ती रात्र भयंकर होती. कोव्हिड वॉर्डच्या लेडीज वॉर्डमध्ये मी एकटेच होते. कारण त्यादिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास शेजारच्या आणि शेवटच्या महिलेला डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना डिस्चार्ज मिळाला याचा मला आनंदही होत होता आणि या अख्या वॉर्डमध्ये मी एकटेच शिल्लक राहिले याचं दुख:ही होत होतं. अख्खा वॉर्ड चिडीचूप होता... प्रत्येक बेडची कथा वेगळी होती. त्याबेडवर असलेल्या महिलांचा भास होत होता. मात्र ते रिकामे बेड बघून मनाला शांतता मिळत होती... कुठेतरी संख्या मी होतेय याचं समाधान होतं... मात्र जशीजशी रात्र होत होती तसतसं मन भरुन येत होतं. आज रात्रभर या वार्डमध्ये आपण एकटंच कसं राहणार? असे अनेक प्रश्न दर दोन मिनिटांना मनात येत होते मात्र शितल समोर आली आणि एका सेकंदात सगळे प्रश्न सुटले.


शितल... विशीतली मुलगी.. अगदी पहिल्या दिवसापासून अत्यंत प्रेमाने माझी काळजी घेत होती. रात्री वेळी दवाखान्यात दाखल झाल्यामुळे आणि माझी परिस्थिती नीट नसल्याने तीच मला माझी वाटू लागली. तसे जीजू होतेच...पण तिच्या प्रत्येक शब्दात धीर होता. आपल्याला लवकर बरं करण्यासाठी एक शब्दच महत्वाचा असतो. त्याच काही शब्दांचा डोस ती मला द्यायची. तिची नाईटशिफ्ट असल्यामुळे 9 वाजता मी तिची वाट बघत बसायचे. आजारपणात दिवस कसाही पार पडतो मात्र रात्र कठीण असते. 


ती आली की तिची बडबड आणि काम सुरु... रात्रीचे सलाईन, इंजेक्शन सगळं अगदी नातेवाईक असल्यासारखी काळजी घ्यायची. कोण, कधी, कशी मनावरचा भार हलका करुन जाईल याचा काही नेम नाही. आधीच माणूस दवाखान्यात एकटं आणि आता वॉर्डमध्येसुद्धा एकटं म्हटल्यावर धस्स झालं. मी एकटक वॉर्ड बघत असाताना शितलचा हळूच आवाज आला... “अगं घाबरु नकोस.... इथे कसलीच भीती नाही... आणि मी झोपेन तुझ्या शेजारच्या बेडवर आज.... काळजी करु नकोस..” तिचे हे शब्द ऐकून मीच अवाक् झाले...


मी पॉझिटिव्ह असताना... जवळ कोणाला येण्याची परवानगी नसताना ही शितल माझ्यासाठी शेजारच्या बेडवर झोपायला तयार झालीच कशी? ती माझी कोण नातेवाईक नाही. आमची ओळख नाही... तशी थोडीफार मैत्री झाली होती तरी एकच नातं होतं.... रुग्ण आणि नर्सचं....ते नातं तिनं खास निभावलं... उकाड्यामुळे मला अंगावर चादर घेऊन झोपणं कठीण होतं मात्र ती PPE कीट घालून रात्रभर झोपली...


त्या दिवसभरात डिस्चार्ज मिळणार म्हणून अनेक महिला आनंदी होत्या. त्यांच्या आनंद पाहून मला हेवा वाटू लागला. माझा डॉक्टरांना रोज एकच प्रश्न असायला.. घरी कधी सोडणार? डॉक्टरांचंही एकच उत्तर... ऑक्सिजन वाढलं की लगेच....  एक विशीतली शितल मला आईची ऊब देत होती. बाबांचा आधार देत होती. बहिणीचं प्रेम देत होती... आणि मैत्रीसुद्धा निभावत होती... या सगळ्या गोष्टी फक्त नर्सच करु शकते यावर मीच शिक्कामोर्तब केला. माणासाला माणसाची गरज भासतेच या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास बसला... खरंच नर्स, मामा, मावशी काम करतात ते काम नाहीच... ते उपकार आहेत...
तोपर्यंत शितल आणि माझी गट्टी जमली होती... बऱ्याच गप्पा झाल्या... आणि मी बिनधास्त झोपले.


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)