Continues below advertisement

BLOG : निवडणूक मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोदी-शाहांच्या जोडीला रोखण्यासाठी सगळ्यात आधी 2015 साली नितीश-लालू यांनाच एकत्र यावं लागलं होतं.. म्हणायला काँग्रेसही सोबत होतीच. पण मुख्य भूमिकेत नितीश-लालू होतेच.. पण, पलटुराम म्हणून बिहारच्या राजकारणात ज्यांचा उल्लेख अनेक दशकं केला जाईल त्या नितीश कुमारांनी 2017 साली एक पलटी मारली आणि 2020 सालच्या विधानसभेचं गणित बदललं..

लालू यादवांचे पूत्र तेजस्वी यादव... आपलं नेतृत्व सिद्ध करत होते.. नितीश कुमारांनी साथ सोडली म्हणून पारंपरिक मित्र काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढली.. मात्र, तेजस्वी यादवाचा पक्ष सोडला तर त्यांच्या महागठबंधनला नावानुसार कामगिरी करता आली नाही.. परिणामी नितीश-मोदींच्या एनडीएचं सरकार आलं. आता एकदा जेव्हा माणूस चुकतं तेव्हा आपण त्याला चूक म्हणतो. मात्र, एकच चूक वारंवार करणाऱ्याला काय म्हणावं... किंवा जर एकच चूक वारंवार केली तर त्याला गुन्हा म्हटला पाहिजे की नाही.. आता ते तुम्ही तुमचं ठरवा.. पण हा उल्लेख का महत्वाचं आहे तर त्यासाठी आजचा निकालातून समजून येतं.

Continues below advertisement

बिहारमध्ये एनडीएनतर क्लीनस्वीप केलंय.. 200 पेक्षा जास्त जागा जिंकत सगळ्या एक्झिट पोल्सलाही मागे टाकत मोदी-नितीश जोडीनं इतिहास घडवलाय.. याच निकालानंतर दोन प्रमुख चर्चा सुरु झाल्या... पहिली अर्थात मुख्यमंत्री कोण होणार..? कारण, प्रचारात नितीश कुमाराच्याच नेतृत्वात निवडणुका लढतोय असं महायुतीनं उघडपणे दाखवलं.. तरीही निकालानंतरच मुख्यमंत्रि‍पदावर शिक्कामोर्तब होईल असंच चित्र होतं..

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्या नेतृत्वातच 2024 च्या विधानसभा महायुतीनं लढल्या. मात्र, निकालानंतर 132 जागा जिंकणाऱ्या भाजपनं मुख्यमंत्रिपदावर दावा केला.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले.. ही धाकधुक नितीश कुमारांनाही असेलच.. पण, तरीही नितीश कुमार काहीसे निश्चित होते.. कारण, दिल्लीतील मोदी सरकारला त्याच्यात 12 खासदारांचा टेकू आहे.. त्यामुळे पाटण्यात जास्त जागा जिंकूनही मोदीजी इतक्यात तरी नितीश कुमारांना मुखमंत्रीपदापासून दूर ठेवण्याची रिस्क घेतील असं वाटतं नाही.. म्हणून तुर्तास तरी हे म्हणू शकतो की नितीश कुमारांचा दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल..

आता दुसरी चर्चा... म्हणजे विजयाचा विश्वास असलेल्या तेजस्वी यादवांचा कोणता निर्णय चुकला? खरंतर सक्षम लोकशाहीसाठी एक सक्षम विरोधीपक्ष असणं गरजेचं असतं.. महाराष्ट्रात विरोधकांची जी स्थिती आहे.. तिच स्थिती आता बिहारधील विरोधकांची बनलीय. त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो की विजयाचा विश्वास असलेल्या तेजस्वी यादवांचा कोणता निर्णय चुकला? तर याच्या उत्तराच्या यादीत सर्वात पुढे असेल.. काँग्रेससोबतची आघाडी... जागावाटपातील घोळ...

असं असलं तरीही तेजस्वी यादवांसारख्या संघर्ष करणाऱ्या तरुण नेत्याचा इतका दारुण पराभव का झाला.. तर अनेक जण म्हणतीलही सत्ताधाऱ्यांनी जवळपास दीड कोटी महिलांना थेट 10 हजारांचं वाटप करत.. मास्टरस्ट्रोक खेळला होताच.. त्यामुळेच त्यांचा दारुण पराभव झाला असेल.. पण, तरीही तेजस्वी यादवांच्या वाटल्या इतक्या कमी जागा येतील.. याचा अंदाज कोणीही लावला नव्हता..

