मागील एका आठवड्यात जवळपास 400 अंकांचा प्रवास बाजाराने बघितला. इन्कम टॅक्सची तारीख म्हणजे रिटर्न फाईल करण्याची तारीख होती, सर्व नौकरदार वर्गाने आणि स्वयं रोजगार करणाऱ्यांनी सुद्धा ही तारीख चुकवली नसणार. आम्हीच कर का भरायचा आणि आम्हाला तर काही सवलती सुद्धा मिळत नाही, ही ओरड वर्षानुवर्षे रिटर्न फाईल करताना येते. फ्री बीजच्या चक्करमध्ये आता आम्हाला कुठलाही विकास करता येणार नाही, जे निवडणुकीत कबूल केले ते पूर्ण करण्यातच आमचा राजस्वी कोष खर्च होणार, हे कर्नाटक सरकारने आल्या-आल्या जाहीर केले. विकास कामे होणारच नसतील, तर रोजगार निर्माण होणार नाही, फुकटात सगळ्या गोष्टी मिळाल्या तर कुणी काम का करणार? आणि जे काम करतात ते सुद्धा हाच पवित्रा घ्यायला मागे पुढे बघणार नाही आणि मग हे फ्री बीजचे दुष्टचक्र असेच सुरु राहील. त्यामुळे हे काही खूप काळ चालणे नाही. ह्यावर उपाय काय?? उत्तर असे आहे की, योग्य आज अचूक आर्थिक नियोजन करणे, स्वतः तर मेहनत करतच आहोत, पण आपल्या पैशाला सुद्धा मेहनतीची सवय लावायची अधिक पैसे कमवायचे आणि अधिक समृद्धी उभारून अधिक कर द्यायचा. 


नियोजन कसे करायचे ह्याबद्दल आपण आधी चर्चा केली आहे, पण मग पैसे अजून वृद्धिंगत कसे करायचे? शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हे दोन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पर्याय आहेत, म्युच्युअल फंडमध्ये नेमके कसे करायचे, हे आपण पुढे बघू त्या आधी काही भागांमध्ये जरा शेअर बाजारात कशाप्रकारे कंपनी शोधता येते. बहुतांश वेळा आपल्याला स्वस्त शेअर हवा असतो, बाजारात त्याला पेनी स्टोकस म्हणतात, पण सावधान प्रत्येक वेळी पेनी स्टोकस चालतीलच असे नाही. काही लोकांचा हा पण अनुभव असेल कि नेमका आपण खरेदी केलेला शेअर दुसऱ्या दिवशी कमीच होतो. ह्याला उत्तर किंवा पर्याय काय? यासाठी काही सूत्र पाळायलाच हवी, ती खालीलप्रमाणे, 


शेअर बाजार एक जलद श्रीमंत होण्याचे साधन नाही


एक गाठच मनाशी पक्की करायला हवी की, शेअर बाजार हा दीर्घावधीचा पर्याय आहे. इथे एकरात्रीत कुणीच श्रीमंत होत नाही. त्यामुळे इथे गुंतवणूक करताना ही दीर्घावधीचीच असायला हवी. जे लोक दीर्घावधीसाठी थांबले त्यांनी पैसे कमवले. 


शेअर बाजारात नव्या गुंतवणूकदाराने ट्रेडिंग करणे धोक्याचे


बरेचदा गुंतवणूकदारांना रोज ट्रेडिंग करून झटपट श्रीमंत व्हायचे असते. हे खरेदी करा, हे विका आणि त्यातून नफा कमवा. शेअर बाजार हे एक विज्ञान आहे. पण ते दीर्घावधीमध्ये, लघु अवधीमध्ये कुठलाही निकष तुम्हाला जवाबदारीपूर्वक नवा कमावून देण्याची गॅरेंटी देऊ शकत नाही. मुळात गॅरेंटी हा शब्दच वापरणे शेअर बाजारात कायद्यांनी गुन्हा आहे आणि डेली ट्रेडिंग करून आजवर कुणी सातत्याने पैसे कमावलेले दिसणार नाही. वर्षानुवर्षांचा अनुभव असेल तर आणि तरच एखाद्या दिवशी ट्रेडिंग करण्यात काही हरकत नाही. 


टिप्सवर अवलंबून काहीही काम करू नये


कुणी कितीही सांगितले की, आम्ही इतके टक्के परतावा देण्याच्या टीप देतो त्यासाठी महिन्याचे इतके घेतो. तर ते शक्य नाही. 2/4 महिने खेळ चालतो. नंतर, मात्र सगळेच गायब. एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे, जर का कुठला शेअर चालेल हे कुणाला पक्के माहित असते तर कुणी दुसऱ्याला का सांगेल? ते केवळ माहिती विकतात आणि माहिती विकणे हा त्यांचा व्यवसाय असतो. त्यामुळे ह्यापासून दूर राहावे. 


युट्युबच्या तथाकथित एक्स्पर्टसपासून सावध राहावे


कोविडनंतर युट्युबचे चलन फार वाढले आहे. प्रत्येक जण झटपट श्रीमंतीचे विविध उपाय सुचवत असतो आणि त्यांच्या जाळ्यात आपण अडकतो. त्यापासून सावध राहावे. 


कर्ज काढून शेअर बाजारात पैसे लावू नये आणि रुमर्स वर विश्वास ठेऊ नये.


मुळात भारतात, 'पता है क्या शर्माजी ने ये शेअर मे पैसे डाले और दुगने होगये', अशा बातम्यांवर खूप विश्वास ठेला जातो. एकाची कानगोष्ट दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला सांगितली जाते. पण कुणालाही माहित नसते कोण शर्माजी. त्यात कर्ज काढून पैसे टाकले तर त्याची काहीही गॅरेंटी नसते की ते वाढतीलच. कारण मुळात त्या सगळ्या बातम्या ऐकलेल्या असतात. काहीही लॉजिकशिवाय असे पैसे गुंतवल्यास नुकसानीची दाट शक्यता असते. तेव्हा आपल्या हाती मग व्याजासकट पैसे परत करण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही. तेव्हा चुकूनही कर्ज कधी बाजारात पैसे गुंतवू नये आणि ऐकिवात असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. 


लक्ष्मी आपल्या घरी आणायची असेल तिला निमंत्रण द्यायचे असेल तर सरस्वतीची उपासना करणे आवश्यक  आहे. शेअर बाजारात पैसे बनतात पण आधी बोलल्याप्रमाणे त्यामागे विज्ञान आहे. ते समजणे महत्वाचे आहे. पैशाची एक भाषा आहे, ती शिकणे महत्वाचे आहे. अंडी ती एकदा आली तर पैसेच-पैसे कमावून आपल्यासाठी आणू शकतात. तेव्हा शेअर बाजारात कसे पैसे कमवायचे, हे तर आपण शिकणार आहोतच. पण, आज काय करू नये हे आपण बघितले... तेव्हा वरील सूचनांचा स्वीकार करा आणि अभ्यासाची तयारी करूया, लक्ष्मीला सणावाराच्या दिवसात निमंत्रण देऊया आणि दिवाळीला खऱ्या अर्थ्याने लक्ष्मीपूजन करूया बघा पटतंय का?