त्यावेळी बुवांनी शरद पवारांना पुन्हा कबड्डीकडे वळण्याचा आग्रह केला. पण त्यांनी अजित पवारांना कबड्डीची धुरा सांभाळण्यास सांगितलं आणि बुवांना त्यांच्या पद्धतीनं दिलासा दिला. पण अजित पवार स्वभावानं रोखठोक. त्यामुळं बुवा थोडे धास्तावले होते, पण अजितदादांनी महाराष्ट्र कबड्डीची धुरा हाती घेताच पहिल्यांदा कबड्डी असोसिएशनला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. त्यांनी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचीच नाही, तर बुवांचीही काळजी घेतली. 

कबड्डीच्या प्रसारासाठी बुवांना जिल्हाजिल्ह्यात फिरावं लागत होतं. वयोमानानुसार ते थकत चालले होते. त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा म्हणून अजित पवारांनी बुवांना नवीकोरी कार घेऊन दिली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या शिवाजी पार्कमधल्या कार्यालयाचं त्यांनी नूतनीकरण केलं. त्यांनी ते कार्यालय अद्ययावतही करून घेतलं. राज्य विजेतेपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धांना त्यांनी भरघोस आर्थिक मदत केली. इतकंच नाही, तर बुवांच्या आजारपणात, त्यांच्या अखेरच्या दिवसांत अजित पवारांनी त्यांची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी व्यवस्थाही निर्माण केली.

महाराष्ट्र आणि बँक कबड्डीतील जुनेजाणते कार्यकर्ते जया शेट्टी यांनाही अजितदादांच्या आठवणींनी गहिवरून आलं होतं. शेट्टी सांगत होते की, १९७३ साली कबड्डीतली प्रतिष्ठेची आश्विनीकुमार भोईर आणि दादोबा गावंड सुवर्णचषक स्पर्धा बारामतीत झाली होती. त्यावेळी अजित पवार केवळ १४-१५ वर्षांचे होते. पण कबड्डी सामने पाहण्यासाठी ते क्रीडांगणाच्या शेजारी अगदी पहिल्या रांगेत येऊन बसत. मग २००१ साली बारामतीत राष्ट्रीय कबड्डीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या स्पर्धेचं सारं व्यवस्थापन अजित पवारांनी पाहिलं होतं. राष्ट्रीय कबड्डीच्या इतिहासातली ती एक सर्वोत्तम स्पर्धा ठरावी, असं प्रशस्तीपत्रक जया शेट्टी यांनी दिलं.

जया शेट्टी म्हणाले की, अजित पवार हे कबड्डी असोसिएशनमध्ये शरद पवारांचाच वारसा घेऊन आले होते. त्यांनी कबड्डी कार्यकर्त्यांना आणि संघटकांना अगदी बजावून सांगितलं होतं की, मी तुमच्या दैनंदिन कारभारात कुठेही ढवळाढवळ करणार नाही. सारं काही तुम्ही पाहायचं. खेळाचं व्यवस्थापन, स्पर्धांचं नियोजन, आर्थिक बाबी यासारख्या मोठ्या गोष्टी असतील, तर हक्कानं माझ्याकडे यायचं. त्यानंतर अजितदादांनी एकदा हो म्हटलं आणि कबड्डीचं काम झालं नाही असं कधीच झालं नाही. त्यामुळं त्यांच्यासारखा नेता हा खेळाच्या मैदानातही मोठा दिलासा देणारा ठरायचा. अजित पवारांची निर्णयक्षमताही त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि कबड्डीसाठी कणखर पाठिंबा देणारी ठरली.

जया शेट्टी आणि शशिकांत राऊत या दोघांनीही महिला कबड्डी विश्वचषकाची आठवण सांगितली. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पहिला महिला कबड्डी विश्वचषक भारतीय संघानं जिंकला होता. त्यावेळी भारतीय संघातल्या महाराष्ट्राच्या चार मुलींना राज्य शासनाकडून प्रत्येकी एक कोटी रुपयांचं इनाम मिळेल, याचं नियोजन अजित पवारांनी केलं होतं. अजितदादांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून महाराष्ट्र संघाला भरघोष निधी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं सलग पाच वर्ष महाराष्ट्राच्या सर्व वयोगटाच्या कबड्डी संघांना गणवेश आणि इतर क्रीडासाहित्य देण्याचा करार केला. कबड्डीसारख्या देशी खेळांच्या बाबतीत हे पहिल्यांदाच घडलं होतं आणि त्यात अजितदादांची भूमिका निर्णायक होती. महत्त्वाचं म्हणजे एवढ्या वर्षात त्यांनी खेळाडूंच्या निवडीत कधीच हस्तक्षेप केला नाही. तसंच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आज स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभी आहे, त्याचं सारं श्रेय हे अजितदादांना जातं, असं जया शेट्टी आणि शशिकांत राऊत या दोघांनीही सांगितलं.

नेमबाजी प्रशिक्षक विश्वजीत शिंदेंनीही अजितदादांच्या खेळांविषयीच्या आस्थेची एक गोष्ट सांगितली. पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी रेंजच्या उद्घाटनाला ते आणि उद्योगमंत्री उदय सामंत आले होते. त्यावेळी कार्यक्रम झाल्यावर त्यांनी शिंदेंना बाजूला घेतलं आणि म्हटलं की, आंतरराष्ट्रीय दर्जाची अशीच एक नेमबाजी रेंज आमच्या बारामतीतही उभारून द्या. जगात जे जे उत्तम आहे, ते बारामतीत आणण्याचा वारसाही त्यांनी शरद पवारांकडून घेतल्याचं या उदाहरणातून दिसून येतं.

बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाची नेमबाजी रेंज उभारण्याचं अजित पवारांचं एक स्वप्न जसं अधुरं राहिलं, तसंच आता पुण्याच्या बालेवाडीत त्यांच्या मनातलं महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन कोण उभं करणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र बॉक्सिंग संघटक जय कवळी सांगतात की, दादांनी बालेवाडीत सारं प्रशासकीय काम करून ठेवलंय. पण आता तिथं महाराष्ट्र ऑलिम्पिक भवनाची इमारत उभी करण्याचं डोंगराएवढं काम करायचं कोणी?

प्रश्न अवघड आहे, कारण त्याचं उत्तर द्यायला आता अजित पवार हयात नाहीत.