मतमोजणीसुरु होण्याआधीच तेजस्वींनी 18 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी घोषणाही केली होती.. मात्र, निकाल असे लागलेत की त्यांना विरोधी पक्षनेतापदही मिळणं मुश्किल बनलंय.. इन शॉर्ट महाराष्ट्रासारखी लॅण्डस्लाईट व्हिक्ट्री बिहारमध्ये महायुतीनं मिळवलीय.

तेजस्वी यादवांच्या संघर्षाला यश मिळालं नाही.. त्यात सर्वात प्रमुख कारणं ठरलं.. ते म्हणजे संपूर्ण प्रचारात काँग्रेसची उदासिनता.. हे म्हणावं लागतंय.. कारण, भाजपनं केंद्रीय मंत्र्यांची फौज महिनाभर बिहारमध्ये प्रचारात उतरवली.. इतकंच नाही भाजपशासित राज्यांच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी 15 पेक्षा जास्त सभा घेतल्या..

योगी, नड्डांनी तर 30-30 सभा घेतल्या.. इतकंच नाही तर भाजपशासित राज्यांमधील बड्या नेत्यांनीही बिहारमध्ये प्रचारात उतरवलं.. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही बिहारमध्ये महायुतीचा प्रचार केला.. याच झंझावाती प्रचारात मोदी-शाहांनी 50 एक सभा घेतल्या.. प्रचाराचं मॅनेजमेंट इतकं स्ट्राँग होतं.. की संपूर्ण प्रचारात मोदी-नितीश कुमारांनी फक्त एका सभेत मंच शेअर केला.. कारण, दोन बडे नेता एकत्र असण्यापेक्षा दोन मतदारसंघात पोहोचले तर फायदा होईल.. आता इतकं बारीक बारीक प्लॅनिंग केलं असेल तर असे निकाल लागूच शकतात..

जे एनडीएनं केलं.. तेच महागठबंधनला करता आलं नाही.. कारण.. जिथं तेजस्वी यादवांनी 183 सभा घेतल्या... इतर कोणत्याही राजकीय नेत्यांपेक्षा शंभराहून जास्त हा आकडा होता.. तिथं तेजस्वी यादवांचा सर्वात मोठा मित्र असलेल्या काँग्रेसकडून इतका प्रभावी प्रचार दिसला नाही.. आकड्यामध्ये सांगायचं तर जिथं भाजपच्या बड्या नेत्यांनी कमीत कमी 30 सभा घेतल्या.. तिथं काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधींनी फक्त 20 सभा घेतल्या.. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी 5 एक तर प्रियांका गांधींनीही 15 च्या आसपास सभा घेतल्या..

जागावाटपात 61 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी 61 सभाही घेतल्या नाहीत.. ना एकाही काँग्रेसशासित राज्याचा मुख्यमंत्री इकडे फिरकला किंवा तळ मांडून राहिल्याचं दिसलं नाही.. कर्नाटकात भाजपला पाणी पाजणारे काँग्रेसचे चाणक्य डी.के. शिवकुमारही इथं दिसले नाही.. उलट काँग्रेस प्रभाऱ्यांच्या उचलबांगड्याच्याच बातम्यांनी प्रचार गाजला.. त्यांच्यापेक्षा जास्त अखिलेश यादवांनी प्रचार केला.. असो.. काँग्रेसच्या याच कामगिरीचा परिणाम तर होणारच ना...

आज कदाचित राजदच्या अनेक नेत्यांना वाटत असेल की एकटे लढलो असतो तर थोडा जास्त फायदा झाला असता.. पण आता काय... असं असलं तरी बिहारच्या याच निकालाचा महाराष्ट्रात परिणाम दिसू लागलाय.. काँग्रेसच्या भूमिकेवर महाराष्ट्रातील मित्रपक्षांनीही उघडपणे भाष्य़ करायला सुरुवात केलीय.. जास्त जागा मागायच्या... आणि परफॉर्मन्स मात्र जेमतेम दाखवायचा... असं म्हणत मित्रपक्षांनी काँग्रेसला टोचायला सुरुवात केलीय.

हे इतक्यात थांबेल असं मात्र दिसत नाही.. त्यामुळेच की काय राष्ट्रीय जनता दल असो.. राष्ट्रीय काँग्रेस असो... प्रत्येक विरोधी पक्षाला थेट मतदारांशी कनेक्ट करणं... त्यांच्या मतप्रवाह आपल्या बाजूनं करणं.. यासाठी ठोस कार्यक्रम आखावे लागतील.. फक्त पार्टटाईम पॉलिटिक्स करुन निवडणुका जिंकता येत नाही.. आणि पार्टटाईम पॉलिटिक्सनं फक्त स्वताच्याच पक्षाचं नाही तर मित्रपक्षाचंही नुकसान होतं.. हेही बिहार निकालानं दाखवून दिलं..

तूर्तास नितीश कुमारांना शुभेच्छा... आणि Better Luck Next Time तेजस्वी... You fougth well...